जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 29 August 2017

योजनांची माहिती मिळण्यासाठी संवाद पर्व उपयुक्त - सुनील सोसे

                   अर्धनारेश्वरालय येथे संवाद पर्व कार्यक्रम
                   • मी मुख्यमंत्री बोलतोय पुस्तिकेचे विमोचन


    जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने शासन विविध योजना राबविते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला  संवाद पर्व कार्यक्रम विविध योजनांची माहिती मिळण्यास उपयुक्त आहे. असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले.
    29 ऑगस्ट रोजी सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय देवस्थान येथे जिल्हा माहिती कार्यालय आणि अर्धनारेश्वरालय गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त वतीने आयोजित संवाद पर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.सोसे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषि अधिकारी घनश्याम तोडसाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.येरणे, नायब तहसिलदार ए.बी.भुरे, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.ए.शेगोकार, रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी डी.जी.रहांगडाले, स्वच्छ भारत मिशनचे गट समन्वयक जी.डी.पटले व अर्धनारेश्वरालय देवस्थानचे अध्यक्ष गोविंदरामजी वरकडे यांची उपस्थिती होती.
      श्री.सोसे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची माहिती संवाद पर्वच्या माध्यमातून मिळण्यास मदत होत आहे. उपस्थित ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. त्यामुळे या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ घेणे सोईचे होईल. महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांना सक्षम करण्याचे काम करीत आहे. सालेकसा तालुक्यातील 1260 पैकी 983 महिला बचतगटांना विविध व्यवसाय उद्योगासाठी फिरता निधी दिला आहे.
     तालुक्यातील प्रत्येक गावच्या ग्रामसंस्थेला देखील 3 लक्ष रुपये निधी दिला असल्याचे सांगून श्री.सोसे म्हणाले, त्यामुळे गावातील बचतगटांना सक्षम करण्याचे काम ग्रामसंस्था करीत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम माविम राबवित आहे. कृषि सखीच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी व पशु सखीच्या माध्यमातून बकरी पालनाच्या व्यवसायातून स्वावलंबी होण्यासाठी महिलांना मदत होत आहे असे त्यांनी सांगितले.
        श्री.तोडसाम म्हणाले, भात पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी पीक विस्तार कार्यक्रम आहे. शेतकरी फळ लागवडीकडे वळला पाहिजे यासाठी देखील 100 टक्के अनुदानावर योजना आहेत. सेंद्रीय तांदळाला प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळण्यास मदत होईल. कृषि‍ विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान, सुक्ष्म सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला बोडी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व कृषि अभियांत्रिकी योजना यासह अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
       डॉ.येरणे यावेळी म्हणाले, वाढती लोकसंख्या कुटूंब कल्याण कार्यक्रमामुळे नियंत्रणात येत आहे. जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना व नवसंजीवनी योजना या गरोदर माता व बालकांसाठी आहे. मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत देखील आरोग्य योजना राबविण्यात येतात. साथीवर नियंत्रण आणण्यासाठी साथरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतात. कुष्ठरोग व क्षयरोगाचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी देखील योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.भुरे म्हणाले, विविध सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना राबविण्यात येतात, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना राबविण्यात येतात. कुटूंबातील महिलांचे नाव सातबारावर नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांचे मतदार यादीत नाव नाही त्यांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंदणी करावी असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री.वरकडे यांनी देखील उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने संवाद पर्वच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
      प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी संवाद पर्व आयोजनामागची भूमिका विषद केली. महाकर्जमाफी, प्रधानमंत्री मुद्रा योजना यासह अन्य योजनांची माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीणू वई, लोकेश कोरे, भरत शाहू, पवन पटले, नवीन भेंडारकर, चेतन बिसेन, सुभाष भेंडारकर, स्वप्नील सांगोळे, अनुसया कोरे, हंसकला शेंडे, धर्मशिला उईके, ममता कापसे, रत्नमाला किरसान, वैशाली  नाईक, भुमेश्वर कापसे, लक्ष्मी भेंडारकर, ग्यानीराम वाढई यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन बाजीराव तरोणे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. कार्यक्रमाला हलबीटोला ग्रामस्थ व गणेशोत्सवानिमित्त आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेला तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले विद्यार्थी उपस्थित होते.

1 comment:

  1. मी मुख्यमंत्री बोलतोय ही पुस्तक उपलब्ध आहे का?

    ReplyDelete