जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 15 August 2020

पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते ‘योजना’ घडिपुस्तिकेचे प्रकाशन

 पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून तयार केलेल्या योजना या घडिपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         योजना या घडिपुस्तिकेमध्ये माझी कन्या भाग्यश्री, शुभ मंगल सामुहिक विवाह योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मनोधैर्य योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, ग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना आर्थिक सहाय्य, जननी शिशु सुरक्षा योजना, मच्छीमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, दुधाळ जनावरांचे गट वाटप, कृषि यांत्रिकीकरण उपअभियान आदी योजनांची थोडक्यात माहिती दिली असून या योजनेसाठी अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्र, संपर्क कोणत्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी साधावा याबाबतची माहिती दिली आहे.

        घडिपुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, सार्वजनिक‍ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण, प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे, जिल्हा पुरवठा अधिकार देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, शिल्पा सोनाले, गोंदिया नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांचेसह जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

00000

कोरोना संकटावर मात करुन विकासाचा मार्ग प्रशस्त करणार - पालकमंत्री अनिल देशमुख

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा


संपूर्ण जग आज कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. प्रत्येकाने यावर मात करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोरोना संकटावर सामूहिक प्रयत्नातून निश्चितच मात करू आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

        भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाच मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय येथे अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले व सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

        स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करताना श्री देशमुख म्हणाले,.. 1857 च्या उठावानंतर ते 1947 सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी 90 वर्षे संघर्ष केला. भारतीय क्रांतिकारकांच्या संघर्षातून आणि बलिदानातून आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारतीयांच्या संघर्ष आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचे भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाल्यांचे त्यांनी सांगितले.

        राज्यात महाआघाडी सरकार ह जनतेच्या मनातील अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी अथक परिश्रम घेत असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, संकटात सापडलेल्या व हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 27 हजार 714 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून आतापर्यंत 24 हजार 117 शेतकऱ्यांना 100 कोटी 28क्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. खरीप हंगामात 54 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आतापर्यंत 251 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.

         श्री देशमुख पुढे म्हणाले, कोरूनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात खरीप हंगामात गर्दी टाळण्यासाठी 363 शेतकरी गटामार्फत 1405 मेट्रिक टन खत4768 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांच्या बांधावर करण्यात आला. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन स्टडी उपक्रम राबविण्यात आला. तसेच शिक्षक गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

        जिल्ह्यात कोराना प्रादुर्भावाच्या काळात कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी संचारबंदीच्या काळात 612 गुन्हे दाखल केल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, या गुन्ह्यांपोटी 41 लाख 74 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यातील 14 पोलिस अधिकारी आणि दोन होमगार्डला कोरोनाची बाधा झाली असून ते उपचार घेत असल्याचे ते म्हणाले.

         कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाल असताना ग्रामीण भागातील मजुरांना या काळात रोजगार उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात आल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, ही योजना जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरली आहे. 1 एप्रिल ते जुलै 2020 पर्यंत 61 कोटी 62 लाख रुपये निधी रोहयोच्या कामावर खर्च झाला. यातून 1 लाख 4 हजार 410 मजुरांना या काळात रोजगार पुरविण्यात आला. जिल्ह्यातील 1 लाख 56 हजार 680 धान उत्पादक शेतकऱ्यांना 359 कोटी 71 लाख रुपये बोनस म्हणून वाटप करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात मका उत्पादक 488 शेतकऱ्यांच्या 22 हजार 214 क्विंटल मक्याची आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आली. याची किंमत तीन कोटी 90 लाख 96 हजार 640 रुपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.                          

          जिल्ह्यात कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त ॲन्टीजेन टेस्ट कराव्यात. शासन, प्रशासन, विविध यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्था अनेक आघाड्यांवर लढत आहेत. सफाई कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, परिचारिका, होमगार्ड, माजी सैनिक, पोलिस, महसूल, शिक्षण, नगरपालिका प्रशासन, कृषी व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना योध्दे म्हणून लढत असल्याचे त्यांनी सांगितले.

       प्रारंभी पालकमंत्री श्री देशमुख यांनी ध्वजारोहण करुन ध्वजाला मानवंदना दिली. उपस्थित पाहुण्यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, श्रीमती बुलकुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, गोंदिया नगर पालिकेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांचेसह विविध विभागाचे निवडक अधिकारी-कर्मचारी सोशल डिस्टन्स ठेवून व तोंडाला मास्क लावून उपस्थित होते.