जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 30 July 2016

लाभार्थ्यांच्या प्रतिसादामुळे समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरुप - पालकमंत्री बडोले




• ग्राम समाधान पंधरवाडा साजरा करणार
                           • 21 हजार लाभार्थ्यांची शिबीराला भेट
                 • 40 स्टॉल्समधून विविध योजनांची माहिती व अर्ज वितरण
            महाराजस्व अभियानाअंतर्गत 40 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा संकल्प आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असून विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गावोगावी शिबिराची माहिती देवून लाभार्थ्याना विविध योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            आज 30 जुलै रोजी गोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पूर्व तयारी समाधान शिबिराचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, माजी आमदार हेमंत पटले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, पं.स.सभापती दिलीप चौधारी, उपसभापती बबलू बिसेन, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, पं.स.सदस्य श्री.जनबंधू, डॉ.लक्ष्मण भगत, रेखलाल टेंभरे, रविकांत बोपचे यांचेसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
            पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, गोरेगाव तालुक्यातील 31 हजार लाभार्थ्यांनी या शिबिरातील विविध स्टॉलला भेट देवून योजनांची माहिती जाणून घेतली आहे. योजनांची माहिती गावापर्यंत पोहोचविण्यासाठी या शिबिराचा उपयोग झाला आहे. यंत्रणा व लाभार्थ्यांमधील दरी कमी होण्यास या शिबिराची मदत झाली आहे. लाभार्थ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करुन त्यांना योजनांचा लाभ देण्यात येईल. अधिकारी व पदाधिकारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी केलेले काम कौतुकास्पद आहे.
             1 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा पंधरवाडा साजरा करण्यात येईल असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, गावातील प्रत्येक कुटुंबाला महासमाधान शिबिराच्या माध्यमातून एकातरी योजनेचा लाभ मिळेल असे नियोजन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी विविध योजनांचे घेतलेले अर्ज परिपूर्ण भरुन येत्या पंधरवाड्यात योजनांचा लाभ मिळण्यासाठी तयार केले जातील. ज्या लाभार्थ्यांनी योजनांचे अर्ज घेतले नसतील अशा लाभार्थ्यांपर्यंत हे अर्ज पोहोचविण्यात येतील. 10 ऑगस्ट पर्यंत योजनांचा लाभ मिळण्याबाबतची सर्व प्रकरणे समाधान कक्षात पोहोचली पाहिजे. गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व विविध यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ मिळेल असे नियोजन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            डॉ.सूर्यवंशी म्हणाले, समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना योग्यप्रकारे व व्यवस्थीतपणे देण्याचा प्रयत्न आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला आहे. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देणे हे आपले कर्तव्य मानून यंत्रणांनी काम करावे. दिव्यांग बांधवांना सुध्दा स्वावलंबी करण्यासाठी दिव्यांग स्वावलंबन अभियानातून मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजना व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी आहे. लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळण्याबाबत स्वत: अर्ज दयावा. हे महासमाधान शिबीर राज्यात एक आदर्श निर्माण करेल असा विश्वास डॉ.सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
            आ.रहांगडाले म्हणाले, समाधान शिबिराच्या माध्यमातून अनेकांचे समाधान करण्यास मदत झाली आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहे. शासन व प्रशासन लाभार्थ्यांच्या जवळ येऊन योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            डॉ.भुजबळ म्हणाले, हे शिबीर महासमाधान शिबिराची पूर्व तयारी आहे. लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास शिबिराचा लाभ होत आहे. विविध यंत्रणांच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यास मदत होत आहे. पोलीस विभाग प्रतिसाद ॲपमुळे संकटात सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी काम करणार आहे. दारुबंदीसाठी गावकऱ्यांनी पुढे यावे यासाठी पोलीस प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतने येत्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव घेवून अवैध दारुविक्री करणाऱ्या व्यक्तीची, अवैध दारुविक्री होत असलेल्या दुकान, पानठेले याची माहिती पोलीस विभागाला देवून सहकार्य करावे. जिल्ह्यातील प्रत्येक गाव व टोला दारुमुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
            डॉ.रामगावकर म्हणाले, समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांनी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. वन विभागाकडून वन्य प्राण्यांकडून शेतीच्या नुकसान भरपाईपोटी मदत करण्यात येत असल्याचे सांगून वन विभागामार्फत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या बफर क्षेत्रालगतच्या गावांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्री.पटले म्हणाले, तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी पालकमंत्र्यांनी समाधान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामुळे अनेकांना योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्रीमती गहाणे म्हणाल्या, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांनी जाणून घेवून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
            सभापती चौधरी म्हणाले, शासनाच्या लोककल्याणकारी विविध योजना आहे. परंतू त्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना नाही. या शिबिरामुळे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळण्यास व त्या योजनांचा लाभ घेण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
            पंचायत समिती परिसरात समाधान शिबिराच्या निमित्ताने विविध योजनांची माहिती देणारे 40 स्टॉल लावण्यात आले होते. दिव्यांग व्यक्तींची तपासणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांच्या नेतृत्वात डॉ.सतीश जयस्वाल यांचेसह अन्य तज्ज्ञ डॉक्टर्सनी केली. तालुक्यातील अनेक गावातील लाभार्थ्यांनी विविध स्टॉलला भेटी देवून आपल्याला ज्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनांची माहिती जाणून घेतली व संबंधित स्टॉलमधून योजनेचा लाभ मिळण्याबाबतचे अर्ज घेतले. तहसिल कार्यालय येथे महासमाधान शिबिराच्या निमित्ताने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबतचे परिपूर्ण अर्ज समाधान नियंत्रण कक्षात पुरक कागदपत्रासह 10 ऑगस्ट पर्यंत आणून दयावे.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी श्री.हरिणखेडे, नायब तहसिलदार सर्वश्री सोमनाथ माळी, श्री.वेदी, जी.आर.नागपुरे, एस.एम.नागपूरे, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती श्रीवास्तव, भूमिअभिलेखचे श्री.मेश्राम, महावितरणचे श्री.भांडारकर, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.जाधव, पं.स.चे विस्तार अधिकारी श्री.सिंगनजुडे, श्री.गिरीपुंजे, श्री.साकुरे, समीर मिर्झा, सर्व तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक तसेच तालुका पातळीवरील विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी  आणि बार्टीच्या समतादूतांनी परिश्रम घेतले.
            कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, तसेच लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी केले. संचालन स्मीता आगासे यांनी तर उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी श्री.हरिणखेडे यांनी मानले

Wednesday 27 July 2016

समाधान शिबिरामुळे शासन, यंत्रणा व जनतेतील दुरावा कमी होण्यास मदत - डॉ.विजय सूर्यवंशी


: विविध योजनांचा लाभ हा गरजू लाभार्थ्याला मिळाला तर त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. समाधान शिबीरातून लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळाल्यास त्याला योजनांचा लाभ घेणे सोयीचे होते. अशा प्रकारच्या समाधान शिबीरामुळे शासन, विविध यंत्रणा व जनतेतील दुरावा कमी होण्यास मदत होत आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
          आज 27 जुलै रोजी अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्न सभागृहात महाराजस्व अभियानांतर्गत महासमाधान शिबीराच्या पूर्व तयारी निमित्ताने आयोजित दिव्यांग स्वावलंबन अभियान समाधान शिबीराचे उदघाटक म्हणून डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी माजी आमदार दयाराम कापगते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव डोंगरवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जि.प.सदस्य मंदा कुमरे, तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य रामलाल मुंगनकर यांची प्रमुख अतिथी म्हणून तर मंचावर तहसिलदार सिध्दार्थ भंडारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी समाधान शिबिरात नागरिकांचे समाधान ज्या प्रमाणे करीत आहे त्या प्रमाणे कार्यालयात कामानिमीत्त येणाऱ्या नागरिकांचे समाधान करावे. समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. अनेक नागरिक विविध योजनांची माहिती जाणून घेतांना व लाभ मिळण्यासाठी अर्ज भरतांना दिसत आहे. पालकमंत्री बडोले साहेबांच्या प्रयत्नांमुळे हे शिबीर होत आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          माजी आमदार कापगते म्हणाले, शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. परंतू समाधान शिबिराच्या आयोजनामुळे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळत आहे व लाभ घेणे सोयीचे होत आहे.
          श्रीमती गहाणे म्हणाल्या, समाधान शिबीर हे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळण्यास व लाभ घेण्यास उपयुक्त ठरत आहे. समाधान शिबीरामुळे कमी कालावधीत योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. शिबीरामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडणार नाही असे सांगितले.
          शिबीराला अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावपातळीवरील विविध यंत्रणांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध यंत्रणांच्या स्टॉलमधून लाभार्थ्यांना व नागरिकांना योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी अर्जाचे वाटप करण्यात आले.

          यावेळी लाभार्थ्यांना व मृतकांच्या वारसांना योजनेचे धनादेश वाटप केले. जवळपास 17 हजार नागरिक व लाभार्थ्यांनी या शिबीरात आपली नोंदणी केली. दिव्यांग स्वावलंबन अभियानाची तसेच समाधान शिबीराविषयीची माहिती गजानन वाघ यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार तथा उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी केले. संचालन प्रा.डॉ.दिलीप नाकाडे यांनी केले. आभार गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले.

Sunday 24 July 2016

पूर्व तयारी समाधान शिबिरात पालकमंत्र्यांकडून विविध स्टॉलची पाहणी व लाभार्थ्यांशी साधला संवाद



        शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावपातळीवर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला मिळाला पाहिजे हा ध्यास घेवून पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी महाराजस्व अभियानाअंतर्गत महासमाधान शिबिरातून 40 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा संकल्प केला आहे. या महासमाधान शिबिराची पूर्व तयारी म्हणून आज 24 जुलै रोजी सडक/अर्जुनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नविन इमारतीत महासमाधान शिबिराच्या निमित्ताने पूर्व तयारी समाधान शिबीर व दिव्यांग स्वावलंबन अभियानाअंतर्गत लावण्यात आलेल्या विविध विभागाच्या 68 स्टॉलला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देवून पाहणी केली व स्टॉलवरुन विविध योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांचेसोबत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण,  पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, माजी पं.स.सभापती पदमा परतेकी, माजी पं.स.सदस्य अर्जुनी घरोटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, तहसिलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी बी.के.लोकरे यांची उपस्थिती होती.
          सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक गावातून आलेल्या 10 हजाराच्यावर लाभार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी अनेक गावातील लाभार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन त्यांच्याशी संवाद साधला. योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित योजनांचे अर्ज परिपूर्ण भरण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी लाभार्थ्यांना दिल्या. काही लाभार्थ्यांनी त्यांच्या अडीअडचणी पालकमंत्र्यांकडे यावेळी मांडल्या.
          यावेळी दिव्यांग स्वावलंबन अभियानाअंतर्गत सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक दिव्यांग व्यक्तींची तपासणी डॉ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वातील आठ वैद्यकीय पथकाने केली. या दिव्यांग व्यक्तीला लागणारे साहित्य तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र त्यांच्याकडून परिपूर्ण भरुन त्यांना लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्ह्यातील जवळपास 1 हजार दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 20 हजार रुपये त्यांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. अनेक दिव्यांग व्यक्तींशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
          या शिबिरात लोकराज्य, नविन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिकेत नाव चढविणे, शिधापत्रिकेतून नाव कमी करणे, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब आर्थिक लाभ योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, जमिनीचे वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतर, संपत्तीचे आपसी वाटणीपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिक बस सवलत, विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र वाटप, भूमि अभिलेखद्वारे जमिनीची मोजणी, जमीन सुपिकता प्रमाणपत्र, राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम, कृषिपंपांना नविन विद्युत जोडणी, सौर कृषिपंप योजना, रमाई घरकूल योजना, इंदिरा आवास योजना, मुद्रा बँक- व्यवसायासाठी कर्ज, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडणे, विना जाणीव तारण कर्ज योजना, स्व.प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान, अटल पेंशन योजना, सुकन्या समृध्दी योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीक विमा योजना, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, नवबौध्द घटकांना मोफत घरगुती विद्युत जोडणी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ओळखपत्र, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, आदिवासींना एलपीजी गॅसचा पुरवठा, मत्स्य व्यावसायीकांना उपयोगी सामुग्रीचा पुरवठा, विद्यार्थीनींना मोफत बस पास योजना, अपंगांना सवलतीच्या दरात धान्य पुरवठा, वन्यप्राण्यांनी केलेली नुकसान भरपाई, विविध महामंडळाद्वारे व्यवसायाकरीता कर्जपुरवठा, ऑनलाईन लर्निंग लायसन्स मार्गदर्शन, वनहक्क जमिनीचे पट्टे वाटप, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मुला-मुलींना सायकल वाटप, महिलांना शिलाई मशिन वाटप, वस्तीगृह प्रवेश, अपंगत्व ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, जातीचे प्रमाणपत्र, मतदार यादीत नाव समावेश, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, पोलीस विभागाच्या योजना तसेच दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी त्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने विविध स्टॉल लावण्यात आले होते.

          महासमाधान शिबिराच्या नि‍मित्ताने तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. गावपातळीवरील काम करणाऱ्या यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती या महासमाधान अभियानाच्या निमित्ताने गावपातळीवर प्रत्येक कुटुंबांना दिली आहे.

प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न - पालकमंत्री राजकुमार बडोले


     शासन आपल्या दारी या संकल्पनेतून महाराजस्व अभियानाअंतर्गत ऑगस्ट महिन्यात महासमाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध 50 पेक्षा जास्त योजनांचा लाभ 40 हजार लाभार्थ्यांना देण्याचे निश्चित केले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
          आज 24 जुलै रोजी सडक/अर्जुनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नविन इमारतीत महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित पूर्व तयारी समाधान शिबिराचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी बी.आर.लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          शासनाच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, यासाठी सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व गोरेगाव तहसिल कार्यालय येथे स्वतंत्र समाधान नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांनी पूर्व समाधान शिबिरानंतर परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह समाधान कक्षात सादर करावे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देणे शक्य होईल. दिव्यांग व्यक्तींना सुध्दा त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रत्येक योजनेचा फायदा प्रत्येक कुटुंबाला मिळाला पाहिजे यासाठी लाभार्थ्यांनी या शिबिरातील स्टॉलवरुन विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          डॉ.सूर्यवंशी म्हणाले, पूर्व तयारी समाधान शिबिरात उपस्थित लाभार्थ्यांची संख्या बघून खऱ्या अर्थाने समाधान होत आहे. येथे असलेल्या विविध स्टॉलवरुन योजनांचे अर्ज लाभार्थ्यांनी परिपूर्ण भरुन समाधान नियंत्रण कक्षात सादर करावे. हक्काने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जावून लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ मिळण्याची मागणी करावी. परिपूर्ण भरलेल्या अर्जामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
          डॉ.पुलकुंडवार म्हणाले, आजच्या पूर्व तयारी समाधान शिबिराला मिळालेला लाभार्थ्यांचा प्रतिसाद उदंड आहे. पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे. परंतू योजना हया खऱ्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजे. त्यांनीच या योजनांचा खऱ्या अर्थाने लाभ घेतला पाहिजे. लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेवून आपले जीवनमान उंचवावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
          यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सडक/अर्जुनी तालुक्यातील प्रविण मत्स्यपालन सहकारी संस्था मालीगुंजा या संस्थेचे सदस्य जनीराम मेश्राम यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसदार पत्नी धर्मशिला मेश्राम यांना केंद्र पुरस्कृत अपघात गटविमा योजनेचा 1 लक्ष रुपयाचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाला सडक/अर्जुनी तालुक्यातील विविध गावातील जवळपास 13 हजार लाभार्थी उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांनी विविध विभागाच्या स्टॉलला भेट देवून त्यांच्याशी संबंधित असलेल्या योजनांची माहिती जाणून घेतली. योजनांचा लाभ घेण्यासाठी काही लाभार्थ्यांनी तेथेच अर्ज भरले. आता 6 ऑगस्ट पर्यंत तालुक्यातील सर्व लाभार्थी विविध योजनांचा लाभ मिळण्याबाबतचे अर्ज तालुका समाधान नियंत्रण कक्षात पुरक कागदपत्रासह सादर करणार आहे.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व बार्टीच्या समता दुतांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाला जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले. संचालन श्री.मेश्राम यांनी, तर उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी बी.आर.लोकरे यांनी मानले. 

Saturday 16 July 2016

शिव ऑनलाईन वर्कमुळे रतन झाला स्वावलंबी

वाढती बेरोजगारी व स्पर्धात्मक युगामुळे सर्वांनाच नोकरी मिळणे आज शक्य नाही. शासन विविध स्तरावर सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराचा मार्ग दाखवून स्वावलंबी करीत आहे. जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथील रतनलाल राऊत (वय 25 वर्ष) या पदवीधर युवकाने एक महिना कालावधीचे कम्प्युटर डाटा एन्ट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण घेऊन गावातच शिव ऑनलाईन जॉब वर्कचे दुकान थाटले आहे. याद्वारे त्याने बेरोजगारीवर मात करुन इतर बेरोजगारांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
     कट्टीपारच्या रतनलालने बी.ए.ची पदवी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मॅकेनिकलचा कोर्स सुद्धा केला आहे. घरी असलेल्या एक एकर शेतीवर आई वडील व भावासह आपला उदरनिर्वाह चांगल्याप्रकारे होऊ शकत नाही हे रतनच्या ध्यानात आले. त्यामुळे रतनने मेकॅनिकलच्या कोर्सच्या आधारे तिरोडा येथील इंजिनिअर वर्कशॉपमध्ये जवळपास एक वर्षापर्यंत 1700 रुपयामध्ये प्रति महिना या प्रमाणे काम केले. यामधून कुटुंबाला थोडाफार हातभार लागण्यास मदत झाली. पण रतनची स्वत:च्या बळावर स्वावलंबी होण्याची अस्वस्थता कायम होती.                                              एकदा रतन कामानिमित्त आमगाव पंचायत समितीमध्ये गेला असता त्याला स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या विविध कोर्सचे बॅनर दिसले. या बॅनरवरील माहितीच्या आधारे रतनने थेट गोंदिया येथील कुडवा नाका येथील वहाणे पॅलेसमधील स्टार स्वरोजगार संस्थेचे कार्यालय गाठून विविध प्रशिक्षणाबाबतची माहिती जाणून घेतली. कम्पुटर डाटा एन्ट्री ऑपरेटर हा कोर्स करण्याचा निश्चय केला.
      रतनने एप्रिल 2015 मध्ये बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक व भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहाय्याने संचालित असलेल्या स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे एक महिना कालावधीचे नि:शुल्क, निवासी व मोफत भोजन व्यवस्था असलेले कम्प्युटर डाटा एन्ट्री ऑपरेटर कोर्सचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर स्वत:च्या पायावरच उभे राहण्याचा निश्चय रतनने केला. आपले गाव व परिसरातील गावातील अनेक जणांची ऑनलाईन कामे करण्यासाठी शिव ऑनलाईन जॉबवर्कचे दुकान थाटण्याचा निर्णय रतनने घेतला. आमगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेने रतनला या व्यवसायासाठी 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. 50 हजार रुपयात रतनने एक संगणक, एक प्रिंटर, स्कॅनर, बीएसएनएलचे ब्रॉड बॅन्डचे कनेक्शन, शितपेय विक्रीसाठी एक फ्रीज व इतर स्टेशनरी साहित्य खरेदी केले.
      ऑनलाईन जॉबवर्कच्या माध्यमातून रतन हा आता कट्टीपार, नंगपूरा, डोंगरगाव, गोसावीटोला, धामणगाव, पिपरीपार या गावातील नागरीकांची, विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची कामे करतो. ग्रामपंचायत रहिवाशी दाखले, आधारकार्डच्या स्लीपवरुन आधारकार्ड कार्ड, 10 वी व 12 वीच्या ऑनलाईन गुणपत्रिका, सीईटी, सेट, नेट परीक्षांचे हॉल तिकीट, विविध परीक्षेसाठी अर्ज करणे, ऑनलाईन सातबारा, नमुना आठ-अ, उत्पन्नाचा दाखला, शेतीविषयक चौकशी अहवाल, विविध कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसुध्दा रतन या जॉबवर्कच्या दुकानातून काढून देतो. शितपेय, स्टेशनरी सुध्दा तो ठेवत असल्यामुळे त्याच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी मदतच झाली आहे. ऑनलाईन जॉब वर्कमुळे त्याला प्रति दिन 500 रुपये उत्पन्न मिळत आहे. कुटुंबाच्या अर्थकारणात रतनचाही हातभार लागत आहे. हा व्यवसाय मोठ्या स्वरुपात सुरु करण्याचा विचार असल्याचे रतनने सांगितले. वाढत्या बेरोजगारीवर स्वकष्टाने मात करुन स्वावलंबी होऊन रतनने इतरांसाठी स्वावलंबनाचा मार्ग दाखविला आहे.

Friday 15 July 2016

पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते कन्हेरी/राम येथे नारळांचे वृक्ष वाटप

पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या सडक/अर्जुनी तालुक्यातील कन्हेरी/राम येथील ग्रामपंचायतमध्ये आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना नारळाच्या वृक्षांचे वाटप केले. यावेळी पं.स.सभापती कविता रंगारी, उपसभापती विलास शिवणकर, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, सरपंच इंदिरा मेंढे, उपसरपंच श्री.मेंढे, धनंजय वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

          पालकमंत्री यावेळी म्हणाले, ग्रामस्थांना देण्यात आलेल्या नारळाच्या झाडाची कुटुंबातील सदस्यांसारखी काळजी घ्यावी. त्याला नियमीत पाणी घालून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करावे. या झाडापासून चार वर्षानंतर उत्पादनाला सुरुवात होईल. वार्षिक सरासरी उत्पादन 5 हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला या झाडापासून मिळणार आहे. नारळाच्या झाडांचे गाव म्हणून कन्हेरी/रामचा नावलौकीक व्हावा यासाठी त्या झाडांची जोपासणा करावी असे आवाहनही त्यांनी केले. तसेच नारळापासून दोरी तयार करणे, आरोग्यवर्धक पाण्यासाठी ओल्या नारळांची विक्री सुध्दा करता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कन्हेरी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावातील प्रत्येक कुटुंबाला एक नारळाचे झाड पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी 500 नारळांची झाडे वितरीत करण्यात आले.

Thursday 14 July 2016

महासमाधान शिबिरातून 40 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा संकल्प - पालकमंत्री बडोले

  शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. येत्या आँगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महासमाधान शिबिरातून जवळपास 40 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            आज 14 जुलै रोजी गोरेगाव पंचायत समितीच्या बचत भवन येथे आयोजित महाराजस्व अभियानाअंतर्गत महासमाधान शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी गोरेगाव पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती बबलू बिसेन, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी श्री.हरिणखेडे, पं.स.सदस्य श्री.जनबंधू, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांनी प्रामुख्याने उपस्थिती होती.
            पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाल्यास त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलण्यास मदत होईल. महासमाधान शिबिराच्या माध्यमातून गावपातळीवरील विविध लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे.लाभार्थ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे एकत्र करुन अर्जासोबत भरुन दयावे. त्यामुळे लाभार्थ्याला योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल, असेही ते म्हणाले.
            सभापती चौधरी म्हणाले, महासमाधान शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. लाभार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज भरुन त्याला लाभ देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनीधींनी पुढाकार घेऊन शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले.
            श्री.डहाट म्हणाले, महसूल विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला महासमाधान शिबिराच्या माध्यमातून मिळाला पाहिजे यासाठी तलाठी, ग्रामसेवक व गावपातळीवरील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व शासनाच्या तालुका पातळीवरील विविध यंत्रणांनी स्वत:हून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पुढे यावे असे ते म्हणाले.
            सभेला तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, भूमि अभिलेखचे उपअधीक्षक श्री.मेश्राम, गटशिक्षणाधिकारी यशवंत तावडे, महावितरण कंपनीचे सहायक अभियंता श्री.भांडारकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती श्रीवास्तव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नाकाडे यांचेसह मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, तलाठी, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक व कोतवाल यांची उपस्थिती होती.
कोतवाल यांची उपस्थिती होती.

शिवमंदीर नागरा

    गोंदियाच्या उत्तर दिशेकडे 5 किमी दुर अंतरावर प्राचीन गाव नागरा आहे. हया गावातील एका टेकडीचे उत्खनन केल्यानंतर प्राचीन हेमाडपंथी शिव मंदीर आढळले. हे गाव 2200 वर्षापूर्वी वसाहत असल्याचे पुरातत्व उत्खनन विभागाचे अनुमान आहे. नागनाथ पासून नागेश्वर बनलेला आहे. ज्यामुळे नागराजच्या कारणांनी ह्या गावाचे नाव नागरा पडले आहे. ही हेमाडपंथी लोकांची वस्ती असावी. येथून 2 किमी अंतरावरची भैरव टेकडी हि सर्वेक्षणाअंती पुरातन असल्याचे आढळले.

Tuesday 12 July 2016

सालेकसा पुरातन व पर्यटन


   
      गोंदिया जिल्हयातील सालेकसा तालुक्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. या तालुक्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पर्यटनस्थळी झालेल्या विकासामुळे परिसरातील गावकऱ्यांना बऱ्यापैकी रोजगाराच्या संधी प्राप्‍त झाल्या आहेत.
          सालेकसा तालुक्यात पुरातान्विकदृष्टया काही अवशेष मिळाल्यामुळे या तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कचारगडची गुंफा पुरातात्विकदृष्टया महत्वाची आहे. या गुफेची उत्तर-दक्षिण लांबी 58 मीटर असून उंची 57 मीटर आहे. एकाच दगडातून या गुफेची निर्मिती झाली आहे हि वैशिष्टयपूर्ण बाब आहे. एकाच वेळी 200 लोक या गुफेमध्ये बसू शकतात एवढी ही गुफा प्रशस्त आहे. आदिवासी समाजाचे उगमस्थान व पवित्र धार्मिक स्थळ म्हणून कचारगडची गुफा प्रसिध्द आहे. एका गोंडी गितानुसार महादेवाने गोंड लोकांना लोखंडी गुफेत बंदिस्त करुन दरवाज्यावर एक मोठा दगड ठेवला. आदिवासींचा नेता लिंगो यांने दगड हटवून सर्व लोकांना मुक्त केले. हेच आदिवासीचे पूर्वज होते. असे सांगण्यात येते.
          कचारगड येथील उत्खननात कु-हाड, छिन्नी, उखळ ही पाषाणशस्त्रे सापडलेली आहेत. त्याचप्रमाणे मातीची भांडी देखील मिळालेली आहेत.
          कचारगड येथे दरवर्षी पाच दिवसांची यात्रा भरते. पर्यटक व जवळपास 9 राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी होतात. हाजराफॉल सालेकसाच्या पूर्वेला असून पर्यटकांना आकर्षित करणारे निसर्गरम्य स्थळ आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाहाला हाजराफॉल म्हणत असून हाजराफॉल बघताच शुभ्र, फेसाळ, दुधाच्या धारा वाहत असल्याचा भास होतो. दरवर्षी पावसाळयादरम्यान हाजराफॉल प्रचंड वाढलेला प्रवाह बघण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.
          सालेकसातील जागृत देवस्थान म्हणून गडमाता मंदिर मान्यता पावले आहे. राज्यसरकारच्या वतीने कचारगड व हाजराफॉल प्रमाणेच गडमाता मंदिरलाही पर्यटनाचा क श्रेणीचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्रीत येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. गडमाता मंदिराच्या गडाच्या उंचीपर्यंत गेल्यावर  सालेकसा तालुक्याचे विहंगम नयनरम्य दृश्य व निसर्ग दृष्टीस पडतो.
          सालेकसातील पर्यटन स्थळांमध्ये हलबीटोला येथील त्रिलोकेश्वरधाम येथील सर्वत्र वनराई बघता येते. 51 फुटाचे त्रिशूल व भगवान शंकराची प्रचंड मुर्ती येथील खास आकर्षण होय.

Friday 8 July 2016

महिलांची कुटुंबातील भूमिका अर्थमंत्र्याची - डॉ.पुलकुंडवार

तिरोडा येथे माविमची सातवी वार्षिक सभा
        गोंदिया,दि.8 : कुटुंब व्यवस्थेत स्त्रीला महत्वाचे स्थान आहे. कुटुंबाच्या विविध गरजांचे नियोजन महिला करतात. त्यामुळे महिलांची कुटुंबातील भूमिका ही गृहमंत्र्याची नव्हे तर अर्थमंत्र्याची आहे, असे मत प्रभारी जिल्हाधिकारी तथा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.
            आज 8 जुलै रोजी तिरोडा येथील झरारीया सभागृहात तेजस्वीनी राज्य ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी लोकसंचालित साधन केंद्र तिरोड्याच्या सातव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उदघाटक म्हणून डॉ.पुलकुंडवार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तिरोडा पं.स.च्या सभापती आशा किंदरले, युनिसेफचे राज्य समन्वयक जयंत देशपांडे, युनिसेफच्या राज्य सल्लागार श्रीमती भारती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे विभागीय मूल्यमापन अधिकारी केशव पवार, तेजस्वीनीच्या अध्यक्ष लिला बिसेन, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, सहायक समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            डॉ.पुलकुंडवार पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सक्षम करण्यात येत आहे. बचतगटातील महिलांनी विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन शेतीपुरक व्यवसाय सुरु करावे. नवनविन मार्केटिंगच्या संधी उपलब्ध होत आहेत, त्याचा पुरेपूर वापर करुन आपल्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून दयावी. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी दुबार व तिबार पिके घेण्यासाठी बचतगटातील महिलांनी त्यांना प्रवृत्त करावे. केवळ धानाचे उत्पादन न घेता, नगदी पिकाकडे शेतकरी वळला पाहिजे यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. बचतगटाच्या महिला कुटुंबाचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.
            तिरोडा येथील मार्केटिंक केंद्र बचतगटाच्या उत्पादित मालांची विक्री करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगून डॉ.पुलकुंडवार पुढे म्हणाले, बचतगटातील महिलांनी घेतलेल्या कर्जातून जास्तीत जास्त पैसा कोणत्या व्यवसायातून उपलब्ध होईल अशा व्यवसायाची निवड करावी. सुरु केलेले व्यवसाय जास्तीत जास्त नफ्यात कसे येतील याकडे लक्ष दयावे. सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात महिलांनी महत्वाची भूमिका बजावावी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            श्रीमती किंदरले म्हणाल्या, बचतगटाच्या माध्यमातून महिलांचा विकास होत आहे. बचतगटातून महिलांनी आपले कतृत्व सिध्द केले आहे. आजची महिला शिक्षीत असून सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्याप्रकारे प्रवेश केला आहे. सावित्रीबाई फुलेंचा आदर्श पुढे ठेवून महिला वाटचाल करीत आहे. महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देवून विकासाला गती दयावी व आत्मविश्वासाने वाटचाल करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            श्री.देशपांडे म्हणाले, महिलांनी आयुष्याचा मोठा काळ बचतगटात घालविला आहे. भावी आयुष्याची तरतूद बचतगटातील सदस्यांनी नियोजनपूर्वक करावी. बचतगटामुळे महिलांची शक्ती वाढली आहे. दिर्घकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बचतगटांनी काम करावे. बचतगटातील सदस्यांचा एकमेकांवर विश्वास असला तर बचतगटाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होतो, असेही ते म्हणाले.
            श्री.देशमुख म्हणाले, कुटुंब व समाजाच्या प्रगतीसाठी बचतगट उपयुक्त आहे. महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी बचतगटाची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येक महिला ही कुटुंबाची आधारस्तंभ आहे. महिलांनी वैयक्तीक प्रगतीसोबत समाजाच्या प्रगतीसाठी काम करावे. गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून गावातील कोणतेही कुटुंब शौचालयाविना राहणार नाही यादृष्टीने काम करावे. जे शौचालय बांधत नाही त्यांचे शौचालय बांधकाम करण्याबाबत मनपरिवर्तन करण्याची भूमिका बचतगटातील महिलांनी पार पाडावी. यावेळी युनिसेफच्या सल्लागार श्रीमती भारती, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे विभागीय मूल्यमापन अधिकारी केशव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
            प्रास्ताविकातून श्री.सोसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने 7 तालुक्यात विविध महिला बचतगटांची निर्मीती करुन 58 हजार महिलांना सक्षम केले आहे. मागीलवर्षी या बचतगटांना उद्योग व्यवसायासाठी 19 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. तर यावर्षी 27 कोटी रुपये कर्जस्वरुपात बचतगटांना देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी आम्रपाली महिला बचतगट मुंडीकोटाच्या श्रीमती डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील रमाबाई आंबेडकर महिला बचतगट बेलाटी, माऊली महिला बचतगट करटी, तुलसी महिला बचतगट परसवाडा, आधार महिला बचतगट गांगला, ओक महिला बचतगट सातोना व दुर्गा महिला बचतगट मेंदीपूर या बचतगटांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते तेजस्वीनी लोकसंचालित साधन केंद्र तिरोडाच्या अहवाल पुस्तिकाचे सन 2015-16 चे विमोचन करण्यात आले.
            या सभेत सन 2015-16 चा वार्षिक अंदाजपत्रकाचे आढावा वाचन करण्यात आले. सन 2016-17 च्या वार्षिक अंदाजपत्रक व नियोजन वाचन करुन मंजूरी प्रदान करण्यात आली. वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक पूर्ततेकरीता विशेष नियोजनावर, कृषी सेवा केंद्राविषयी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानावर चर्चा करण्यात आली.
            सभेला सहयोगीनी, प्रभाग समन्वयक, तालुका अभियान कक्षातील कर्मचारी, वस्ती समुदाय साधन व्यक्ती, ग्रामसंस्था लेखापाल, पशु सखी, कृषी सखी, मत्स्य सखी, बँक मित्रा, कायदा साथी, तालुका उपजिविका व्यवस्थापक, तालुका उपजिविका सल्लागार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी अनिता आदमने, शिल्पा येडे, प्रितम पारधी, विनोद राऊत, सारिका बंसोड, सुनिल पटले, चित्रा कावळे, रेखा रामटेके, निशा मेश्राम, लक्ष्मीप्रसाद बारापात्रे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सविता तिडके यांनी केले. उपस्थितांचे आभार नंदेश्वरी बिसेन यांनी मानले.

तलावांचा जिल्हा पाणीदार गोंदिया



                                      "  असतील जेथे जलाचे साठे
                                  तेथे स्वर्गही वाटे उणे...  "

             तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख. या जिल्हयातील पूर्वजांना जलसाक्षरतेचे महत्व त्याकाळीच कळले होते. त्याकाळी सिंचनाची सुविधा माजी मालगुजारी तलावातूनच उपलब्ध झाली. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गोंदियाला वरदान लाभले ते विपूल नैसर्गिक साधनसंपत्तीचे. आज जिल्हयातील परसवाडा,गंगेझरी,गोठणगाव यासारखे अनेक माजी मालगुजारी तलाव आज स्थलांतरीत व विदेश पक्षांच्‍या काही काळाच्या वास्तव्यामुळे पर्यटनाचे केंद्र बनले आहे.
             मानवी जीवनात पाणी बहुमोल आहे. पाण्याविना जीवन जगण्याची कल्पनाही आपण करु शकत नाही. थोरामोठयांना जलसाक्षरतेचे महत्व आज पटले आहे. पाण्याचा थेंब-न्-थेंब वाचविण्यासाठी अनेक उपक्रम अंमलात आणले जात आहे. परंतू पूर्वजांच्या दूरदर्शीतेने आजची पाणीटंचाईची ही समस्या  फार पूर्वीच हेरली होती. त्यादृष्टीने त्यांनी पावलेही उचलली होती. पाणी जरी नैसर्गिक साधन संपत्ती आहे पण कधीतरी त्याचा स्त्रोत संपुष्टात येवू शकतो याची जाणीव ठेवून जणू पूर्वजांनी त्याबाबतची व्यवस्‍थाच निर्माण करुन ठेवली.
            तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हयात 2130 तलाव असून त्यापैकी 1886 तलाव हे माजी मालगुजारी तलाव आहेत. अंदाजे 300 ते 350 वर्षापूर्वी 16 व्या शतकात पूर्व विदर्भावर गोंडराज्याचे राज्य होते. तत्कालीन राज्यकर्त्यांची दूरदृष्टी कमालीची होती. जनतेची भविष्यातील पाण्याची आवश्यकता बघता गोंडराजाने फर्मान काढले की, तलाव निर्मिती करणा-या गावक-यांना ते गांव बक्षीस म्हणून देण्यात येईल. त्यावेळी देखील त्या भागात धानाचे पिक प्रामुख्याने घेण्यात येत होते. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील पावसाची सराससरी जरी बरोबर असली तरी कधीकधी दडी मारणा-या पावसामुळे भात पिक धोक्यात येत होते. ही बाब लक्षात ठेवून आणि बक्षिसामुळे जिल्हयातील कोहळी व पोवार समाजातील मालगुजारांनी लोकसहभागातून तलावांची निर्मिती केली. तलावांची निर्मिती करतांना त्यांच्यातील अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करुन पाणी साठविण्यासाठी योग्य जागेची निवड केली.
      त्याकाळात जमिनीचा उतार व खोली मोजण्याची यंत्रणा नव्हती. त्यावर उपाय म्हणून मालगुजारांनी तलावांचे जाळे निर्माण केले. तलाव निर्मितीमध्ये मालगुजारांचे कष्ट म्हणून या तलावांना मालगुजारी तलाव म्हणून संबोधले जाते.
          स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सन 1950 मध्ये मालगुजारी संपुष्टात आल्यानंतर शासनाने सन 1963 मध्ये माजी मालगुजारी तलाव ताब्यात घेतले. परंतू या तलावापासून शेतक-यांना सिंचनाचे मुक्त अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जसेच्या तसे ठेवले आहे.
      जिल्हयातील परसवाडा,झिलमिली, गंगेझरी,गोठणगांव या सारखे अनेक माजी मालगुजारी तलाव आज पर्यटनाचे व पक्षी अभ्यासकांचे केंद्र बनले आहे. या माजी मालगुजारी तलावावर मध्य पूर्व ऐशीया, मध्ययुरोप, सायबेरिया, मंगोलिया, लेह, लदाख, अमेरिका, इंग्लड, आस्ट्रे‍लिया, इंडोनेशीया, पाकिस्थान, दक्षिण पूर्व आशिया, उत्तर युरोप, उत्तर अमेरीका,दक्षिण युरोप,पूर्व चीन,बांग्लादेश, मध्य आशिया, व आखाती देशातून विविध प्रजातीचे पक्षी हिवाळयात येथे येतात. त्यामध्ये ग्रे लेग गुज, बार हेडेड गुज, कॉम्ब डक, कॉमन टेल, स्पॉट बिल्ड डक, नॉर्थन पिन्टेल, नॉर्थन शॉवेलर, युरेशिएन विंजेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड,फेरोजिनस पोचार्ड, इंडियन पिट्टा, कॉमन क्रेन,  ग्रीन पोचार्ड,कस्टर्ड पोचार्ड, यासारखे 350 च्या वर विविध प्रजातीचे पक्षी येथे येतात. बार हेडेड गुज हा पक्षी तर उंच हिमालय ओलांडून जिल्हयात दाखल होतो. तलावांच्या काठावर असलेले देवधान व तलावातील किटक हे पक्षी आवडीने खातात. तलावांचा परिसर व तेथील वातावरण या पक्षांना पोषक असल्यामुळे पिल्ले जन्माला घातल्यानंतर ते आपल्या मायदेशी परत फिरतात. पक्षांच्या वास्तव्यामुळे अनेक तलाव हे आज पर्यटकांना व पक्षीनिरीक्षकांना अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. 

Thursday 7 July 2016

रामलालने काष्ठ शिल्पकलेतून केले अनेकांना स्वावलंबी


       प्रत्येकाकडे काही ना काही उपजतच कला गुण असतात. हे कलागुणच त्यांना जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर स्वावलंबी करण्यास मदत करतात. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा इतरांनाही दानधर्म करुन त्यांना स्वावलंबी करणारे फारच थोडे असतात. सालेकसा तालुक्यातील निंबा येथील रामलाल चव्हाण या काष्ठ शिल्पकाराने गावातील अनेकांना या काष्ठशिल्पकलेचं 15 वर्षापूर्वीच प्रशिक्षण देवून त्यांच्यातील कौशल्य विकसीत केली. निंबा गावातील जवळपास 11 विवाहीत युवकांची काष्ठशिल्पकला ही आज त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे.
          सालेकसा तालुका तसा मागास, दुर्गम, जंगलव्याप्त आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. सालेकसापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेले निंबा हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. काष्ठशिल्पकलेचा बादशाह असलेला रामलाल निंब्यात राहतो. रामलाल चव्हाण वय 50 वर्ष, शिक्षण बी.कॉम. व एम.कॉम. प्रथम वर्षापर्यंत झालेले.
          1992 ते 1955 या काळात रामलाल गोंदिया येथे निरांचल इन्व्हेस्टमेंट इंडिया लिमिटेड या इलाहाबादच्या फायनान्स कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. या कालावधीत कपंनीच्या एजन्टच्या माध्यमातून ‍िजल्ह्यातील अनेकांनी गोंदिया येथील निरांचलच्या शाखेत आपला पैसा गुंतविला. कंपनीच्या संचालकांनी या शाखेतील गुंतवणूकदारांचा पैसा घेवून पळ काढला. त्यामुळे गुंतवणूकदार शाखा व्यवस्थापक असलेल्या रामलालकडे आपला पैसा परत मिळावा यासाठी तगादा लावू लागले. कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यामुळे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणारा रामलाल बेरोजगार झाला. परंतु गुंतवणूकदार रामलालकडे आपला पैसा परत मिळावा म्हणून पुन्हा तगादा लावू लागले. रामलालचा यामध्ये कोणताही दोष नव्हता. गुंतवणूकदार निंबा येथे घरी येवू लागले त्यामुळे रामलाल बेचैन व त्रस्त झाला होता. या कटकटीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
          रामलालने आपला मुक्काम गावाजवळील शेतात ठोकला. शेतालाच लागून जंगल असल्यामुळे आपण आता काहीतरी काम केले पाहिजे हा निश्चय केला. जंगलात भटकंती करुन बांबूचे व झाडांचे विविध प्रकारचे ओबडधोबड आकाराचे निरुपयोगी असलेले खोड, मुळांना शोधून रामलालने त्यापासून टेबल लॅम्प, साप, शो पीस तयार करण्याचे काम सुरु केले. या लाकडी वस्तूंना मोठी मागणी होवू लागली.
          जंगलातील निरुपयोगी व टाकावू लाकडां-मुळापासून रामलाल त्याच्या अंगी असलेल्या कलागुणातून मोर, कासव, गरुड, मासा, हरिण, नाईट लॅम्प, गणपती, गौतम बुध्द, पानपुडा तसेच विविध प्रकारचे वॉलपिस तयार करु लागला. हळूहळू हीच काष्ठशिल्पकला रामलालच्या उदरनिर्वाहाची साधन बनली. अनेकांची पाऊले काष्ठशिल्पाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी निंब्याकडे वळली.
          रामलाल हा उत्कृष्ट काष्ठ शिल्पकार असल्याची बाब पंचायत समिती सालेकसा येथे माहीत झाल्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात रामलालने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली. प्रगती मैदान दिल्ली, मुंबई येथील सरस प्रदर्शन, पुणे, वेरुळ, नागपूर, रायपूर या छत्तीसगडच्या राजधानीत भरलेल्या प्रदर्शनातून रामलालने तयार केलेल्या वस्तुंची विक्री झाली.
          रामलालने आपल्या अंगी असलेली काष्ठ शिल्पकला ही स्वत:पुरती मर्यादित न ठेवता गावातील अनेक युवकांना स्वत:च्या घरीच प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण दिले. युवकांचे त्यावेळीच या कलेत कौशल्य विकसीत करुन रामलालने कौशल्य विकासाचा कार्यक्रम गावात राबविला. निंबा येथील सुभाष वरकडे, ताराचंद बावनथडे, रमेश भगत, कुवरलाल ‍बिसेन, मुन्ना बिसेन, अनिल बिसेन, सुखचंद भगत, नरेश भगत, माणिकलाल कटरे, होसलाल कटरे, शालिक भगत यांना रामलालने काष्ठ शिल्पकलेत तरबेज केले. रामलालने दिलेल्या प्रशिक्षणातून कौशल्य विकसीत झालेली ही विवाहीत युवा मंडळी आज गावात विविध प्रकारच्या काष्ठ शिल्पकलेतून वस्तू तयार करुन विक्री करीत आहे. काष्ठ शिल्पकला ही या युवकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे.
          गोंदियाचे पहिले जिल्हाधिकारी संजीवकुमार यांनी सुध्दा रामलालने तयार केलेले काष्ठशिल्प बघितले. मेहनती व जिद्द असलेल्या रामलालला त्यांनी पाठबळ दिले. काबील कास्तची 4 एकर जमीन त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. काष्ठ शिल्पकलेतून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या विक्रीतून रामलालला महिन्याकाठी 15 ते 20 हजार मिळते. शेतीतून सुध्दा चांगले उत्पन्न होत असल्यामुळे आणखी तीन एकर शेती विकत घेतली आहे. रामलालची मुलगी वैशाली ही बीड येथे बी.टेक. करीत आहे. भुवनेश्वर व नेगेश्वर ही दोन मुले 12 वी विज्ञान शाखेतून चांगल्याप्रकारे उत्तीर्ण झाली आहे. पीएमटीची तयार करीत असून दोघांना डॉक्टर बनविण्याचे रामलालचे स्वप्न आहे.
          निंबासारख्या छोट्या गावात अनेकांना काष्ठ शिल्पकलेतून आत्मनिर्भर करणाऱ्या रामलालला त्याची मुले सुध्दा चांगली शिकून मोठ्या पदावर पोहचली पाहिजे यासाठी तो परिश्रम घेत आहे. मेक इन इंडिया तसेच कौशल्य विकास कार्यक्रमातून रामलालला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु करायचा आहे. त्यासाठी त्याला प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेवून अनेक काष्ठ शिल्पकारांची फौज तयार करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा विचारही रामलालने बोलून दाखविला.

ओळख गोंदियाची


     निसर्ग सौंदर्याने व वनसंपदेने नटलेला, ऐतिहासिक, धार्मिक परंपरा लाभलेला, खडीगंमत, दंडार यासारख्या लोककलांचा साठा जोपासणारा, धानाचे कोठार आणि तलावांचा जिल्हा अशी विविधांगी ओळख असलेला गोंदिया जिल्हा.
          1 मे 1999 रोजी गोंदिया जिल्हयाची स्थापना झाली. या जिल्हयाला उत्तरेकडे मध्यप्रदेश आणि पूर्वेकडे छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. दक्षिणेकडे गडचिरोली आणि पश्चिमेकडे भंडारा जिल्हयाची सीमा लागून आहे. गोंदिया जिल्हयाचा परिसर प्राचीन काळी गोंड राज्याच्या अधिपत्याखाली होता. त्याकाळी असलेल्या दाट वनात गोंड समाज राहायचा. या गोंड समाजाचा त्याकाळी मुख्य व्यवसाय हा जंगलातील गोंद(डिंक) आणि लाख जंगलातून गोळा करुन गावात आणून विकणे हा असायचा. त्या गोंदवरुन गोंदिया हे नाव पडले असावे. असा उल्लेख इंग्रज राजवटीत आर.व्ही.रसेल यांनी लिहीलेल्या गॅझेटियरमध्ये आढळतो.
          गोदिया जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ 5641 चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्हयातील 1 लाख 80 हजार 300 हेक्टर जमीन जंगलाने व्यापलेली आहे. सन 2011 च्या जनगणनेनूसार जिल्हयाची लोकसंख्या 13 लाख 22 हजार 507 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 75 हजार 961 इतकी (13.30टक्के), अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2 लाख 14 हजार 253 इतकी (16.20 टक्के) आहे. शहरी लोकसंख्या 2 लाख 25 हजार 930 आणि ग्रामीण लोकसंख्या 10 लाख 96 हजार 577 इतकी आहे.
          जिल्हयात गोंदिया, तिरोडा, देवरी आणि अर्जुनी/मोरगांव हे चार महसूल उपविभाग आहेत. गोंदिया आणि तिरोडा येथे नगर परिषद असून गोरेगांव, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगांव, देवरी येथे नगर पंचायती आहे.    जिल्हयात एकूण 553 ग्रामपंचायती आहे. महसूली गावांची संख्या 954 आहे. आदिवासी गावे 336 इतकी आहे. जिल्हयाचा साक्षरता दर 85.41 टक्के आहे. मानव विकास निर्देशांकात राज्यात गोंदिया जिल्हा 21 व्या क्रमांकावर आहे. मुंबई-कलकत्ता हा रेल्वेमार्ग तर मुंबई-कलकत्ता हा 6 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जिल्हयातून जातो. जंगलातील तेंदूपत्ता आणि बांबू ही वनसंपदा जिल्हयातील ग्रामीणांचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. ग्रॅनाईट, लोह व कॉर्थ ही खनीजे जिल्हयात उपलब्ध आहे. वैनगंगा ही सर्वात मोठी नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे जिल्हयातून वाहते. याशिवाय गाढवी, बाघ, चुलबंद ह्या नद्या सुध्दा जिल्हयातून वाहतात.
   नवेगाव- नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प, लाखो आदिवासींचे श्रध्दास्थान असलेले कचारगड, गोठणगाव येथील तिबेटियन बांधवांची वसाहत, प्रतापगड, मांडोदेवी, नागरा यासह हाजराफॉल धबधबा, नवेगावबांध जलाशय, बोदलकसा, पांगडी, चुलबंद,  इटियाडोह, शिरपूर , कालीसराड, पुजारीटोला, चोरखमारा आदी सिंचन प्रकल्पसुध्दा पर्यटकांचे आवडते स्थान झाले आहेत.  पूजारीटोला, कालीसरार, इटियाडोह, शिरपूर अशा मोठया प्रकल्पाने जिल्हयाच्या सिंचन क्षमतेते भर घातली आहे. जिल्हयात असलेली अनेक पर्यटन व तीर्थस्थळांमुळे मोठया प्रमाणात पर्यटक व भाविक जिल्हयात येतात. त्यामुळे या निमित्ताने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होते.