जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 23 January 2018

रोहयोची कामे यंत्रणांनी समन्वयातून करुन मजूरांना रोजगार दयावा - पालकमंत्री बडोले

     जिल्ह्यात पाऊस समाधानकारक आला नसल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 23 जानेवारी रोजी रोजगार हमी योजनेचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, मुळात रोजगार हमी योजना ही आपल्या राज्याची योजना आहे. मात्र आज आपण या योजनेच्या अंमलबजावणीत माघारलो आहे. तालुका पातळीवर संबंधित यंत्रणांचा या योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका आहे. तालुका पातळीवर तहसिलदाराने यंत्रणांचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडावी. योजनेच्या कामाचा नियमीत आढावा दर महिन्याला घ्यावा. ज्या ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यांच्या मागणीचा विचार करुन त्यांना कामे उपलब्ध करुन दयावे. ग्रामपंचायती व ग्रामस्थांना विश्वासात घेवून रोहयोतून विकास कामे करावी. ज्या मजूरांना मागील कामांची अद्यापर्यंत मजूरी देण्यात आली नाही त्यांना ती त्वरित देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा. कुशलच्या कामाची थकीत मजूरी केंद्र सरकारकडून लवकर उपलब्ध कशी होईल यासाठी देखील पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले.
       पांदण रस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, जिल्ह्यात रोहयोमधून मोठ्या प्रमाणात पांदन रस्ते तयार करण्याचे नियोजन करावे. अनेक गावात अंतर्गत रस्त्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी पंचायत समितत्यांनी विशेष लक्ष्य देवून अंतर्गत रस्त्यांच्या अडचणीची सोडवणूक करावी असे त्यांनी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून अकुशलची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. निधी उपलब्ध नाही तरी सुध्दा मजूर मोठ्या संख्येने कामावर येत आहे. जिल्ह्यातील ज्या 13 हजार मजूरांची मजूरी प्रलंबीत आहे, निधी उपलब्ध होताच ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. ज्या कुटूंबांनी 90 दिवसापेक्षा जास्त काम केले आहे अशा कुटूंबातील मजूरांना कामगार कल्याण मंडळाचे फायदे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. जिल्ह्यात 22 जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर 864 कामे व यंत्रणांची 391 कामे अशी एकूण 1255 कामे सुरु असून त्यावर 68529 मजूर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

       सभेला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, सहायक वनसंरक्षक श्री.शेंडे, श्री.शेख, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी व रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment