जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 29 March 2019

युवा वर्गाने मोठ्या संख्येने मतदान करुन इतरांना प्रोत्साहित करावे - डॉ.कादंबरी बलकवडे


         युवा वर्ग हे देशाचे भविष्य आहे. निवडणूक प्रक्रियेत युवा वर्गाने सक्रीय होवून आपले योगदान दयावे. येत्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये युवा वर्गाने मोठ्या संख्येने मतदान करुन इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 28 मार्च रोजी मतदार जागृती अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 22 महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांशी चर्चा करतांना जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
       डॉ.बलकवडे म्हणाल्या, या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत एकही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये यासाठी युवावर्गाने पुढाकार घ्यावा. घरातील 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्यास प्रोत्साहित करावे. ज्येष्ठ असलेल्या आजी-आजोबांना तसेच शेजारच्या व्यक्ती, मित्र मंडळींना तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदानाचे महत्व पटवून देवून त्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी येण्यास प्रोत्साहित करावे. तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून मतदार जागृतीबाबत विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
        डॉ.दयानिधी म्हणाले, मतदार जागृती अभियाना दरम्यान महाविद्यालयामध्ये येवून मतदान प्रक्रिया कशाप्रकारे राबविण्यात येते याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येईल. महाविद्यालयातील युवक-युवतींनी मतदान जागृती अभियाना दरम्यान सामाजिक बांधीलकी जोपासून काम करावे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदार मतदान करण्यास पुढे येतील असे ते म्हणाले.
         यावेळी जिल्ह्यातील 22 महाविद्यालयातील 27 विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार जागृती उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग देणार असल्याचे सांगितले.

Thursday 28 March 2019

सर्व महिलांनी मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

बचतगटांच्या महिलांशी साधला संवाद


         आपण कोणाला मतदान केले हे व्हीव्हीपॅट मशिनच्या माध्यमातून दिसून येणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया विश्वासपूर्ण व पारदर्शक झाली आहे. महिला कुठेतरी कमी आहेत ही भावना बचतगटामुळे दूर झाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. येत्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत सर्व महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
        आज 28 मार्च रोजी गोंदिया तालुक्यातील पिंडकेपार येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत मतदार जागृती अभियानाअंतर्गत महिला मतदारांशी संवाद साधतांना डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, गोंदिया तहसिलदार राजेश भांडारकर, गोंदिया अपर तहसिलदार अनिल खडतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
        महिला बचतगटाच्या माध्यमातून त्यांच्या गटाचा लेखाजोखा व्यवस्थीत ठेवत असल्याचे सांगून डॉ.बलकवडे म्हणाले, यावरुन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ज्या दिवशी मतदान करायचे आहे त्या दिवशी कुणाला मतदान करायचे आहे याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यावा. महिलांनी निवडणूकीच्या काळात पैशाच्या प्रलोभनला बळी पडू नये. निवडणूकीत पैसे घेणे आणि देणे हा भ्रष्टाचार आहे. निवडणूकीत महिलांनी निर्भयपणे मतदान करावे. गावातील कोणतीही महिला मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. गावातील 18 वर्षावरील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करावे असेही त्यांनी सांगितले.
        श्री.खडसे म्हणाले, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. मतदार हा राजा आहे. निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमुळे गतीमान व पारदर्शक झाली आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी. शंभर टक्के मतदानामुळे आपल्याला अपेक्षीत व कार्यक्षम उमेदवार निवडून देता येईल. मतदानाबाबतची उदासिनता दूर करुन सर्व मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे सांगितले.
       श्री.सोसे म्हणाले, गावातील बचतगटातील सर्व महिला स्वत: मतदान करुन गावातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करतील. गावातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता बचतगटातील महिला घेतील असे ते म्हणाले.
        प्रारंभी मंडळ अधिकारी पी.सी.शर्मा व तलाठी जी.पी.सोनवाणे यांनी उपस्थित महिलांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन याबाबतचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. व्हीव्हीपॅट मशिनच्या माध्यमातून आपण कोणाला मतदान केले हे दिसणार असल्याचे त्यांनी उपस्थित महिलांना व नागरिकांना सांगितले. उपस्थित महिलांनी मतदानाची यावेळी प्रात्यक्षिके केली व त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे समाधान केले.
        कार्यक्रमाचे संचालन अनिता बडगे यांनी केले व उपस्थितांचे आभार सुर्यकांता मेश्राम यांनी मानले. यावेळी पिंडकेपार येथील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत झाशीची राणी महिला ग्रामसंस्थेच्या बचतगटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदिप कुकडकर, मोनिता चौधरी, प्रफुल अवघड, दिपाली सोळंके यांच्यासह गावातील बचतगटाच्या महिलांनी परिश्रम घेतले.

Wednesday 27 March 2019

सोशल मिडियावर गोंदिया सायबर सेलची करडी नजर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
• आचारसंहिता भंग करणाऱ्याच्या विरोधात होणार कारवाई
     भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 11 एप्रिल रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. निवडणूकीची घोषणा झाली त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

        लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार आणि त्या पक्षांचे स्टार प्रचारक यांच्या वतीने किंवा त्यांना फायदेशीर होईल अशा बातम्या वृत्तपत्रांमधून, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून, केबल चॅनल्स, मोबाईल नेटवर्क किंवा सोशल मिडिया यावर देतांना उमेदवाराने त्याची माहिती रोजच्या रोज निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराच्या परवानगीशिवाय त्यांच्या प्रचारासाठी कोणी अशाप्रकारच्या बातम्या प्रकाशित किंवा प्रसारीत केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता लोकप्रतिनिधी कायदा इत्यादी कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
        सोशल मिडियावर मतदारास प्रलोभने/लाच देणे, समाजामध्ये जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट प्रसारीत करणे, पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक कामाशी संबंधित नसलेल्या खाजगी बाबींवर टिका करणे, मत मिळविण्याकरीता जाती-धर्माच्या नावावर मतदारांना आवाहन करणे याप्रकारचे कोणतेही व्हिडिओ/फोटो लाईक करणे, फॉरवर्ड करणे अर्थात ते पुढे पाठविणे, त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, आपल्या स्टेटसला ठेवणे या कृती कायदयाचा भंग करणाऱ्या आहे.
         पोलीस अधीक्षक विनीता एस.यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलिसांचा सायबर सेल आता व्हॉटस्ॲप ग्रुप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम व हाईक यावर सोशल मिडिया तसेच वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडिया, केबल चॅनल्स, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क यावर करडी नजर ठेवणार असून त्याबाबत संबंधितांवर प्रचलित कायदयाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
         गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगातर्फे लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्रसारीत करु नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे पोलीस अधीक्षक विनीता एस. यांनी कळविले आहे.

Monday 25 March 2019

दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांसह एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये - डॉ.कादंबरी बलकवडे



       येत्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानापासून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांसह जिल्ह्यातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज त्यांच्या कक्षात आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
        जिल्हाधिकारी म्हणाल्या, जिल्ह्यात येणाऱ्या दोन लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे. मतदान केंद्रावर सर्वप्रकारच्या मतदारांना आवश्यक त्या सोयी-सुविधा व अन्य बाबीसाठी समन्वय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. समन्वय अधिकारी यांना नेमून देण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रात आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध आहे की नाही याची प्रत्यक्ष भेट देवून खात्री करावी. काही सुविधा मतदारांना मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन दयावयाचे असल्याने त्याचे सुक्ष्म नियोजन आतापासूनच करावे. मतदान केंद्रनिहाय विवरणपत्रात अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांना सादर करावयाचा असल्याने त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
         ज्या ठिकाणी दिव्यांग मतदार आहेत त्यांना व्हीलचेअरच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणेच्या सहकार्याने घरुन मतदानासाठी आणणे व त्यांना परत घरी सुखरुप पोहोचवून देण्याची जबाबदारी पार पाडावी असे सांगून डॉ.बलकवडे म्हणाल्या, दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रावर रॅम्सची व्यवस्था करण्यात यावी. अंध मतदारांना देखील आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दयाव्या. शौचालय व मुत्रीघराची व्यवस्था देखील मतदान केंद्रावर असली पाहिजे. औषधोपचाराची प्राथमिक सुविधा देखील प्रत्येक केंद्रावर उपलब्ध करुन दयाव्यात. पुरुष व महिला मतदारांसाठी मतदान केंद्रावर प्रतिक्षा कक्ष उपलब्ध करण्यात  यावा. उन्हामुळे कोणत्याही मतदाराला मतदानाच्या वेळी त्रास होणार नाही याची दक्षता घेवून आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात किमान एका मतदान केंद्रात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत कार्यान्वीत करावी, त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला मतदार मतदानासाठी प्रोत्साहित होतील असे त्या म्हणाल्या.
       यावेळी आचारसंहिता अंमलबजावणी आणि स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, मतदान केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड (तिरोडा विधानसभा क्षेत्र), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी (आमगाव विधानसभा क्षेत्र), नगरपालिका प्रशासनचे जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव (गोंदिया विधानसभा क्षेत्र), प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एन.व्ही.नैनवाड (अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्र) यांची उपस्थिती होती.
00000

राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएमचे पहिल्या टप्प्यात सरमिसळीकरण



 
      येत्या 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्याअनुषंगाने आज 25 मार्च रोजी नविन प्रशासकीय इमारतीतील जिल्हा माहिती कार्यालयात असलेल्या प्रसारमाध्यम कक्षात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या समोर इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनचे पहिल्या टप्प्यात संगणकाच्या माध्यमातून सरमिसळीकरण करण्यात आले.
       जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यावेळी म्हणाल्या, विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापराबाबत मनात शंका ठेवू नये. निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे केली जाते. या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांना विश्वासात घेतले जाते. ईव्हीएम बाबत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यात येते. संगणक प्रक्रियेच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनचे सरमिसळीकरण करण्यात येत असल्यामुळे कोणत्या विधानसभा क्षेत्रातील कोणत्या मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जाणार आहे हे सांगता येणार नाही. जिल्ह्यात गोंदिया आणि अर्जुनी/मोरगाव येथील प्रत्येकी एक मतदान केंद्रावर 1400 पेक्षा जास्त मतदार असल्यामुळे दोन आणखी मतदार केंद्राची आवश्यकता असून या दोन मतदान केंद्राला मंजूरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
         भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, गोंदिया व तिरोडा हे विधानसभा मतदारसंघ येतात. तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आमगाव विधानसभा मतदारसंघ येतो. आमगाव विधानसभा मतदारसंघात 310 मतदान केंद्र येतात. त्यासाठी 310 बॅलेट युनिट मंजूर असून राखीव 25 टक्के म्हणजे 79 बॅलेट युनिट, असे एकूण 389 बॅलेट युनिट, आमगाव मतदारसंघासाठीच 310 कंट्रोल युनिट आणि 25 टक्के राखीवमध्ये 79 कंट्रोल युनिट आणि 310 मतदान केंद्रासाठी 310 व्हीव्हीपॅट मंजूर असून 32 टक्के म्हणजे 100 व्हीव्हीपॅट मशीन अशा एकूण 410 व्हीव्हीपॅट मशीन आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी देण्यात येणार आहे.
        अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील 316 मतदान केंद्रासाठी 316 बॅलेट युनिट मंजूर असून 17 टक्के राखीव म्हणजे 57 बॅलेट युनिट, असे एकूण 373 बॅलेट युनिट, 316 कंट्रोल युनिट मंजूर असून 17 टक्के राखीव म्हणजे 57 कंट्रोल युनिट, असे एकूण 373 कंट्रोल युनिट मतदान केंद्रासाठी तर 316 व्हीव्हीपॅट मशिन मंजूर असून, 28 टक्के राखीव व्हीव्हीपॅट असून ती संख्या 90 आहे असे एकूण 406 व्हीव्हीपॅट मशिन अर्जुनी/मोरगाव या विधानसभा क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे.
         गोंदिया विधानसभा क्षेत्रातील 360 मतदान केंद्रासाठी 360 बॅलेट युनिट मंजूर असून 17 टक्के राखीव म्हणजे 63 बॅलेट युनिट, असे एकूण 423 बॅलेट युनिट मंजूर आहे. 360 कंट्रोल युनिट मंजूर असून 17 टक्के राखीव ठेवण्यात आले असून ही संख्या 63 कंट्रोलची आहे. या विधानसभा क्षेत्रासाठी 423 कंट्रोल युनिट लागणार आहे. तर 360 व्हीव्हीपॅट मंजूर असून 27 टक्के म्हणजे 99 व्हीव्हीपॅट राखीव राहणार आहे. ही व्हीव्हीपॅटची संख्या एकूण 459 इतकी राहील.                                                                                                              तिरोडा विधानसभा क्षेत्रातील 295 मतदान केंद्रासाठी 295 बॅलेट युनिट मंजूर असून त्यामध्ये राखीव 17 टक्के म्हणजे 51 बॅलेट युनिट राखिव राहणार असून एकूण 346 बॅलेट युनिट या मतदारसंघासाठी पुरविण्यात येणार आहे. याच मतदारसंघासाठी 295 कंट्रोल युनिट मंजूर असून 17 टक्के म्हणजे 51 कंट्रोल युनिट राखीव राहणार आहे. असे एकूण 346 कंट्रोल युनिट या मतदारसंघासाठी पुरविण्यात येणार आहे. तर 295 व्हीव्हीपॅट मंजूर असून 27 टक्के राखीव म्हणजे 80 व्हीव्हीपॅट असतील. तर एकूण 375 व्हीव्हीपॅट यंत्राचा पुरवठा या मतदारसंघासाठी करण्यात येणार आहे.
        पहिल्या पातळीवर करण्यात आलेल्या सरमिसळीकरणानंतर ईव्हीएम मशीन, सीपीयु मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन मतदारसंघनिहाय तेथील स्ट्राँग रुमला पाठविण्यात येणार आहे. ज्या वाहनामधून ह्या मशिन्स जाणार आहेत त्या वाहनाला सुध्दा जीपीएस मशीन लावण्यात येणार आहे. नविन प्रशासकीय इमारतीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमचे कुलूप उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात आले.
       यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी राहूल खांडेभराड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
00000

Tuesday 19 March 2019

आचारसंहितेचे पालन करण्यासोबतच निवडणूकीचा खर्च दररोज सादर करा - डॉ.कादंबरी बलकवडे

राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक

        येत्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत काही उमेदवार अपक्ष म्हणूनही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचे पालन करणे सर्व पक्षांना तसेच उमेदवारांना बंधनकारक असून त्यांना निवडणूकीचा खर्च दररोज सादर करणे देखील बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज 19 मार्च रोजी आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आचारसंहिता अंमलबजावणी आणि स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवडणूक खर्चाचे नोडल अधिकारी तथा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.
         डॉ.बलकवडे म्हणाल्या, निवडणूकीत होणारा उमेदवाराचा आणि पक्षाच्या खर्चाचा दैनंदिन अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा यांना पाठविण्यात येणार आहे. पक्षाच्या आणि उमेदवाराच्या प्रत्येक खर्चाचा हिशोब संबंधितांना व्यवस्थीत ठेवावा लागणार आहे. एका उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा ही 70 लक्ष रुपये इतकी आहे. प्रचाराच्या कामात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र प्रचाराची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतील. एका विधानसभा क्षेत्रात परवानगी देण्याचे अधिकार संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना तर एकापेक्षा जास्त क्षेत्रात प्रचाराची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. प्रचार गाडीत वाहनचालकासह पाच व्यक्तीच प्रचारासाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. सभा आणि रॅलीसाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याचे अधिकार संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना आहे. आचारसंहितेचे उल्लंघन व खर्चाबाबत भरारी पथके तैनात करण्यात आली असून ती 15 मिनिटातच घटनास्थळी पोहोचतील.
        विविध वस्तू व साहित्य खरेदीचे भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातून दरपत्रके मागविण्यात आल्याचे सांगून डॉ.बलकवडे म्हणाल्या, त्यानुसार चहा, जेवण, नास्ता, निवडणूक प्रचार साहित्य, वाहनाचे दर निश्चित करण्यात आले आहे. कुठलाही खर्च कमी दाखविणे ही सुध्दा गंभीर बाब आहे. उमेदवाराला त्याचे समाजमाध्यमांचे पत्ते नामनिर्देशन पत्र दाखल करतांना भरुन दयावे लागणार आहे. उमेदवाराव्यतिरिक्त इतर कोणी त्याचा खर्च करीत असेल त्यावर लक्ष राहणार असल्याचे डॉ.बलकवडे यांनी सांगितले.
         डॉ.दयानिधी म्हणाले, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्याची तक्रार सी-व्हीजील ॲपवर करता येईल. आधी हे ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल. ज्याने तक्रार केली आहे त्याचे नाव गोपनीय राहील. 100 मिनिटाच्या आत त्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येणार आहे. हे ॲप म्हणजे नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे देखील आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करता येईल. पक्ष कार्यकर्ते यांचा निवडणूक प्रचार काळात भाडे/भत्ता निश्चित करण्यात आला आहे. मतदान प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांचा भत्ता देखील पक्षाने दयावा. त्याचा पक्षाच्या खर्चात समावेश करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
        श्री.चौधरी म्हणाले, येत्या 22 मार्च रोजी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनचे सरमिसळीकरण करण्यात येणार आहे. ही प्रक्रियाच पारदर्शक राहणार आहे. इव्हीएम असलेल्या वाहनावर जीपीआरएस सिस्टीम राहणार आहे. निवडणूकविषयी आलेल्या कोणत्याही तक्रारींची वेळीच दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         श्री.जवंजाळ म्हणाले, प्रत्येक उमेदवाराला दररोज होणाऱ्या खर्चाचा हिशोब ठेवावा लागणार आहे. या खर्चाची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. प्रचार, रॅली, सभा यामध्ये होणाऱ्या खर्चावर सुध्दा बारीक लक्ष राहणार आहे.
         श्री.खडसे म्हणाले, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून पेडन्यूजवर विशेष लक्ष राहणार आहे. वृत्तपत्रातील, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीवर सुध्दा देखरेख राहणार आहे. पोलीस विभागाच्या सायबर सेलच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर देखील करडी नजर राहणार आहे. ऑडिओ-व्हिडिओ प्रचाराचे सा‍हित्य प्रसारण करण्यापूर्वी एमसीएमसी कमिटीकडे दाखल झाल्यानंतर समितीच्या परवानगीनंतर प्रचार-प्रसारासाठी मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सां‍गितले.
         यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींनी चहा, जेवण, नास्ता, प्रचाराचे साहित्य, वाहन भाडे, मतदान प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांना देण्यात येणारे मानधन तसेच राजकीय पक्षांना निवडणूकीदरम्यान लागणारे साहित्य व सामुग्रीच्या दरपत्रकाबाबत विस्तृत चर्चा केली.
00000