जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 30 August 2017

जन वन योजनेचा लाभ घ्या - पी.बी.वाडे

                                मंगेझरीत संवाद पर्व
     नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रालगत जी गावे आहेत त्या गावांच्या विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना आहे. या क्षेत्रालगत असलेल्या गावातील नागरिकांनी आपल्या विकासासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.वाडे यांनी केले.
      तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथे 29 ऑगस्ट रोजी वनश्री गणेशोत्सव मंडळ, सातपुडा फाऊंडेशन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित संवाद पर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.वाडे बोलत होते. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, मंगेझरीच्या सरपंच अनुसया कुमरे, ग्रामपंचायत सदस्य बंडू मरसकोल्हे, वनसंरक्षक के.बी.कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.वाडे पुढे म्हणाले, या योजनेतून ग्रामस्थांचे वनावरील अवलंबीत्व कमी व्हावे यासाठी ग्रामस्थांना गॅस कनेक्शन देण्यात येत आहे. सोबतच गॅस शेगडी ठेवण्यासाठी ओटे, कोणी उघड्यावर शौचास जावू नये यासाठी शौचालय बांधून देण्यात येत आहे. वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान होवू नये यासाठी शेतीला सौर कुंपन लावून देण्यात येत आहे. वन्यप्राणी शेतातील विहिरीत पडू नये यासाठी विहिरीला कठडे लावून देण्यात येत आहे. रोजगाराच्या संधी ग्रामस्थांना मिळावे यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुक्ष्म नियोजन आराखड्यानुसार या योजनेतून ग्रामविकासाची कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.सोसे म्हणाले, शासनाच्या अनेक घटकांसाठी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधी या योजना समजून घेणे महत्वाचे आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या हाती आज आर्थिक व राजकीय सत्ता आली आहे. माविम तिरोडा तालुक्यातील 114 गावात काम करीत असून 1780 बचतगटाच्या माध्यमातून 23 हजार महिला जुळल्या आहेत. 1100 महिला बचतगटांना दोन वर्षात दीड कोटी रुपये निधी उद्योग व्यवसायासाठी माविमने त्यांना उपलब्ध करुन दिला आहे. बचतगटातील महिलांनी आता आर्थिकस्थिती भक्कम करण्यासाठी बकरी पालनाचा व्यवसाय सुरु करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
       श्रीमती कुमरे म्हणाल्या, या संवाद पर्वामुळे मंगेझरीच्या ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत झाली आहे. आता ग्रामस्थ निश्चित शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावात जे बेरोजगार आहेत त्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे. ज्यांनी प्रशिक्षण घेतले आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. गावातील शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे त्या म्हणाल्या. श्री.मरसकोल्हे यांनीही मार्गदर्शन केले.
      प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी संवाद पर्व आयोजित करण्यामागचा उद्देश उपस्थित ग्रामस्थांना सांगितला. शासनाने नुकतीच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असून पात्र शेतकऱ्यांनी 15 सप्टेबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बेरोजगारांनी स्वावलंबी होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा तसेच कौशल्य विकासाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वावलंबी व्हावे. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली.

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनरक्षक श्रीमती व्ही.एन.मेहर, श्रीमती एच.डी.आस्वले, श्री.वाटघुळे, श्री.गायधने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मुकूंद धुर्वे यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday 29 August 2017

योजनांची माहिती मिळण्यासाठी संवाद पर्व उपयुक्त - सुनील सोसे

                   अर्धनारेश्वरालय येथे संवाद पर्व कार्यक्रम
                   • मी मुख्यमंत्री बोलतोय पुस्तिकेचे विमोचन


    जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने शासन विविध योजना राबविते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला  संवाद पर्व कार्यक्रम विविध योजनांची माहिती मिळण्यास उपयुक्त आहे. असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले.
    29 ऑगस्ट रोजी सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय देवस्थान येथे जिल्हा माहिती कार्यालय आणि अर्धनारेश्वरालय गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त वतीने आयोजित संवाद पर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.सोसे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषि अधिकारी घनश्याम तोडसाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.येरणे, नायब तहसिलदार ए.बी.भुरे, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.ए.शेगोकार, रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी डी.जी.रहांगडाले, स्वच्छ भारत मिशनचे गट समन्वयक जी.डी.पटले व अर्धनारेश्वरालय देवस्थानचे अध्यक्ष गोविंदरामजी वरकडे यांची उपस्थिती होती.
      श्री.सोसे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची माहिती संवाद पर्वच्या माध्यमातून मिळण्यास मदत होत आहे. उपस्थित ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. त्यामुळे या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ घेणे सोईचे होईल. महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांना सक्षम करण्याचे काम करीत आहे. सालेकसा तालुक्यातील 1260 पैकी 983 महिला बचतगटांना विविध व्यवसाय उद्योगासाठी फिरता निधी दिला आहे.
     तालुक्यातील प्रत्येक गावच्या ग्रामसंस्थेला देखील 3 लक्ष रुपये निधी दिला असल्याचे सांगून श्री.सोसे म्हणाले, त्यामुळे गावातील बचतगटांना सक्षम करण्याचे काम ग्रामसंस्था करीत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम माविम राबवित आहे. कृषि सखीच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी व पशु सखीच्या माध्यमातून बकरी पालनाच्या व्यवसायातून स्वावलंबी होण्यासाठी महिलांना मदत होत आहे असे त्यांनी सांगितले.
        श्री.तोडसाम म्हणाले, भात पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी पीक विस्तार कार्यक्रम आहे. शेतकरी फळ लागवडीकडे वळला पाहिजे यासाठी देखील 100 टक्के अनुदानावर योजना आहेत. सेंद्रीय तांदळाला प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळण्यास मदत होईल. कृषि‍ विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान, सुक्ष्म सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला बोडी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व कृषि अभियांत्रिकी योजना यासह अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
       डॉ.येरणे यावेळी म्हणाले, वाढती लोकसंख्या कुटूंब कल्याण कार्यक्रमामुळे नियंत्रणात येत आहे. जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना व नवसंजीवनी योजना या गरोदर माता व बालकांसाठी आहे. मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत देखील आरोग्य योजना राबविण्यात येतात. साथीवर नियंत्रण आणण्यासाठी साथरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतात. कुष्ठरोग व क्षयरोगाचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी देखील योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.भुरे म्हणाले, विविध सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना राबविण्यात येतात, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना राबविण्यात येतात. कुटूंबातील महिलांचे नाव सातबारावर नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांचे मतदार यादीत नाव नाही त्यांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंदणी करावी असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री.वरकडे यांनी देखील उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने संवाद पर्वच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
      प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी संवाद पर्व आयोजनामागची भूमिका विषद केली. महाकर्जमाफी, प्रधानमंत्री मुद्रा योजना यासह अन्य योजनांची माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीणू वई, लोकेश कोरे, भरत शाहू, पवन पटले, नवीन भेंडारकर, चेतन बिसेन, सुभाष भेंडारकर, स्वप्नील सांगोळे, अनुसया कोरे, हंसकला शेंडे, धर्मशिला उईके, ममता कापसे, रत्नमाला किरसान, वैशाली  नाईक, भुमेश्वर कापसे, लक्ष्मी भेंडारकर, ग्यानीराम वाढई यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन बाजीराव तरोणे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. कार्यक्रमाला हलबीटोला ग्रामस्थ व गणेशोत्सवानिमित्त आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेला तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले विद्यार्थी उपस्थित होते.

Thursday 24 August 2017

कर्जमाफीबाबत तातडीने कार्यवाही करा - पालकमंत्री बडोले

       राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. येत्या 15 सप्टेबर पर्यंत कर्जमाफीबाबतची कार्यवाही प्रशासनाने पूर्ण करावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
        जिल्हाधिकारी कार्यालयात 24 ऑगस्ट रोजी कर्जमाफी व पीक परिस्थितीच्या आढावा सभेत पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी.शिंदे, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक मिलींद आटे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वश्री गेडाम, ढोरे, छप्परघरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री.बडोले पुढे म्हणाले, ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी.सेंटर या केंद्रावरुन शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज व्यवस्थीत भरण्यात यावे. यासाठी कृषि, महसूल व ग्रामपंचायत विभागाने काळजीपूर्वक काम करावे. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेले नाही त्यांचे आधारकार्ड काढण्याची कार्यवाही करावी. 15 सप्टेबर पूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       जिल्ह्यात धानाचे 40 टक्के नुकसान झाल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केलेली नाही असे शेतकरी, कमी पावसामुळे मध्यम व उच्च प्रतीच्या धानाचे नुकसान झालेले शेतकरी यांची स्वतंत्र यादी तयार करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करता येईल. ज्या शेतकऱ्यांच्या धानपिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना दुसरे पीक म्हणून उडीद, मुंग याची लागवड करण्यासाठी बियाणे उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेवढ्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. सिंचनासाठी शेतीला 12 तास वीजपुरवठा करण्यात येईल व कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
      यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्यात 8 दिवसाच्या आत पाट्या लावण्यात याव्या. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावात पाणीसाठा व्यवस्थीत राहील याचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. त्यामुळे शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होईल. ज्या प्रकल्पांचा भूसंपादन निधी उपलब्ध झाला आहे त्याचे वाटप संबंधित शेतकऱ्यांना तातडीने करावे व अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प वेळीच पूर्ण करण्याचे नियोजन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, कर्जमाफीच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राने 10 अर्ज प्रती दिवस ऑनलाईन करावे असे त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. महसूल, कृषि व ग्रामपंचायत विभागाच्या योग्य समन्वयातून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 सप्टेबर पूर्वीच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.इंगळे यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस व धानाची रोवणी याबाबतची माहिती दिली. जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री.सिल्हारे यांनी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुण-तरुणींना कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत व बेरोजगारांच्या तक्रारी येणार नाहीत यादृष्टीने बँकांनी या योजनेसाठी काम करावे अशा सूचना बँकांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री.वासनिक, सहायक निबंधक श्री.गोस्वामी यांचीही उपस्थिती होती.

Saturday 19 August 2017

जात वैधता प्रमाणपत्र बाबतच्या अडचणी दूर करणार - राजकुमार बडोले

जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम



          सर्वसामान्य जनतेला जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      19 ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह गोंदिया येथे जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप सामाजिक न्याय मंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संधोधन अधिकारी गौतम वाकोडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, पुर्वी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नागपूरला जावे लागत असे. परंतू आता प्रत्येक जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र समिती कार्यान्वीत झाल्यामुळे हा त्रास कमी झाला आहे. राज्यातील वैद्यकीय व इंजिनियरींग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी सामाजिक न्याय मंत्री बडोले यांच्या हस्ते रोशनी भुरे व कल्याणी चिखलोंढे या विद्यार्थीनींना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत 12 वी विज्ञान-768, व्यावसायीक अभ्यासक्रम-5 व निवडणूक विषयक-4, असे एकूण 777 जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी केले. संचालन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संधोधन अधिकारी गौतम वाकोडे यांनी केले, उपस्थितांचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून होणार आज प्रक्षेपण

मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात
घर विषयक प्रश्नांना उत्तरे
राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाच्या ‘सर्वांसाठी परवडणारी घरे’ या विषयावरील पहिल्या भागाचे उद्या रविवार २० ऑगस्ट २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारण होणार आहे.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे निर्मित या कार्यक्रमाचे प्रसारण रविवार २० ऑगस्ट २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी, झी चोवीस तास आणि साम टीव्ही या वाहिन्यांवरून सकाळी दहा वाजता होईल. याच कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दि. २१ ऑगस्ट २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सायंकाळी साडेपाच वाजता होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून सोमवार दि. २१ ऑगस्ट आणि मंगळवार दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी  ७ वाजून २५ मिनिटांनी प्रसारण होईल.                               
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा मिळेल? संक्रमण शिबिरात राहणाऱ्या कुटुंबांचे कायम स्वरूपी पुनर्वसन होईल का? भोगवटा प्रमाणपत्राच्या अडचणी व पद्धती सुलभ करणार का? पंतप्रधान आवास योजनेच्या घरांसाठी पात्रता काय? भूमिहीनांना घरकुलाचा लाभ कसा मिळेल? शबरी योजनेचे स्वरूप कसे आहे? अनधिकृत बांधकामे नियमित होणार का? खासगी इमारतींसाठी वाढीव एफएसआय मिळणार का?, अशा राज्याच्या विविध भागातून आलेल्या प्रश्नांबाबत राज्य शासन करीत असलेल्या व्यापक योजनांची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना या कार्यक्रमात दिली आहे.
          या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाआधी ई-मेल आणि एसएमएसवरून लोकांकडून सर्वांसाठी परवडणारी घरे या विषयावर प्रश्न मागविण्यात आले होते. त्याला राज्याच्या विविध भागातील साधारण दहा हजाराहून अधिक लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी योजना, महारेरा, संक्रमण शिबिरे, म्हाडाची घरे, इमारतींचा पुनर्विकास, भोगवटा प्रमाणपत्र, धारावी पुनर्वसन प्रकल्प, बीडीडी चाळींचा पुनर्विकास अशा गृहनिर्माण विषयक मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले होते. यातील निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत.

Wednesday 16 August 2017

पालकमंत्र्यांच्या हस्ते कालीमाटी व नवेगावबांध येथे भूमीपूजन



            अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तीर्थस्थळ असलेल्या कालीमाटी येथे हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 16 ऑगस्ट रोजी केले. यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, जि.प.सदस्य तेजूकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, माजी जि.प.सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, कार्यकारी अभियंता श्री.ताकसांडे, उपविभागीय अभियंता श्री.देशमुख, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, दिनकरनगर सरपंच खोकन सरकार, प्रतापगड सरपंच इंदिरा वालदे, सुकडी सरपंच पंचशिला मेश्राम, तुकूम/नारायण सरपंच दयाराम शहारे, गोठणगाव सरपंच शकुंतला वालदे, व्यंकट खोब्रागडे, नूतन सोनवाने, आनंदराव तिडके, हरिचंद उईके, संदीप कापगते, विनोद नाकाडे, प्रकाश रहांगडाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांपुढे आपल्या विविध समस्या मांडल्या.

      नवेगावबांध येथील आंबेडकर नगरात जि.प.च्या समाजकल्याण विभागातील अनुसूचित जाती घटकांचा विकास कार्यक्रमांतर्गत गिताबाई सांगोडकर ते भिमराव लाडे यांच्या घरापर्यंतच्या 5 लक्ष रुपये खर्चातून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, पं.स.सदस्य गुलाब कोरेटी, रामलाल मुंगनकर, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, होमराज पुस्तोडे, नवल चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आंबेडकर नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दोन वर्षात रस्त्यांची कामे पूर्ण करणार - पालकमंत्री बडोले

सिंदीपार येथे रस्त्याचे भूमीपूजन

               ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळते. येत्या दोन वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       सडक/अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथे 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या वडेगाव ते सिंदीपार या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य इंदू परशुरामकर, गायत्री इरसे, राजेश कठाणे, सिंदीपार सरपंच जसवंता टेकाम, खोडशिवनी सरपंच अर्चना भैसारे, कोदामेडी सरपंच अनिता बडोले, वडेगाव सरपंच प्रभा बडोले, कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, श्री.ताकसांडे, नायब तहसिलदार अखिल मेश्राम यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले पुढे म्हणाले, रोजगार हमी योजनेतून पांदन रस्त्यांची कामे पूर्ण करुन या रस्त्यांच्या खडीकरणाची कामे सुध्दा करण्यात येतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी व शेतातील माल घरी व बाजारपेठेत आणण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी बंधाऱ्याची साखळी तयार करण्यात येईल. बंधाऱ्याला पाट्या लावून पाण्याची साठवणूक करण्यात येईल. त्यामुळे शेतीला सिंचनासाठी या पाण्याची मदत होईल. सिंदीपार येथील शाळेसाठी वर्गखोल्या बांधून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य श्री.चुऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. या रस्त्याच्या कामावर 1 कोटी 65 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे वडेगाव ते सिंदीपार दरम्यानच्या गावांना रस्त्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

     पालकमंत्र्यांनी खोडशिवनी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या खोडशिवनी ते सौंदड या 6.32 कि.मी. रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. यावेळी जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य इंदू परशूरामकर, राजेश कठाणे, गायत्री इरले, ग्रामपंचायत सरपंच अर्चना भैसारे, उपसरपंच मनोहर परशूरामकर, कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, श्री.ताकसांडे, उपअभियंता श्री.देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी खोडशिवनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बफर क्षेत्राच्या गावातील सर्वच कुटूंबांना गॅस कनेक्शन देणार - राजकुमार बडोले

चिखली येथे गॅस कनेक्शनचे वाटप


          नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांच्या विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांना देण्यात येईल. बफर क्षेत्रातील गावांचे इंधनासाठी वनावर असलेले अवलंबीत्व कमी करण्यासाठी सर्वच कुटूंबांना गॅस कनेक्शन देण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       16 ऑगस्ट रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील चिखल ग्रामपंचायत येथे वन्यजीव विभागाच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून गावातील कुटूंबांना गॅस कनेक्शनचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य माधुरी पातोडे, पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, वन्यजीव विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी गीता पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.राठोड, सरपंच सुधाकर कुर्वे, नायब तहसिलदार अखिल मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये काही गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे त्या गावांच्या अडचणी वाढल्या आहेत. बफर क्षेत्रात गुरे चराई करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुरणांचा विकास करणे गरजेचे आहे. जंगलाच्या परिसरात असलेल्या शेतीला सौर कुंपन दिल्यास शेतपिकाची नासाडी वन्य प्राण्यांकडून होणार नाही. कोहमारा येथे घरगुती इंधनासाठी जळावू लाकडाचा डेपो सुरु करण्यात यावा. बांबू आधारित व्यवसाय करणाऱ्यांना बांबू उपलब्ध करुन दयावेत असेही ते यावेळी म्हणाले.
       श्रीमती पातोडे म्हणाल्या, या भागातील काही गावांचा समावेश बफर क्षेत्रामध्ये झाला आहे. त्यामुळे संबंधित गावातील ग्रामस्थांची वन व्यवस्थापन बाबतची जबाबदारी आता वाढली आहे. इंधनासाठी वनावर असलेले अवलंबीत्व कमी व्हावे यासाठी गॅस कनेक्शन वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.हत्तीमारे म्हणाले, गावातील सर्वच कुटूंबांकडे गॅस कनेक्शन नसल्यामुळे वन विभागाने जळावू लाकडाची व्यवस्था करुन दयावी. जनवन योजनेच्या माध्यमातून गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करावे व आवश्यक असलेले पुस्तके उपलब्ध करुन दयावे. वन्यजीव विभागाने गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे असे ते म्हणाले.
       श्रीमती पवार म्हणाल्या, जनवन योजनेच्या माध्यमातून बफर क्षेत्रातील गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जंगलाचे व वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी बफर क्षेत्रातील ग्रामस्थांची वाढली आहे. विविध घटकातील कुटूंबांना गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात येईल. या योजनेबाबत त्यांनी यावेळी विस्तृत माहिती दिली.
       पालकमंत्र्यांच्या हस्ते यादवराव मुनेश्वर या लाभार्थ्याला गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी चिखली ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार गिरीधारी हत्तीमारे यांनी मानले.

भरती प्रक्रियेवरील निर्बंध उठविण्यास विशेष मंजूरी घेणार - पालकमंत्री बडोले


करंजी येथे आरोग्य उपक्रेंद्राचे लोकार्पण



         आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजे. जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी भरती प्रक्रियेवरील निर्बंध उठविण्यासाठी शासनाकडून विशेष मंजूरी घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      15 ऑगस्ट रोजी आमगाव तालुक्यातील करंजी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानातून बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांनी केले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, पं.स.सभापती हेमलता डोये, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तहसिलदार साहेबराव राठोड, पं.स.सदस्य यशवंत बावनकर, सरपंच पंचफुला बागडे, उपसरपंच चंद्रसेन शेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू वंजारी, उपअभियंता सुनील तरोणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीराम शेंडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष चेतराम हुकरे, श्रीमती जांभूळकर यांची उपस्थिती होती.
       पालकमंत्री बोलतांना पुढे म्हणाले, ग्रामीण भागात रस्त्यांची चांगली सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध घटकातील लाभार्थ्यांना घरकूल, गॅस कनेक्शन वाटप अशा वैयक्तीक योजनांचा सुध्दा लाभ देण्यात येत आहे. ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गावे स्वच्छ व सुंदर झाली पाहिजे. गावाच्या विकासासाठी आपण सर्वोतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शाळेतील मुलांना शिक्षकांनी, पालकांनी मोठे स्वप्न दाखविले पाहिजे. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले पाहिजे, त्यामुळे ते जबाबदार नागरिक होवून पुढे येतील. करंजीची शाळा सौर ऊर्जेवर डिजीटल केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.
       शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यातील धान पिकाची स्थिती वाईट आहे. 50 टक्के रोवणी झालेली नाही, हलक्या धानाचेही नुकसान झाले आहे. 20 ऑगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर शेतीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, हे आरोग्य उपकेंद्र लोकांच्या आरोग्य सेवेत इमारतीच्या लोकार्पणामुळे रुजू झाले आहे. त्यामुळे ही इमारत रुग्ण व बाळंतपणासाठी उपयुक्त ठरणार आहे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेला 14 व्या वित्त आयोगाचा निधी विकास कामासाठी खर्च करुन विकास कामाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. गावातील प्रत्येक घरी शौचालय असले पाहिजे व त्याचा प्रत्येकाने नियमीत उपयोग केला पाहिजे. विकास कामात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे असे त्या म्हणाल्या.
       आमदार पुराम म्हणाले, कोणताही व्यक्ती हा मुलभूत गरजांपासून वंचित राहू नये. आरोग्याची सुविधा असणे ही अत्यंत महत्वाची गरज आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर उपकेंद्राचे उदघाटन होत आहे ही भूषणावह बाब नाही. जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे शेतीची स्थिती भिषण आहे. शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दयावे असे सांगून ते म्हणाले, ज्या विभागात रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांची भरती करण्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीमती डोये व श्री.हर्षे यांचीही भाषणे झाली.

      पालकमंत्र्यांनी यावेळी जि.प.शाळेच्या सौर ऊर्जेवर आधारित असलेल्या डिजीटल क्लासरुमचे उदघाटन केले. उपकेंद्राचे बांधकाम करणारे कंत्राटदार लखन हरिणखेडे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Tuesday 15 August 2017

स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापन दिन कार्यक्रम समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री राजकुमार बडोले

       • ‘आपला जिल्हा’ माहिती पु‍स्तिकेचे विमोचन
                                     • विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती सन्मानीत


           मागासवर्गातील युवक उद्योजक झाले पाहिजे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी क्रिमीलेअरची मर्यादा साडेचार लाखावरुन सहा लाख करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. समाजातील उपेक्षीत, वंचित, दुर्बल यासह सर्व घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       आज 15 ऑगस्ट रोजी कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री बडोले यांनी केले. परेडचे निरीक्षण केल्यानंतर उपस्थितांना संबोधीत करतांना ते बोलत होते. यावेळी  जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्स समिती सभापती पी.जी.कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       पालकमंत्री बोलतांना पुढे म्हणाले, मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यात रोजगार हमी योजना जिल्ह्यात यशस्वी ठरली. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा वार्षिक योजनेतून दिव्यांगांच्या विकासासाठी 3 टक्के निधीची तरतूद केली आहे. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अशांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटूंबांसाठी 2574 रमाई आवास योजनेची घरे बांधून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        जिल्ह्यातील विविध बँकांकडून 45 हजार 726 शेतकऱ्यांना 198 कोटीचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, वनालगत असलेल्या गावातील कुटूंबांचे वनावरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी 4174 कुटूंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या व त्यांच्याशी संबंधित राज्यातील 28 स्थळांचा विकास करुन त्यांना पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
       जलयुक्त शिवार अभियानातून मागील तीन वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, या अभियानामुळे गावाची पाण्याची गरज पूर्ण होत आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा विकास करुन त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सांगितले.
       जिल्ह्यात ऊर्जा विकासाच्या दृष्टीने विविध कामे करण्यात येत असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी सातही दिवस वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि फिडर योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अपूर्ण अवस्थेतील सिंचन प्रकल्पाची कामे त्वरित पूर्ण करुन जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे श्री.बडोले यावेळी म्हणाले.                                                                                   कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.रुखमोडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बागडे, श्री.राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विलास निखारे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बांधव, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड पथक, बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, फिरते न्यायवैदयक पथक, रुग्णवाहिका पथक व अग्नीशमन पथक यांनी संचलन केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
      विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी, विद्यार्थी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व व्यक्तींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी पंकज गजभिये, तहसिलदार कल्याण डहाट, संजय नागटिळक, नायब तहसिलदार विलास कोकवार, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर, एन.जी.कुंभलकर, सन 2015-16 या वर्षात राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळविलेल्या अर्जुनी/मोरगाव येथील जी.एम.बी.इंग्लीश मिडियम हायस्कूलची विद्यार्थीनी सावी गाडेगोणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ ग्राम स्पर्धेत ग्रामपंचायत चिचेवाडा, ग्रामपंचायत येरंडी/दर्रे व ग्रामपंचायत बिजेपार यांच्या सरपंच, सदस्य व सचिवांचा तसेच कुटूंबकल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्व.आबासाहेब खेडेकर पुरस्कार ग्रामपंचायत चिचटोला, पाणी व सांडपाणी व्यवस्थापनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल स्व.वसंतराव नाईक पुरस्कार ग्रामपंचायत गांधीटोला, सामाजिक एकतेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रामपंचायत बेरडीपार येथील सरपंच, सदस्य, सचिवांचा सत्कार करण्यात आला. विड्रॉल करतांना जास्त आलेले पैसे प्रामाणिकपणे बँकेला परत केल्याबद्दल सालेकसा येथील श्रीमती लिला डोंगरे यांचा, स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ यासह अन्य सामाजिक क्षेत्रात काम केल्याबद्दल हर्ष मोदी यांचा व सतीश पारधी यांचा यामध्ये समावेश आहे.
       महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणारे एकोडीचे तलाठी सुनील राठोड, धापेवाड्याचे कोतवाल बी.डी.पारधी, वडेगावचे तलाठी नरेश उगावकर, गुमाधवडाचे कोतवाल विनोद रहांगडाले, बेलाटीचे पोलीस पाटील दर्याव रिनाईत, मोहाडीच्या तलाठी निराशा शंभरकर, अशोक बघेले. डव्वाचे मंडळ अधिकारी आर.एल.रहांगडाले, कोयलारीचे तलाठी सुनील राठोड, भिवखिडकीचे तलाठी एस.बी.मेश्राम, अर्जुनी/मोरगावचे तलाठी एस.एच.हरिणखेडे, चान्नाचे कोतवाल शरद रामटेके, अर्जुनी/मोरगावचे पोलीस पाटील मधुकर परबते, देवरीचे मंडळ अधिकारी सिंधी मेश्राम, सालईचे तलाठी नरेश तागडे, किकरीपारच्या तलाठी शुभांगी सहारे, कावराबांधचे तलाठी आर.एन.ठाकरे, पिपरीयाचे तलाठी एस.टी.पंधरे, कोतवाल श्री.उंदीरवाडे यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

Monday 14 August 2017

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘आपला जिल्हा’ माहिती पुस्तिकेचे विमोचन


           भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते आपला जिल्हा - गोंदिया या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
        जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या आपला जिल्हा - गोंदिया या माहिती पुस्तिकेमध्ये जिल्ह्याचे भौगोलिक स्थान, जिल्ह्याची पार्श्वभूमी, जिल्ह्याचे वैशिष्ट्ये, तालुके, जिल्ह्यातील गावे, जिल्ह्याचा नकाशा, लोकसभा व विधानसभा मतदारसंघ, जिल्ह्याची लोकसंख्या, जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या तसेच शहरी व ग्रामीण लोकसंख्या, जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक, साक्षरतेचे प्रमाण, जिल्ह्यातील महसूल विभाग, नगरपालिका, पंचायत समित्या, एकूण ग्रामपंचायती, नगरपरिषद/नगर पंचायतची लोकसंख्या, जिल्ह्यातील पंचायत समिती निहाय ग्रामपंचायती व त्यांची लोकसंख्या, जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदया, जिल्ह्यातील डोंगररांगा, जिल्ह्याचे वनक्षेत्र, वन्यजीव, अभयारण्य, जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व इतर विविध महाविद्यालयाची संख्या, जिल्ह्यातील महत्वाचे सण, मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प, जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलाव यांची सिंचन क्षमता, कृषि क्षेत्र, उद्योग, महिला-पुरुष बचतगट, जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळे, राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळणाऱ्या ऐश्वर्यसंपन्न सारस पक्षाची व जिल्ह्यातील विविध तलावांवर येणाऱ्या विदेशी व स्थलांतरीत पक्ष्यांची माहिती देण्यात आली आहे. ही पुस्तिका बहुरंगी असून पुस्तिकेमध्ये अत्यंत आकर्षक असे विविध छायाचित्र माहिती निहाय घेण्यात आले आहे. ही पुस्तिका अनेकांना जिल्ह्यातील विविध विषयांच्या माहितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
00000

Monday 7 August 2017

पालकमंत्र्यांनी केली पीक परिस्थतीची पाहणी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही

           



       जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे केवळ 51 टक्केच रोवणी झाली आहे. समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिकाची स्थिती वाईट असून जमिनीला भेगा गेल्या आहेत, त्यामुळे लावलेली रोपे सुकत आहे. या पीक परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला असतांना शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 5 व 6 ऑगस्ट रोजी गोरेगाव, सडक/अर्जुनी आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देवून प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
       गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे झनकलाल चौरागडे व मुलचंद भावे या शेतकऱ्यांच्या धान पिकाची पाहणी करुन त्यांच्याशी चर्चा केली. झनकलाल चौरागडे हे कृषि विभागाच्या योजनेतून तयार केलेल्या शेततळ्यातून धानाला पाणी देत होते. तर मुलचंद भावे या शेतकऱ्याने समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पेरणीच केली नसल्याचे सांगितले. हिरापूर येथील पुष्पाबाई बोपचे यांच्या शेतातील धान नर्सरीची देखील पाहणी केली. कमी पावसामुळे धान नर्सरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची बाब उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे रोवणी करतांना सुध्दा मोठ्या अडचणी निर्माण होणार असल्याचे यावेळी काही शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय अधिकारी श्री.तळपाळे, पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती बबलु बिसेन, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, तालुका भाजपा अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, पं.स.सदस्य केवलराम बघेले, पुष्पराज जनबंधू, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने, संजय बारेवार, माजी सरपंच सतीश रहांगडाले आदी उपस्थित होते.
       पालकमंत्र्यांनी यावेळी कुऱ्हाडी येथील महा ई-सेवा केंद्राला भेट देवून पीक विमा योजनेचे ऑनलाईन किती अर्जाची नोंदणी झाली व ऑनलाईन नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणी सेवा केंद्राचे संचालक भुमेश्वर पटले यांचेकडून जाणून घेतल्या. सडक/अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रा येथील शेतकरी सकुबाई नेवारे यांच्या शेतात जावून धानपिकाची पाहणी केली. कमी पावसामुळे धान उत्पादनात मोठा फरक पडणार असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. काही शेतकऱ्यांनी तर अद्याप रोवणी केली नसल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पाटेकुर्राचे शेतकरी लेखीराम वरखडे, थाडू राणे यांच्याशी पालकमंत्र्यांनी संवाद साधून त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम, तालुका भाजपा अध्यक्ष विजय बिसेन, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, सरपंच चेतन वडगाये उपस्थित होते. पळसगाव/डव्वा येथील रुपविलास कुरसूंगे यांच्या शेतातील धान पिकाची पाहणी केली. तसेच जांभळी येथील काही शेतकऱ्यांच्या पीक परिस्थितीची पाहणी केली.
       अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील मुंगलीटोला येथील शाळेतील विद्यार्थ्यांना काही दिवसापूर्वी दूध घेवून जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. या अपघातात कल्याणी कांबळे हिचा मृत्यू झाला व या अपघातात जखमी झालेले हर्षा कापगते, योगेश कापगते, रोहिणी डोंगरवार, बादल मेश्राम यांचीही विचारपूस केली. मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांची पालकमंत्र्यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. अपघातात मृत्यू पावलेल्या कल्याणी कांबळे या विद्यार्थीनीच्या पालकाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून तसेच जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आमदार निधीतून मदत करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी विविध कुटूंबांना सांत्वन म्हणून वैयक्तीकरित्या प्रत्येकी 10 हजार रुपयाची मदत केली.
       बाकटी येथील शेतकऱ्यांशी पालकमंत्री बडोले यांनी संवाद साधून चान्ना येथील गजानन महाराज मंदिरात गावातील शेतकऱ्यांशी पीक परिस्थितीबाबत चर्चा केली. शेतीला सिंचनासाठी 24 तास वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. बोंडगाव/देवी येथील शेतकरी हेमराज बोरकर, यादवराव बरैया, माधव बरैया, सिध्दार्थ साखरे, गणेश वालदे, विनोद वालदे, विजू मानकर, संजय मानकर या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन पिकाचे जर नुकसान झाले तर शासन मोबदला देईल याची ग्वाही पालकमंत्र्यांनी त्यांना दिली. पिंपळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित शेतकऱ्यांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला व त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. यावेळी पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, चामेश्वर गहाणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास फुंडे, सरपंच प्रज्ञा डोंगरे, केवलराम पुस्तोडे, तहसिलदार देवदास बोंबार्डे, तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम उपस्थित होते.
        खांबी येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपस्थित शेतकऱ्यांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री म्हणाले, पाऊस कमी झाल्यामुळे पीक परिस्थितीची पाहणी करण्याकरीता केवळ 45 टक्के पाऊस झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. तलावात केवळ 18 टक्के जलसाठा आहे आणि चार दिवसात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा निश्चित लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.
        अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील कोरडवाहू शेती असलेल्या गावात कमी रोवण्या झाल्या असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, ज्यांच्या रोवण्या झालेल्या नाही ते शेतकरी आज संकटात आहेत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निश्चित मदत करण्यात येईल. देशातील सर्वात मोठी कर्जमुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीसाठी सलग 12 तास वीज पुरवठा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याच्या वीज विकासासाठी मोठा निधी मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज विकासाच्या कामाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी नारायण भेंडारकर या शेतकऱ्याने शेतीसाठी भारनियमन बंद करावे, 24 तास वीज मिळावी, कर्ज माफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची अट रद्द करावी, सेवा सहकारी संस्थांकडून उपलब्ध करुन देण्यात येणारी यादी ग्राह्य धरावी, विमा हा महसूल मंडळासाठी निकष न ठेवता शेतीपूरता मर्यादित ठेवावा, झासीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी त्वरित मिळावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सभेला पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, चामेश्वर गहाणे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, केवलराम पुस्तोडे, तहसिलदार देवदास बोंबार्डे, तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम, सहायक गटविकास अधिकारी श्री.आंदीलवाड, सरपंच शारदा खोटेले, मंडळ कृषि अधिकारी संजय रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday 4 August 2017

पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना प्रोत्साहित


         जिल्ह्यात यावर्षी 4 ऑगस्ट पर्यंत केवळ 55 टक्के पाऊस पडला आहे. धान उत्पादक शेतकरी कमी पावसामुळे रोवण्या न झाल्यामुळे चिंतातूर झाला आहे. कमी पावसामुळे पिकाच्या उत्पादनावर सुध्दा फरक पडणार आहे. नैसर्गीक संकटामुळे पिकाची नुकसान भरपाई संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देता यावी यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ 4 ऑगस्ट पर्यंत घेण्याची मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी 3 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सहा तालुक्यांना भेट देवून पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारीत असलेल्या ठिकाणी, तसेच तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतमध्ये उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी प्रोत्साहित केले. पिकाचा विमा काढणे किती आवश्यक आहे याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले.
      सी.एस.सी. सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र व संग्राम केंद्र यांना जिल्हाधिकारी काळे यांनी भेट देवून ऑनलाईन विमा हप्ता भरतांना येत असलेल्या अडचणीबाबतची माहिती जाणून घेतली. तहसिल कार्यालय गोरेगाव येथील पीक विमा भरण्यासाठी उघडण्यात आलेल्या केंद्राला भेट देवून सोनी, भडंगा व इतर गावातील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना विम्याबाबत असलेल्या शंकांचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निराकरण केले. या तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून नेमलेल्या उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      सडक/अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील तलाठी साझा येथे पीक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर सडक/अर्जुनी येथील सेतू केंद्राला भेट देवून पीक विमा काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून सेतू केंद्र चालकाला पीक विम्याचा अर्ज ऑनलाईन भरतांना येणाऱ्या अडचणीची माहिती जाणून घेतली. या तालुक्याचे संपर्क अधिकारी म्हणून नेमलेले उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसिलदार विठ्ठल परळीकर उपस्थित होते. तालुक्यातील चिखली येथील ग्रामपंचायतमध्ये उपस्थित असलेल्या  शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा करुन 4 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आवश्यक ते कागदपत्र सी.एस.सी. व सेतू केंद्राला देवून पीक विम्याचा हप्ता भरण्याचे सांगितले. गावातील शेतकऱ्यांनी यावेळी पिकाची स्थिती अत्यंत बिकट असून इथला शेतकरी धान पिकावरच अवलंबून असल्याचे तसेच पीक विमा काढण्यासाठी संबंधित केंद्रावर एकही अर्ज अपलोड होत नसल्याचे पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना कळविणार असल्याचे सांगितले व उपस्थित शेतकऱ्यांना जलपुनर्भरणाची कामे हाती घ्यावी असे सूचविले.

       अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील परसोडी येथील ग्रामपंचायतमध्ये उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. नवेगावबांध येथील आपले सरकार ऑनलाईन केंद्राला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसिलदार देवदास बोंबार्डे उपस्थित होते. देवरी येथे सुध्दा सेतू केंद्र, आपले सरकार ऑनलाईन केंद्राला भेट देवून तालुक्यातील परसोडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करुन पीक विमा बाबतच्या येणाऱ्या अडचणी ऐकून घेतल्या. यावेळी तहसिलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी श्री.हिरुळकर, कृषि अधिकारी श्री.मेश्राम उपस्थित होते. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे सी.एस.सी. केंद्राला भेट देवून ऑनलाईन किती अर्ज सादर करण्यात आले याबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी तहसिलदार प्रशांत सांगडे, तालुका कृषि अधिकारी श्री.तोडसाम उपस्थित होते. आमगाव तालुक्यातील ठाणा येथील सी.एस.सी. केंद्राला भेट देवून येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी तहसिलदार साहेबराव राठोड उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री राजकुमार बडोले व खासदार नाना पटोले यांना पीक विम्याचा ऑनलाईन अर्ज भरतांना येणाऱ्या अडचणीची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याबाबत प्रोत्साहन मिळाले.

बिरसी विमानतळावर विमान अपहरण घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची प्रात्यक्षिके




काही वर्षापूर्वी कंदहार येथून विमानाचे अपहरण करण्यात आले होते. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अपहरण केलेले विमान अपहरणकर्त्यांनी कोसळवून मोठी वित्त व प्राणहानी घडवून आणली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व देशातील एखादया विमानतळावरुन विमानाचे अपहरण झाले तर कोणत्या प्रकारच्या उपययोजना केल्या पाहिजे याचे प्रात्यक्षिक 4 ऑगस्ट रोजी बिरसी येथील भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या विमानतळावर करण्यात आली.
      उपाययोजनांची रंगीत तालीम घेवून यावेळी बिरसी विमानतळ समितीची सभा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विमान कशाप्रकारे संपर्कात येवू शकते. अचानक त्या विमानाचे अपहरण कशाप्रकारे होते व अपहरणाचे कोडवर्ड याबाबतची माहिती या प्रात्यक्षिकातून देण्यात आली.
       प्रात्यक्षिकाच्यावेळी धावपट्टीवर 3 ॲम्बुलंस, 1 अग्नीशमन वाहन, श्वानपथक, पोलीस व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला. कंट्रोलरुम येथून पोलीस अधीक्षक यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश बिनतारी संदेशातून प्रात्यक्षिक करणाऱ्यांना दिले. यावेळी कंट्रोल रुममधून प्रात्यक्षिकाची पाहणी उपस्थितांनी केली.
      यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी बिरसी विमानतळ समितीची सभा घेतली. सभेला पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, बिरसी विमानतळचे संचालक सचिन खंगार, प्रविण गडपाल, अजय वर्मा, विनयकुमार ताम्रकार, संदिप पिंपळापुरे, देवेंद्र गौर, के.एस.राव, श्री.सोनवणे, ओ.एस.पशीने, श्रीमती रिंचेन डोलमा, विजय अहिरे यांची उपस्थिती होती.
      जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, बिरसी विमानतळ येथे सुध्दा 24 तास कडेकोट बंदोबस्त असला पाहिजे. विमान अपहरणासारखी घटना या विमानतळावर होणार नाही यादृष्टीने दक्ष असले पाहिजे. विविध भाषा जाणणारे व्यक्ती या समितीमध्ये असावे. विमानतळ प्राधिकरणाचा स्वतंत्र प्रसारमाध्यम अधिकारी नेमण्यात यावा अशी उपयुक्त सूचनाही त्यांनी यावेळी केली.

      डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे पोलीस विभागाचे बंदोबस्त नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात असतो. पुरेसे पोलीस बळ सुध्दा जिल्ह्यात नाही. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षीत पोलीस दल नसल्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने अर्धसैनिक दलाच्या तुकड्यामार्फत सुरक्षेची जबाबदारी दिल्यास उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.खंगार यांनी विमानतळ सुरक्षेबाबतची व मागच्या सभेची माहिती यावेळी दिली.

Tuesday 1 August 2017

पावसाळी अधिवेशनात जिल्ह्याला मोठा निधी पालकमंत्री बडोले यांच्या प्रयत्नामुळे

जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार
• प्रशासकीय इमारत फर्नीचरसाठी 9 कोटी 36 लाख
                              • सावंगीत विश्रामगृहासाठी 1 कोटी 81 लाख    
                          • जुनेवाणी प्रकल्पासाठी 1 कोटी 89 लाख


         मुंबई येथे सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्याच्या विविध विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर करुन घेतल्यामुळे जिल्ह्यातील विविध विकास कामांना आता गती मिळणार आहे. पावसाळी अधिवेशनात आज खर्चाच्या पुरक मागण्यांमध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पालकमंत्री बडोले यांनी मंजूर करुन घेतला. यामध्ये विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सडक/अर्जुनी येथे दिवाणी न्यायाधीश निवासस्थानासाठी 56.27 लाख रुपये तर सावंगी येथील विश्रामगृहाच्या प्रांगणातील अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी बैठक कक्षाचे बांधकामासाठी 181 लाख रुपये मंजूर करण्यात आले. गोंदिया येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये फर्नीचरसाठी तब्बल 936 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सदरच्या कामावर 784 लाख रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे बडोले म्हणाले.
        गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी यापूर्वीच 449 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. याशिवाय गोंदिया येथील जी.एन.एम. प्रशाळेच्या बांधकामासाठी 982 लाख रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले.
        जुनेवाणी या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 189 लाख रुपयाची कामे नव्याने मंजूर करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्यात यश आले असून शासनाने यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांचाही यासाठी मी आभारी असल्याचे बडोले म्हणाले. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह असो, तरुणांसाठी स्वयंरोजगारा बाबतचा कौशल्य विकास कार्यक्रम असो की, भारतीय प्रशासकीय सेवेसाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी असो, हवाई सुंदरी पुर्वतयारी प्रशिक्षण यामध्ये जिल्हा अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. 

आझाद विद्यालयात उर्दू लोकराज्य विद्यार्थी मेळावा उत्साहात


          विविध लोककल्याणकारी योजना शासन राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी राबवीत आहे. या विविध योजनांची माहिती शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातून प्रकाशित करण्यात येते. राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींना उर्दू भाषेतून सुध्दा योजनांची माहिती व्हावी व त्या योजनांचा त्यांनी लाभ घेवून विकास साधण्यासाठी उर्दू भाषेतून प्रकाशित होणाऱ्या लोकराज्यची माहिती देण्यासाठी गोंदिया येथील आझाद उर्दू विद्यालयात विद्यार्थी मेळावा   1 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, मुख्याध्यापिका श्रीमती टी.एल.शेख यांची उपस्थिती होती.
      अध्यक्षस्थानावरुन श्री.खडसे म्हणाले, जिल्ह्यातील ही उर्दू शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना उर्दू भाषेतून शिक्षण घेतांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी व त्या माध्यमातून त्यांच्या विकासाला गती मिळण्यासाठी हे मासिक उपयुक्त आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी देखील भविष्यात या मासिकाचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे असे त्यांनी सांगितले.
      श्री.गणराज म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक विचारातून काम करावे. मोठे होण्याचे स्वप्न बघावे. ते पूर्ण करण्यासाठी कठोर परीश्रम घ्यावे. उर्दू लोकराज्यमुळे विद्यार्थी व पालकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल. डॉ.एपीजे अब्दूल कलाम आझाद यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा आदर्श पुढे ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असेही ते यावेळी म्हणाले.

      यावेळी जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी मुख्याध्यापिका श्रीमती टी.एल.शेख यांना उर्दू लोकराज्य अंक भेट म्हणून दिले. उपस्थित विद्यार्थ्यांना देखील लोकराज्य अंक देण्यात आले. दर महिन्याला विद्यार्थी व शिक्षकांसाठी 150 लोकराज्य अंकाची मागणी श्रीमती शेख यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला सहायक शिक्षक अजहर अहमद, श्री शादाब खान, श्रीमती रुखसाना बेगम, श्रीमती हिना कौसर, श्रीमती रुखसाना खान यांची तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक श्रीमती शेख यांनी केले. आभार शिक्षक अजहर अहमद यांनी मानले.