जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 16 July 2016

शिव ऑनलाईन वर्कमुळे रतन झाला स्वावलंबी

वाढती बेरोजगारी व स्पर्धात्मक युगामुळे सर्वांनाच नोकरी मिळणे आज शक्य नाही. शासन विविध स्तरावर सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराचा मार्ग दाखवून स्वावलंबी करीत आहे. जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथील रतनलाल राऊत (वय 25 वर्ष) या पदवीधर युवकाने एक महिना कालावधीचे कम्प्युटर डाटा एन्ट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण घेऊन गावातच शिव ऑनलाईन जॉब वर्कचे दुकान थाटले आहे. याद्वारे त्याने बेरोजगारीवर मात करुन इतर बेरोजगारांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
     कट्टीपारच्या रतनलालने बी.ए.ची पदवी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मॅकेनिकलचा कोर्स सुद्धा केला आहे. घरी असलेल्या एक एकर शेतीवर आई वडील व भावासह आपला उदरनिर्वाह चांगल्याप्रकारे होऊ शकत नाही हे रतनच्या ध्यानात आले. त्यामुळे रतनने मेकॅनिकलच्या कोर्सच्या आधारे तिरोडा येथील इंजिनिअर वर्कशॉपमध्ये जवळपास एक वर्षापर्यंत 1700 रुपयामध्ये प्रति महिना या प्रमाणे काम केले. यामधून कुटुंबाला थोडाफार हातभार लागण्यास मदत झाली. पण रतनची स्वत:च्या बळावर स्वावलंबी होण्याची अस्वस्थता कायम होती.                                              एकदा रतन कामानिमित्त आमगाव पंचायत समितीमध्ये गेला असता त्याला स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या विविध कोर्सचे बॅनर दिसले. या बॅनरवरील माहितीच्या आधारे रतनने थेट गोंदिया येथील कुडवा नाका येथील वहाणे पॅलेसमधील स्टार स्वरोजगार संस्थेचे कार्यालय गाठून विविध प्रशिक्षणाबाबतची माहिती जाणून घेतली. कम्पुटर डाटा एन्ट्री ऑपरेटर हा कोर्स करण्याचा निश्चय केला.
      रतनने एप्रिल 2015 मध्ये बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक व भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहाय्याने संचालित असलेल्या स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे एक महिना कालावधीचे नि:शुल्क, निवासी व मोफत भोजन व्यवस्था असलेले कम्प्युटर डाटा एन्ट्री ऑपरेटर कोर्सचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर स्वत:च्या पायावरच उभे राहण्याचा निश्चय रतनने केला. आपले गाव व परिसरातील गावातील अनेक जणांची ऑनलाईन कामे करण्यासाठी शिव ऑनलाईन जॉबवर्कचे दुकान थाटण्याचा निर्णय रतनने घेतला. आमगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेने रतनला या व्यवसायासाठी 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. 50 हजार रुपयात रतनने एक संगणक, एक प्रिंटर, स्कॅनर, बीएसएनएलचे ब्रॉड बॅन्डचे कनेक्शन, शितपेय विक्रीसाठी एक फ्रीज व इतर स्टेशनरी साहित्य खरेदी केले.
      ऑनलाईन जॉबवर्कच्या माध्यमातून रतन हा आता कट्टीपार, नंगपूरा, डोंगरगाव, गोसावीटोला, धामणगाव, पिपरीपार या गावातील नागरीकांची, विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची कामे करतो. ग्रामपंचायत रहिवाशी दाखले, आधारकार्डच्या स्लीपवरुन आधारकार्ड कार्ड, 10 वी व 12 वीच्या ऑनलाईन गुणपत्रिका, सीईटी, सेट, नेट परीक्षांचे हॉल तिकीट, विविध परीक्षेसाठी अर्ज करणे, ऑनलाईन सातबारा, नमुना आठ-अ, उत्पन्नाचा दाखला, शेतीविषयक चौकशी अहवाल, विविध कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसुध्दा रतन या जॉबवर्कच्या दुकानातून काढून देतो. शितपेय, स्टेशनरी सुध्दा तो ठेवत असल्यामुळे त्याच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी मदतच झाली आहे. ऑनलाईन जॉब वर्कमुळे त्याला प्रति दिन 500 रुपये उत्पन्न मिळत आहे. कुटुंबाच्या अर्थकारणात रतनचाही हातभार लागत आहे. हा व्यवसाय मोठ्या स्वरुपात सुरु करण्याचा विचार असल्याचे रतनने सांगितले. वाढत्या बेरोजगारीवर स्वकष्टाने मात करुन स्वावलंबी होऊन रतनने इतरांसाठी स्वावलंबनाचा मार्ग दाखविला आहे.

No comments:

Post a Comment