जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 21 June 2018

शरीर निरोगी राहण्यासाठी योगा करणे आवश्यक - डॉ.कादंबरी बलकवडे

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा




        मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
       इंदिरा गांधी स्टेडियम येथे आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भूजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, योगा व प्राणायाम केल्याने मनुष्याचा शारिरीक, मानसिक व अध्यात्मिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी कुटूंबासह योगा करावे, त्यामुळे समाज निरोगी होण्यास मदत होईल. योगा केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन संतुलीत राहते तसेच शरीराचे पुनर्जागरण होत असते. योगासनामुळे शरिराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अनेक कामे वेळीच पार पाडण्यास मदत होते. योगासनामुळे मनुष्य निरोगी राहतो व शरीर बळकट बनते आणि काम करण्यास उत्साह निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी योगा निरंतर करीत राहावे असे त्यांनी सांगितले.
      यावेळी योग प्रशिक्षकांनी प्रात्यक्षिकाद्वारे शवासन, वज्रासन, शशाकासन, मंडूकासन, मक्रासन, भूजंगासन, सेतूबंधासन, उत्तानपादासन, पदमासन, सुखासन, ध्यान मुद्रासन, ताडासन, वृक्षासन, कपालभाती, नाडी शोधन प्राणायाम, शितली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम उपस्थितांकडून करवून घेतली व योगासनाचे महत्व पटवून दिले.
       प्रारंभी वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल विश्व गायत्री परिवार, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती, रामकृष्ण सत्संग मंडळ, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट, योग मित्र मंडळ, पोलीस विभाग यांचे सहकार्य लाभले.
       कार्यक्रमाचे संचालन डॉ.नागेश गौतम यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.प्रशांत कटरे यांनी मानले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सांख्यिकी अधिकारी तुलसीदास झंझाड, नेहरु युवा केंद्राचे अधिकारी श्री.धुवारे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment