जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 27 March 2019

सोशल मिडियावर गोंदिया सायबर सेलची करडी नजर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
• आचारसंहिता भंग करणाऱ्याच्या विरोधात होणार कारवाई
     भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 11 एप्रिल रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. निवडणूकीची घोषणा झाली त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

        लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार आणि त्या पक्षांचे स्टार प्रचारक यांच्या वतीने किंवा त्यांना फायदेशीर होईल अशा बातम्या वृत्तपत्रांमधून, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून, केबल चॅनल्स, मोबाईल नेटवर्क किंवा सोशल मिडिया यावर देतांना उमेदवाराने त्याची माहिती रोजच्या रोज निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराच्या परवानगीशिवाय त्यांच्या प्रचारासाठी कोणी अशाप्रकारच्या बातम्या प्रकाशित किंवा प्रसारीत केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता लोकप्रतिनिधी कायदा इत्यादी कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
        सोशल मिडियावर मतदारास प्रलोभने/लाच देणे, समाजामध्ये जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट प्रसारीत करणे, पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक कामाशी संबंधित नसलेल्या खाजगी बाबींवर टिका करणे, मत मिळविण्याकरीता जाती-धर्माच्या नावावर मतदारांना आवाहन करणे याप्रकारचे कोणतेही व्हिडिओ/फोटो लाईक करणे, फॉरवर्ड करणे अर्थात ते पुढे पाठविणे, त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, आपल्या स्टेटसला ठेवणे या कृती कायदयाचा भंग करणाऱ्या आहे.
         पोलीस अधीक्षक विनीता एस.यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलिसांचा सायबर सेल आता व्हॉटस्ॲप ग्रुप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम व हाईक यावर सोशल मिडिया तसेच वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडिया, केबल चॅनल्स, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क यावर करडी नजर ठेवणार असून त्याबाबत संबंधितांवर प्रचलित कायदयाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
         गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगातर्फे लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्रसारीत करु नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे पोलीस अधीक्षक विनीता एस. यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment