जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 18 January 2017

गोंदिया फेस्टिवल : घोटीत निसर्ग अभ्यास शिबीर अर्थव्यवस्था निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न - अभिमन्यू काळे


: गोंदिया जिल्हा हा वैशिष्टयपूर्ण असून जिल्हयात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. नागझिरा अभयारण्याशेजारील गावातील शाळांमधील मुले जेव्हा मोठे होतील तेव्हा ते निसर्गाशी रममान होतील. भविष्यात ते आपल्या भागाची अर्थव्यवस्था ही निसर्गाशी  जोडण्याचा ते निश्चित विचार करतील याच हेतूने या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
           तिरोडा तालुक्यातील नागझिरा अभयारण्याच्या मंगेझरी प्रवेशद्वाराजवळील घोटी या गावी 17 जानेवारी रोजी गोंदिया फेस्टिवल निमित्ताने 17 व 18 जानेवारी दरम्यान आयोजित निसर्ग शिबीराचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मंगेझरीच्या सरपंच अनुसया कुमरे,  उपसरपंच गणेश भगत, सातपुडा फाऊंडेशनचे संरक्षण अधिकारी मुकुंद धुर्वे, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष रुपेश निंबार्ते, पत्रकार हरीश मोटघरे, जंगल कामगार संघाचे अध्यक्ष जगन धुर्वे, घोटी शाळा सुधार समिती अध्यक्ष भैय्यालाल कतलाम, वन व्यसस्थापन समिती अध्यक्ष पुरणलाल टेकाम, ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष छगनलाल सलाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
              जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, जिल्हयातील वनसंपत्तीचा वापर करुन जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी निसर्ग पर्यटन क्षेत्र विकसित करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हयात जास्त जंगल असल्यामुळे उद्योग उभे राहण्यास मर्यादा आहे. त्यामुळे या उद्योगांसोबत येणाऱ्या प्रदुषणापासून आपण वाचतो आहोत. गोंदिया फेस्टीवलच्या माध्यमातून स्थानिक कलावंताच्या कलागुणांना वाव देणे, स्थानिक गोंडी चित्रकलेचा प्रचार पसार करणे, पशूपक्षांची माहिती देणे, तलावांची माहिती देणे यासोबतच एक नवीन उपक्रम म्हणून जंगलाच्या आणि तलावांच्या आजूबाजूंच्या गावांमध्ये निसर्ग पायवाट तयार करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना या पायवाटांचा आनंद घेता येईल असे त्यांनी सांगितले.
               निसर्ग पायवाटच्या माध्यमातून पर्यटकांना निसर्गाची, पशुपक्षांची ओळख होणार असल्याचे सांगून श्री काळे म्हणाले, यामधून गावातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासा मदत होईल. जिल्हयात 20 ते 25 ठिकाणी होम स्टेची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पर्यटक येथे मुक्काम करतील. काही कुटूंबांना यामधून रोजगार देखील उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले                                                                                    
                    डॉ. रामगावकर म्हणाले, वन समितीच्या  माध्यमातून गावातील बेरोजगारांचा आर्थिक प्रश्न सुटावा यासाठी निसर्ग पायवाट तयार करण्यात येईल. तसेच होम स्टेची सुविधा इथे उपलब्ध करुन देण्यासाठी गावातील कुटूंबांनी पुढाकार घेतल्यास पर्यटक मोठया प्रमाणात येतील त्यामुळे यातून कुटूंबांना देखील रोजगार मिळेल. लहानपणापासून शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वन आणि वन्यजीवांची आवड निर्माण करण्यासाठी निसर्ग अभ्यास शिबीर उपयुक्त असल्याचे सांगून सातपुडा फाऊंडेशनने यासाठी  घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
                  गोंदिया फेस्टिवलचे औचित्य साधून जिल्हा पर्यटन समिती गोंदिया आणि सातपुडा फाऊंडेशन यांनी निसर्ग अभ्यास शिबीराचे आयोजन 17 व 18 जानेवारी दरम्यान घोटी येथे केले. या दोन दिवशीय शिबीरात जी एस गर्ल्स हायस्कुल कु-हाडी , आदिलोक हायस्कूल बोळूंदा, जि.प.प्राथमिक मराठी शाळा बोळूंदा, जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंडकेपार, उच्च प्राथमिक शाळा मंगेझरी व प्राथमिक शाळा घोटी येथील एकूण 44 विद्यार्थी-विद्यार्थींनी व चार शिक्षक या शिबीरात सहभागी झाले.
                  दोन दिवशीय शिबीरादरम्यान विद्यार्थ्यांना निसर्ग पायवाट, बफर क्षेत्रात भ्रमंती केली. निसर्गातील विविध घटकांची माहिती जाणून घेतली. जलसंवर्धनासाठी वनराई बंधारा विद्यार्थ्यांनी बांधला. विद्यार्थ्याचे निसर्ग खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी दारुचे दुष्परिणाम यावर पथनाटय सादर केले. यावेळी शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना सारस वैभव गोंदियाचे, गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया व ट्रुथ अबाउट टायगर हे माहितीपट दाखविण्यात आले. शेकोटी गप्पा कार्यक्रम घेण्यात आला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी सातपुडा फाऊंडेशनचे संरक्षण अधिकारी मुकुंद धूर्वे शिक्षक पी.के.तिरपुडे, पी.बी. धमगाये, एस.पी.तिरपुडे, ए.आर. मेश्राम, श्रीमती के.बी.टेंभरे यांचेसह घोटी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
                                                                   

No comments:

Post a Comment