जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 8 July 2016

तलावांचा जिल्हा पाणीदार गोंदिया



                                      "  असतील जेथे जलाचे साठे
                                  तेथे स्वर्गही वाटे उणे...  "

             तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख. या जिल्हयातील पूर्वजांना जलसाक्षरतेचे महत्व त्याकाळीच कळले होते. त्याकाळी सिंचनाची सुविधा माजी मालगुजारी तलावातूनच उपलब्ध झाली. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गोंदियाला वरदान लाभले ते विपूल नैसर्गिक साधनसंपत्तीचे. आज जिल्हयातील परसवाडा,गंगेझरी,गोठणगाव यासारखे अनेक माजी मालगुजारी तलाव आज स्थलांतरीत व विदेश पक्षांच्‍या काही काळाच्या वास्तव्यामुळे पर्यटनाचे केंद्र बनले आहे.
             मानवी जीवनात पाणी बहुमोल आहे. पाण्याविना जीवन जगण्याची कल्पनाही आपण करु शकत नाही. थोरामोठयांना जलसाक्षरतेचे महत्व आज पटले आहे. पाण्याचा थेंब-न्-थेंब वाचविण्यासाठी अनेक उपक्रम अंमलात आणले जात आहे. परंतू पूर्वजांच्या दूरदर्शीतेने आजची पाणीटंचाईची ही समस्या  फार पूर्वीच हेरली होती. त्यादृष्टीने त्यांनी पावलेही उचलली होती. पाणी जरी नैसर्गिक साधन संपत्ती आहे पण कधीतरी त्याचा स्त्रोत संपुष्टात येवू शकतो याची जाणीव ठेवून जणू पूर्वजांनी त्याबाबतची व्यवस्‍थाच निर्माण करुन ठेवली.
            तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हयात 2130 तलाव असून त्यापैकी 1886 तलाव हे माजी मालगुजारी तलाव आहेत. अंदाजे 300 ते 350 वर्षापूर्वी 16 व्या शतकात पूर्व विदर्भावर गोंडराज्याचे राज्य होते. तत्कालीन राज्यकर्त्यांची दूरदृष्टी कमालीची होती. जनतेची भविष्यातील पाण्याची आवश्यकता बघता गोंडराजाने फर्मान काढले की, तलाव निर्मिती करणा-या गावक-यांना ते गांव बक्षीस म्हणून देण्यात येईल. त्यावेळी देखील त्या भागात धानाचे पिक प्रामुख्याने घेण्यात येत होते. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील पावसाची सराससरी जरी बरोबर असली तरी कधीकधी दडी मारणा-या पावसामुळे भात पिक धोक्यात येत होते. ही बाब लक्षात ठेवून आणि बक्षिसामुळे जिल्हयातील कोहळी व पोवार समाजातील मालगुजारांनी लोकसहभागातून तलावांची निर्मिती केली. तलावांची निर्मिती करतांना त्यांच्यातील अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करुन पाणी साठविण्यासाठी योग्य जागेची निवड केली.
      त्याकाळात जमिनीचा उतार व खोली मोजण्याची यंत्रणा नव्हती. त्यावर उपाय म्हणून मालगुजारांनी तलावांचे जाळे निर्माण केले. तलाव निर्मितीमध्ये मालगुजारांचे कष्ट म्हणून या तलावांना मालगुजारी तलाव म्हणून संबोधले जाते.
          स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सन 1950 मध्ये मालगुजारी संपुष्टात आल्यानंतर शासनाने सन 1963 मध्ये माजी मालगुजारी तलाव ताब्यात घेतले. परंतू या तलावापासून शेतक-यांना सिंचनाचे मुक्त अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जसेच्या तसे ठेवले आहे.
      जिल्हयातील परसवाडा,झिलमिली, गंगेझरी,गोठणगांव या सारखे अनेक माजी मालगुजारी तलाव आज पर्यटनाचे व पक्षी अभ्यासकांचे केंद्र बनले आहे. या माजी मालगुजारी तलावावर मध्य पूर्व ऐशीया, मध्ययुरोप, सायबेरिया, मंगोलिया, लेह, लदाख, अमेरिका, इंग्लड, आस्ट्रे‍लिया, इंडोनेशीया, पाकिस्थान, दक्षिण पूर्व आशिया, उत्तर युरोप, उत्तर अमेरीका,दक्षिण युरोप,पूर्व चीन,बांग्लादेश, मध्य आशिया, व आखाती देशातून विविध प्रजातीचे पक्षी हिवाळयात येथे येतात. त्यामध्ये ग्रे लेग गुज, बार हेडेड गुज, कॉम्ब डक, कॉमन टेल, स्पॉट बिल्ड डक, नॉर्थन पिन्टेल, नॉर्थन शॉवेलर, युरेशिएन विंजेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड,फेरोजिनस पोचार्ड, इंडियन पिट्टा, कॉमन क्रेन,  ग्रीन पोचार्ड,कस्टर्ड पोचार्ड, यासारखे 350 च्या वर विविध प्रजातीचे पक्षी येथे येतात. बार हेडेड गुज हा पक्षी तर उंच हिमालय ओलांडून जिल्हयात दाखल होतो. तलावांच्या काठावर असलेले देवधान व तलावातील किटक हे पक्षी आवडीने खातात. तलावांचा परिसर व तेथील वातावरण या पक्षांना पोषक असल्यामुळे पिल्ले जन्माला घातल्यानंतर ते आपल्या मायदेशी परत फिरतात. पक्षांच्या वास्तव्यामुळे अनेक तलाव हे आज पर्यटकांना व पक्षीनिरीक्षकांना अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. 

No comments:

Post a Comment