जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 7 August 2017

पालकमंत्र्यांनी केली पीक परिस्थतीची पाहणी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही

           



       जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे केवळ 51 टक्केच रोवणी झाली आहे. समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिकाची स्थिती वाईट असून जमिनीला भेगा गेल्या आहेत, त्यामुळे लावलेली रोपे सुकत आहे. या पीक परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला असतांना शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 5 व 6 ऑगस्ट रोजी गोरेगाव, सडक/अर्जुनी आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देवून प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
       गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे झनकलाल चौरागडे व मुलचंद भावे या शेतकऱ्यांच्या धान पिकाची पाहणी करुन त्यांच्याशी चर्चा केली. झनकलाल चौरागडे हे कृषि विभागाच्या योजनेतून तयार केलेल्या शेततळ्यातून धानाला पाणी देत होते. तर मुलचंद भावे या शेतकऱ्याने समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पेरणीच केली नसल्याचे सांगितले. हिरापूर येथील पुष्पाबाई बोपचे यांच्या शेतातील धान नर्सरीची देखील पाहणी केली. कमी पावसामुळे धान नर्सरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची बाब उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे रोवणी करतांना सुध्दा मोठ्या अडचणी निर्माण होणार असल्याचे यावेळी काही शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय अधिकारी श्री.तळपाळे, पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती बबलु बिसेन, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, तालुका भाजपा अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, पं.स.सदस्य केवलराम बघेले, पुष्पराज जनबंधू, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने, संजय बारेवार, माजी सरपंच सतीश रहांगडाले आदी उपस्थित होते.
       पालकमंत्र्यांनी यावेळी कुऱ्हाडी येथील महा ई-सेवा केंद्राला भेट देवून पीक विमा योजनेचे ऑनलाईन किती अर्जाची नोंदणी झाली व ऑनलाईन नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणी सेवा केंद्राचे संचालक भुमेश्वर पटले यांचेकडून जाणून घेतल्या. सडक/अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रा येथील शेतकरी सकुबाई नेवारे यांच्या शेतात जावून धानपिकाची पाहणी केली. कमी पावसामुळे धान उत्पादनात मोठा फरक पडणार असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. काही शेतकऱ्यांनी तर अद्याप रोवणी केली नसल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पाटेकुर्राचे शेतकरी लेखीराम वरखडे, थाडू राणे यांच्याशी पालकमंत्र्यांनी संवाद साधून त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम, तालुका भाजपा अध्यक्ष विजय बिसेन, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, सरपंच चेतन वडगाये उपस्थित होते. पळसगाव/डव्वा येथील रुपविलास कुरसूंगे यांच्या शेतातील धान पिकाची पाहणी केली. तसेच जांभळी येथील काही शेतकऱ्यांच्या पीक परिस्थितीची पाहणी केली.
       अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील मुंगलीटोला येथील शाळेतील विद्यार्थ्यांना काही दिवसापूर्वी दूध घेवून जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. या अपघातात कल्याणी कांबळे हिचा मृत्यू झाला व या अपघातात जखमी झालेले हर्षा कापगते, योगेश कापगते, रोहिणी डोंगरवार, बादल मेश्राम यांचीही विचारपूस केली. मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांची पालकमंत्र्यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. अपघातात मृत्यू पावलेल्या कल्याणी कांबळे या विद्यार्थीनीच्या पालकाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून तसेच जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आमदार निधीतून मदत करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी विविध कुटूंबांना सांत्वन म्हणून वैयक्तीकरित्या प्रत्येकी 10 हजार रुपयाची मदत केली.
       बाकटी येथील शेतकऱ्यांशी पालकमंत्री बडोले यांनी संवाद साधून चान्ना येथील गजानन महाराज मंदिरात गावातील शेतकऱ्यांशी पीक परिस्थितीबाबत चर्चा केली. शेतीला सिंचनासाठी 24 तास वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. बोंडगाव/देवी येथील शेतकरी हेमराज बोरकर, यादवराव बरैया, माधव बरैया, सिध्दार्थ साखरे, गणेश वालदे, विनोद वालदे, विजू मानकर, संजय मानकर या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन पिकाचे जर नुकसान झाले तर शासन मोबदला देईल याची ग्वाही पालकमंत्र्यांनी त्यांना दिली. पिंपळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित शेतकऱ्यांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला व त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. यावेळी पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, चामेश्वर गहाणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास फुंडे, सरपंच प्रज्ञा डोंगरे, केवलराम पुस्तोडे, तहसिलदार देवदास बोंबार्डे, तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम उपस्थित होते.
        खांबी येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपस्थित शेतकऱ्यांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री म्हणाले, पाऊस कमी झाल्यामुळे पीक परिस्थितीची पाहणी करण्याकरीता केवळ 45 टक्के पाऊस झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. तलावात केवळ 18 टक्के जलसाठा आहे आणि चार दिवसात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा निश्चित लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.
        अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील कोरडवाहू शेती असलेल्या गावात कमी रोवण्या झाल्या असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, ज्यांच्या रोवण्या झालेल्या नाही ते शेतकरी आज संकटात आहेत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निश्चित मदत करण्यात येईल. देशातील सर्वात मोठी कर्जमुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीसाठी सलग 12 तास वीज पुरवठा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याच्या वीज विकासासाठी मोठा निधी मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज विकासाच्या कामाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी नारायण भेंडारकर या शेतकऱ्याने शेतीसाठी भारनियमन बंद करावे, 24 तास वीज मिळावी, कर्ज माफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची अट रद्द करावी, सेवा सहकारी संस्थांकडून उपलब्ध करुन देण्यात येणारी यादी ग्राह्य धरावी, विमा हा महसूल मंडळासाठी निकष न ठेवता शेतीपूरता मर्यादित ठेवावा, झासीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी त्वरित मिळावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सभेला पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, चामेश्वर गहाणे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, केवलराम पुस्तोडे, तहसिलदार देवदास बोंबार्डे, तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम, सहायक गटविकास अधिकारी श्री.आंदीलवाड, सरपंच शारदा खोटेले, मंडळ कृषि अधिकारी संजय रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment