जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 15 August 2017

स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापन दिन कार्यक्रम समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री राजकुमार बडोले

       • ‘आपला जिल्हा’ माहिती पु‍स्तिकेचे विमोचन
                                     • विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती सन्मानीत


           मागासवर्गातील युवक उद्योजक झाले पाहिजे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी क्रिमीलेअरची मर्यादा साडेचार लाखावरुन सहा लाख करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. समाजातील उपेक्षीत, वंचित, दुर्बल यासह सर्व घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       आज 15 ऑगस्ट रोजी कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री बडोले यांनी केले. परेडचे निरीक्षण केल्यानंतर उपस्थितांना संबोधीत करतांना ते बोलत होते. यावेळी  जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्स समिती सभापती पी.जी.कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       पालकमंत्री बोलतांना पुढे म्हणाले, मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यात रोजगार हमी योजना जिल्ह्यात यशस्वी ठरली. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा वार्षिक योजनेतून दिव्यांगांच्या विकासासाठी 3 टक्के निधीची तरतूद केली आहे. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही अशांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटूंबांसाठी 2574 रमाई आवास योजनेची घरे बांधून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        जिल्ह्यातील विविध बँकांकडून 45 हजार 726 शेतकऱ्यांना 198 कोटीचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, वनालगत असलेल्या गावातील कुटूंबांचे वनावरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी 4174 कुटूंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या व त्यांच्याशी संबंधित राज्यातील 28 स्थळांचा विकास करुन त्यांना पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
       जलयुक्त शिवार अभियानातून मागील तीन वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, या अभियानामुळे गावाची पाण्याची गरज पूर्ण होत आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा विकास करुन त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सांगितले.
       जिल्ह्यात ऊर्जा विकासाच्या दृष्टीने विविध कामे करण्यात येत असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी सातही दिवस वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि फिडर योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अपूर्ण अवस्थेतील सिंचन प्रकल्पाची कामे त्वरित पूर्ण करुन जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे श्री.बडोले यावेळी म्हणाले.                                                                                   कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.रुखमोडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बागडे, श्री.राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विलास निखारे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बांधव, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड पथक, बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, फिरते न्यायवैदयक पथक, रुग्णवाहिका पथक व अग्नीशमन पथक यांनी संचलन केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
      विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी, विद्यार्थी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व व्यक्तींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी पंकज गजभिये, तहसिलदार कल्याण डहाट, संजय नागटिळक, नायब तहसिलदार विलास कोकवार, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर, एन.जी.कुंभलकर, सन 2015-16 या वर्षात राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळविलेल्या अर्जुनी/मोरगाव येथील जी.एम.बी.इंग्लीश मिडियम हायस्कूलची विद्यार्थीनी सावी गाडेगोणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ ग्राम स्पर्धेत ग्रामपंचायत चिचेवाडा, ग्रामपंचायत येरंडी/दर्रे व ग्रामपंचायत बिजेपार यांच्या सरपंच, सदस्य व सचिवांचा तसेच कुटूंबकल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल स्व.आबासाहेब खेडेकर पुरस्कार ग्रामपंचायत चिचटोला, पाणी व सांडपाणी व्यवस्थापनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल स्व.वसंतराव नाईक पुरस्कार ग्रामपंचायत गांधीटोला, सामाजिक एकतेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रामपंचायत बेरडीपार येथील सरपंच, सदस्य, सचिवांचा सत्कार करण्यात आला. विड्रॉल करतांना जास्त आलेले पैसे प्रामाणिकपणे बँकेला परत केल्याबद्दल सालेकसा येथील श्रीमती लिला डोंगरे यांचा, स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ यासह अन्य सामाजिक क्षेत्रात काम केल्याबद्दल हर्ष मोदी यांचा व सतीश पारधी यांचा यामध्ये समावेश आहे.
       महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणारे एकोडीचे तलाठी सुनील राठोड, धापेवाड्याचे कोतवाल बी.डी.पारधी, वडेगावचे तलाठी नरेश उगावकर, गुमाधवडाचे कोतवाल विनोद रहांगडाले, बेलाटीचे पोलीस पाटील दर्याव रिनाईत, मोहाडीच्या तलाठी निराशा शंभरकर, अशोक बघेले. डव्वाचे मंडळ अधिकारी आर.एल.रहांगडाले, कोयलारीचे तलाठी सुनील राठोड, भिवखिडकीचे तलाठी एस.बी.मेश्राम, अर्जुनी/मोरगावचे तलाठी एस.एच.हरिणखेडे, चान्नाचे कोतवाल शरद रामटेके, अर्जुनी/मोरगावचे पोलीस पाटील मधुकर परबते, देवरीचे मंडळ अधिकारी सिंधी मेश्राम, सालईचे तलाठी नरेश तागडे, किकरीपारच्या तलाठी शुभांगी सहारे, कावराबांधचे तलाठी आर.एन.ठाकरे, पिपरीयाचे तलाठी एस.टी.पंधरे, कोतवाल श्री.उंदीरवाडे यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

No comments:

Post a Comment