जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 28 January 2018

कचारगड यात्रेतील भाविकांची गैरसोय टाळा - पालकमंत्री बडोले


      देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कुपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला येत्या 30 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार असून देशातील विविध भागातून लाखो आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होणार आहे. येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण यात्रेदरम्यान येणार नाही यासाठी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांच्या व देवस्थान समितीच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात 27 जानेवारी रोजी कचारगड येथे 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या यात्रेच्या तयारीचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम, आ.संजय पुराम, आ.डॉ.अशोक उईके, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    श्री.बडोले म्हणाले, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ जल, स्वच्छ परिसर व स्वच्छ अन्न या प्रधानमंत्री मोदींनी दिलेल्या घोषवाक्यानुसार तिथे व्यवस्था असली पाहिजे. भाविक महिलांसाठी मोबाईल शौचालयाचा वापर करावा. भाविकांसाठी आंघोळीची व्यवस्था असावी. यात्रेदरम्यान बेवारटोला प्रकल्पातून पाणी नाल्यात सोडल्यास भाविकांना आंघोळीसाठी, शौचालयासाठी  तसेच पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता होईल. सर्व भाविकांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी यात्रेदरम्यान मिळावे यासाठी प्रशासन व देवस्थान समितीने लक्ष्य दयावे. यात्रेदरम्यान मंचावरुन कोणीही प्रक्षोभक भाषणे देणार नाही याची देवस्थान समितीने दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
     राजे अंब्रीशराव म्हणाले, यात्रा ही सर्वांसाठी आहे. यात्रेदरम्यान कोणीही भडकावू भाषण देणार नाही याची दक्षता घेवून अशांना पोलिसांनी ताब्यात घेवून कारवाई करावी. मागील 25 वर्षापासून कचारगड येथे यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र आपण भाविकांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन देवू शकलो नाही ही खंत आहे. देवस्थान समितीने यात्रेदरम्यान जबाबदारीने काम करावे. अलीकडच्या तीन वर्षाच्या काळात बरीच विकासकामे कचारगड परिसरात झालेली आहे. यात्रेत भाविकांना समस्यांच्या सामना करावा लागू नये असे त्यांनी सांगितले.
       आमदार पुराम म्हणाले, यात्रेदरम्यान दिवसा पोलिसांचा बंदोबस्त असतो मात्र रात्रीला पोलीस कमी असतात. विशेषत: रात्रीला मोठ्या संख्येने विविध राज्यातून येणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी येत असल्यामुळे रात्रीला पोलीस बंदोबस्त असावा. कचारगड येथे विशाल सभागृह बांधण्यासाठी राज्य शासनाने 5 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यात्रेदरम्यान सभागृह बांधकामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाने आदिवासी बांधवांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल यात्रेदरम्यान लावावे असे सांगितले.
       जिल्हाधिकारी काळे म्हणाले, यात्रा ही भव्य स्वरुपात होत असल्यामुळे आणि देशातील विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने येत असल्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. विविध यंत्रणांवर जबाबदारी सोपविली आहे. बेवारटोला प्रकल्पातून 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान नाल्यात पाणी सोडण्यास आपली तत्वता मान्यता असल्याचे सांगितले. यात्रेसाठी जिल्हा निधीतून 3 लक्ष रुपये देणार असल्याचे ते म्हणाले.
     प्रभारी उपवनसंरक्षक शेंडे म्हणाले, यात्रेच्या काळात यात्रा परिसरातील जंगलात लोकांकडून आगी लागण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेता वन विभाग सतर्क असून तैनात वन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात येईल.
       यावेळी सालेकसा तहसिलदार सांगळे यांनी सांगितले की, यात्रेच्या तयारीच्या दृष्टीने तालुका प्रशासनाची 8 जानेवारीला सभा घेण्यात आली. तालुका पातळीवरील 12 विभागांचा सहभाग यात्रा यशस्वीतेसाठी राहणार आहे. योग्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. भाविकांसाठी मदत केंद्रही सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       कचारगड यात्रेदरम्यान 20 अधिकारी व 120 कर्मचारी दोन पाळीमध्ये ड्युटीवर राहणार आहे. पार्कींगची जागा निश्चित असते तसेच सी.60 चे जवान तैनात असतील. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येतील असे सालेकसा पोलीस निरिक्षक श्री.खंदारे यांनी सांगितले.
       यात्रेदरम्यान धनेगाव येथे वैद्यकीय पथक व ॲम्बुलन्स तैनात करण्यात येणार आहे. रुग्ण तपासणी, पाणी तपासणी करण्यात येईल. यात्रेदरम्यान अन्न विषबाधा होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. स्टॉलधारकांना याबाबत कळविणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.येरणे यांनी सांगितले.     
       भाजपचे महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी यात्रेदरम्यान महिला भाविकांसाठी मोबाईल शौचालयाची व्यवस्था असावी तसेच यात्रेदरम्यान आदिवासींसाठी असलेल्या विविध योजनांची प्रचार-प्रसिध्दी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
       देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.कोकाडे यांनीही येणाऱ्या अडचणी सांगितल्या. आढावा बैठकीला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजु नवले, देवरी तहसिलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी ए.एल.खाडे, आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी गिरीश पाहुणे, सालेकसाच्या महावितरणचे ए.पी.राठौर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता डी.यु.तुरकर, कनिष्ठ अभियंता ए.एम.अडमे, उपविभागीय अभियंता प्रकाश लांजेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.सी.दमाहे, शाखा अभियंता एन.जी.खोंड, सहायक पोलीस निरिक्षक अविनाश मते, अंकुर कापसे, कोसमतर्राचे सरपंच वैभव बागडे, ग्रामसेवक पी.एम.चव्हाण, ए.एस.आवळे, मंडळ कृषि अधिकारी एस.व्ही.भोसले, एस.के.दोनोडे, ए.एच.टेंभूरकर, डी.एच.धापोड, व्ही.सी.लाडे, के.बी.शहारे, पी.व्ही.राऊत, गोपालसिंह उईक, संतोष पंधरे यांची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी मानले.

Saturday 27 January 2018

शिबीरातून कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घ्या - न्या. कमलाकर कोठेकर


विविध प्रकारच्या कायदयाची माहिती विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून जनतेला देण्यात येते. सार्वजनिक हिताच्या व लोककल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या शिबीरातून नागरिकांनी आपल्या कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घ्यावी. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी केले.
          गोंदिया तालुक्यातील नागरा येथे 27 जानेवारी रोजी आयोजित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित शासकीय सेवा, योजना व विधी सेवेच्या महाशिबीरात अध्यक्षस्थानावरुन न्या. कोठेकर बोलत होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा. दयानिधी, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव न्या. श्रीमती ईशरत शेख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड टि.बी. कटरे, नागरा सरपंच पुष्पाताई अठराहे यांची उपस्थिती होती.
         न्या. श्री कोठेकर म्हणाले, नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने  अर्जासोबत कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती स्टॉलवरुन करुन घ्यावी. योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता केली तरच योजनेचा लाभ मिळू शकतो. शिबीराला आलेल्या नागरिकांनी इथे असलेल्या स्टॉल भेट दयावी. त्यामुळे माहिती मिळण्यास मदत होईल. विविध यंत्रणांनी शिबीरात स्टॉल लावून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
           श्री दयानिधी म्हणाले, या शिबीराचा नागरा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकंनी लाभ घ्यावा. जिल्हा परिषदेमार्फत लोककल्याणकारी व सार्वजनिक हिताच्या अनेक योजना राबविण्यात येतात. शिबीरात लावण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध यंत्राणांच्या स्टॉलला नागरिकांनी भेट देवून योजनांची माहिती जाणून घ्यावी. योजनेचा लाभ मिळवून घेण्याबाबात काही शंका असतील तर त्याचे समाधान स्टॉलवरुन करुन घ्यावे. लोकांची शिबीराच्या माध्यमातून सेवा करण्याची चांगली संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
         डॉ. भूजबळ म्हणाले शिबीराच्या माध्यमातून काही लाभार्थ्यांना जागेवरच लाभ देण्यात येत आहे. जबाबदार प्रशासनासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची आणि संवेदनशिलेची प्रचिती येथे येत आहे. पोलीस विभागाच्या स्टॉलमधून सायबर गुन्हे, महिलांसाठीच्या प्रतिसाद ॲप्स, पोलिस मित्र ॲप्स बाबतची माहिती देण्यात येणार आहे. नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलीस प्रशासन गतीमान झाल्याचे त्यांनी सांगितले.
         यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत नागरा येथील ज्ञानेश्वरी लिल्हारे यांना ॲक्वा वॉटर प्लॅन्टसाठी 9 लक्ष रुपये व प्रतुल गणवीर यांना सायकल स्टोअर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन लक्ष रुपये कर्ज देना बँकेने मंजूर केले. या दोन्ही लाभार्थ्यांना बँकेचे कर्ज मंजूरीपत्र देण्यात आले.
          शिबीराला न्यायिक अधिकारी माधुरी आनंद, पी.एस.खरवडे, पी.बी.भोसले, श्रीमती ए.एस. जरुदे, श्रीमती व्ही. आर. मालोदे, एन.आर.ढोके, विक्रांत खंदारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होते. विविध स्टॉलवर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना माहिती देण्यासाठी उपस्थित होते   
     अग्नी सुरक्षा व उपाययोजनेबाबतचे प्रात्यक्षिक अदानी पॉवर प्रोजेक्ट तिरोडाचे मुख्य अग्निशमन अधिकारी त्रिकोलसिंग पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी सादर करुन माहिती दिली. यावेळी न्यायिक अधिकारी, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीरसुध्दा लावण्यात आले. या शिबीरातून अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. ज्यांनी अद्यापपर्यंत आधारकार्ड काढलेले नाही त्यांच्यासाठी शिबीर आयोजित केले. रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींसाठी नागरा येथील देवस्थानामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
             शासनाच्या विविध योजनांची तसेच मुद्रा योजनेची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या स्टॉलवर विक्रीसाठी लोकराज्य मासिक ठेवण्यात आले होते. विविध योजनांचे पॉम्पलेट्स, घडीपुस्तिका, माहिती पुस्तिका स्टॉलला भेट देणाऱ्या नागरिकांना मोफत देण्यात आल्या. तसेच या महाशिबीरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महसूल विभाग, पंचायत विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, समाज कल्याण विभाग, कृषि विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, वीज वितरण कंपनी, शिक्षण विभाग जिल्हा उद्योग केंद्र, महिला व बाल कल्याण विभाग, बँक ऑफ इंडियाचा स्टार स्वरोजगार प्रशिक्षण केंद्राचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवर योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी नागरा व परीसरातील ग्रामस्थांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.

Friday 26 January 2018

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार


       पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तनुज मेश्राम, प्रभुदास बन्सोड यांचा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार डॉ.अमीत बुध्दे, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक दुलिचंद मेश्राम, जिल्हा गुणवंत महिला खेळाडू पुरस्कार निलम अवस्थी, जिल्हा गुणवंत खेळाडू रुपेश साखरे, जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कार महेश हरिणखेडे यांना, जिल्हास्तरीय युवा पुरस्कार संस्था वर्गातून पहांदी पारो कुपार लिंगो, बहुउद्देशीय संस्था खर्रा, जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रमोद गुडधे व पुजा तिवारी यांना, रशिया-इंडिया युथ फोरममध्ये भारतातर्फे सहभागी होवून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जतीन वहाणे यांना, आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.धीरज लांबट, निशांत बन्सोड, संजय बिसेन, डॉ.योगेश पटले, अजित सिंग, प्रशांत तिरपुडे यांना, राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 25 मीटर रायफल शुटींग स्पर्धेत सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल श्रीमती निलीमा भूजबळ-पाटील यांचा, विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रबोधनात्मक कामगिरी केल्याबद्दल आमगावचे सेवानिवृत्त प्राचार्य श्यामराव बहेकार यांचा, नेहरु युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा मंडल पुरस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्था मेंगाटोला यांचा, सन 2017-18 या वर्षात राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल 17 स्काऊट व 14 गाईड विद्यार्थ्यांचा, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत सन 2016-17 या वर्षात सर्वात जास्त पुरुष शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.सी.वानखेडे, डॉ.एस.एल.झोडे, डॉ.राधेश्याम पाचे, डॉ.डी.डी.रायपुरे यांचा, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लागवड अधिकारी वाय.के.कुंभलकर यांचा, तायक्वांडो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल उदय रहांगडाले व तुषार हत्तीमारे यांचा, सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सैनिक कल्याण संघटक सुभेदार मेजर जगदिश रंगारी यांचा, सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील स्वयंप्रेरणेने नियमीत स्वच्छ ग्राम करणाऱ्या युवक-युवतींचा, माविमच्या उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदिया व प्रेरणा ग्रामसंस्था भिवापूर यांचा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सन 2017-18 या वर्षात उत्कृष्ट काम करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, सहायक वनसंरक्षक एम.एच.शेंडे, वनसंरक्षक एम.आर.शेख, नायब तहसिलदार पी.एस.बिसेन, सहायक कार्यक्रम अधिकारी आर.पी.शहारे, कार्यक्रम व्यवस्थापक एम.एस.साखरे, निवडणूक कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्रीमती आर.आर.मलेवार यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते ‘वाटचाल विकासाची’घडिपुस्तिकेचे विमोचन


       जिल्ह्यातील तीन वर्षाच्या विकास कामांवर आधारीत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या गोंदिया जिल्हा-वाटचाल विकासाची या घडिपुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      गोंदिया जिल्हा-वाटचाल विकासाची या पुस्तिकेमध्ये सामाजिक न्याय विभागाचा बार्टीचा स्वयंरोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा, रमाई घरकुल योजना, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास, मामा तलावांचे पुनरुज्जीवन, शेतीला सिंचनासाठी सौर कृषिपंपाचे बळ, 997 स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशीनच्या वापरामुळे आलेली पारदर्शकता, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, धडक सिंचन विहिरीमुळे सिंचनाची झालेली सुविधा, डॉ.श्यामाप्रसाद मुखजी जनवन विकास योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पर्यटन विकासाला चालना, तलाव तेथे मासोळी अभियान, लोकसहभागातून शाळा डिजीटल, जलयुक्त शिवार अभियान व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आदी योजनेच्या यशस्वीतेबाबतची माहिती या घडिपुस्तिकेत देण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी - पालकमंत्री राजकुमार बडोले



      जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       प्रजासत्ताक दिनाचा 68 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर 26 जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
       पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, आधुनिक भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेचे देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली आहे. समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत विविध तरतुदी करण्यात आल्या आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या आपल्या राज्याला अनेक संत समाजसुधारकांनी दिशा देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
     समाजातील वंचित व दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विकासासाठी 4 कोटी 63 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून रमाई आवास योजनेतून यावर्षी 5 हजार घरकुले बांधण्यात येणार आहे, तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 10360 घरे व शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत 467 घरकुले बांधण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 84272 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यापैकी 45 हजार 713 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, यावर्षी 1 कोटी 35 लक्ष रुपये तसेच जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन व तीर्थस्थळाच्या विकासासाठी 4 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटन व तीर्थस्थळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येण्यास मदत होणार असल्यामुळे त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलक्रांती घडण्यास मदत होत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, यावर्षी जलयुक्तमध्ये 63 गावांची निवड करण्यात आली असून 434 कामे पूर्ण झाली आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत 567 उमेदवारांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी माविमच्या पुढाकारातून जिल्ह्यातील 62 हजार 486 महिला 5043 बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्या असून अनेक महिलांनी उद्योग व्यवसायाला सुरुवात केली आहे. रोहयोच्या माध्यमातून डिसेंबरअखेर 1 लाख 27 हजार कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले. परेड कमांडर म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते सहभागी होते. परेडमध्ये पुरुष पोलीस पथक, महिला पोलीस पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, जिल्हा वाहतूक शाखा, पुरुष व महिला होमगार्ड, विशेष व्याघ्र जंगल पथक, राष्ट्रीय छात्रसेना पथक, महाराष्ट्र छात्रसेना पथक, राज्य राखीव दल, स्काऊट-गाईड पथक, बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, फिरते न्यायवैदयक पथक, श्वान पथक, बाँब शोधक पथकाचा समावेश होता. तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवा, जलद बचाव दल, जि.प.आरोग्य विभाग चित्ररथ, सामाजिक वनीकरण विभाग चित्ररथ, जि.प.सर्व शिक्षा अभियान चित्ररथ, जलयुक्त शिवार चित्ररथ, अग्नीशमन दल, पब्लीक स्कूल वन बचाव, आदर्श कॉन्व्हेंट पथक, मिलिटरी स्कूल पथक यांनीही यामध्ये सहभाग घेतला.
       कार्यक्रमाला आमदार गोपालदास अग्रवाल, माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जि.प.आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, जि.प.अपर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अपुर्व पावडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.
     यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये गुरुनानक वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदियाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर, राजस्थान कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी ओडीसी लोकनृत्य व जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपारच्या विद्यार्थीनींनी व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने शो ड्रील सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

Tuesday 23 January 2018

रोहयोची कामे यंत्रणांनी समन्वयातून करुन मजूरांना रोजगार दयावा - पालकमंत्री बडोले

     जिल्ह्यात पाऊस समाधानकारक आला नसल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 23 जानेवारी रोजी रोजगार हमी योजनेचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, मुळात रोजगार हमी योजना ही आपल्या राज्याची योजना आहे. मात्र आज आपण या योजनेच्या अंमलबजावणीत माघारलो आहे. तालुका पातळीवर संबंधित यंत्रणांचा या योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका आहे. तालुका पातळीवर तहसिलदाराने यंत्रणांचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडावी. योजनेच्या कामाचा नियमीत आढावा दर महिन्याला घ्यावा. ज्या ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यांच्या मागणीचा विचार करुन त्यांना कामे उपलब्ध करुन दयावे. ग्रामपंचायती व ग्रामस्थांना विश्वासात घेवून रोहयोतून विकास कामे करावी. ज्या मजूरांना मागील कामांची अद्यापर्यंत मजूरी देण्यात आली नाही त्यांना ती त्वरित देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा. कुशलच्या कामाची थकीत मजूरी केंद्र सरकारकडून लवकर उपलब्ध कशी होईल यासाठी देखील पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले.
       पांदण रस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, जिल्ह्यात रोहयोमधून मोठ्या प्रमाणात पांदन रस्ते तयार करण्याचे नियोजन करावे. अनेक गावात अंतर्गत रस्त्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी पंचायत समितत्यांनी विशेष लक्ष्य देवून अंतर्गत रस्त्यांच्या अडचणीची सोडवणूक करावी असे त्यांनी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून अकुशलची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. निधी उपलब्ध नाही तरी सुध्दा मजूर मोठ्या संख्येने कामावर येत आहे. जिल्ह्यातील ज्या 13 हजार मजूरांची मजूरी प्रलंबीत आहे, निधी उपलब्ध होताच ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. ज्या कुटूंबांनी 90 दिवसापेक्षा जास्त काम केले आहे अशा कुटूंबातील मजूरांना कामगार कल्याण मंडळाचे फायदे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. जिल्ह्यात 22 जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर 864 कामे व यंत्रणांची 391 कामे अशी एकूण 1255 कामे सुरु असून त्यावर 68529 मजूर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

       सभेला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, सहायक वनसंरक्षक श्री.शेंडे, श्री.शेख, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी व रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी - राजकुमार बडोले

      भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे हे प्रत्येक जागरुक नागरिकाला वाटते. जिथे भ्रष्टाचार, गैरव्यवहार होतात त्याबाबत लोक आवाज उठवून होणारा भ्रष्टाचार निदर्शनास आणत असतात. भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या येणाऱ्या तक्रारींची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
    23 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     श्री.बडोले म्हणाले, तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समित्यांच्या नियमीत बैठका झाल्या पाहिजे. तालुक्यात अनेक नागरिकांच्या विविध विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रारी असतात. अनेक कामाची गुणवत्ता चांगली राहत नसल्यामुळे नागरिक याबाबत भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी करीत असतात. अशा तक्रारींची तालुका प्रशासनाने गंभीरतेने दखल घेवून तक्रारकर्त्या नागरिकांना दिलासा दयावा व त्या कामाची चौकशी करुन कामात पारदर्शकता राहील यादृष्टीने काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची नियमीत बैठक दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येईल. भ्रष्टाचाराबाबत नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींची वेळीच दखल घेवून त्यांचे समाधान करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       सभेला समितीचे सदस्य कविता रंगारी, उमाकांत ढेंगे, विश्वजीत डोंगरे, बसंतकुमार गणवीर, रतन वासनिक, विनोद किराड यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यावेळी उपस्थित होते.

वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहावे - पालकमंत्री राजकुमार बडोले


     मोठ्या प्रमाणात इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत गोंदिया पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने 23 जानेवारी रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सायबर तज्ञ म्हणून पियुष वर्मा व आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कमलेश वालदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्रच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, समाजाला सायबर गुन्हेगारीविषयी जागरुक करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रातील मुलांनी पोलीस विभागाच्या मदतीने मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मॅरॉथॉन स्पर्धेत सहभाग घेतला ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. आज पोलीस विविध क्षेत्रात चांगले काम करीत असल्यामुळे लोकांचे मित्र असल्याची भावना जनमाणसात तयार होत आहे, ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
    पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांच्या नेतृत्वात पोलीस विभाग चांगले काम करीत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, मागास व दुर्गम भागातील मुलां-मुलीमध्ये चांगली जडणघडण करण्याचे काम पोलीस करीत असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास सुध्दा निर्माण करुन त्यांना यशाचा मार्ग दाखविण्यात येत आहे. रन फॉर डेमॉक्रसी ॲन्ड डेव्हलपमेन्टच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून या मुलांचे करियर घडविण्याचे काम पोलीस विभाग करीत आहे ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे श्री.बडोले म्हणाले.
      श्री.वालदे म्हणाले, बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशाचा व्यवहार होत असतो. त्यासाठी नागरिकांनी बँकेत व्यवहार करतांना सदैव जागरुक राहून सावध राहिले पाहिजे. सोशल मिडियावर आपली वैयक्तीक माहिती देवू नये, जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही. यासाठी सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी त्यांनी इंटरनेट बँकींग, फिशींग, मोबाईल बँकींग, स्मीशिंग, युपीआय, ई-वॅलेटस्, युएसएसडी, कार्डस्, युपीआय, विशिंग फ्रॉडस्, लॉटरी फ्रॉडस्, सोशल मिडिया फ्रॉडस्, आयडेन्टीटी थेफ्ट याबाबत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे सविस्तर माहिती दिली.
     प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ म्हणाले, सायबर गुन्हेविषयी जनजागृती अभियानामुळे बँकींग व्यवहाराबाबत होणारी ऑनलाईन फसवणूक, सोशल मिडियाबाबत होणारे गुन्हे याबाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षा दौड या उपक्रमात जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. याच विद्यार्थ्यांनी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय मॅरॉथॉन स्पर्धेत देखील सहभाग घेतला. लोकशाही आणि विकासासाठी दौड या उपक्रमाद्वारे गोंदिया जिल्हा नक्षलमुक्त होण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी कार्यशाळेत उपस्थित असलेल्या नागरिकांमधील रामअवतार अग्रवाल, आदेश शर्मा व पोलीस निरिक्षक श्री.दासुरकर यांनी बँकींग फ्रॉड व्यवहाराबाबत काही प्रश्न विचारले. त्यावर श्री.वालदे यांनी त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले.

       सायबर जनजागृती कार्यशाळेला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मंदार जवळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती खन्ना, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक व महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन पोलीस उपनिरिक्षक राधिका कोकाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.

Monday 22 January 2018

दिनदयाल अंत्योदय योजना : गोंदियातील 35 बचतगटांना कर्ज वितरण

    गोंदिया,दि.22 : दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत गोंदिया नगरपरिषद अंतर्गत कार्यरत 35 महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे 35 लाख रुपये कर्ज विविध उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी आयडीबीआय बँकेकडून मंजूर करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात विशेष जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या 22 जानेवारीच्या सभेत 5 महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रत्येकी 1 लाखाचे कर्जाचे धनादेश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, आयडीबीआय बँकेच्या नागपूर येथील प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली नेमलेकर, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
    गोंदिया नगरपरिषद अंतर्गत दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाने महिलांचे 361 स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन केले आहे. गोंदिया शहरातील महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून सक्षमीकरणाचे काम माविम करीत आहे. शहरी भागातील पात्र कुटूंबातील महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगटाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आयडीबीआय बँकेने माविमच्या मदतीने पुढाकार घेतला आहे.
      मार्च 2018 पर्यंत गोंदिया नगरपरिषदेअंतर्गत स्थापित बचतगटांपैकी 300 स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रत्येकी 1 लक्ष रुपये कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 150 महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना 1 कोटी 50 लक्ष रुपये आयडीबीआय बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.

      जिल्हाधिकारी काळे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लुंबीनी, अनुराग, एकता, प्रियल व जॉन्सी या महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयाचे धनादेश उद्योग व्यवसायासाठी देण्यात आले. यासाठी माविमची उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया काम करीत आहे. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक विक्रम बोराडे, न.प.च्या बचतगटाच्या तज्ञ श्रीमती बिसेन व लोकसंचालीत साधन केंद्राच्या मोनिता चौधरी उपस्थित होत्या.

Sunday 21 January 2018

दोन वर्षात नवेगावबांधचा कायापालट करणार - राजकुमार बडोले

नवेगावबांध येथे बालोद्यानाचे भूमीपजून

     नवेगावबांध जलाशय परिसराचा सन 1971 ते 1991 हा काळ उत्कर्षाचा होता. त्यानंतर या परिसराच्या अधोगतीला सुरुवात झाली. नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत आणि जास्तीत जास्त स्थानिकांना यामधून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. येत्या दोन वर्षात नवेगावबांध जलाशय परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट करण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
    21 जानेवारी रोजी नवेगावबांध जलाशयाजवळ बालोद्यान तयार करणे, चौकीदार कक्ष आणि बालोद्यानासमोर सौर ऊर्जा लाईट लावण्याच्या कामाचे भूमीपूजन श्री.बडोले यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सडक/अर्जुनी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, सडक/अर्जुनीच्या माजी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, अर्चना राऊत, माजी जि.प.सदस्य रामदास कोहारकर, श्रीमती विजया कापगते, नवेगावबांधचे सरपंच अनिरुध्द शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, केवलराम पुस्तोडे, लायकराम भेंडारकर, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर, नवेगावबांध फाउंडेशनचे अध्यक्ष विजय डोये, नितीन गुगलिया, नवल चांडक यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, नवेगावबांध पर्यटनस्थळाची ओळख देशपातळीवर होईल अशा पध्दतीने विकसीत करण्यात येईल. 10 पट पर्यटक जास्त येतील यादृष्टीकोनातून इथला विकास करण्यात येईल. या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 50 कोटी रुपये देण्याचे तत्वता मान्य केले आहे. लवकरच याला मंजूरी देण्यात येईल. 80 लक्ष रुपये खर्चातून झिप लाईन सुरु करण्यात येईल. पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टचे बांधकाम पुर्णत्वास येत आहे. 25 लक्ष रुपयातून स्टेप गार्डन आणि 60 लक्ष रुपयांच्या निधीतून दुसऱ्या बाजूच्या बीचचे काम सुरु करण्यात येईल. संजय कुटीपर्यंत पर्यटकांसाठी मिनी ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्रीमती गहाणे, रामदास बोरकर यांची समायोचित भाषणे झाली. यावेळी नवेगावबांध येथील ग्रामस्थ तसेच पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच अनिरुध्द शहारे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांनी मानले.

Saturday 20 January 2018

पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप

कटंगी मध्यम प्रकल्प
     पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 20 जानेवारी रोजी तहसिल कार्यालय गोरेगाव येथे गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पातील वन विभागाच्या अखत्यारितील वन जमिनीसाठी 58 भूधारकांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप  करण्यात आले. यावेळी आमदार विजय रहांगडाले, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य डॉ.लक्ष्मण भगत, तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महेंद्र नंदेश्वर, प्रमोद जनबंधू, नोकलाल सोनवाने, संगीता नेवारे, धोंडू सोनवाने, योगराज ठाकरे, श्रीराम राऊत, जगलाल दिहारे, सुनील शहारे, नरेश नेवारे, पतीराम चौधरी, अनिल नंदेश्वर, भोलाराम भोंडे, पंचशीला शहारे, अशोक चौधरी, दशरथ नाईक, बुधराम सोनवाने यांच्यासह 58 शेतकऱ्यांना वन विभागाच्या अखत्यारितील 13.69 हेक्टर वन जमिनीसाठी 16 लक्ष 59 हजार 734 रुपये धनादेश वाटप करण्यात आले. 

Thursday 18 January 2018

लोकशाही व विकासाला मारक ठरणाऱ्या नक्षली तत्वज्ञानापासून युवापिढीने दूर राहावे - अंकुश शिंदे

मुंबई मॅरॉथॉनसाठी 73 आदिवासी विद्यार्थी रवाना

     जंगलामध्ये पसरलेला नक्षलवाद आता शहरी भागात पसरत आहे. या नक्षलवादाला चोख प्रतिउत्तर दिले जाईल. गोंदिया व गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल व दुर्गम भागातील विद्यार्थी लोकशाही व विकासासाठी दौड हा संदेश घेवून मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभागी होत आहे. लोकशाही व विकासाला मारक ठरणाऱ्या नक्षली तत्वज्ञानापासून युवापिढीने दूर राहावे. असे आवाहन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी केले.
      गोंदिया पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात गोंदिया व गडचिरोली नक्षलग्रस्त क्षेत्रातील 73 आदिवासी विद्यार्थांची चमू टाटा मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 17 जानेवारी रोजी निघाली. त्यावेळी त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात श्री.शिंदे बोलत होते. यावेळी गोंदिया पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, गडचिरोली पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.शिंदे म्हणाले, या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपैकी कोणीही आतापर्यंत मुंबई पाहिलेली नाही. ही वस्तुस्थिती असली तरी विद्यार्थ्यांनी लोकशाही आणि विकासासाठी दौड हा संदेश घेवून मुंबई मॅरॉथॉन स्पर्धा जिंकून आपल्या जिल्ह्याचा व राज्याचा नावलौकीक जागतिक स्तरावर वाढवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी श्री.शिंदे यांनी नक्षलवादाचा उगम व त्यानंतरच्या प्रवासामध्ये देश व राज्यामध्ये ओढवलेला विनाश यावर प्रकाश टाकला.
      डॉ.देशमुख म्हणाले, नक्षलवादाची वैचारिक बैठक समजून घेवून लोकशाही व विकासाच्या आड येणाऱ्या या नक्षलवादी तत्वज्ञानास मुळापासून उखडून टाकून गडचिरोली व गोंदिया ही जिल्हे नक्षलमुक्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
      प्रास्ताविकातून डॉ.भूजबळ यांनी लोकशाही आणि विकासासाठी दौड या उपक्रमाची रुपरेषा विशद केली. गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये राबविलेल्या सुरक्षा दौड या उपक्रमाची माहिती देवून जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या कचारगड येथील पारी कुपार लिंगो व माँ काली कंकाली या जिल्ह्यात असलेल्या श्रध्दास्थानाविषयी माहिती दिली.
      गोंदिया व गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील 52 मुले आणि 21 मुली असे एकूण 73 आदिवासी विद्यार्थी मुंबई येथे 21 जानेवारी रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभागी होत आहे. या विद्यार्थ्यांचे धावण्याच्या स्पर्धेतील कौशल्य व नैपुण्य वृध्दींगत करण्यासाठी गोंदिया पोलीस मुख्यालय येथे 12 ते 17 जानेवारी या कालावधीत सराव व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना विशेष आहार देण्यात आला. पोलीस विभागातील खेळाडू, कर्मचारी व क्रीडा मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांचा कसून सराव घेण्यात आला.
       समारोपीय कार्यक्रमात देवरी तालुक्यातील पालांदूर/जमी. येथील चेतन पदे व गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील जांभळी येथील अंजली कोरचा या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पोलीस विभागाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
       मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या चमूचे मुख्य व्यवस्थापक म्हणून अपर पोलीस अधीक्षक संदीप अटोले हे काम पाहणार असून त्यांच्या मदतीला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरिक्षक नागेश भाष्कर व इतर 8 पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक व कवायत निर्देशक यांचे पथक व्यवस्थापनासाठी नेमण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची ही चमू 17 जानेवारी रोजी गोंदिया येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईसाठी रवाना झाली. रेल्वेस्टेशनवर या चमूला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday 15 January 2018

लोकराज्य पोलीस विशेषांकाचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विमोचन

    शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा जानेवारी 2018 चा अंक हा आपले पोलीस आपली अस्मिता यावर आधारीत पोलीस विशेषांक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे.
      पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांच्या कक्षात 15 जानेवारी रोजी लोकराज्य पोलीस विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्ड जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      लोकराज्यचा हा पोलीस विशेषांक पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. अंकातील माहिती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानात भर घालणारी आहे. या अंकामधील माहितीमुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमतेने काम करण्यास मदत होणार आहे. तसेच हा अंक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी विमोचनप्रसंगी व्यक्त केले.

    या लोकराज्य पोलीस विशेषांकात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात पोलिसांचा मोठा हातभार लागला असून कायदा व सुव्यवस्था उत्तमप्रकारे हाताळण्यात आली आहे. दहशतवाद, नक्षलवाद, सायबर गुन्हेगारी, आर्थिक गुन्हेगारी या प्रकारच्या आव्हानांचा सामना महाराष्ट्र पोलीस समर्थपणे करीत असल्याची माहिती असून सुरक्षीत सुव्यवस्थीत महाराष्ट्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रतिसाद आणि प्राधान्य यावर गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी या विषयावर विशेषांकाच्या माध्यमातून विचार व्यक्त केले आहे. महामार्गाचे रक्षक, फोर्स वन, तत्पर तपास आणि अपराधसिध्दीत वाढ, संवेदनशील कार्यक्षमता, पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, गुन्हेसिध्दीचे शास्त्रीय तंत्र, डिजीटल तपासाची स्मार्ट दिशा, सायबर युगाची आव्हाने, सायबर गुन्ह्यांचा पाठलाग, सागरी सुरक्षीततेची सज्जता, गृहरक्षक, संपर्कदूत दक्षता यासह गोंदिया जिल्ह्याच्या वनवैभव आणि निसर्ग पर्यटनावर लेख सुध्दा या अंकात आहे. या अंकाची किंमत केवळ 10 रुपये असून हा अंक विक्रीसाठी जिल्हा माहिती कार्यालय येथे उपलब्ध आहे.

Wednesday 10 January 2018

मुद्रा बँक योजना मिशन मोडवर राबविणार - वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार

आतापर्यंत 50 लाख 38 हजार जणांना कर्जवाटप
देशातील आर्थिक विषमता दूर करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेली मुद्रा बँक योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेतून मागील दोन वर्षात  50 लाख 38 हजार जणांना कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यापुढील काळातही ही योजना प्रभावीपणे राबवून बेरोजगारांचे जीवनमान बदलण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, गोरगरिबांना विनातारण आणि विनाजामीन कर्ज मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी अशी मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. मागील साधारण दोन वर्षात राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. योजनेतून 2016 - 17 मध्ये 16.9 हजार कोटी रुपयांचे तर 2017 - 18 मध्ये आतापर्यंत 8.8 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 2016 - 17 मधे 33 लाख 44 हजार तर 2017 - 18 मधे आतापर्यंत 16 लाख 93 हजार इतक्या बेरोजगारांना आपण या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले आहे. यापुढील काळातही मिशन मोडवर ही योजना राबवून जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज आणि कोशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. याबरोबरच फक्त कर्ज वितरण न करता लाभार्थ्याला कौशल्य विकास प्रशिक्षणही देण्यात यावे, त्यामुळे मिळालेले कर्जाचे पैसे त्याला योग्य पद्धतीने वापरता येतील. प्रशिक्षण, कार्यशाळा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावरही भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मागील दोन वर्षांच्या काळात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तर नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यात कमी कर्जवाटप झाल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर योजनेचा उद्देशच आर्थिक विषमता दूर करणे हा आहे, त्यामुळे राज्यातील विशेषतः मागास जिल्ह्यातही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
नोकरी मागणाऱ्या हातापेक्षा नोकरी देणाऱ्या हातांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. या धोरणातूनच पुढे आलेल्या या योजनेला अधिक प्रभावी करण्यासाठी त्याची कौशल्य विकास विभाग, स्टार्टअप योजना, बचतगट विषयक विविध योजना यांच्याशी सांगड घालून पुढील आर्थिक वर्षातही ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

बैठकीस आमदार अनिल सोले, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, आयटी सचिव श्रीनिवासन, एसएलबीसीचे समन्वयक श्री. मस्के, ग्रामीण जिवनोन्नती कार्यक्रमाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्यासह मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे विविध सदस्य आदी उपस्थित होते. 

Saturday 6 January 2018

गावे आजारमुक्त करण्यासाठी शोषखड्डे आवश्यक - अभिमन्यू काळे

                                 • डासमुक्त गावासाठी सभा

• माहूर पं.स.सभापतीने केले सादरीकरण
      अनेक आजार हे सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या डासामुळे होतात. सांडपाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. तरच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. गावे डासमुक्त झाली तरच गावे आजारमुक्त होईल, यासाठी शोषखड्डे करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      तिरोडा येथील अदानी वीज निर्मिती प्रकल्पातील सभागृहात 4 जानेवारी रोजी शोषखड्डे निर्मितीतून डासमुक्त गाव करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी काळे हे अध्यक्ष म्हणून बोलत होते. सभेला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंताडा राजा दयानिधी, माहूर पं.स.सभापती मारुती रेकुलवार, अदानी प्रकल्पाचे स्टेशन हेड श्री.साहू यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.काळे म्हणाले, यावर्षी दुष्काळ सदृश्यस्थिती आहे. त्यामुळे आतापासून नियोजन करुन शोषखड्डे तयार करण्याचे आणि छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संकलन मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दयावा लागणार आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त रोजगाराची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी आतापासूनच खड्डे करावे. रब्बी हंगामात सुध्दा पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार नसल्यामुळे रोहयोतून मोठ्या प्रमाणात कामे घ्यावी असे त्यांनी सांगितले.
      ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे त्या गावांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करावे असे सांगून श्री.काळे म्हणाले, पिण्याच्या पाण्याच्या योजनांची दुरुस्ती करावी. सार्वजनिक विहिरीतील गाळ काढून घ्यावा. ज्या ठिकाणी विंधन विहिरीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी विंधन विहिरीसाठी मंजूरी घ्यावी. नादुरुस्त विंधन विहिरींची दुरुस्ती करावी. पाईप कमी पडत असतील तर बोअरसाठी पाईपची मागणी करावी. गावांसाठी ज्या ठिकाणावरुन पाणीपुरवठा करण्यात येतो तेथील पाण्याच्या स्त्रोतावर शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतीतील विहीर किंवा विंधन विहिरीचा परिणाम होत असेल तर अशांवर पाणी उपसा करण्यास बंदी घालावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात करावी असे त्यांनी सांगितले.
      रोजगार हमी योजनेची कामे प्रत्येक तालुक्यातील 10 गावात येत्या 10 जानेवारीपासून सुरु करावी असे निर्देश देवून श्री.काळे म्हणाले, 26 जानेवारीपर्यंत 1 लाख मजूर रोहयोच्या कामावर असतील असे नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ज्या गावांना भासणार आहे त्या गावांचे प्रस्ताव पाठवावे असे ते म्हणाले.
      श्री.दयानिधी म्हणाले, शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी ज्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही अशांना जातीचे प्रमाणपत्र तातडीने मिळवून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी सहकार्य करावे. जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. जे ग्रामसेवक मुख्यालयी राहणार नाही त्यांचा घरभाडे भत्ता कपात करण्यात येईल. यापूर्वी देण्यात आलेला घरभाडे भत्ता देखील वसूल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.रेकुलवार यांनी आपल्या सादरीकरणातून माहूर तालुक्यातील लांजी या गावी तत्कालीन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.काळे यांच्या संकल्पनेतून गावे डासमुक्त करण्यासाठी मी सरपंच असतांना लांजीत प्रत्येक घरी सांडपाण्याचा जमिनीत योग्य निचरा व्हावा यासाठी शोषखड्डे केले. शोषखड्यामुळे गाव डासमुक्त तर झालेच सोबत या पाण्याचा जमिनीत चांगला निचरा होत असल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे स्त्रोत कोरडे पडायचे मात्र शोषखड्डयामुळे पाण्याचा निचरा होवू लागल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात देखील विहीरी, विंधन विहिरींना देखील चांगले पाणी उपलब्ध झाले. 300 कुटूंबाच्या लांजीत दररोज दीड लाख लिटर पाणी इतरत्र वाहून न जाता भूगर्भात साठविले जाते. वर्षभरात 5 कोटी 40 लक्ष लिटर पाण्याचा निचरा होत असल्याचे सांगून श्री.रेकुलवार म्हणाले, शोषखड्डयामुळे संपूर्ण गाव डासमुक्त तर झालेच सोबत आजारमुक्त झाल्याचे सांगितले.
    जिल्हा डासमुक्त करण्यासाठी शोषखड्डे तयार करण्याच्या नियोजनाबाबतची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी (रोहयो) यांनी तालुक्यातील गावनिहाय दिली. सभेला उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी आणि सहायक प्रकल्प अधिकारी (रोहयो) यांची उपस्थिती होती.

Wednesday 3 January 2018

आज संस्कारीत माणसांची गरज - हरिभाऊ बागडे

महागाव येथे पुरस्काराचे वितरण

      समाजातील गरजू लोकांना शामरावबापू कापगते यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. अशा समाजाच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. दुष्काळाच्या काळात सुध्दा त्यांनी विदर्भ मराठवाड्यातील लोकांना मदत केली. ते संस्कारीत असल्यामुळेच त्यांनी समाजातील गरजवंतांना मदत केली. आज अशाप्रकारच्या संस्कारीत माणसाची गरज आहे. असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
      3 जानेवारी रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील महागाव (शिरोली) येथील श्यामाप्रसाद कनिष्ठ महाविद्यालयात शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा श्री.बागडे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हेमंत पटले होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक दिनेशभाई पटेल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, अर्जुनी/मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, कमल पाऊलझगडे, मंदा कुमरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.गजानन डोंगरवार, ऋषी शहारे यांची उपस्थिती होती.
      आणीबाणीच्या काळात शामरावबापूंनी कारावास भोगल्याचे सांगून श्री.बागडे म्हणाले, 1972 च्या दुष्काळात सुध्दा त्यांनी लोकांना मदत केली. समाजासाठी काम करीत असतांना त्यांनी वेळेचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी सुध्दा विद्यार्थी जीवनात वेळेचे नियोजन करुन यश संपादन करावे. स्वावलंबनासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्यविषयक शिक्षण घ्यावे. यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. आता उत्पन्नाची मर्यादा देखील वाढविण्यात आली आहे. अपघात विमा योजना, अटल पेंशन योजना याचा जास्तीत जास्त फायदा नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
      श्री.पटेल म्हणाले, प्रत्येकजन आज यश संपादन करण्यासाठी कार्य करीत आहे. शामरावबापूंनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वाहून घेतले. गरजवंतांना त्यांनी मदत केली. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना त्यांच्याठिकाणी होती असे ते म्हणाले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या, प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत आहेत. समाज व निसर्गाप्रती आपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. आज समाज कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे हे बघण्याची वेळ आहे. समाजाला काहीतरी आपले देणे आहे या भूमिकेतून शामरावबापूंनी काम केल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते सेवाव्रती पुरस्कार डॉ.देवाशिष चॅटर्जी (गोंदिया), गोरक्षा पुरस्कार नमुदेव ठाकरे (माहुरकूडा), संभा पंधरे (शिरोली), श्रमिक पुरस्कार किसन सूर्यवंशी (शिरोली), ल.वा.भोयर (मडेघाट), युवा पुरस्कार माधुरी वैद्य (दिघोरी/मोठी), वनश्री पुरस्कार शरद भुजाडे (पिंडकेपार), शिक्षक पुरस्कार अंगेश बेहलपांडे (लाखोरी), हेमराज हेमने, रामकृष्ण परशुरामकर, पंढरी दुधबरे, कला पुरस्कार मुलचंद गहाणे, कृष्णा किरसान, साहित्य पुरस्कार बंडोपंत बोडेकर (चंद्रपूर), डॉ.चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली), पत्रकारिता पुरस्कार अमरचंद ठवरे (बोंडगाव/देवी), आत्माराम मस्के (शिरोली), जीवन गौरव पुरस्कार डॉ.विलास डांगरे (नागपूर), मातोश्री पुरस्कार विशाखा गुप्ते (भंडारा), खेळाडू पुरस्कार शशीकला आगाशे, शेती पुरस्कार राजेंद्र सांभारे व अलका दुधबरे यांना पीएचडी मिळाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले.
      यावेळी डॉ.हेमकृष्ण यांनी लिहिलेल्या ‘हाती घे मशाल’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, मलखांब कवायती, दोरीवरच्या कवायती, शेतकरी समुह नृत्य सादर करुन उपस्थितांची प्रशंसा मिळविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड.मनीष कापगते यांनी मानले. कार्यक्रमाला महागाव (शिरोली) परिसरातील ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माविमद्वारे महिलांची मोटरसायकल रॅली

• 8 महिलांना मायक्रो एटीएमचे वाटप

                                  • लोकसंचालीत केंद्रांना धनादेश वाटप


     महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयच्या वतीने 3 जानेवारी रोजी नेहरु चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, नागपूर विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मतांदा राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक नीरज जागरे, समाज कल्याणचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त अनिल देशमुख, जि.प.माजी सभापती सविता पुराम, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
      जिल्हाधिकारी काळे यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. बचतगटाच्या माध्यमातून माविम मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरणावर सातत्याने भर देत आहे. जिल्ह्यातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करणार असल्याचे श्री.काळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
     श्री.ठाकरे यावेळी म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणात सावित्रीबाई फुलेंचा मोलाचा वाटा आहे. महिला त्यांच्या आदर्शावरच वाटचाल करुन स्वावलंबी बनत आहे.
     श्री.दयानिधी म्हणाले, महिलांनी सर्वांगीण विकासासाठी संघटीत होवून काम करावे. सामाजिक विकासात महिलांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आज सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
     डॉ.भूजबळ म्हणाले, महिलांना सामाजिक सुरक्षा पोलीस विभागामार्फत पुरवून कायदेशीर मदत दिली जाईल. जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांचे चांगले संघटन असून अनेक महिला आज उद्योग व्यवसाय करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
     प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महिलांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी बचतगटातील तुलसी चौधरी, भिमा पटले, शाहिस्ता शेख, अनिता चिखलोंडे, दुर्गा रंगारी, शोभा तावाडे, सुनिता शिवणकर, सत्यशिला भगत या 8 महिलांना मायक्रो एटीएमचे वाटप करण्यात आले.  उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया व स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव यांना आर्थिक मध्यस्थता उपक्रमाकरीता प्रत्येकी 24 लाख रुपयाचे धनादेश देण्यात आले.
     पंडीत नेहरु यांच्या पुतळ्याजवळ माविमच्या बचतगटातील महिला तसेच शहरातील महिला व युवतींच्या मोटरसायकल रॅलीला मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरुन फिरुन नेहरु चौक येथ विसर्जीत झाली. या रॅलीमध्ये ई-व्हेईकलचा सुध्दा समावेश होता. रॅलीतील आकर्षक चित्ररथात सावित्रीबाईच्या वेशभुषेत अनिता बडगे होत्या. कार्यक्रमस्थळी विविध वस्तूंचे विक्री स्टॉल लावण्यात आले होते.
      कार्यक्रम व रॅलीच्या यशस्वीतेसाठी सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी सतीश मार्कंड, लेखाधिकारी योगेश वैरागडे, सहायक नियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, उपजिविका सल्लागार श्री.बांगरे, श्री.पंचभाई, धनराज बनकर, श्रीमती बिसेन, मोनिता चौधरी, आशिष बारापात्रे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले. संचालन शालु साखरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रिया बेलेकर यांनी मानले. कार्यक्रम व रॅलीत मोठ्या संख्येने महिला व युवतींचा सहभाग होता.

विद्यार्थ्यांनो ! बौध्दीक क्षमता वाढविण्यासाठी कष्ट करा - हरिभाऊ बागडे

      सावित्रीबाई फुलेंनी पावनेदोनशे वर्षापूर्वी शिक्षणाचा विळा उचलला. त्या काळी मुलींनी शिक्षण घेवू नये अशी मानसिकता होती. आज मुली सावित्रीबाईंचा आदर्श पुढे ठेवून अनेक क्षेत्रात पुढे आल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनी बौध्दीक क्षमता वाढविण्यासाठी कष्ट करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
     अर्जुनी/मोरगाव येथील शिवप्रसाद जायस्वाल महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारंभाचे उदघाटक म्हणून श्री.बागडे बोलत होते. अध्यक्षस्थानी लुणकरण चितलांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, बद्रीप्रसाद जायस्वाल, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य मंदा कुमरे, नामदेव कापगते, शिवनारायण पालीवाल, लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती होती.
       श्री.बागडे यावेळी म्हणाले, पुर्वी कमी शिक्षण असणाऱ्यांना नोकरी लागत होती. आज चित्र बदलले आहे. सर्व परीक्षा हया ऑनलाईन झाल्या आहे. स्पर्धेत टिकून यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. दर्जेदार गुणवत्तेच्या आधारावर आज पुढे जाण्याची गरज आहे. शिक्षण हे अधिक दर्जेदार झाले पाहिजे. शाळेतील विद्यार्थी कसा टिकेल याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे. दुसऱ्यांशी स्पर्धा करतांना स्वत:मधील उणिवा शोधाव्या लागतील असे ते म्हणाले.
      पुढच्या पिढ्या अधिक घडवायच्या असतील तर शिक्षकांनी चांगले ज्ञानदान करणे गरजेचे आहे असे सांगून श्री.बागडे म्हणाले, कोणताही पाल्य हा शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. मागे असलेल्या समाजाला पुढे गेलेल्या समाजाच्या बरोबर आणण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले. गाडगेबाबांना देखील शिक्षणाची तळमळ होती. मुलींनी सावित्रीबाईचा विचार पुढे नेण्याचे काम करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष चितलांगे यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.

       प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींनी विद्यापीठ गीताने केली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, बचतगटातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजीव पाटणकर यांनी केले. संचालन श्री.काकडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.भरत राठोड यांनी मानले.