जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 3 January 2020

सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरुक रहावे - जगदिश पांडे

सायबर सेफ उमेनअंतर्गत कार्यशाळा


        दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत चालली आहे. महिला व बालकांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकाने दक्ष राहणे गरजेचे असून तसेच सायबर सुरक्षिततेबाबत देखील प्रत्येकाने जागरुक रहावे. असे आवाहन गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांनी केले.
        आज 3 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात गोंदिया पोलीस दलाच्यावतीने ‘सायबर सेफ वुमेन’ मोहिमेअंतर्गत महिला व बालकांवरील अत्याचार व सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती कार्यशाळेत मुख्य अतिथी म्हणून श्री. पांडे बोलत होते.
        यावेळी पोलीस निरीक्षक राहूल शिरे, ॲड. हेमलता पतेह, नगरसेविका संगीता घोष, पुजा तिवारी, प्रमिला सिंद्रामे, भावना कदम, पत्रकार अपुर्व मेठी, गजेंद्र फुंडे व श्री असाटी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        प्रारंभी सायबर साक्षरता ही काळाची गरज आहे याबाबत व्हिडिओ क्लीप दाखविण्यात आली.
        श्री. शिरे यांनी महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी सर्रास इंटरनेटचा वापर होत असल्यामुळे त्यावर आपण काय उपाय केले पाहिजे याबाबत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे विस्तृत माहिती दिली.
        ॲड. हेमलता पतेह म्हणाल्या, इंटरनेट किंवा मोबाईल हाताळतांनी सावध राहण्याची गरज आहे. मुलांना लहान वयातच चांगले संस्कार दिले पाहिजे. गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी महिला व बालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
        श्रीमती घोष म्हणाल्या, सायबर गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस विभागातील सायबर सेलची मदत घेण्यात यावी. मोबाईलचा वापर करतांना सावधगिरी बाळगायला पाहिजे, यासाठी आई-वडिलांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.
        श्री. फुंडे म्हणाले, सामाजिक गुन्हेगारीला दूर करण्यासाठी सायबर सेलची आवश्यता आहे. नारी अबला नाही, नारी आज सबला आहे, त्यासाठी व्यवहार सांभाळून करावे. समाजशील चांगली कामे करुन समाजाला उन्नतीकडे न्यावे असे त्यांनी सांगितले.
       प्रभाकर पालांदूरकर यांनी सोशल मीडियाचा वापर करतांना आपण काय दक्षता घ्यायला पाहिजे याबाबत विस्तृत माहिती दिली. चाईल्ड लाईफ संस्थेचे अशोक बेडेकर यांनी 1098 यावर फोन केल्यास नक्कीच आपल्याला मदत मिळेल असे सांगितले.
        संचालन संजय मारवाडे यांनी केले, उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक राहूल शिरे यांनी मानले. कार्यक्रमास शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थीनी, शिक्षिका, विविध स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधी, पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या महिला सभासद तसेच मुलांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गोंदिया पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment