जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 30 April 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

        महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदीप भिमटे, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर, नायब तहसिलदार श्री.चिचघरे, सोमनाथ माळी, प्रभारी अधीक्षक आर.एस.पटले, जिल्हा सैनिक कल्याण संघटक जगदिश रंगारी, नाझर श्री.लिल्हारे, श्री.मेनन, आकाश चव्हाण, अश्विनी पवार, स्मिता शेठे, भारती चव्हाण, चैताली मानकर, अंशुल हिरकने, संतोष शेंडे, श्री.राऊत, श्री.नाकाडे, श्री.हेमने, श्री.गुरुबेले, श्री.सोनवणे, श्री.रोकडे, श्री.भोवते यांची उपस्थिती होती.

00000

महाराष्ट्र दिन साजरा पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण



                                                     महिला प्लाटूनने केले पथसंचलन
 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते 1 मे रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर करण्यात आले. पालकमंत्री बडोले यांनी राष्ट्रध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
      पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे आजच्या पथसंचलनात सर्व महिला प्लाटूनचा समावेश होता. परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक दिपाली खन्ना यांनी पथसंचलनाचे नेतृत्व केले. या पथसंचलनात पोलीस मुख्यालयाच्या महिला प्लाटूनचे नेतृत्व सहायक पोलीस निरीक्षक शितल जाधव, पोलीस ठाणे महिला प्लाटूनचे नेतृत्व नक्षल सेलच्या पोलीस उपनिरीक्षक राधिका कोकाटे, जलद प्रतिसाद पथकाचे नेतृत्व डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक निशा वानखेडे, पोलीस ठाणे महिला प्लाटूनचे नेतृत्व गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक संध्या सोमनकर, दंगा नियंत्रण पथकाचे नेतृत्व दर्शना राणे, नेहा मांडवे, होमगार्ड महिला प्लाटूनचे नेतृत्व श्रीमती जी.पी.बल्ले, नूतन विद्यालयाच्या भावना समुंद्रे यांनी केले.
      या पथसंचलनात निर्भया पथक, फिरते न्याय वैद्यक पथक, श्वान पथक, बाँब शोधक पथक, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, बिट मार्शल, बँड पथक व रुग्णवाहिका यांचा सहभाग होता. यावेळी महिला स्वयंसुरक्षा प्रात्यक्षिकेत पोलीस शिपाई कमांडो मार्शल आर्ट ट्रेनर जनार्धन कुसराम यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस रिना चौव्हाण व आशा मेश्राम यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आली. या प्रात्यक्षिकात दिक्षा तांडेकर, सरिता लिल्हारे, प्रियंका निनावे, पल्लवी गजभिये, अनिता राऊत, मेघा उईके, प्रियंका मिश्रा, रोशनी चौव्हाण, ज्योत्सना बांडेबुचे, जयश्री चवळे, शितल चवळे व संगीता कल्लो यांनी सहभाग घेतला. नक्षलवादयांविरुध्द लढणे, छेडखानीविरुध्द लढणे यासह अनेक प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली.

       कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले. 

Saturday 28 April 2018

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे - जिल्हाधिकारी काळे


भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
     भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
        भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 28 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेवून निवडणूकीसंदर्भात माहिती दिली, त्यावेळी श्री.काळे बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री.काळे पुढे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधिची अधिसूचना जारी करण्यात आली असून आचारसंहितेची माहिती सुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे. सदर अधिसूचनेद्वारे 3 मे रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिध्द करणे, 10 मे- अर्ज भरण्याची मुदत, 11 मे- उमेदवारी अर्जाची छाननी करणे, 14 मे- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, 28 मे रोजी मतदान व 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
        या निवडणूकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. ही लोकसभा पोटनिवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षीत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
        बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) शुभांगी आंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, नायब तहसिलदार (निवडणूक) राजश्री मलेवार, तसेच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतदारांची माहिती
विधानसभा मतदारसंघाचे नाव
पुरुष
स्त्री
एकूण
63 - अर्जुनी मोरगाव
124125
121647
245772
64 - तिरोडा
121816
123303
245119
65 - गोंदिया
150147
154679
304826
                 एकूण
396088
399629
795717
मतदान केंद्राची माहिती
विधानसभा मतदारसंघाचे नाव
मतदान केंद्र
सहा. मतदान केंद्र
एकूण
63 - अर्जुनी मोरगाव
305
-
305
64 - तिरोडा
288
1
289
65 - गोंदिया
335
10
345
                 एकूण
928
1
939
 मतदान पथकासाठी लागणारे मनुष्यबळ
1
मतदान केंद्राध्यक्ष प्रत्येकी 1 प्रमाणे
(एकूण मतदान केंद्राची संख्या 939 + 10 % प्रमाणे)
1033
2
मतदान अधिकारी प्रत्येकी 3 प्रमाणे
(एकूण मतदान केंद्राची संख्या 939 + 10 % प्रमाणे)
3099
3
पोलीस शिपाई प्रत्येकी 1 प्रमाणे
939
4
पाणी वाटप कर्मचारी प्रत्येकी 1 प्रमाणे
939
00000

Wednesday 25 April 2018

मलेरीयावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा - रमेश अंबुले



जागतिक हिवताप दिन साजरा
     सांडपाण्याची योग्य विल्हेवाट केली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरीयासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरीयावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा. असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण स‍मिती सभापती रमेश अंबुले यांनी केले.
       25 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात जागतिक हिवताप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री.अंबुले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी श्री.राऊत, पत्रकार एच.एच.पारधी यांची उपस्थिती होती.
       मलेरियासारख्या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्ष राहावे असे सांगून श्री.अंबुले म्हणाले, सांडपाणी रस्त्याने वाहणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. ज्यांनी मलेरीया निर्मुलनासाठी चांगले काम केले आहे ते अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्रीमती दोनोडे म्हणाल्या, आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजना आहेत. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. डासांची उत्पत्तीच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाने ज्या गावामध्ये डास आहेत तेथे नियमीत फवारणी करावी, त्यामुळे मलेरियासारखे आजार होणार नाही असे त्यांनी सांगितले.
        श्री.पातुरकर म्हणाले, कुटूंब कल्याण व मलेरीया निर्मुलन कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून सुरु आहे. नियोजनात चुका झाल्या की रुग्णांच्या प्रमाणात वाढ होते. आरोग्य सेवा झपाट्याने या रोगावर मात करण्यासाठी काम करीत आहे. कायाकल्प योजना व लोकसहभागातून आरोग्य विभाग मलेरीया या आजारावर मात करण्यासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
      डॉ.निमगडे म्हणाले, हिवताप हा आजार राज्याच्या काही भागात आहे. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्यामुळे आणि शेजारी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य लागून असल्यामुळे कामानिमित्त स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: जिल्ह्यातील देवरी व सालेकसा तालुक्यातील या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. मलेरियाच्या डासापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे सुध्दा या भागात वितरण करण्यात आले आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन केले तर डासाची उत्पत्ती होणार नाही व या आजारावर मात करता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.वाळके म्हणाले, मच्छरांपासून हा आजार होतो. मलेरियामुळे विकासात अडथळा निर्माण झाला आहे. या आजारावर मात करण्यासाठी आबाल वृध्दांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
       यावेळी मलेरीयाच्या निर्मुलनासाठी उत्कृष्ट कार्य करणारे दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ओ.जी.थोटे, डॉ.नरेश येरणे, मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.विजय पटले, ककोडीचे डॉ.गजानन काळे, केशोरीचे डॉ.पिंकू मंडल, धाबेपवनीचे डॉ.ए.बी.हजारे, खोडशिवनीचे डॉ.खोटेले, शेंडाचे डॉ.डुंभरे, तसेच प्रत्येक तालुक्यातील 3 आशा कार्यकर्ती, 1 आरोग्य सहायक, 1 आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक व 1 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा व काही पत्रकार बांधवांचा पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार बांधव, आशा सेविका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, संचालन किशोर भालेराव यांनी केले. उपस्थितांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा येळे यांनी मानले.

Tuesday 24 April 2018

प्रत्येकाने उष्माघातापासून संरक्षण करावे - डॉ.देवेंद्र पातुरकर



उष्माघात व अग्नीसुरक्षा बाबत कार्यशाळा
• प्रात्यक्षिकाचे सादरीकरण
      उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर जातांना तीव्र तापमानामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. उन्हामध्ये बाहेर जातांना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेवून उष्माघातापासून आपले संरक्षण करावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांनी केले.
       23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात उष्माघात व अग्नीसुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, तहसिलदार सर्वश्री रविंद्र चव्हाण, विठ्ठल परळीकर, सी.आर.भंडारी प्रामुख्याने उपस्थित होते.
      डॉ.पातुरकर पुढे म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे. जास्त तापमानामुळे तीव्र उन्हाचा मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. अशावेळी उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
      डॉ.निमगडे म्हणाले, जास्त तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांची योग्य ती काळजी घेवून उष्माघात होणार नाही यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.
      श्रीमती खन्ना म्हणाल्या, पोलीस विभागातील विविध पथकांच्या माध्यमातून विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलीस विभाग सदैव सज्ज असल्याचे सांगितले.
     कार्यशाळेत अदानी प्रकल्पाचे अग्नीशमन अधिकारी त्रिलोकसिंग पांचाळ यांनी आग प्रतिबंधक उपाययोजनाबाबत आपत्ती व्यवस्थापनात प्राथमिक उपाययोजना कशाप्रकारे कराव्यात तसेच उपलब्ध साधनांच्या आधारे आपत्तीत जखमी झालेल्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी नेण्याची उपाययोजना, तसेच या काळातील प्रथमोपचार कशा पध्दतीने करता येईल याबाबतची विस्तृत माहिती सादरीकरणातून उपस्थितांना दिली.
      डॉ.हेमंत आळीकने यांनी उष्माघातापासून संरक्षण कसे करावे याबाबत सादरीकरणारे विस्तृत माहिती दिली. जसे- श्रमिकांनी उन्हामध्ये जास्त श्रमाची कामे करणे टाळावे, उन्हात बाहेर निघतांना डोळ्यावर गॉगलचा वापर करावा. उन्हाळ्यात शक्यतो सकाळी व संध्याकाळी असे दोनदा आंघोळ करावी. जेणेकरुन तीव्र तापमानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उष्माघातापासून बचाव होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
      एलपीजी गॅस वितरक अरविंद नागदेवे यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचा तसेच शेगडी व रेग्युलेटरचा महिलांनी कशाप्रकारे योग्य वापर करावा याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच महिलांनी गॅस शेगडी व रेग्युलेटरचा उपयोग काळजीपूर्वक करावे असे सांगितले. सिलेंडर गॅसचे वजन 14.2 असते. सिलेंडर कधीही एक्सपायर होत नाही. गॅस शेगडी ही आय.एस.आय.मार्कची असणे आवश्यक आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा विमा असतो. दुर्घटना झाल्यावर कंपनीमार्फत विमा देण्याची तरतूद आहे. गॅस सिलेंडर दुर्घटनेमुळे एखादयाचा मृत्यू झाल्यास योग्य ती पडताळणी करुन लाभार्थ्याला विमा कंपनीतर्फे 6 लाख रुपये विमा देण्यात येतो. गॅस शेगडीचा पाईप पाच वर्षात एक्सपायर होत असतो. गॅस शेगडीचा वापर करतांना रेग्यलेटरला नेहमी बंद करुन ठेवावे. जेव्हा काम असेल तेव्हाच रेग्युलेटर सुरु करावे अन्यथा बंद करुन ठेवावे असे त्यांनी सांगितले.
      कार्यशाळेला पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.बबन मेश्राम, पत्रकार एच.एच.पारधी व अपुर्व मेठी तसेच महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस विभाग व जिल्ह्यातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. उपस्थितांचे आभार लेखाधिकारी लखीराम बाविस्कर यांनी मानले.
आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके
        इमारतीला आग लागल्यास कशाप्रकारे आगीवर नियंत्रण मिळवावे याची प्रात्यक्षिके उपस्थितांसमोर अग्नीशमन यंत्राद्वारे अदानी प्रकल्पाचे अग्नीशमन अधिकारी श्री.त्रिलोकसिंग पांचाळ व विवेक शांडिल्य यांनी करुन दाखविले. गजबजलेल्या ठिकाणी आग लागल्यास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दुचाकी अग्नीशमन वाहनाद्वारे आगीवर कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येईल याची प्रात्यक्षिके नगरपालिका विभागाचे सहायक अग्नीशमन अधिकारी छबीलाल पटले व जितेंद्र गौर यांच्या सहकाऱ्यांनी करुन दाखविले. तसेच उपस्थितांकडून अशाप्रकारचे प्रात्यक्षिके सुध्दा करवून घेतली. प्रात्यक्षिकाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, तहसिलदार सर्वश्री सी.आर.भंडारी, विठ्ठल परळीकर, रविंद्र चव्हाण, नायब तहसिलदार सोमनाथ माळी, जिल्हा माहिती कार्यालयाचे के.के.गजभिये, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                             

Friday 20 April 2018

उत्कृष्ट कामगिरीसाठी संघटीत प्रयत्न करा - जिल्हाधिकारी काळे



ग्राम स्वराज अभियानातून कुंभारटोलीत ग्रामस्थांशी संवाद
      कुंभारटोली या गावाने वनांचे संरक्षण व पर्यावरण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. तसेच इतर क्षेत्रात सुध्दा या गावाने चांगले काम केले आहे. ग्राम स्वराज अभियानात या गावाने केंद्र सरकारच्या सातही योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. देशात या अभियानात उत्तम कामगिरी केल्याचा नावलौकीक मिळविण्यासाठी गावकरी, पदाधिकारी व अधिकारी यांनी संघटीत प्रयत्न करावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथे 20 एप्रिल रोजी ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत केंद्र सरकारचे नोडल अधिकारी श्रीमती फरीदा नाईक व श्री.जितेंदर कुमार यांनी भेट देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी काळे बोलत होते. माजी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, ग्राम स्वराज अभियानाचे नोडल अधिकारी श्रीमती फरीदा नाईक, श्री. जितेंदर कुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई, अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, पं.स.सदस्य लोकेश अग्रवाल, गटविकास अधिकारी अशोक पाटील, सरपंच सुनंदा येरणे, नायब तहसिलदार श्री.पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री.काळे म्हणाले, 20 एप्रिल हा उज्वला दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे. स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी आणि महिलांना स्वयंपाक करतांना धुरापासून मुक्ती मिळण्यासाठी गावातील कोणतेही कुटूंब उज्वला गॅस योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता या अभियानादरम्यान घ्यावी. ज्यांना आजपर्यंत गॅस कनेक्शन मिळालेले नाही त्यांना या अभियानात गॅस जोडणी देण्यात यावी. शौचालय बांधून उपयोग होणार नाही तर त्याचा उपयोग प्रत्यक्षात करण्यात यावा. वयोवृध्द नागरिकांच्या मदतीसाठी सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
    श्रीमती मेंढे म्हणाल्या, जिल्ह्यात अधिकारी आणि पदाधिकारी योग्य समन्वयातून काम करतात. कुंभारटोलीच्या अनेक समस्या सोडविण्यात आल्या आहे. त्या माध्यमातून ग्रामस्थांना अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. वनग्रामच्या माध्यमातून कुंभारटोलीने चांगले काम केले आहे. ग्राम स्वराज अभियानाच्या योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी गावात झाली पाहिजे. गावातील कोणताही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही याची दक्षता घेतली जावी असेही त्या म्हणाल्या.
       श्री.सवई म्हणाले, 20 एप्रिल हा उज्वला दिवस आहे. महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी ही योजना आहे. जिल्ह्यात 46 हजारपेक्षा जास्त कुटूंबांना या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. कुंभारटोली येथे 890 घरांपैकी 867 कुटूंबांकडे गॅस कनेक्शन असून उर्वरित 23 कुटूंबांना या अभियानादरम्यान 100 रुपयात कनेक्शन देवून हे गाव धूरमुक्त करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
      सरपंच श्रीमती येरणे म्हणाल्या, गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्ते, नाल्या, घनकचरा व्यवस्थापन करण्यात आले आहे. गावातील वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गाव विकासाला गती मिळाली आहे. 14 व्या वित्त आयोगातून दिव्यांग बांधवांना साहित्य दिले आहे. अंगणवाड्यांची दुरुस्ती, सौर ऊर्जेतून वीज पुरवठा, पंखे, लाईट तसेच तसेच बालकांना शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी अंगणवडीला आर.ओ.मशीन देखील लावण्यात आली आहे. मनरेगा योजनेतून 300 लोकांना रोजगार सुध्दा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी केंद्र सरकारचे नोडल अधिकारी श्रीमती फरीदा नाईक व श्री.जितेंदर कुमार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ घेण्याचे उपस्थित ग्रामस्थांना आवाहन केले.
    उज्वला दिवसाचे औचित्य साधून कुंभारटोली येथील निवृत्तीबाई बंसोड, वच्छला भावे, सरिता मडावी या महिलांना गॅस कनेक्शनचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. ज्यांनी बँक खाते उघडलेले नाही अशांसाठी बँक ऑफ इंडिया शाखा आमगावच्या वतीने खाते उघडण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या तीन योजनांचा गावातील प्रत्येक व्यक्तीने लाभ घ्यावा. यासाठी अर्ज भरुन घेण्यासाठी स्टॉल देखील लावण्यात आला. यावेळी स्टॉलला जिल्हाधिकारी काळे यांनी भेट दिली. गावातील काही कुटूंबांच्या शौचालयांची देखील मान्यवरांनी पाहणी केली.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अशोक पाटील यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी श्री.रहांगडाले यांनी तर उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार श्री.पवार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कुंभारटोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday 19 April 2018

केंद्राच्या योजनांचा लाभ घेवून समृध्द व्हा - डॉ.राजा दयानिधी



येरंडी येथे ग्राम स्वराज अभियान
    केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान जिल्ह्यातील तीन गावात ग्राम स्वराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेवून समृध्द व्हावे. असे प्रतिपादन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले.
       ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील येरंडी/देवल येथे 19 एप्रिल रोजी केंद्र सरकारचे या अभियानाचे नोडल अधिकारी श्रीमती नाईक व श्री. राजेंदर कुमार यांनी भेट दिली. यानिमित्ताने ग्रामस्थांशी संवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ.दयानिधी बोलत होते. यावेळी केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानाच्या नोडल अधिकारी फरीदा नाईक, श्री. राजेंदर कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.सदस्य गिरीष पालीवाल, पं.स.उपसभापती करुणा नांदगाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री राजेश बागडे, राजेश राठोड, भिमराव पारखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, सरपंच रेखा खोब्रागडे, तहसिलदार श्री.भंडारी, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
      डॉ.दयानिधी म्हणाले, यापुर्वी केंद्र सरकारच्या या योजनांचा गावातील ज्या कुटूंबांना लाभ मिळालेला नाही त्यांनी या अभियाना दरम्यान लाभ घ्यावा. सर्वांचे सहकार्य व सर्वांचा सहभाग या अभियानात आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या तीन योजनांचा गावातील प्रत्येक व्यक्तीने लाभ घ्यावा. यासाठी प्रत्येकाने बँक खाते काढावे. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत गावातील कुठलाही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे त्यांनी सांगितले.
    श्रीमती नाईक म्हणाल्या, जिल्ह्यातील यंत्रणा या अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे. केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत असलेल्या सात योजनांचा लाभ गावातील प्रत्येक कुटूंबांनी घेतला पाहिजे, यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यास तसेच मार्गदर्शन करण्यास आपण आल्याचे त्यांनी सांगितले.
      विमा योजनेचा लाभ येरंडी ग्रामस्थ कमी प्रमाणावर घेत असल्याचे दिसून आले आहे असे सांगून श्रीमती नाईक म्हणाल्या, ग्रामस्थांनी स्वत:चे आरोग्य व सुरक्षेचा विचार करुन या विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी बँकेचे अधिकारी-कर्मचारी आपल्या गावात आले आहे. गावातील प्रत्येक घरी एलईडी बल्ब असले पाहिजे, त्यामुळे वीज बिलात बचत होते. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनी योजनेच्या लाभातून शौचालय बांधून घ्यावे. शौचालयाचा वापर देखील कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने करावा असेही त्या म्हणाल्या.
    श्री.जितेंदर कुमार म्हणाले, केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत ज्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळणार आहे त्यामाध्यमातून ग्रामस्थ समृध्द होण्यास मदत होणार आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीने या योजनांचा लाभ घ्यावा. कुणीही उघड्यावर शौचास बसणार नाही याची प्रत्येकाने शपथ घ्यावी आणि स्वच्छतेला महत्व दयावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रारंभी केंद्र सरकारचे नोडल अधिकारी श्रीमती नाईक व श्री.राजेंदर कुमार यांनी हेमराज रामटेके या लाभार्थ्याच्या घरी जावून आवास योजनेच्या घरकुलाचे भूमीपूजन केले तर धीरज पंचभाई या लाभार्थ्याच्या घरी शौचालय बांधकामाचे भूमीपूजन केले.
      यावेळी वीज वितरण कंपनीने सौभाग्य योजनेअंतर्गत 19 कुटूंबांना वीज जोडणी तर उजाला योजनेअंतर्गत ग्रामस्थांनी 28 एलईडी बल्ब खरेदी केल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री.लिमजे यांनी दिली. येरंडी गावात 56 कुटूंबांकडे बँक खाते नसून त्यांचे बॅंक खाते या अभियानादरम्यान काढणार असल्याची माहिती देना बँकेचे अधिकारी श्री.मिश्रा यांनी दिली. गावातील 246 कुटूंबांकडे गॅस कनेक्शन असून 93 कुटूंबांना गॅस कनेक्शनचे वाटप या अभियानादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार श्री.भंडारी यांनी दिली. गावातील एक बालक बाहेरगावी असल्यामुळे लसीकरणापासून वंचित आहे, त्याचेही लवकरच लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे मिशन इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत यांनी सांगितले.    
      यावेळी नोडल अधिकारी श्रीमती नाईक व श्री.राजेंदर कुमार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला येरंडी येथील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ, तालुक्यातील विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी, सर्व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी तर उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी आर.डी.वलथरे यांनी मानले.

Wednesday 18 April 2018

शाश्वत विकासातून घोगरा आदर्श करणार - आ.विजय रहांगडाले

घोगरा येथे ग्राम स्वराज्य अभियान सभा
• केंद्राच्या विशेष प्रतिनिधींचा ग्रामस्थांशी संवाद


    जिल्ह्यातील तीन गावांची निवड सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने करण्यात आली आहे. गावे ही विकासाचा कणा आहे, त्यामुळे गावाचे मागासलेपण दूर झाले पाहिजे. घोगरा या गावाचे मागासलेपण दूर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून शाश्वत विकासातून हे गाव आदर्श करणार असल्याची ग्वाही आमदार विजय रहांगडाले यांनी दिली.
        18 एप्रिल रोजी तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या विशेष प्रतिनिधींनी गावाला भेट देवून संवाद साधला. यानिमित्ताने आयोजित‍ कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून श्री.रहांगडाले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. यावेळी केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक श्रीमती फरीदा नाईक, संरक्षण मंत्रालयाचे अवर सचिव जितेंदर कुमार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, पं.स.उपसभापती मनोहर राऊत, घोगरा सरपंच गीता देव्हारे, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत) राजेश बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) राजेश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(महिला व बालकल्याण) भिमराव पारखे, तहसिलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी जावेद ईनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.काळे म्हणाले गावांचा विकास करतांना काही प्रातिनिधीक गावे तयार करावी लागतात. सात निकषांच्या आधारे जिल्ह्यातील तीन गावांची निवड करण्यात आली आहे. 5 मे पर्यंत सात योजनांचा लाभ या तीन गावातील ग्रामस्थांना देण्यात येणार असून ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
       श्री.दयानिधी म्हणाले, गावातील प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा. रोगराई टाळण्यासाठी प्रत्येकाने घर व परिसर स्वच्छ ठेवावा. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी. जिल्ह्यातील शेअरींग व नादुरुस्त शौचालयाचा आकडा शुन्यावर आणण्याचा मानस व्यक्त करुन त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती डॉ.दयानिधी यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे व सरपंच श्रीमती देव्हारे यांनी गावातील विकास कामे व समस्यांची माहिती देवून आपले विचार व्यक्त केले.
       घोगरा गावात ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत भेटीसाठी आलेल्या केंद्र सरकारच्या विशेष प्रतिनिधींचे आगमन झाल्यानंतर भिमनगर येथे घरकुल बांधकाम तसेच शेअरींग शौचालयाचा वापर करणाऱ्या महिलेकडे शौचालय बांधकामाचे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रोजगार हमी योजनेच्या कामावर 100 टक्के उपस्थित राहून काम करणाऱ्या तीन महिलांचा याप्रसंगी प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
        केंद्र सरकारचे विशेष प्रतिनिधी श्रीमती नाईक व जितेंदर कुमार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील उपलब्ध असलेल्या सुविधा, शाळा व अंगणवाडीची सुविधा याबाबतची माहिती जाणून घेतली. गावातील सर्व महिलांचे बँक खाते असले पाहिजे. गावात स्वच्छता राखण्यास कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात. पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या आहाराबाबत माहिती जाणून घेतली.
       महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत गावात 15 महिला बचतगट स्थापन केले असून 11 गटांना लिंकेज करण्यात आले आहे. या गटांना फिरता निधी देण्यात आला आहे. 16 लाख 15 हजार रुपये गावातील बचतगटांच्या महिलांच्या खात्यात जमा आहे. बचतगटातील अनेक महिला शेतीवर आधारीत व्यवसाय करीत असून प्रामुख्याने शेळी, गाय, म्हैस पालन, किराणा व्यवसाय करतात. गावातील 140 महिलांकडे गॅस कनेक्शन असून 60 महिलांना या अभियाना दरम्यान गॅस कनेक्शन मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केल्याची माहिती बचतगटांच्या सहयोगीनी यांनी यावेळी दिली.

       श्रीमती नाईक व जितेंदर कुमार यांनी अंगणवाडीला भेट देवून ग्रोथ चार्ट बालकांना, स्तनदा मातांना व गर्भवती मातांना देण्यात येणाऱ्या आहाराची पाहणी केली व अंगणवाडी सेविकेशी संवाद साधला. आरोग्य उपकेंद्राला भेटी प्रसंगी रुग्णांना येथून उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवेबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी घोगरा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday 17 April 2018

ग्राम स्वराज्य अभियानाची पाहणीसाठी श्रीमती नाईक व जितेंद्र कुमार जिल्ह्यात

      14 एप्रिल ते 5 मे दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील येरंडी ता.अर्जुनी/मोर, घोगरा ता.तिरोडा आणि कुंभारटोली ता.आमगाव या तीन गावांची निवड केंद्र सरकारने केली आहे. या गावात केंद्र सरकारच्या सात योजनांची प्रभावी अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक श्रीमती फरीदा नाईक व संरक्षण विभागाचे अवर सचिव जितेंद्र कुमार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. 17 एप्रिल रोजी श्रीमती नाईक व जितेंद्र कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी काळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या अभियानाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी उपस्थित होते. या तीन गावांमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य योजना), उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि मिशन इंद्रधनुष्य या केंद्र सरकारच्या सात योजनांची प्रभावी अंमलबजावणी या अभियानादरम्यान करण्यात येणार आहे.  

Saturday 14 April 2018

डॉ.आंबेडकरांचे मोठेपण जगालाही मान्य - जिल्हाधिकारी काळे



सामाजिक न्याय भवनात डॉ.आंबेडकर जयंती साजरी
    आपण जन्म कुठे आणि कुणाच्या घरी घ्यावा हे आपल्या हाती नाही. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा सुख-दु:ख, फायदे-तोटे घेवून येतो. जन्म कुठे घेतला याचा काळ कधीच संपुन गेला आहे. त्याकाळी डॉ.आंबेडकरांनी स्वकर्तृत्वाने जगाला बरेच काही दिले आहे. म्हणून ते महामानव ठरले. त्यांचे मोठेपण भारतानेच नाही तर संपुर्ण जगाने मान्य केले आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी काळे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांची उपस्थिती होती.
      श्री.काळे पुढे म्हणाले, डॉ.आंबेडकरांच्या जीवनकार्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या कार्यातून आपण काय अंगिकारु शकतो याकडे लक्ष्य देवून त्यादृष्टीने प्रयत्न केले तर त्यांच्या जयंतीदिनी खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन केल्यासारखे होईल. डॉ.आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करुन राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी वर्तमानपत्रे काढली, सामाजिक चळवळी उभारल्या. त्यांची राजकीय चळवळ त्या काळातील नेत्यांनी मान्य केली होती. त्यांनी त्यांच्या पक्षाचे राजकीय धोरण ठरवून जाहिरनामा सुध्दा काढला होता. जे कुटूंब लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणेल त्यांना मदत करण्याची तर जे कुटूंब लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणार नाही अशांना शिक्षेची तरतूद त्यांनी केल्याचे श्री.काळे यांनी सांगितले.
      डॉ.भूजबळ म्हणाले, महात्मा फुले व डॉ.आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून समतेचा संदेश सर्वदूरपर्यंत देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटना ही डॉ.आंबेडकरांच्या प्रचंड अभ्यासातून निर्माण झाली आहे. आज जो एकसंघ भारत दिसतो आहे त्याचा स्त्रोत भारतीय राज्यघटना आहे. डॉ.आंबेडकरांच्या समृध्द अनुभवातून राज्यघटना तयार झाली आहे. डॉ.आंबेडकरांचे विचार आणखी सामर्थ्यशाली कसे होतील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. देशातील विविध जातीधर्माला आचार-विचाराचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिले आहे. डॉ.आंबेडकरांनी गौतम बुध्द, संत कबीर आणि महात्मा फुले यांना आपले गुरु मानले. त्यांनी सुध्दा समतेचा संदेश दिला. समतेच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी डॉ.आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केल्याचे त्यांनी सांगितले.
     डॉ.बेदरकर म्हणाल्या, जे लोक गरीब, निरक्षर आहेत त्यांनादेखील मताचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी डॉ.आंबेडकर आग्रही होते. जे शिक्षीत आणि श्रीमंत आहे त्यांनाच केवळ मताचा अधिकार मिळाला तर गरीब समाजाची काय अवस्था झाली असती हा विचार न केलेलाच बरा. डॉ.आंबेडकर हे सामाजिक समतेचे प्रतिक आहे. त्यांनी सुरुवातीला आणि शेवटीही देशाचाच विचार केला. देशाअंतर्गत सर्वप्रथम कुटूंब नियोजनाचा विचार डॉ.आंबेडकरांनी मांडला. महिलांच्या हिताचा विचार करुन डॉ.आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.खडसे यांनीही डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
      यावेळी मान्यवरांच्या हस्ते 10 आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा धनादेश, शाल व श्रीफळ देवून, सामाजिक समता सप्ताहानिमीत्त रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचा, वरिष्ठ लिपीक श्री.खोटेले यांची पदोन्नती व उत्कृष्ट कार्याबद्दल, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले. संचालन प्रदिप ढवळे यांनी केले तर आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मानले.

Friday 13 April 2018

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राथमिकता - पालकमंत्री बडोले

6 ठिकाणी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भूमीपूजन
     ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी आणि त्यांना पुरेशा प्रमाणात शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याला आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        12 एप्रिल रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेतील दत्तक घेतलेल्या वडेगाव/सडक येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे भूमीपूजन श्री.बडोले यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, सरपंच हेमराज खोटेले, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.शेगावकर, गटविकास अधिकारी श्री.लोकरे यांची उपस्थिती होती.
       श्री.बडोले म्हणाले, जिल्ह्यातील ज्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी योजनेची आवश्यकता आहे अशा गावांचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी देखील खोल जात आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता ग्रामस्थांनी घेवून पाण्याचा काटकसरीने वाटप करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
       श्री.परशुरामकर म्हणाले, शासनाच्या अनेक योजना चांगल्या आहेत. परंतू योजना राबवितांना यंत्रणा कमी पडत आहे. लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केली तर नक्कीच त्या योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळू शकते असे त्यांनी सांगितले.
       श्रीमती सोनवणे म्हणाल्या, गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी ही उपयुक्त योजना आहे. ही योजना या गावांमध्ये यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी परिश्रम घेतले. ही योजना पूर्ण होताच ग्रामस्थांना नियमीत शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.हत्तीमारे म्हणाले, पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रामस्थांनी योजना योग्यप्रकारे राबवून त्याचा लाभ घ्यावा. पाण्याचा वापर काटकसरीने व योग्य प्रमाणात ग्रामस्थांनी करावा असेही ते म्हणाले.
       श्री.कठाणे म्हणाले, पाण्याची आवश्यकता पडल्यास योजनेची आठवण येते. या योजनेच्या पुर्ततेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        पालकमंत्र्यांच्या हस्ते वडेगाव येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होणार आहे. गावची सन 2033 ची लोकसंख्या गृहीत धरुन 483 कुटूंबांसाठी प्रति व्यक्ती 40 लिटर याप्रमाणे 1 लक्ष 8 हजार 680 लिटर प्रति दिन पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेवर 57 लाख 57 हजार 450 रुपये खर्च होणार आहे.
      पालकमंत्री बडोले यांनी सडक/अर्जुनी तालुक्यातील वडेगाव(सडक), खजरी(डोंगरगाव), डोंगरगाव(खजरी), कोहळीटोला(आदर्श), डव्वा, गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन केले.

        सडक/अर्जुनी तालुक्यातील खजरी(डोंगरगाव) येथील पाणीपुरवठा योजनेवर 55 लाख 52 हजार 441 रुपये, डोंगरगाव(खजरी) येथील पाणीपुरवठा योजनेवर 53 लाख 98 हजार 559 रुपये, कोहळीटोला(आदर्श) येथील पाणीपुरवठा योजनेवर 52 लाख 62 हजार 499 रुपये, डव्वा येथील पाणीपुरवठा योजनेवर 86 लाख 48 हजार 170 रुपये, गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथील पाणीपुरवठा योजनेवर 63 लाख रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे संबंधित गावच्या ग्रामस्थांना योजना पूर्ण होताच शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या भूमीपूजन कार्यक्रमाला संबंधित गावच्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शाखा अभियंता श्री.वाघमारे व श्री.चव्हाण यांनी मानले.

Thursday 12 April 2018

मामा तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमामुळे शेतकरी समृध्द होण्यास मदत - पालकमंत्री बडोले



जिलहयाची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे. जिल्हयातील तलावात गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमामुळे मोठया प्रमाणात पाणीसाठा निर्माण होईल. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून शेतकरी समृध्द होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुकयातील डव्वा येथील तलाव परिसरात 12 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाअंतर्गत माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, पंचायत समिती सदस्य जयशिला जोशी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. भुमेश्वर पटले, सरपंच पुष्पमाला बडोले, उपसरपंच चेतन वडगाये यांची उपस्थिती होती.
श्री बडोले म्हणाले, तलावाचे खोलीकरण करत असतांना डव्वा हे गाव जलयुक्त शिवार अभियानात घेतले होते. यावर्षी 450 मामा तलावांचे खोलीकरण  करण्यात येणार आहे. उर्वरीत तलांवाचे खोलीकरण पुढील वर्षात करण्यात येईल. या गावाच्या परिसरातील तलावांचे देखील खोलीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाच्या  संदर्भात राजकारण बाजूला ठेवून काम करीत असल्याचे सांगून श्री बडोले म्हणाले की, त्यामुळे गावाची विकास कामे मार्गी लागत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असतांना अनेक विंधन विहिरी दिल्या. मुख्यमंत्री पेयजल योजनेत डव्वाची निवड केली त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जाणार आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामात गुणवत्ता असली पाहिजे. याची खबरदारी पाणी पुरवठा विभागाने घ्यावी. ही योजना भविष्यात सौर उर्जेवर आणण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती सोनवणे म्हणाल्या, या तलावातील गाळ काढण्यात येणार असल्यामुळे मोठया प्रमाणात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. पाणीपुरवठा योजना कार्यन्वित होणार असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सोडविला जाईल. कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
श्री परशुरामकर म्हणाले, शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था  उपलब्ध व्हावी यासाठी माजी मालगुजारी तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हा शासनाचा कौतुकास्पद कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे तलांवातील गाळ काढण्याचे काम सुरु झाले आहे. डव्वासाठी पाणीपुरवठा योजना सुरु झाल्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच श्रीमती बडोले यांनीही मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते डव्वा येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाचे भूमीपूजन चुलबंद नदीच्या काठावर करण्यात आले. या योजनेच्या कामावर 86 लाख 48 हजार 170 रुपये खर्च करण्यात येणार आहे. सन 2033 ची लोकसंख्या गृहीत धरुन प्रती व्यक्ती 40 लिटर पाणी पुरवठा याप्रमाणे 1 लाख 65 हजार 680 लिटर पाणी पुरवठा दररोज करण्यात येणार आहे. डव्वा येथील 796 कुटूंबातील 3418 व्यक्तींसाठी ही योजना कार्यान्वीत होणार आहे.
डव्वा येथील माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या तलावाच्या खोलीकरणाच्या कामावर 41 लक्ष रुपये खर्च होणार आहे. यातून 89 हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून 20 टिएमसी पाणीसाठा वाढणार आहे. 13 हजार क्युबिक मीटर गाळ या तलावातून काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री शेगावकर, उपविभागीय अभियंता सुभाष कापगते, शाखा अभियंता श्री वाघमारे, श्री राठोड, यांचेसह गावातील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच चेतन वडगाये यांनी केले. संचालन विलास चव्हाण यांनी तर उपस्थितांचे आभार श्री शहा यांनी मानले.