जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 27 January 2017

सामान्य माणसात विश्वास निर्माण करा - राजकुमार बडोले

 कायदा व सुव्यवस्थेचा आढावा  
        जिल्ह्यातील अवैध धंदयाला आळा बसवून जातीय अत्याचाराचे गुन्हे घडणार नाही तसेच धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याकडे पोलीस विभागाने लक्ष दयावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र पोलीसांनी सामान्य माणसात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
         25 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
         ना.बडोले पुढे म्हणाले, मागच्या काही वर्षापूर्वी जिल्हयातील लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. सामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यात पोलीस विभागाला काही प्रमाणात यश आले आहे. नगर परिषदेच्या निवडणूकीच्या काळात पोलीसांनी चांगले काम केले आहे. गुन्हेगारांवर पोलीसांचा धाक कायम असला पाहिजे. पोलीसांनी गुन्हेगारांचा छळा लावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
         पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले तर त्यांचा सत्कार करण्यात यावा असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळण्यास मदत होईल. अवैध दारुची वाहतूक जिल्ह्यातून होणार नाही यासाठी पोलीस विभागाने दक्ष राहून काम करावे. भविष्यातही पोलीस विभागाने चांगलीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरात ज्या भागात गुन्हे जास्त घडतात तेथे सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत. ॲट्रासिटी कायदयाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला गुन्हयाशी संबंधित विशेष कक्ष स्थापन करुन ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणाऱ्या गुन्हयाची तसेच त्यांच्या मुलांकडून होणाऱ्या त्रासाची सुध्दा पोलीसांनी तातडीने दखल घ्यावी असे त्यांनी सांगितले.
         पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्ह्यात 6 तपासणी नाके तयार करुन जिल्ह्यात होणाऱ्या आवागमनाची तपासणी करण्यात येईल. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व उर्वरित भागातील नागरिकांना सुरक्षेची हमी देवून प्रत्येक नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नगर परिषद निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात चोख बंदोबस्त होता. या दरम्यान आलेल्या तक्रारीचे निराकरण तातडीने करण्यात आले. बीट पोलीसींग पध्दतीचा वापर करुन 10 बीट तयार करुन याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल.
         नागरिकांचे समाधान यावर पोलीसांचा भर असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, पोलीस व जनतेचे नाते भक्कम करण्यात येईल. आदरयुक्त दरारा पोलीसांचा असावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्वच प्रकारच्या गुन्हयांवर आळा घालण्यात येईल. पोलीस विभागाची जवळपास 150 कोटीची कामे पोलीस महासंचालकांनी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.
         सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मंदार जवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक जयराज रणवरे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, नक्षल सेलचे पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे आणि जिल्ह्यातील सर्व 16 पोलीस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते. यावेळी सादरीकरणातून जिल्ह्यातील घटनांची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली.

Thursday 26 January 2017

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम कॅशलेस व्यवहार जनजागृती चित्ररथ

                                         पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी
                              
         काळा पैशाला आळा घालणे, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि व्यवहारात पारदर्शकता आणून नागरिकांना कॅशलेस व्यवहाराकडे वळविण्यासाठी निती आयोगाने उपाययोजना आखल्या आहेत. रोखरहीत व्यवहाराला चालना देवून कॅशलेस महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने तयार करण्यात आलेल्या कॅशलेस व्यवहार जनजागृती अभियानाच्या चित्ररथाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्त्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर पोलीस कवायत मैदान कारंजा येथून हिरवी झेंडी दाखवून या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
         यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ.रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता श्री.बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम यांची उपस्थिती होती.
         गोंदिया जिल्हा कॅशलेस होण्यासाठी तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी चित्ररथावरील संदेश व माहिती उपयुक्त ठरणार आहे. कॅशलेसची चळवळ गतीमान करुन गोंदिया जिल्हा कॅशलेस व्यवहाराकडे निश्चित वळणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
         रोखरहीत व्यवहाराला चालना देवून जास्तीत जास्त नागरिकांना कॅशलेस व्यवहार अवगत करण्यासाठी हा चित्ररथ गोंदिया जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जनजागृती करणार आहे. रोखरहीत व्यवहार कसे करावेत यासंबंधित चित्रफित दाखवून नागरिकांची रोखरहीत व्यवहारासंबंधी जागृती करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने माझा मोबाईल -माझी बँक, ई-बटवा, डिजीटल पेमेंट, भिम ॲप, युपीआय, बँक कार्ड, पॉईंट ऑफ सेल मशीन व आधारकार्ड, युएसएसडी, प्रिपेड वॉलेट, एईपीएस, पीओएस यांच्या वापराबाबत सचित्र माहिती तसेच चित्रफित दाखवून नागरिकांचे रोखरहीत व्यवहारासंबंधी प्रबोधन करण्यात येणार आहे. कॅशलेस व्यवहारामुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यात व ती बळकट करण्यास हे अभियान उपयुक्त ठरणार आहे.
                        

राज्यघटनेमुळे देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत - पालकमंत्री राजकुमार बडोले

67 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
    

      आधुनिक भारताला सर्वात मोठी मिळालेली देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेच देशाला एक मजबूत लोकशाही व्यवस्था मिळाली. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
         भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस कवायत मैदान कारंजा येथे पालकमंत्री बडोले यांनी केले. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. राष्ट्रध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरिक्षण केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
         पालकमंत्री बडोले म्हणाले, जगातील श्रेष्ठ राज्यघटनांमध्ये आपल्या देशाच्या राज्यघटनेचा समावेश आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वानुसार देशाची बांधिलकी स्वातंत्र, समता, बंधुभाव आणि सर्वांसाठी समान न्याय या तत्वांवर आधारीत आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले, देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आणि आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी योजना राबविण्याची जबाबदारी राज्य संस्थेची आहे. आपला भौतिक तथा राजकीय-सांस्कृतिक विकास साधत अत्यंत सन्मानाने जीवन जगण्यासाठी भारतीय राज्यघटनेने कोणत्याही प्रकारच्या जात, धर्म, लिंग, रंग भेदाशिवाय प्रत्येक नागरिकाला अनेक मुलभूत अधिकार दिले आहेत. समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी, तसेच समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि भारतीय महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान न्याय व हक्क मिळाला पाहिजे यासाठी राज्यघटनेत विविध तरतूदी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
         कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजकुमार पुराम, राजेश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार, सोनाली चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री.नौकरकर, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदिपकुमार बडगे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मीक, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव देवसुदन धारगावे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री.कातोरे, वन विभागाचे श्री.बिसेन, श्री.शेंडे, उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 
         पोलीस परेडचे संचलन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजु नवले यांनी केले. परेडमध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, बीट मार्शल पथक, निर्भया पथक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र जलद बचाव दल, होमगार्ड, एन.सी.सी., भारत स्काऊट-गाईड पथक, बुलबुल पथक, रस्ता सुरक्षा पथक, पोलीस बँड पथक, फिरते न्यायवैदयक पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, गोंदिया नगरपरिषद अग्नीशमन यांनी सहभाग घेतला.
         जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती तसेच सर्वसाधारण योजनांची सचित्र माहिती दर्शविणारा चित्ररथ, वन्यजीव विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रस्ता सुरक्षा रथ, सेंद्रीय तांदूळ वापराबाबत जागृती आदी चित्ररथ यामध्ये सहभागी होते. यानंतर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
       पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वज निधी संकलनाचे 24 लक्ष रुपयाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सैनिक कल्याण विभागाचे कल्याण संघटक सुभेदार मेजर जगदीश रंगारी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या चांदलमेटा येथील शारदा स्वयंसहायता बचतगटाच्या अध्यक्ष वंदना उईके यांनी लाख उत्पादन व्यवसायात उत्कृष्ट कार्य करुन कंबोडिया येथील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल, सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथील सावित्री स्वयंसहायता महिला बचतगट यांनी जिल्ह्यात सर्वाधिक जास्त कर्ज घेवून 100 टक्के नियमीत परतफेड करुन उत्तमरित्या व्यवसायाला सुरुवात केल्याबद्दल, सन 2015-16 चा नेहरु युवा केंद्राचा ग्रामीण भागात उत्कृष्ट समाजकार्य केल्याबद्दल हेमंत एज्यूकेशन सोसायटी बसंतनगर गोंदिया यांना 25 हजार रुपयाचा धनादेश व प्रशस्तीपत्र, सन 2016-17 या वर्षात स्मार्ट ग्राम या अंतर्गत ग्रामपंचायत कारंजा ता.गोंदिया, ग्रामपंचायत बोदा ता.तिरोडा, ग्रामपंचायत रामाटोला ता.आमगाव, ग्रामपंचायत गांधीटोला ता.सालेकसा, ग्रामपंचायत जेटभावडा ता.देवरी, ग्रामपंचायत पाथरी ता.गोरेगाव, ग्रामपंचायत कोकणा ता.सडक/अर्जुनी, ग्रामपंचायत दाभना ता.अर्जुनी/मोरगाव येथील सरपंच व सचिवांचा, राष्ट्रीय अंध संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बुध्दीबळ व विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या तौफिक मसुद सैय्यद, होमेंद्र नागपुरे, भुमिता माहुर्ले, मनीषा झोडे, प्रशांत उपराडे या अंध विद्यार्थ्यांचा, केंद्र सरकार पुरस्कृत कायाकल्प योजनेत सन 2015-16 या वर्षात उपजिल्हा रुग्णालय तिरोडा या संस्थेला राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम, राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राहूल कुसराम (स्काऊट), दिप्ती डोहरे (गाईड), शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचे गोरेगाव तालुक्यातील 1000 शेतकऱ्यांना वर्गणीदार केल्याबद्दल गोरेगाव तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांचा, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सविता तुरकर, कृषि क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रभू डोंगरवार, झाडीपट्टी कलाकार राज पटले, चेतन वडगाये, नारायण मेश्राम यांचा, हॉटेल बिंदल प्लाझा आग दुर्घटनेप्रसंगी मदत करणारे गोंदिया न.प.अग्नीशमन विभागाचे फायरमन मोहनीश नागदेवे, जितेंद्र गौर, अंकीत जैन, पुरुषोत्तम तिवारी, सुधीर मसानी, विनोद मेंढे यांचा, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रचार प्रसिध्दीत विभागस्तरीय 75 हजार रुपयाचा द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार नरेश रहिले, जिल्हास्तरावर 25 हजार रुपयाचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्चना गिरी यांचा, आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी सर्वश्री अशोक तारडे, वेदप्रकाश चौरागडे, विजय पटले, आरोग्य सेविका कल्पना साखरे, सीमा झलके यांचा, बालविकास क्षेत्रात विशेष कामगिरी करुन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा जागृती संस्थेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांचा, पोलीस विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्योती बांते यांना रजत पदक, जि.प.समाज कल्याण विभागातर्फे गुडगाव, हरियाणा येथील नॅशनल ब्लाईंड आणि डेफ जुडो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या योगेश नंदनवार व कोमल राऊत यांना सिल्वर पदक आणि त्रिभुवन रहांगडाले व मदन फुल्लुके यांना कास्य पदक आदींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व धनादेश देवून सत्कार करण्यात आला.

00000

Wednesday 18 January 2017

गोंदिया फेस्टिवल : घोटीत निसर्ग अभ्यास शिबीर अर्थव्यवस्था निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न - अभिमन्यू काळे


: गोंदिया जिल्हा हा वैशिष्टयपूर्ण असून जिल्हयात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. नागझिरा अभयारण्याशेजारील गावातील शाळांमधील मुले जेव्हा मोठे होतील तेव्हा ते निसर्गाशी रममान होतील. भविष्यात ते आपल्या भागाची अर्थव्यवस्था ही निसर्गाशी  जोडण्याचा ते निश्चित विचार करतील याच हेतूने या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
           तिरोडा तालुक्यातील नागझिरा अभयारण्याच्या मंगेझरी प्रवेशद्वाराजवळील घोटी या गावी 17 जानेवारी रोजी गोंदिया फेस्टिवल निमित्ताने 17 व 18 जानेवारी दरम्यान आयोजित निसर्ग शिबीराचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मंगेझरीच्या सरपंच अनुसया कुमरे,  उपसरपंच गणेश भगत, सातपुडा फाऊंडेशनचे संरक्षण अधिकारी मुकुंद धुर्वे, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष रुपेश निंबार्ते, पत्रकार हरीश मोटघरे, जंगल कामगार संघाचे अध्यक्ष जगन धुर्वे, घोटी शाळा सुधार समिती अध्यक्ष भैय्यालाल कतलाम, वन व्यसस्थापन समिती अध्यक्ष पुरणलाल टेकाम, ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष छगनलाल सलाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
              जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, जिल्हयातील वनसंपत्तीचा वापर करुन जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी निसर्ग पर्यटन क्षेत्र विकसित करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हयात जास्त जंगल असल्यामुळे उद्योग उभे राहण्यास मर्यादा आहे. त्यामुळे या उद्योगांसोबत येणाऱ्या प्रदुषणापासून आपण वाचतो आहोत. गोंदिया फेस्टीवलच्या माध्यमातून स्थानिक कलावंताच्या कलागुणांना वाव देणे, स्थानिक गोंडी चित्रकलेचा प्रचार पसार करणे, पशूपक्षांची माहिती देणे, तलावांची माहिती देणे यासोबतच एक नवीन उपक्रम म्हणून जंगलाच्या आणि तलावांच्या आजूबाजूंच्या गावांमध्ये निसर्ग पायवाट तयार करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना या पायवाटांचा आनंद घेता येईल असे त्यांनी सांगितले.
               निसर्ग पायवाटच्या माध्यमातून पर्यटकांना निसर्गाची, पशुपक्षांची ओळख होणार असल्याचे सांगून श्री काळे म्हणाले, यामधून गावातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासा मदत होईल. जिल्हयात 20 ते 25 ठिकाणी होम स्टेची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पर्यटक येथे मुक्काम करतील. काही कुटूंबांना यामधून रोजगार देखील उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले                                                                                    
                    डॉ. रामगावकर म्हणाले, वन समितीच्या  माध्यमातून गावातील बेरोजगारांचा आर्थिक प्रश्न सुटावा यासाठी निसर्ग पायवाट तयार करण्यात येईल. तसेच होम स्टेची सुविधा इथे उपलब्ध करुन देण्यासाठी गावातील कुटूंबांनी पुढाकार घेतल्यास पर्यटक मोठया प्रमाणात येतील त्यामुळे यातून कुटूंबांना देखील रोजगार मिळेल. लहानपणापासून शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वन आणि वन्यजीवांची आवड निर्माण करण्यासाठी निसर्ग अभ्यास शिबीर उपयुक्त असल्याचे सांगून सातपुडा फाऊंडेशनने यासाठी  घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
                  गोंदिया फेस्टिवलचे औचित्य साधून जिल्हा पर्यटन समिती गोंदिया आणि सातपुडा फाऊंडेशन यांनी निसर्ग अभ्यास शिबीराचे आयोजन 17 व 18 जानेवारी दरम्यान घोटी येथे केले. या दोन दिवशीय शिबीरात जी एस गर्ल्स हायस्कुल कु-हाडी , आदिलोक हायस्कूल बोळूंदा, जि.प.प्राथमिक मराठी शाळा बोळूंदा, जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंडकेपार, उच्च प्राथमिक शाळा मंगेझरी व प्राथमिक शाळा घोटी येथील एकूण 44 विद्यार्थी-विद्यार्थींनी व चार शिक्षक या शिबीरात सहभागी झाले.
                  दोन दिवशीय शिबीरादरम्यान विद्यार्थ्यांना निसर्ग पायवाट, बफर क्षेत्रात भ्रमंती केली. निसर्गातील विविध घटकांची माहिती जाणून घेतली. जलसंवर्धनासाठी वनराई बंधारा विद्यार्थ्यांनी बांधला. विद्यार्थ्याचे निसर्ग खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी दारुचे दुष्परिणाम यावर पथनाटय सादर केले. यावेळी शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना सारस वैभव गोंदियाचे, गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया व ट्रुथ अबाउट टायगर हे माहितीपट दाखविण्यात आले. शेकोटी गप्पा कार्यक्रम घेण्यात आला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी सातपुडा फाऊंडेशनचे संरक्षण अधिकारी मुकुंद धूर्वे शिक्षक पी.के.तिरपुडे, पी.बी. धमगाये, एस.पी.तिरपुडे, ए.आर. मेश्राम, श्रीमती के.बी.टेंभरे यांचेसह घोटी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
                                                                   

Friday 13 January 2017

गोंदिया फेस्टीवलनिमित्त फोटोग्राफी वर्कशॉप

          

फोटोग्राफीसोबतच वन्यजीवांच्या संरक्षणाची चळवळ उभी व्हावी
                                                             - अभिमन्यूकाळे 
         देशात वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जाणीव उशिरा रुजली आहे. 1982 च्या वन कायदयामुळे जंगलाच्या संरक्षणाला सुरुवात झाली आहे. केवळ जंगलात वन्यजीवांचे फोटो काढण्यापूरतेच काम मर्यादित न ठेवता वन्यजीवांच्या संरक्षणाची चळवळ उभी करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले
         गोंदिया फेस्टीवलनिमित्ताने आज हॉटेल गेटवे येथे  फोटोग्राफी वर्कशॉपचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी काळे बोलत होते. उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, प्रसिध्द आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
           श्री काळे पुढे म्हणाले, जंगले ही आपल्याला आनंद देणाऱ्या वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने आहेत. जंगलातील पशूपक्षांचे संरक्षण आणि संवर्धन कशाप्रकारे करता येईल. यादृष्टीने काम झाले पाहिजे. मानव आणि निसर्ग यांचा एकत्रित अधिवास आता अत्याआवश्यक झाला आहे. बिबटसारखे प्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागली आहे. त्यांचा अधिवास देखील धोक्यात आल्याचे यावरुन दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            गोंदिया फेस्टीवलच्या माध्यमातून सारस संवर्धनासोबतच सेंद्रीय शेतीची चळवळ उभारावी लागणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, सेंद्रीय शेती आणि वन्यपशू पक्षी यांचा जवळचा संबंध आहे. शेतातील उत्पादनासाठी करण्यात येत असलेल्या रासायनिक खते आणि औषंधाचा वापर आज वन्यपशू पक्षांच्या जीवावर उठले आहे. या खतांच्या व औषधांच्या वापरामुळे पशुपक्षांचे खाद्य कमी होत आहे. त्यामुळे स्थलांतरीत पक्षी जिल्हयात तलावांवर हळूहळू कमी येतील. त्यामुळे त्यांचा अधिवास वाढविणे गरजेचे आहे.या महोत्सवाच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
              जिल्हयातील 12 ते 15 तलावाच्या परिसरात पक्ष्यांचा अधिवास वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येईल असे सांगून श्री काळे म्हणाले यासाठी तलावांच्या परिसरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. पक्षीनिरीक्षणासाठी या तलावाच्या परिसरात मनोरे उभारले जातील. होम स्टेच्या दृष्टीने ग्रामस्थांना या चळवळीत सहभागी करुन घेण्यात येईल. त्यामुळे त्यांनाही वाटेल की आपला गाव परिसरात बाहेरच्या लोकांना यायला आवडते. निसर्ग संवर्धनात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले जिल्हयातील गोंडी चित्रकलेचा प्रसार करणार असल्याचे सांगितले.  
                डॉ. रामगावकर म्हणाले, गोंदिया फेस्टीवलच्या माध्यमातून एकप्रकारे पर्यटन महोत्सवालाचा सुरुवात झाली आहे. जिल्हयाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. छायाचित्रकार हा हौस म्हणून चित्र काढतो. वन्यजीवाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून फोटोग्राफी करतो. त्यांचे जीवनपट तो उघड करतो. या बाबी आपण बघत नाही. वन्यजीवांच्या संरंक्षणात छायाचित्रकारांची भूमिका महत्वाची असते. या भूमिकेतून वन्यजीव व वनाच्या संरक्षणात महत्वाचे योगदान मिळत असते. असे त्यांनी सांगितले.                                                                                  श्री खानोलकर म्हणाले, वन्यजीवांचे छायाचित्र काढणे ही एक प्रकारची नशाच आहे. फोटोग्राफीसाठी नियोजन आणि संशोधन आवश्यक आहे. पक्षांचे फोटो काढण्याचा आनंद घेण्यासोबतच त्यांची वागणूक टिपणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. मात्र वेळेचे भान ठेवून ही फोटोग्राफी करणे आवश्यक आहे. फोटोग्राफी वैशिष्टयपूर्ण व्हावी यासाठी मन ओतून काम करणे गरजेचे आहे. पक्षांचे फोटो काढतांना थेट त्यांचेपर्यंत जावू नये. वन्यजीवांचे छायाचित्र काढतांनादेखील आपण त्या प्राण्यांकडे न जाता ते आपल्या जवळ येतील अशापध्दतीने फोटोग्राफी करावी. जिथे आपण फोटोग्राफी करणार आहोत त्या भागातील स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तंत्रशुध्दपध्दतीने वन्यजीव फोटोग्राफीबाबत काही टिप्स दिल्या. त्यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांबाबत विस्तृत माहिती देखील दिली.
                    वर्कशॉपला निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादुर तिडके, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एस.एस.कातोरे, के.टी.एसचे वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, सेवानिवृत्त सहायक वनरक्षक अश्विन ठक्कर,  सातपुडा फाऊंडेशनचे मुकुंद धूर्वे, सेवा संस्थेचे सावन बहेकार, हिरवट संस्थेचे रुपेश निबांर्ते, चेतन जसानी, भारत जसानी, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, पत्रकारबांधव यांचेसह गोंदिया, भंडारा, नागपूर, बालाघाट येथील हौसी छायाचित्रकार या वर्कशॉपला उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. संचालन मुकुंद धूर्वे यांनी तर उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी मानले.
                                                             0000000000000

Tuesday 3 January 2017

महिलांनी स्वावलंबी होवून सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण करावे - डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार


डिजीटल साक्षरता कार्यशाळा
      सावित्रीबाई फुले झाल्या नसत्या तर महिला सक्षम झाल्या नसत्या. जगाच्या इतिहासात महिलांसाठी काम करणारी व्यक्त्ती सावित्रीबाई फुले एवढी कोणीही झालेली नाही. आपण महिला सक्षमीकरणात चांगला टप्पा गाठलेला आहे, त्याला आज व्यवस्थीत आकार देण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुलेंचे स्वप्न साकार करण्यासाठी महिलांनी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
     आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जयंतीनिमित्त आयोजित डिजीटल साक्षरता कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून डॉ.पुलकुंडवार बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक मनोज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर व गुगल इंडियाचे तज्ञ मार्गदर्शक श्री.सिध्दार्थ यांची उपस्थिती होती.
       डॉ.पुलकुंडवार पुढे म्हणाले, अमेरिकेच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत महिला विरुध्द पुरुष असा लढा होता. या निवडणूकीत हिलरी क्लिंटन या महिलेचा पराभव झाला. तेथे आजही पुरुष प्रधान मानसिकता आहे. पुरुष आजही तेथे स्त्रीला बॉस म्हणून स्वीकारायला तयार नाही. आपल्याकडे सावित्रीबाई फुले होवून गेल्यामुळे समाजाची मानसिकता निश्चितपणे बदललेली आहे. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल ही पदे देखील महिलांनी भूषविलेली आहे.  
      महिला, मुलींनी शाळा कॉलेजमध्ये जावून शिक्षण घेणे म्हणजे सक्षम होणे नव्हे असे सांगून डॉ.पुलकुंडवार म्हणाले, रुढी, परंपरा, वाईट चालीरितीच्या जोखडातून महिलांना मुक्त करायचे आहे. आजही स्त्रीभृण हत्या थांबवण्यासाठी विविध कार्यक्रमाची गरज पडत आहे. स्त्रीचा आग्रह असतो की, वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजे. मुलासाठी आग्रह सुध्दा स्त्रीच धरते ही मानसिकता बदलविण्याची आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. डिजीटल साक्षरतेसाठी माविमच्या महिलांनी काम करावे. डिजीटल व्यवहारामुळे पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचेही डॉ.पुलकुंडवार यांनी सांगितले.
        पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ म्हणाले, ज्या-ज्या वेळी महिला सक्षमीकरणाचा विषय येतो तेव्हा पोलीस विभाग याकडे अत्यंत आत्मियतेने व संवेदनशीलपणे बघत असते. स्त्री व बालकांवर होणारे अत्याचार हा पोलिसांचा महत्वाचा विषय आहे. प्रत्येक पातळीवर याबाबत जनजागृती करण्यात येते. गुन्ह्यांचा आलेख बघितला तर महिला व बालकांवर होणारे अत्याचार हा प्रकार अतिशय गंभीर गुन्ह्यांचा आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध कायद्याच्या तरतूदी असल्याचे त्यांनी सांगितले.
       दिल्लीतील निर्भया घटनेनंतर कायदयात काही सुधारणा झाल्या असल्याचे सांगून डॉ.भुजबळ म्हणाले, पिडीत महिलेला न्याय देण्यासाठी राज्य घटनेपासून ते कायदयाचे अधिष्ठान समोर आणलेले दिसते. जस्टीस वर्मा समितीने ज्या शिफारशी केल्या आहेत त्या एकमताने संसदेने मंजूर केल्या आहे. पिडीत महिला व मुलींना न्याय देण्यासाठी पोलीस विभाग आपले दायित्व पार पाडत आहे. महिला व मुलींच्या छेडखानीच्या घटना टाळण्यासाठी निर्भया पथके तयार करण्यात आली आहे. इंटरनेट साथी महिलांच्या माध्यमातून सकारात्मक काम होत आहे. इंटरनेटचा अल्पवयात दुरुपयोगही होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून महिलांनी ज्ञान प्राप्त करुन घ्यावे असे सांगितले.
        श्री.श्रीवास्तव म्हणाले, महिलांनी कॅशलेस होणे गरजेचे आहे. इंटरनेट साथीच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिलांना आपले बँक खाते मोबाईल नंबरवर जोडावे लागणार आहे. कॅशलेस गोंदिया करण्यासाठी प्रत्येकाने काळजीपूर्वक स्वाईप मशीनचा वापर करावा. या मशीनवर गोपनीय नंबर टाकतांना तो कोणाला दिसणार नाही याची काळजी घ्यावी. आधार कार्ड, मोबाईल नंबर व बँक खाते क्रमांक एकमेकांशी जोडले जाणार आहे. कॅशलेस गोंदियासाठी प्रत्येकाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असावे. प्रधानमंत्री आवास योजना, सुलभ शौचालय योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
    श्रीमती बेदरकर म्हणाल्या, महिलांना अज्ञानाच्या अंधकारातून काढून जीवनात प्रकाश आणण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांना भारतरत्न ही उपाधी देणे आता चुकीचे आहे. या महामानवांना कित्येक वर्ष आधीच ही उपाधी देण्याची आवश्यकता होती. पूर्वी महिलांच्या हाती पोळपाट होते, आता महिलांच्या हाती लॅपटॉप, आयपॅड आलेले आहे. इंटरनेट साथी असलेल्या महिला सावित्रीबाई फुलेंचा आदर्श पुढे ठेवून तयार झालेल्या आहेत. देशात ज्या-ज्या सुधारणा झाल्यात त्या सुधारणांचे मानकरी फुले दाम्पत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
      डॉ.हुबेकर म्हणाल्या, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षण दिले, पण महिला आरोग्याच्या बाबतीत साक्षर झालेल्या नाही. आरोग्य विभागाच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत, या योजनांचा महिलांनी लाभ घेण्याची आवश्यकता आहे. महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर होवून त्यातून आरोग्य सुधारणा करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे व नाबार्डचे श्री.जागरे यांनीही मार्गदर्शन केले.
      प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी सांगितले की, माविमच्या बचतगटांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना डिजीटल साक्षर करण्यात येत आहे. त्यांचे उपजिविकेचे साधनही वाढविण्यात येत आहे. इंटरनेट साथीच्या माध्यमातून कॅशलेस गोंदिया करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

     यावेळी इंटरनेट साथी गीता भोयर, बेबीनंदा वाघमारे, तृप्ती बहेकार, प्रिती दोनोडे, ममता नेवारे, प्रमिला मोहते यांनी मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मुक नाटिका उत्कर्ष साधन केंद्र गोंदियाच्या महिलांनी सादर केली. इंटरनेट साथी मंदिरा सहारे यांनी कविता सादर केली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील 101 इंटरनेट साथी महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन योगीता राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार आशा दखने यांनी मानले.