जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 26 January 2020

70 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था सन्मानीत





भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन 26 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम कारंजा येथील पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वाजता संपन्न झाला. राष्ट्रध्वजारोहणानंतर पालकमंत्री अनिल देशमुख यांनी परेडचे निरीक्षण करुन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना सन्मानीत केले. यावेळी त्यांनी प्रेरणा सभागृह येथे समग्र शिक्षा अभियानाच्या जिल्हा समन्वयक कुलदिपीका बोरकर यांनी काढलेल्या विविध प्रकारच्या चित्रांची भेट देवून पाहणी केली.

        जिल्ह्यास ध्वज दिन निधी गोळा करण्याकरीता दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांचा पालकमंत्री देशमुख यांनी सत्कार केला.
        जिल्हा पोलीस दलातील आंतरीक सुरक्षेबाबत उत्कृष्ट कामगिरी करणारे किशोर टेंभूर्णीकर, संदेश शिरसाट, प्रतापशाह सलामे, राकेश भूरे, रुपेंद्र गौतम, ईश्वरदास जनबंधू, शितल भांडारकर, अमोल राठोड, अमित नागदेवे, पुरुषोत्तम देशमुख, मनोज केवट, प्रकाश मेश्राम यांचा, 9 सप्टेबर 2019 रोजी वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदिलगतच्या गावातील 110 लोकांना सुखरुप सुरक्षीतस्थळी हलविण्याचे काम केले व 15 जानेवारी 2020 रोजी बिरसोला घाट येथे संक्रांतीनिमीत्त भरलेल्या यात्रेत घाटावर आंघोळीसाठी गेलेल्या तीन व्यक्तींना पाण्यात बुडत असतांना त्यांचे प्राण वाचविल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन चमूतील ज्ञानेश्वर धनवे, किशोर टेंभूर्णे, सुभाष कश्यप, अजय खोब्रागडे, राजकुमार बोपचे, नरेश उईके, रविंद्र भांडारकर, जसवंत रहांगडाले, संदिप कराडे, रुपेंद्र गौतम, धिरज दुबे, इमरान सैय्यद, जावेद पठाण, गोपाल लोंधे, गिरीधारी पतेह, चुन्नीलाल मुटकूरे, इंद्रकुमार बिसेन, जबरान चिखलोंढे, चिंतामन गिरेपुंजे, अनिल नागपुरे, चंद्रशेखर बिसेन, संदिप गजभिये, निलेश बाभरे, मुरलीधर मुधोडकर, दुर्गेश लंजे यांचा, नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय काम करणारे पोलीस हवालदार राजेंद्र भेंडारकर यांना, आरोग्य विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम, समाजसेवक नरेश लालवानी, आदर्श शर्मा यांना, गोंदिया ॲथलॅटीक्स संघटनेचे धावपटू सुभाष लिल्हारे, गुरुदेव दमाहे, दिनेश दाऊदशरे, वैशाली माटे, संदिप चौधरी, वर्षा पंधरे, अनमोल चचाणे, सीमा टेंभरे, लोकचंद मारबदे यांनी टाटा स्टील मॅराथॉन 2020 मध्ये सहभाग घेवून पारितोषिक मिळविल्याबद्दल, ज्येष्ठ नागरिक देवेंद्र शर्मा यांनी केरळ येथे झालेल्या 40 व्या नॅशनल मास्टर्स ॲथलॅटिक्स चॅम्पीयनशीप स्पर्धेत 5 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत चवथा क्रमांक आणि 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल, तिरोडा तालुक्यातील लिटिल फ्लावर ॲकाडमी तिरोडा येथील विद्यार्थ्यांनी नाशिक येथील स्पर्धेत जिल्ह्याचा नावलौकीक केल्याबद्दल मुख्याध्यापक रोहितकुमार तिरपुडे, प्रशिक्षक निखील शेंडे, दिपक घरजारे, विद्यार्थीनी ओजस्वी हटवार, आराध्या चंद्रोल, पहेल ग्यानचंदानी, साक्षी जयस्वाल, धानी गुनेरिया, आरोही तिवडे, मृणाली वासनिक, वेदांत पटले, विहान रामटेके, अरायना तोमर, सोनाली लिल्हारे, चांदनी वत्यानी, कृतिका मेश्राम, तुलसी ठाकूर, ओजस्वी महादूले, अन्वेषा जगने, शगुन रोहिले यांना, गोंदिया पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक पर्यावरण जागृतीचे काम करीत असल्याबद्दल वर्षा भांडारकर यांना, स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार देवून सरपंच व सचिव यांना सन्मानीत करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत सोनपुरी ता.गोंदिया, ग्रामपंचायत अर्जुनी ता.तिरोडा, ग्रामपंचायत पाउलदौना ता.आमगाव, ग्रामपंचायत दरबडा ता.सालेकसा, ग्रामपंचायत बोरगाव/बाजार ता.देवरी, ग्रामपंचयत घोटी ता.सडक/अर्जुनी, ग्रामपंचायत कानोली ता.अर्जुनी/मोरगाव यांचा समावेश आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने राबविलेल्या लोकराज्य घरोघरी मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत तिरोडा तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी 762 शेतकऱ्यांना या वर्षात लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार केल्याबद्दल, जिल्ह्यात सिकलसेल व थेलेसेमीयाच्या रुग्णांना रक्त पुरवठा करण्यास मदत करणारे विनोद चांदवानी, गोंदिया ते वाघा बॉर्डरपर्यंत सायकलने प्रवास करुन पर्यावरण संरक्षण व शांतीचा संदेश देणारे गोंदिया येथील अशोक मेश्राम, रक्तदान कार्यात सक्रीय सहभाग देणारी सोच सेवा संस्था गोंदिया यांना, व्हॉटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त ग्रामीण डॉक्टरांना हृदयरोगाबाबत मार्गदर्शन करणारे हृदयरोग तज्ञ डॉ.प्रमेश गायधने यांना, मराठा लाईट इन्फ्रन्ट्री पुणे येथे शिपाई पदावर उत्कृष्ट व ईमानदारीने सेवा केलेले गोंदिया येथील कुंजीलाल बोपचे यांना, अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारे नैलेश शेंडे यांचा, यशोदा बहुउद्देशीय संस्था पदमपूर ता.आमगाव यांनी सामाजिक व युवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, सामाजिक व युवक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देवरी येथील कुलदीप लांजेवार यांना जिल्हास्तरीय युवा पुरस्कार, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोंदिया येथील विशाल डोडानी, तनुश्री गौतम व चेतक मानक यांना आणि रेल्वे प्रवास करतांना प्रवाशाला वाचविल्याबद्दल रेल्वे पोलीसचे योगेश कुंजाम व प्रशांत बर्वे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले.
00000

शिवभोजन केंद्राचे पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ




         गरीब आणि गरजू लोकांना 10 रुपयात भोजन देणाऱ्या शिवभोजन केंद्राचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते जयस्तंभ चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील प्रताप क्लब कॅन्टीन येथे करण्यात आला. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार राजेश भांडारकर, अप्पर तहसिलदार अनिल खडतकर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, प्रताप क्लब कॅन्टीनचे संचालक केशव पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री देशमुख यांनी गरीब व्यक्तीला शिवभोजन थाली वाटून या योजनेचा शुभारंभ केला. प्रताप क्लब कॅन्टीन परिसरात केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच नवीन प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयात कामानिमीत्त येणाऱ्या गरीब व गरजू लोकांना या कॅन्टीनमधून शिवभोजनाचा 10 रुपये देवून आस्वाद घेता येणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्याला मिळवून देणार - पालकमंत्री अनिल देशमुख

70 वा प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन साजरा
                                 • राज्यात 8 हजार पोलिसांची भरती करणार
                                 • अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी कडक पाऊले उचलणार
                                 • 2 लाखावरील कर्जमाफीसाठी प्रयत्नशील
                                 • गोंदियात मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन करणार





         जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील काळात चांगले काम करावे. लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
        26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदान येथे साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री देशमुख बोलत होते.
        यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आमदार विनोद अग्रवाल, माजी खासदार खुशाल बोपचे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एम.रामानुजम, उपवनसंरक्षक एस.युवराज व वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती दिव्य भारती यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले, राज्याच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजुर, महिला, आदिवासी व दलित बांधवांसह सर्वांच्या विकासासाठी भविष्यात अनेक योजना राबविण्यात येतील. मधल्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत होता. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकऱ्यांवर असलेले कर्ज माफ झाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच महत्वाचा निर्णय घेवून शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. त्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. पुढील काळात जे शेतकरी कर्जाची नियमीत परतफेड करतात त्या शेतकऱ्यांसाठी सुध्दा शासन योजना जाहीर करणार आहे. 2 लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा कसा देता येईल यादृष्टीने राज्य शासन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असे सांगून श्री देशमुख म्हणाले, रजेगाव/काटी, तेढवा, पिंडकेपार यासह अनेक उपसा सिंचन व सिंचन प्रकल्पाची कामे जवळपास पूर्ण झाली आहे. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 पूर्ण करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून 50 कोटी रुपये मंजूर झाले आहे. हा उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या प्रकल्पाचा फायदा गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार आहे. आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात 20 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धान खरेदीचे 240 कोटी रुपये अदा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
          श्री देशमुख पुढे म्हणाले, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे केंद्र शासनाच्या व्यवस्थापन परिणामकारकता मुल्यमापनात या प्रकल्पाने राज्यात पहिला तर देशात बारावा क्रमांक मिळविला आहे. त्याबद्दल या प्रकल्पाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन श्री देशमुख यांनी केले. ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पोलीस विभागाकडून नक्षल कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी चांगले काम सुरु आहे. राज्यातील युवकांना पोलीस सेवेत येण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी 8 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लवकरच राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे यासाठी पोलीस विभाग प्रभावी पध्दतीने काम करीत असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी कायदा केला होता. त्यांच्यानंतर या कायदयाची अंमलबजावणी व्यवस्थीत झाली नाही. ग्रामीण भागात अवैध सावकारीचा त्रास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होतो आणि त्यांची लुबाडणूक केली जाते. अशा या अवैध सावकारीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पुढील काळात पोलीस विभागाच्या वतीने कठोर पाऊले उचलली जातील याची ग्वाही त्यांनी दिली.
        जिल्हा मागास, दुर्गम, नक्षलग्रस्त असला तरी जिल्ह्यातील 180 तरुण युवकांनी मागीलवर्षी व यावर्षीच्या मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभाग घेवून चांगले यश मिळविले असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, या युवकांना पुढील काळात प्रोत्साहन देण्यासाठी गोंदिया येथे एका मोठ्या मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. मुंबई येथे पुढील मॅरॉथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, त्यांना तेथे मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. परेडचे निरीक्षण केले. शालेय मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम बघून त्यांनी प्रशंसा केली. विविध अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा व संस्थांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला.
        यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय दैने, सचिव देवसूदन धारगावे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एसईए हाश्मी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री ढोणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी श्री तारसेकर, युवराज कुंभलकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापिका मंजुश्री देशपांडे यांनी केले.
                       

Saturday 25 January 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या घडिपुस्तिकेचे व भित्तीपत्रकाचे प्रकाशन

                                   जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

          जिल्हा नियोजन समितीच्या 24 जानेवारीच्या सभेत पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या परिवर्तन या घडिपुस्तिकेचे आणि अकरा विविध योजनांच्या भित्तीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, खासदार सुनिल मेंढे, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, विजय रहांगडाले, सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधि, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती संबंधीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी व त्यामाध्यमातून त्यांना या योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजना सन 2019-20 च्या निधीतून परिवर्तन ही घडिपुस्तिका तयार केली आहे. या घडिपुस्तिकेमध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी पब्लिक स्कूल, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य आणि सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आदी योजनांच्या माहितीचा समावेश आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी, लाभाचे स्वरुप, अर्ज करण्याची पध्दत आणि कोणाशी संपर्क साधावा याबाबतची माहिती घडिपुस्तिकेत देण्यात आली आहे.
         विविध शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, रमाई आवास योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी पब्लिक स्कूल, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य आदी योजनांची भित्तीपत्रके तयार करण्यात आली आहे. या भित्तीपत्रकावरील माहितीमुळे संबंधीत लाभार्थ्यांना शासनाच्या या योजनांची माहिती मिळून लाभ घेण्यास मदत होणार आहे.
         घडिपुस्तिका व भित्तीपत्रकांच्या प्रकाशनप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
                                 00000

विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री अनिल देशमुख

                                      जिल्हा नियोजन समितीची सभा

181 कोटी 69 लाखाच्या सन 2020-21 च्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
                                  


        जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीतून यंत्रणांनी विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
           24 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार सुनिल मेंढे, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे, विजय रहांगडाले, सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री पुढे म्हणाले, ज्या शाळांच्या आवारात विजेच्या डीपी, रोहीत्रे आणि वरून इलेक्ट्रिक तागेलेले आहेत ते तातडीने काढण्याची कार्यवाही वीज वितरण कंपनीने हाती घ्यावी. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये. ही कार्यवाही करण्यासाठी ज्या दहा कोटी रुपये निधीची मागणी केली आहे, तो निधी मिळविण्यासाठी सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा. ज्या कृषी पंपांना मागणी करूनही वीज पुरवठा करण्यात आलेला नाही त्यासाठी देखील पाठपुरावा करून प्रलंबित वीज जोडणीचा प्रश्न सोडवावा. जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीशी संबंधित असलेल्या विविध समस्यांवर लवकरच नागपूर येथे ऊर्जा मंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
         मुख्यमंत्री पांदन रस्ते योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, जिल्हा नियोजन समितीला यावर्षी या योजनेसाठी निधी उपलब्ध झाला नाही.न्य योजनांमधून  योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्यास या योजनेची कामे करता येतील. या योजनेसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी रोहयो मंत्र्यांकडे मुंबईला बैठक घेण्यात येईल. निमाला डावलून रोहयो आणि वन विभागात कामे झाली असल्यास संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.
        तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी ज्या स्थळांचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्राप्त होणार नाही तोपर्यंत पुढील कारवाई करता येणार नसल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, जनसुविधा निधीची मागणी करताना संबंधित गावांमध्ये कोणकोणती कामे करण्यात आली, कोणकोणत्या कामासाठी निधीची आवश्यकता आहे त्याबाबतची मागणी करावी. प्राधान्याने जनसुविधा निधीपासून वंचित असलेल्या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दयावा. हा निधी देतांना जिल्ह्यातील आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य यांना विश्वासात घ्यावे. मुंबई मॅरेथॉनमध्ये जिल्ह्याती जास्तीत जास्त धावपटू भविष्यात सहभागी होतील याचे नियोजन पोलिस विभागाने करावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल असेही देशमुख यांनी सांगितले.                                                                                                                                                  खासदार मेंढे म्हणाले, ज्या ग्रामपंचायतींना जनसुविधा निधी आजपर्यंत उपलब्ध करून देण्यात आला नाही, त्या ग्रामपंचायतींना तो निधी उपलब्ध करून द्यावा असे सांगितले.
      आमदार डॉ.फुके म्हणाले, वनविभागांतर्गत करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे ते म्हणाले.
      आमदार अग्रवाल म्हणाले, अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आलेल्या नाही, तातडीने त्या वीज जोडण्या दयाव्यात. सन 20-21 च्या आराखड्यात नियतव्यय वाढवून मिळावा, त्यामुळे अनेक विकास कामे करता येतील. ज्या ग्रामपंचायतीला जनसुविधा निधी मिळाला नाही त्यांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला पाठवावे असे म्हणाले.
      आमदार रहांगडाले म्हणाले, वैनगंगा नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे नदी काठावरील अनेक गावांचे नुकसान होते, या गावासाठी पूरनियंत्रणकरिता दरवर्षी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी असे ते म्हणाले.
       आमदार चंद्रिकापुरे म्हणाले, विकास कामे करतांना संपूर्ण जिल्हा डोळ्यापुढे ठेवून कामे करण्यात यावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. सर्वांना सारखा न्याय मिळेल या भावनेतून काम केले पाहिजे.
       आमदार कोराेटे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती हया विकासापासून वंचित आहे. अशा ग्रामपंचायतीच्या विकासासाठी जनसुविधा निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
               यावेळी समितीने जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 च्या 181 कोटी 69 लक्ष 51 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता प्रदान केली. यामध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण 126 कोटी 20 लक्ष 67 हजार रुपये, अनूसूचित जाती उपयोजना 10 कोटी 88 लाख 20 हजार रुपये,  आदिवासी उपयोजना 39 कोटी 71 लाख 99 हजार रुपये आणि आदिवासी क्षेत्र बाहय योजना व माडाच्या 4 कोटी 88 लाख 65 हजार रुपयाच्या निधीचा समावेश आहे.
        जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 या वर्षात डिसेंबर 2019 अखेर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 46 कोटी 92 लाख 45 हजार रुपये (61.83 %), अनुसूचित जाती उपयोजना 11 कोटी 53 लाख 61 हजार रुपये (90.77 %). आदिवासी उपयोजना 15 कोटी 64 लाख 39 हजार रुपये (75.84 %) आणि आदिवासी क्षेत्र बाहय योजना व माडा 4 कोटी 89 लाख 34 हजार रुपये (84.62 %) इतका खर्च झाला आहे.
         जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अंतर्गत पुनर्विनियोजनाचे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 13 कोटी 60 लाख 38 हजार रुपये, अनुसूचित जाती उपयोजना 1 कोटी 33 लाख रुपये, आदिवासी उपयोजना 20 कोटी 28 लाख 60 हजार रुपये आणि आदिवासी क्षेत्र बाहय योजना व माडाच्या 12 कोटी 92 लाख 54 हजार रुपयांच्या पुनर्विनियोजनाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
         सन 2019-20 या वर्षात शेतकरी बचतगटांकरीता कृषी अवजारे बँक 2 कोटी 46 लाख 50 हजार रुपये. प्राथमिक शाळांमध्ये अध्ययनस्तर निश्चिती व गुणवत्ता विकास करण्याकरीता रुपये 76 कोटी 26 लक्ष. महसूल विभागाला डिजिटल इंडिया लँड रेकाडर्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत तलाठी व मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप प्रिंटरचा पुरवठा करण्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. प्राथमिक शाळांमध्ये जलशुध्दीकरण यंत्र बविण्यासाठी 77 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्हयात नियोजन भवन बांधकामासाठी 5 कोटी रुपयाची तरतुद सन 2020-21 च्या आराखडयात प्रस्तावित करण्यात आली आहे.
         भेला सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, समितीचे सदस्य हाजी अल्ताफ हमीद अली, विश्वजीत डोंगरे, शैलजा सोनवणे, लता दोनोडे, पी.जी.कटरे, रमेश चुऱ्हे, विनीत सहारे, दुर्गा तिराले, प्रीती रामटेके, नोज डोंगरे, माधुरी पातोडे, सरिता कापगते, कैलास पटले, मंदा कुमरे, कमलेश्‍वरी लिल्हारे, स्वेता मानकर, हेमलता तेह, आशिष बारेवार, ललिता चौरागडे, विमल नागपुरे, दीपकसिंह पवार, राजेश भक्तवर्ती यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती, योजनेच्या बाबतचे सादरीकरण जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले यांनी केले. उपस्थितांचे आभार एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी मानले.                                          

Tuesday 7 January 2020

आय-पास प्रणालीद्वारे संगणकीय कामकाज होणार सुलभ - जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे


आय-पास संगणक प्रणालीवर कार्यशाळा
      जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज ‘पेपरलेस’ होण्याच्या दृष्टीने ‘आय-पास’ ही वेब बेस्ड संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यात ही प्रणाली राबविण्याकरीता मान्यता देण्यात आली असून या आय-पास प्रणालीद्वारे संगणकीय कामकाज करणे सुलभ होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.
        7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आय-पास या संगणकीय प्रणालीवर कार्यशाळा घेण्यात आली, यावेळी डॉ.बलकवडे बोलत होत्या. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी़ एस.ई.ए.हाश्मी, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीमती बुलकुंडे, ईएसडीस कंपनीचे किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
        डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, आपणास आय-पास प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. ही प्रणाली येत्या 1 एप्रिल 2020 पासून सुरु करण्यात येत असल्यामुळे सर्वांनी या आय-पास प्रणालीमध्ये लक्ष देवून कामे करावीत. कोणाला काही शंका असल्यास संबंधितांकडून त्याचे निरसन करुन घ्यावे असे त्यांनी सांगितले.
        डॉ.दयानिधी म्हणाले, आय-पास प्रणालीद्वारे संगणकीय काम करणे सोईचे होणार आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
        श्री.सुटे म्हणाले, आय-पास प्रणाली योग्यप्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. या प्रणालीमुळे पारदर्शक प्रशासन, गतिमान प्रशासन, परिणामकारक सनियंत्रण, लोकाभिमुख प्रशासन व पेपरलेस कामकाज होण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
        श्री.पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना, खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, पर्यटन विकास कार्यक्रम, अल्पसंख्याक विकास कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम इत्यादी योजनांना प्रशासकीय मंजूरी, निधी वितरण व युटीलायझेशन सर्टिफिकेट याबाबत सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली.
        प्रास्ताविक व संचालन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदिप भिमटे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले यांनी मानले. कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.