जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 22 January 2018

दिनदयाल अंत्योदय योजना : गोंदियातील 35 बचतगटांना कर्ज वितरण

    गोंदिया,दि.22 : दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत गोंदिया नगरपरिषद अंतर्गत कार्यरत 35 महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे 35 लाख रुपये कर्ज विविध उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी आयडीबीआय बँकेकडून मंजूर करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात विशेष जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या 22 जानेवारीच्या सभेत 5 महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रत्येकी 1 लाखाचे कर्जाचे धनादेश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, आयडीबीआय बँकेच्या नागपूर येथील प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली नेमलेकर, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
    गोंदिया नगरपरिषद अंतर्गत दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाने महिलांचे 361 स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन केले आहे. गोंदिया शहरातील महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून सक्षमीकरणाचे काम माविम करीत आहे. शहरी भागातील पात्र कुटूंबातील महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगटाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आयडीबीआय बँकेने माविमच्या मदतीने पुढाकार घेतला आहे.
      मार्च 2018 पर्यंत गोंदिया नगरपरिषदेअंतर्गत स्थापित बचतगटांपैकी 300 स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रत्येकी 1 लक्ष रुपये कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 150 महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना 1 कोटी 50 लक्ष रुपये आयडीबीआय बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.

      जिल्हाधिकारी काळे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लुंबीनी, अनुराग, एकता, प्रियल व जॉन्सी या महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयाचे धनादेश उद्योग व्यवसायासाठी देण्यात आले. यासाठी माविमची उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया काम करीत आहे. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक विक्रम बोराडे, न.प.च्या बचतगटाच्या तज्ञ श्रीमती बिसेन व लोकसंचालीत साधन केंद्राच्या मोनिता चौधरी उपस्थित होत्या.

1 comment: