जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 1 August 2017

आझाद विद्यालयात उर्दू लोकराज्य विद्यार्थी मेळावा उत्साहात


          विविध लोककल्याणकारी योजना शासन राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी राबवीत आहे. या विविध योजनांची माहिती शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातून प्रकाशित करण्यात येते. राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींना उर्दू भाषेतून सुध्दा योजनांची माहिती व्हावी व त्या योजनांचा त्यांनी लाभ घेवून विकास साधण्यासाठी उर्दू भाषेतून प्रकाशित होणाऱ्या लोकराज्यची माहिती देण्यासाठी गोंदिया येथील आझाद उर्दू विद्यालयात विद्यार्थी मेळावा   1 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, मुख्याध्यापिका श्रीमती टी.एल.शेख यांची उपस्थिती होती.
      अध्यक्षस्थानावरुन श्री.खडसे म्हणाले, जिल्ह्यातील ही उर्दू शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना उर्दू भाषेतून शिक्षण घेतांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी व त्या माध्यमातून त्यांच्या विकासाला गती मिळण्यासाठी हे मासिक उपयुक्त आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी देखील भविष्यात या मासिकाचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे असे त्यांनी सांगितले.
      श्री.गणराज म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक विचारातून काम करावे. मोठे होण्याचे स्वप्न बघावे. ते पूर्ण करण्यासाठी कठोर परीश्रम घ्यावे. उर्दू लोकराज्यमुळे विद्यार्थी व पालकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल. डॉ.एपीजे अब्दूल कलाम आझाद यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा आदर्श पुढे ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असेही ते यावेळी म्हणाले.

      यावेळी जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी मुख्याध्यापिका श्रीमती टी.एल.शेख यांना उर्दू लोकराज्य अंक भेट म्हणून दिले. उपस्थित विद्यार्थ्यांना देखील लोकराज्य अंक देण्यात आले. दर महिन्याला विद्यार्थी व शिक्षकांसाठी 150 लोकराज्य अंकाची मागणी श्रीमती शेख यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला सहायक शिक्षक अजहर अहमद, श्री शादाब खान, श्रीमती रुखसाना बेगम, श्रीमती हिना कौसर, श्रीमती रुखसाना खान यांची तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक श्रीमती शेख यांनी केले. आभार शिक्षक अजहर अहमद यांनी मानले.

No comments:

Post a Comment