जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 31 May 2019

पाणी टंचाईवर प्रत्यक्ष कृतीतून मात करा - राजकुमार बडोले

पाणी टंचाई आढावा सभा


उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येवू नये यासाठी जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी विंधन विहिरीची कामे, विंधन विहिरी दुरुस्तीची कामे, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्याची कामे आणि आवश्यक त्या विंधन विहिरीमध्ये पुरक पाईप टाकावे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही सर्व कामे प्रत्यक्ष कृतीतून यंत्रणांनी करावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
       आज 31 मे रोजी पवार बोर्डींग गोंदिया येथे जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आमदार विजय रहांगडाले, संजय पुराम, प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपाध्यक्ष हाजी अलताफ हमीद, जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सडक/अर्जुनी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, गोंदिया पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, देवरी पं.स.सभापती सुनंदा बहेकार, गोरेगाव नगराध्यक्ष आशिष बारेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
         पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, पाणी टंचाईबाबत अनेक ग्रामपंचायतीच्या व गावाच्या अडचणी आहेत. गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगातून निधी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनी स्वत: पुढाकार घेवून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढे आले पाहिजे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ज्या उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत त्या प्रत्यक्षात अंमलात आल्या पाहिजे. एप्रिल ते जून हे महिने पाणी टंचाईचे आहेत. पंचायत समितींनी आपल्या स्तरावर उपाययोजना करण्याबाबत जी कामे सूचविण्यात आली आहेत त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नसेल तर ही बाब गंभीर आहे असे सांगितले.
        ज्या पाणी पुरवठा योजना वीज जोडणी अभावी बंद आहेत त्या योजनांना पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता तातडीने वीज जोडणी करण्यात यावी असे सांगून श्री.बडोले म्हणाले, जे पाण्याचे स्त्रोत आटले आहेत त्याची तपासणी करण्यात यावी. योग्य तेथे पाण्याचे स्त्रोत निर्माण करावे यासाठी निधीची अडचण नाही. ज्या ठिकाणी विंधन विहिरी करण्यात आल्या आहेत त्यावर त्वरित हँडपंप बसविण्यात यावे. या कामात दिरंगाई होवू नये. जिल्ह्यातील सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्याचा कालबध्द कार्यक्रम ग्रामपंचायतीने राबवावा, त्यामुळे पाणी साठा उपलब्ध होण्यास मदत होईल. जेथे विहिर अधिग्रहणाची आवश्यकता आहे तेथे विहिर अधिग्रहीत करुन संबंधित गावाला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करावी. ज्या नादुरुस्त विंधन विहिरी आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती करावी असे त्यांनी सांगितले.
        श्री.बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या ज्या योजना बंद आहेत त्या तातडीने सुरु करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून दुरुस्तीसाठी निधीची मागणी करावी त्यासाठी शासन निधी देण्यास तयार आहे. हया योजना तातडीने दुरुस्ती करुन ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दयावे असे ते यावेळी म्हणाले.                                                                
         आमदार श्री.रहांगडाले म्हणाले, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील ज्या गावामध्ये पाणी टंचाई भासत आहे त्या गावाला तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी भेट देवून संबंधित ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेवून पाण्याची व्यवस्था करावी.
         आमदार श्री.पुराम म्हणाले, सालेकसा, देवरी व आमगाव तालुक्यातील काही गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेवून पाण्याची उपलब्धता करुन दयावी असे सांगितले.
        यावेळी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे यांचेसह अन्य लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील पाणी टंचाईच्या समस्या आढावा बैठकीत मांडल्या.
        ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांनी पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जानेवारी ते मार्च 2019 या कालावधीत पाणी टंचाई कृती आराखडा टप्पा-2 अंतर्गत जिल्ह्यात 123 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई असून यावर मात करण्यासाठी 272 उपाययोजना करण्यात येत आहे. नव्याने 39 नविन विंधन विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. 220 विंधन विहिरीच्या हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली आहे. टप्पा-3 अंतर्गत एप्रिल ते जून 2019 या कालावधीत 153 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई असून यावर मात करण्यासाठी 1540 उपाययोजना प्रस्तावित असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.
        माहे जानेवारी ते मे 2019 या कालावधीत लघु नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 22 विद्युत पंप दुरुस्ती व आश्रम शाळेअंतर्गत 6 असे एकूण 28 विद्युत पंप दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 2 योजना दुरुस्त करण्यात आल्या आहे तर सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजनेअंतर्गत 20 कामे पूर्ण करण्यात आली आहे. टंचाई कालावधीत एकूण 1182 पैकी 596 विंधन विहिरींची दुरुस्ती करण्यात आली असून 586 दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहे. स्थानिक विकास निधी अंतर्गत 127 विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ पंचायत समितीला पाणी टंचाई अंतर्गत देखभाल दुरुस्तीसाठी 2696 जीआय पाईपचे वाटप करण्यात आल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.
       सभेला निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, रचना गहाणे, किशोर तरोणे, शिला चव्हाण, श्रीमती तिराले, श्रीमती पाथोडे यांचेसह अन्य जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, नगरपालिका-नगरपंचायत मुख्याधिकारी, पाणी टंचाई निवारणार्थ संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध जि.प.सदस्य, पं.स.सदस्य व ग्रामपंचायत सरपंचांनी त्यांच्या क्षेत्रातील व गावातील पाणी टंचाईच्या समस्या मांडल्या.

शेतकऱ्यांच्या समृध्दीचे नियोजन करा - पालकमंत्री बडोले

खरीप हंगामपूर्व आढावा सभा
शासनाच्या कृषिविषयक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. पीक कर्जाची मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज पुरवठा झाला पाहिजे. बोगस बियाणे, खते व किटकनाशकांचा शेतकऱ्यांना पुरवठा होणार नाही याची दक्षता घेवून जिल्ह्यातील शेतकरी समृध्द कसा होईल यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांना दिले.
        आज 31 मे रोजी पवार बोर्डींग गोंदिया येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत श्री.बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आमदार विजय रहांगडाले, प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          श्री.बडोले म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी अर्ज केले आहे त्यांना तातडीने वीज पुरवठा करावा. त्यामुळे त्यांना सिंचन करण्यास मदत होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सौर कृषिपंपाच्या माध्यमातून सिंचन करतील यासाठी सौर कृषिपंप घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. बोगस बियाणै, खते व किटकनाशके यांना आळा घालण्यासाठी कृषि निविष्ठा केंद्रांची नियमीत काटेकोरपणे तपासणी करावी. नेहमीच्या शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावरील बियाणे मोफत देण्यापेक्षा अन्य शेतकऱ्यांना मोफत बियाणांचा पुरवठा करुन त्याला त्याचा उपयोग होईल यासाठी मदत करावी असे सांगितले.
         फलोत्पादन अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी फळबागांकडे कसे वळतील याकडे लक्ष दयावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, खरीप हंगामात उडीत पिकाचा पेरा वाढला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नगदी पिकाकडे वळविण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात असलेल्या हवामान केंद्राच्या माध्यमातून केंद्र परिसरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. जे शेतकरी या योजनेत अपात्र ठरले त्यांच्या अपात्रतेमधील त्रुटी दूर करुन ते पात्र ठरवून त्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने सहकार विभागाने पुढाकार घ्यावा असे सांगितले.
        राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, यावेळी केवळ 40 टक्केच शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित 60 टक्के शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज पुरवठा करुन त्यांना मदतीचा हात दयावा. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे यासाठी जलसंधारण व जलसंपदा विभागाने नियोजन करावे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची तातडीने उचल करावी. ते उघड्यावर राहून त्याची नासाडी होणार नाही याची दक्षता पणन विभागाने घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.                                                                                       आमदार श्री.रहांगडाले म्हणाले, प्रात्यक्षिकासाठी काही शेतकऱ्यांना कृषि विभागाने धान मोफत उपलब्ध करुन दयावा. त्यामुळे त्यांना बियाण्यांचा चांगला उपयोग होईल. खरीप हंगामात शेतकऱ्यांना उडीद बियाणे उपलब्ध झाली पाहिजे. बोगस बियाणे, खते व किटकनाशकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याकडे कृषि विभागाने लक्ष दयावे असे त्यांनी सांगितले.
         प्रास्ताविकातून प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नंदकिशोर नायनवाड यांनी सांगितले की, सन 2018-19 मध्ये प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रात 14 हजार 163 हेक्टरने वाढ झाली आहे. सन 2017-18 या वर्षात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुक्यात 1 कोटी 67 लक्ष व देवरी तालुक्यात 2 लक्ष 18 हजार तर माहे फेब्रुवारी 2018 मध्ये आठ तालुक्यात झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2 कोटी 91 लाख 68 हजार रुपये वाटप केले. 43 हजार 21 मे.टन रासायनिक खताचा वापर सन 2018-19 च्या खरीप हंगामात करण्यात आला. सन 2019 च्या खरीप हंगामासाठी महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडून 62 हजार 836 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
       सन 2018-19 या वर्षात जिल्ह्यातील 1587 निविष्ठा परवानाधारक केंद्राची खरीप व रब्बी हंगामात तपासणी करण्यात आली. त्यापैकी 60 केंद्रांना अनियमीततेबाबत कारणे दाखवा नोटीस तर 29 केंद्रांना विक्री बंदीचे आदेश व 2 केंद्राचे परवाने निलंबीत करण्यात आले. सन 2019-20 या वर्षाकरीता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांना 230 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असल्याचे श्री.नायनवाड यांनी सांगितले.
        सन 2018-19 या वर्षात मार्च 2019 अखेर जिल्ह्यातील 595 कृषि पंपांना वीज जोडणी देण्यात आली असून सन 2019-20 या वर्षात 2792 कृषिपंपांना वीज जोडणीचे उद्दिष्ट दिल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री.बारापात्रे यांनी दिली.
        जिल्ह्यात असलेल्या विविध सिंचन प्रकल्प व अन्य साधनाच्या माध्यमातून 1 लाख 6 हेक्टरवर सिंचन करण्यात आले. तर 2019-20 या वर्षात 1 लाख 21 हजार 196 हेक्टरवर सिंचनाचे नियोजन असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.छप्परघरे यांनी दिली.
        जिल्ह्यातील मार्केटींग फेडरेशनचे 57 आणि आदिवासी विकास महामंडळाचे 43 अशा एकूण 100 केंद्रावर सन 2018-19 च्या खरीप हंगामात 85 हजार 683 शेतकऱ्यांनी 27 लाख 49 हजार 879 क्विंटल धानाची खरेदी केली असून या धानाची किंमत 474 कोटी 57 लक्ष रुपये असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर धान खरेदीचे पैसे जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी श्री.खर्चे यांनी दिली.
        यावेळी तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने, श्री.पात्रीकर, श्री.तुमडाम, श्री.तोडसाम यांचेसह अन्य तालुका कृषि अधिकारी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्र हिवराचे कार्यक्रम समन्वयक डॉ.देशमुख, कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.उषा डोंगरवार, जलसंपदा विभाग, पणन विभाग, पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम यांनी मानले. 

Monday 20 May 2019

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा - डॉ.कादंबरी बलकवडे

पाणी टंचाई आढावा बैठक

     जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही नागरिकाला पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबध्द पध्दतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
       आज 20 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी टंचाईचा आढावा घेतांना डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनील कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       डॉ.बलकवडे म्हणाल्या, पाण्याचे जे स्त्रोत आहे त्यामधून नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे. हे स्त्रोत दुरुस्त करुन त्याचे पुर्नजीवन करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. आवश्यक त्या वाड्या-वस्त्या आणि वार्डामध्ये पाण्यासाठी पाईप लाईन टाकण्याचे काम त्वरित करावे. गोंदिया शहरातील दलित वस्तीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहे, तेव्हा नगर परिषदेने पुढाकार घेवून तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दयावे. शहरी भागात सर्वांना पाणी मिळावे यासाठी एक महिन्याच्या आत सर्व्हेक्षण करण्यात यावे. सार्वजनिक विहिरी पाण्याच्या दृष्टीने कशा उपयोगात आणता येईल तसेच बंद अथवा नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरी दुरुस्ती करुन उपयोगात आणण्याचे देखील त्यांनी सूचविले.
        ज्या स्त्रोतातून नागरिकांना पाण्याची उपलब्धता होते त्या स्त्रोताचा परिसर हा नियमीत स्वच्छ ठेवला पाहिजे असे सांगून डॉ.बलकवडे म्हणाल्या, शुध्द आणि स्वच्छ पाणी नागरिकांना मिळाले पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. ज्या यंत्रणांकडे स्त्रोताच्या देखभालीची जबाबदारी सोपविली आहे त्यांनी या कामात हयगय केल्यास संबंधित यंत्रणेच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यावर निलंबनाच्या अप्रिय कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल. भविष्यातील काळात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याच्या पुर्नभरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागती करुन प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या ठिकाणी सद्यस्थितीत नाईलाजाने टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे तेथील पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण व आवश्यक त्या दुरुस्ती करुन पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करावा व टँकरने पाणी पुरवठा बंद करावा. पाणी पुरवठा होत असलेल्या सार्वजनिक तसेच घरगुती नळाला टिल्लू पंप लावून जर कुणी पाणी घेत असतील तर अशांचे टिल्लू पंप जप्त करुन संबंधितांवर यंत्रणेने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.   
       डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, ज्या स्त्रोतांमधून नागरिकांना पाणी उपलब्ध होते त्यामध्ये ब्लिचींग पावडर पुरेशा प्रमाणात टाकावे. त्यामुळे दुषित पाणी कुणाच्याही पिण्यात येवून त्यांना आजारांचा सामना करण्याची वेळ येणार नाही. ज्या योजना मंजुरीसाठी शासनाकडे पाठवायच्या आहेत त्या तातडीने शासनाने पाठवून मंजूरी मिळवून घ्यावी. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून ज्या नळ योजना तयार आहेत परंतू वीज जोडणी अभावी   नागरिकांना पाणी मिळत नाही, तेव्हा डिमांड त्वरित भरुन वीज जोडणी करुन घ्यावी, त्यामुळे लवकरच पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. जी कामे प्रगतीपथावर आहेत ती तातडीने पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरु करावा. पाण्याचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे पाण्याचे दुषित स्त्रोत आहेत त्याचे निर्जंतुकीकरण करुन ते पाणी वापरण्यायोग्य व पिण्यायोग्य होतील याकडे विशेष लक्ष्य दयावे असे त्यांनी सांगितले.
        मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात विविध ठिकाणी नविन विंधन घेण्याचे 43 प्रस्ताव होते, त्यापैकी 39 प्रस्तावांना मंजूरी मिळाली असून 20 कामे पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील 220 विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करण्यात आली आहे. टप्पा-3 अंतर्गत 136 नविन विंधन विहिरी घेणे, 962 विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. लघु नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 22 विद्युत पंप दुरुस्ती व आश्रमशाळेअंतर्गत 6 असे एकूण 28 विद्युत पंप दुरुस्ती करण्यात आली आहे. सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजनेअंतर्गत 20 कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
         यावेळी नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा बाबतची सद्यस्थिती व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी श्री.जाधव यांनी तसेच संबंधित नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.छप्परघरे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रिकापुरे यांनी सुध्दा त्यांच्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
        आढावा बैठकीला बाघ इटियाडोहचे कार्यकारी अभियंता एच.वाय.छप्परघरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रिकापुरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच.बी.चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.आर.बी.शहारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक, गोंदिया नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, तिरोडाचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांचेसह तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
00000