जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 20 April 2018

उत्कृष्ट कामगिरीसाठी संघटीत प्रयत्न करा - जिल्हाधिकारी काळे



ग्राम स्वराज अभियानातून कुंभारटोलीत ग्रामस्थांशी संवाद
      कुंभारटोली या गावाने वनांचे संरक्षण व पर्यावरण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. तसेच इतर क्षेत्रात सुध्दा या गावाने चांगले काम केले आहे. ग्राम स्वराज अभियानात या गावाने केंद्र सरकारच्या सातही योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. देशात या अभियानात उत्तम कामगिरी केल्याचा नावलौकीक मिळविण्यासाठी गावकरी, पदाधिकारी व अधिकारी यांनी संघटीत प्रयत्न करावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथे 20 एप्रिल रोजी ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत केंद्र सरकारचे नोडल अधिकारी श्रीमती फरीदा नाईक व श्री.जितेंदर कुमार यांनी भेट देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी काळे बोलत होते. माजी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, ग्राम स्वराज अभियानाचे नोडल अधिकारी श्रीमती फरीदा नाईक, श्री. जितेंदर कुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई, अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, पं.स.सदस्य लोकेश अग्रवाल, गटविकास अधिकारी अशोक पाटील, सरपंच सुनंदा येरणे, नायब तहसिलदार श्री.पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री.काळे म्हणाले, 20 एप्रिल हा उज्वला दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे. स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी आणि महिलांना स्वयंपाक करतांना धुरापासून मुक्ती मिळण्यासाठी गावातील कोणतेही कुटूंब उज्वला गॅस योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता या अभियानादरम्यान घ्यावी. ज्यांना आजपर्यंत गॅस कनेक्शन मिळालेले नाही त्यांना या अभियानात गॅस जोडणी देण्यात यावी. शौचालय बांधून उपयोग होणार नाही तर त्याचा उपयोग प्रत्यक्षात करण्यात यावा. वयोवृध्द नागरिकांच्या मदतीसाठी सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
    श्रीमती मेंढे म्हणाल्या, जिल्ह्यात अधिकारी आणि पदाधिकारी योग्य समन्वयातून काम करतात. कुंभारटोलीच्या अनेक समस्या सोडविण्यात आल्या आहे. त्या माध्यमातून ग्रामस्थांना अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. वनग्रामच्या माध्यमातून कुंभारटोलीने चांगले काम केले आहे. ग्राम स्वराज अभियानाच्या योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी गावात झाली पाहिजे. गावातील कोणताही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही याची दक्षता घेतली जावी असेही त्या म्हणाल्या.
       श्री.सवई म्हणाले, 20 एप्रिल हा उज्वला दिवस आहे. महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी ही योजना आहे. जिल्ह्यात 46 हजारपेक्षा जास्त कुटूंबांना या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. कुंभारटोली येथे 890 घरांपैकी 867 कुटूंबांकडे गॅस कनेक्शन असून उर्वरित 23 कुटूंबांना या अभियानादरम्यान 100 रुपयात कनेक्शन देवून हे गाव धूरमुक्त करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
      सरपंच श्रीमती येरणे म्हणाल्या, गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्ते, नाल्या, घनकचरा व्यवस्थापन करण्यात आले आहे. गावातील वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गाव विकासाला गती मिळाली आहे. 14 व्या वित्त आयोगातून दिव्यांग बांधवांना साहित्य दिले आहे. अंगणवाड्यांची दुरुस्ती, सौर ऊर्जेतून वीज पुरवठा, पंखे, लाईट तसेच तसेच बालकांना शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी अंगणवडीला आर.ओ.मशीन देखील लावण्यात आली आहे. मनरेगा योजनेतून 300 लोकांना रोजगार सुध्दा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी केंद्र सरकारचे नोडल अधिकारी श्रीमती फरीदा नाईक व श्री.जितेंदर कुमार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ घेण्याचे उपस्थित ग्रामस्थांना आवाहन केले.
    उज्वला दिवसाचे औचित्य साधून कुंभारटोली येथील निवृत्तीबाई बंसोड, वच्छला भावे, सरिता मडावी या महिलांना गॅस कनेक्शनचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. ज्यांनी बँक खाते उघडलेले नाही अशांसाठी बँक ऑफ इंडिया शाखा आमगावच्या वतीने खाते उघडण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या तीन योजनांचा गावातील प्रत्येक व्यक्तीने लाभ घ्यावा. यासाठी अर्ज भरुन घेण्यासाठी स्टॉल देखील लावण्यात आला. यावेळी स्टॉलला जिल्हाधिकारी काळे यांनी भेट दिली. गावातील काही कुटूंबांच्या शौचालयांची देखील मान्यवरांनी पाहणी केली.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अशोक पाटील यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी श्री.रहांगडाले यांनी तर उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार श्री.पवार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कुंभारटोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment