जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 25 December 2018

दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत विद्यार्थी घडवावे - राजकुमार बडोले


गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या जि.प.आंतरराष्ट्रीय शाळेचा लोकार्पण सोहळा




            गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. शिक्षकांनी या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत विद्यार्थी घडवावेत. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेचा आज लोकार्पण सोहळा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. यावेळी जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स.सभापती माधुरी टेंभरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हाश्मी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        श्री.बडोले पुढे म्हणाले, राज्यातील 13 शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये शहीद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव या शाळेचा समावेश आहे. ही गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदललेला असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण दिले पाहिजे. या शाळेतील शिक्षण हे मराठी मातृभाषेतून होणार आहे. देशाला उत्तम योगदान देणारे विद्यार्थी या शाळेतून घडविण्यात यावे. या शाळेत भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात येईल, त्याकरीता प्रस्ताव पाठविण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
         श्री.डोंगरे म्हणाले, आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भवितव्य आहेत. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होणे गरजेचे आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, कारण शिक्षणामुळे माणूस घडत असतो. या शाळेत भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करुन दयावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
         श्री.रहांगडाले म्हणाले, विद्यार्थ्यांना या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षकांची मानसिकता असली पाहिजे. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने दर्जेदार शिक्षण देवून चांगले विद्यार्थी घडवावेत असे त्यांनी सांगितले.
        प्रास्ताविकातून श्री.नरड म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून राज्यातील 13 शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्याथ्याची गुणवत्ता सिद्ध करणारा हा शिक्षणक्रम तयार करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
        प्रारंभी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत राज्यातील 13 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने शुभारंभ झाला. त्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले.
         कार्यक्रमास तिरोडा उपविभागीय अधिकारी जी.एम.तळपाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी रोहिणी बनकर, उपशिक्षणाधिकारी श्री.मांढरे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे, पं.स.उपसभापती सुरेश रहांगडाले, जि.प.सदस्य पुष्पराज जनबंधू, माजी सभापती दिलीप चौधरी, रेखलाल टेंभरे, लक्ष्मण भगत, गोरेगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री.चव्हाण यांचेसह गोरेगाव परिसरातील नागरिक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एम.बी.शेख यांनी केले, उपस्थितांचे आभार शहिद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र बिसेन यांनी मानले.


Monday 17 December 2018

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’


प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद

            शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभत्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहे. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाआहे. 1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहे.
             केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण)उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना,छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना,प्रधानमंत्री पीक विमा योजना,मागेल त्याला शेततळे,गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवारस्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,सुक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोक संवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.
           मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची ईच्छा असणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना व त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या इतर पूरक योजना यांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले नावसंपर्क क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची माहिती av.dgipr@maharashtra.gov.in या ईमेलवर आणि 8291528952 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर दिनांक 28 डिसेंबरपर्यत पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क संचालनालयाने केले आहे.
           ईच्छूक लाभार्थी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांचे कडेही दिनांक 28 डिसेंबरपर्यंत माहिती पाठवू शकतात.
                                                                 0000000


Thursday 13 December 2018

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे - डॉ.संजीव कुमार

                              • विविध विषयाचा आढावा
• प्रलंबीत कामे त्वरित पूर्ण करा



       जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरु असलेली कामे सर्व विभागांनी समन्वयातून करुन येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी दिल्या.
       जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज जिल्ह्यातील विकासात्मक कामाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिश बैजल, उपवनसंरक्षक एस.युवराज, उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, उपायुक्त के.एन.के.राव, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे व निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       डॉ.संजीव कुमार पुढे म्हणाले, अपूर्ण असलेले घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तातडीने बैठक घेवून नियोजन करावे. इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेबाबत विशेष मोहीम राबवून घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे. तसेच अस्मिता योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामीण  पेयजल कार्यक्रम, पाणी टंचाई निवारण कृती आराखडा, 11 हजार सिंचन विहीर कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान, सर्व शिक्षा अभियान व आरोग्य विषयक कामांबाबत त्यांनी यावेळी सविस्तर आढावा घेवून अपुर्ण असलेली कामे येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
        कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडेबाबत प्राप्त झालेले अनुदान डिसेंबरअखेर 100 टक्के वितरीत करण्यात यावे. त्याचप्रमाणे सामुहिक वनहक्क दावे व वैयक्तीक वन हक्क दावे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी तसेच महसूल वसूलीला गती देण्यात यावी अशा सूचना डॉ.संजीव कुमार यांनी दिल्या.
        यासोबतच महसूल विषयक अ,ब,क प्रपत्रातील महसूल वसुलीची सद्यस्थिती, वाळू लिलावाची सद्यस्थिती, कब्जेहक्क/भाडेपट्टयाने दिलेल्या जमीनी संदर्भात दाखल PIL बाबत केलेली कार्यवाही, लॅन्‍ड बॅक प्रणालीमध्ये Data Entry ची प्रगतीबाबत आढावा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 42 ब,क,ड च्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल अंमलबजावणीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा, शिधापत्रिका संगणकीकरण आधार सिडींग, तालुका निहाय ऑनलाईन व ऑफलाईन धान्य वितरणाचा आढावा, केरोसीन वितरणबाबत प्राप्त हमी पत्राची तालुका निहाय आकडेवारी, माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आढावा, 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम जिवंत रोपांची टक्केवारी तसेच 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, अपूर्ण सिंचन विहिरी पूर्ण करणे व प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आदी विषयाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सभेला जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते. संचालन लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.
00000


Monday 3 December 2018

लोकशाही मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा - डॉ.बलकवडे

जागतिक दिव्यांग दिन साजरा



        लोकशाही प्रणालीमध्ये सर्वांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.  
        3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने ‘सुलभ निवडणूका’ या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज दिव्यांग दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभांगी आंधळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
        जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करीत आहे. दिव्यांग बांधव सुध्दा एक समाजाचा घटक आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
        डॉ.दयानिधी म्हणाले, दिव्यांग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे त्यांनी सांगितले.
        श्री.रामटेके म्हणाले, दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, बिज भांडवल योजना, आंतरजातीय विवाह योजना व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा दिव्यांग बांधवांनी अवश्य लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
        प्रास्ताविकातून श्रीमती आंधळे म्हणाल्या, आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये दिव्यांग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहिर केले आहे. त्यानुसार दिव्यांग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा यासाठी दिव्यांग मतदारांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केले आहे किंवा 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणार आहेत त्यांनी फॉर्म नं.6 अवश्य भरुन दयावे. फॉर्म नं.6 हा बीएलओ यांचेकडे उपलब्ध आहे. तसेच तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा उपलब्ध करुन दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
       यावेळी हारेश गुप्ता, शेहबाग शेख, आकाश मेश्राम, राखी चुटे, देवेंद्र रहमतकर, इंदू बघेले, दुर्गेश जावळकर, कमलेश फुंडे, राजकुमार बावीरशेट्टी, हर्शिका उके व विजय वटचानी इत्यादी दिव्यांग मतदारांचा मान्यवरांच्या हस्ते ‘मतदार असल्याचा अभिमान-मतदानासाठी सज्ज’ हे घोषवाक्य लिहिलेले बॅच व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला व त्यांच्यासोबत मतदान प्रक्रियेविषयी संवाद साधण्यात आला.
       कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. उपस्थितांचे आभार हरिश्चंद्र मडावी यांनी मानले. कार्यक्रमास दिव्यांग बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षरोपटे लावण्यात आले.