जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 3 January 2018

विद्यार्थ्यांनो ! बौध्दीक क्षमता वाढविण्यासाठी कष्ट करा - हरिभाऊ बागडे

      सावित्रीबाई फुलेंनी पावनेदोनशे वर्षापूर्वी शिक्षणाचा विळा उचलला. त्या काळी मुलींनी शिक्षण घेवू नये अशी मानसिकता होती. आज मुली सावित्रीबाईंचा आदर्श पुढे ठेवून अनेक क्षेत्रात पुढे आल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनी बौध्दीक क्षमता वाढविण्यासाठी कष्ट करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
     अर्जुनी/मोरगाव येथील शिवप्रसाद जायस्वाल महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारंभाचे उदघाटक म्हणून श्री.बागडे बोलत होते. अध्यक्षस्थानी लुणकरण चितलांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, बद्रीप्रसाद जायस्वाल, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य मंदा कुमरे, नामदेव कापगते, शिवनारायण पालीवाल, लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती होती.
       श्री.बागडे यावेळी म्हणाले, पुर्वी कमी शिक्षण असणाऱ्यांना नोकरी लागत होती. आज चित्र बदलले आहे. सर्व परीक्षा हया ऑनलाईन झाल्या आहे. स्पर्धेत टिकून यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. दर्जेदार गुणवत्तेच्या आधारावर आज पुढे जाण्याची गरज आहे. शिक्षण हे अधिक दर्जेदार झाले पाहिजे. शाळेतील विद्यार्थी कसा टिकेल याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे. दुसऱ्यांशी स्पर्धा करतांना स्वत:मधील उणिवा शोधाव्या लागतील असे ते म्हणाले.
      पुढच्या पिढ्या अधिक घडवायच्या असतील तर शिक्षकांनी चांगले ज्ञानदान करणे गरजेचे आहे असे सांगून श्री.बागडे म्हणाले, कोणताही पाल्य हा शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. मागे असलेल्या समाजाला पुढे गेलेल्या समाजाच्या बरोबर आणण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले. गाडगेबाबांना देखील शिक्षणाची तळमळ होती. मुलींनी सावित्रीबाईचा विचार पुढे नेण्याचे काम करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष चितलांगे यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.

       प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनींनी विद्यापीठ गीताने केली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, बचतगटातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजीव पाटणकर यांनी केले. संचालन श्री.काकडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.भरत राठोड यांनी मानले.

No comments:

Post a Comment