जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 25 March 2020

काळाबाजार, साठेबाजी व ग्राहकांची लूट होणार नाही याची दक्षता घ्यावी - डॉ.कादंबरी बलकवडे



          कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभर 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसाचा लॉकडाउन करण्यात आला आहे. या दरम्यान सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये.या लॉकडाउन दरम्यान कोणत्याही वस्तूंचा काळाबाजार, व्यापाऱ्यांकडे वस्तूंची साठेबाजी आणि दुकानात ग्राहक म्हणून येणाऱ्या नागरिकांची लूट होणार नाही याची पुरेपूर दक्षता यंत्रणांनी घ्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.
 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा आयोजित बैठकीत घेतला यावेळी डॉ. बलकवडे बोलत होत्या.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री चव्हाण,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीमती वंदना सवरंगपते, रवींद्र राठोड, गंगाराम तळपाळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.नितीन कापसे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती
          डॉ. बलकवडे पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या वस्तू पोहोचतील यासाठी  पुरवठा विभागाने लक्ष द्यावे. वाजवी किमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही वस्तूंची विक्री ग्राहकांना होणार नाही त्यामाध्यमातून त्यांची लूट होणार नाही याकडे विशेष लक्ष असावे. स्वस्त धान्य दुकानातून ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना व्यवस्थितपणे धान्याचा पुरवठा करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
      जीवनावश्यक वस्तूपैकी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गोंदिया शहरातील भाजी बाजारात नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी भाजी बाजारातील काही दुकाने सुभाष हायस्कूलच्या मैदानात लावण्यात यावी असे सांगून डॉ. बलकवडे म्हणाल्या,त्यामुळे ग्राहकांची भाजीपाला खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. शहरातील सुपर मार्केटमध्ये ग्राहकांना स्वतः वस्तूंची निवड करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रत्येक ग्राहकाने वस्तू खरेदी करताना  तीन फुटाचे अंतर ठेवून  वस्तू खरेदी कराव्या.नगदी पैसे देऊन ग्राहकांनी वस्तू खरेदी करण्यापेक्षा  डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,भीम ऍप्स, फोन-पे या ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार करून घेतलेल्या वस्तूंची भूगतान करावे असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुकास्तरावर एक पथक गठित करण्यात आल्याचे सांगून डॉ.बलकवडे म्हणाला,या पथकाच्या माध्यमातून नागरिकांनी घराच्या बाहेर  न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गर्दी  टाळण्यासाठी किराणा दुकानात वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी थोड्या थोड्या संख्येने यावे.तीन फुटांचे अंतर ठेवून वस्तू खरेदी करण्याबाबत तसेच ज्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे तेथे नियमांचे पालन होत नाही अशा दुकानदारावर कारवाई करून सदर दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
आंतरराज्यीय व आंतरजिल्हा सीमा तपासणी नाक्यांवर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सहकार्य करावे.त्यांची अडवणूक होणार नाही या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे. असे सांगून त्या म्हणाल्या, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी लक्ष देऊन भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यातून जिल्ह्यातील  कामानिमित्त गेलेले नागरिक  परत गावाकडे आले असतील तर अशांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी व त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या  वास्तव्याच्या ठिकाणी त्यांना अलगीकरण करून ठेवावे. असेे निर्देश त्यांनी यावेळी महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.