जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 7 July 2016

ओळख गोंदियाची


     निसर्ग सौंदर्याने व वनसंपदेने नटलेला, ऐतिहासिक, धार्मिक परंपरा लाभलेला, खडीगंमत, दंडार यासारख्या लोककलांचा साठा जोपासणारा, धानाचे कोठार आणि तलावांचा जिल्हा अशी विविधांगी ओळख असलेला गोंदिया जिल्हा.
          1 मे 1999 रोजी गोंदिया जिल्हयाची स्थापना झाली. या जिल्हयाला उत्तरेकडे मध्यप्रदेश आणि पूर्वेकडे छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. दक्षिणेकडे गडचिरोली आणि पश्चिमेकडे भंडारा जिल्हयाची सीमा लागून आहे. गोंदिया जिल्हयाचा परिसर प्राचीन काळी गोंड राज्याच्या अधिपत्याखाली होता. त्याकाळी असलेल्या दाट वनात गोंड समाज राहायचा. या गोंड समाजाचा त्याकाळी मुख्य व्यवसाय हा जंगलातील गोंद(डिंक) आणि लाख जंगलातून गोळा करुन गावात आणून विकणे हा असायचा. त्या गोंदवरुन गोंदिया हे नाव पडले असावे. असा उल्लेख इंग्रज राजवटीत आर.व्ही.रसेल यांनी लिहीलेल्या गॅझेटियरमध्ये आढळतो.
          गोदिया जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ 5641 चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्हयातील 1 लाख 80 हजार 300 हेक्टर जमीन जंगलाने व्यापलेली आहे. सन 2011 च्या जनगणनेनूसार जिल्हयाची लोकसंख्या 13 लाख 22 हजार 507 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 75 हजार 961 इतकी (13.30टक्के), अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2 लाख 14 हजार 253 इतकी (16.20 टक्के) आहे. शहरी लोकसंख्या 2 लाख 25 हजार 930 आणि ग्रामीण लोकसंख्या 10 लाख 96 हजार 577 इतकी आहे.
          जिल्हयात गोंदिया, तिरोडा, देवरी आणि अर्जुनी/मोरगांव हे चार महसूल उपविभाग आहेत. गोंदिया आणि तिरोडा येथे नगर परिषद असून गोरेगांव, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगांव, देवरी येथे नगर पंचायती आहे.    जिल्हयात एकूण 553 ग्रामपंचायती आहे. महसूली गावांची संख्या 954 आहे. आदिवासी गावे 336 इतकी आहे. जिल्हयाचा साक्षरता दर 85.41 टक्के आहे. मानव विकास निर्देशांकात राज्यात गोंदिया जिल्हा 21 व्या क्रमांकावर आहे. मुंबई-कलकत्ता हा रेल्वेमार्ग तर मुंबई-कलकत्ता हा 6 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जिल्हयातून जातो. जंगलातील तेंदूपत्ता आणि बांबू ही वनसंपदा जिल्हयातील ग्रामीणांचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. ग्रॅनाईट, लोह व कॉर्थ ही खनीजे जिल्हयात उपलब्ध आहे. वैनगंगा ही सर्वात मोठी नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे जिल्हयातून वाहते. याशिवाय गाढवी, बाघ, चुलबंद ह्या नद्या सुध्दा जिल्हयातून वाहतात.
   नवेगाव- नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प, लाखो आदिवासींचे श्रध्दास्थान असलेले कचारगड, गोठणगाव येथील तिबेटियन बांधवांची वसाहत, प्रतापगड, मांडोदेवी, नागरा यासह हाजराफॉल धबधबा, नवेगावबांध जलाशय, बोदलकसा, पांगडी, चुलबंद,  इटियाडोह, शिरपूर , कालीसराड, पुजारीटोला, चोरखमारा आदी सिंचन प्रकल्पसुध्दा पर्यटकांचे आवडते स्थान झाले आहेत.  पूजारीटोला, कालीसरार, इटियाडोह, शिरपूर अशा मोठया प्रकल्पाने जिल्हयाच्या सिंचन क्षमतेते भर घातली आहे. जिल्हयात असलेली अनेक पर्यटन व तीर्थस्थळांमुळे मोठया प्रमाणात पर्यटक व भाविक जिल्हयात येतात. त्यामुळे या निमित्ताने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होते.

2 comments:

  1. There are total of 23 Major Dams ( Height from foundation 10 meters or more ) in Gondia District. First 12 Dams, Sl No 1 to 12 ,are covered in this Dams in Gondia district Part One Dams number 13 to 23 will be covered in Dams in Gondia district Part Two .Gondia Tourism

    ReplyDelete