जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 29 June 2019

जीवनात सांख्यिकीचे महत्व अनन्यसाधारण - डॉ.कादंबरी बलकवडे

                                                          सांख्यिकी दिन उत्साहात साजरा

         जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एखादया आकडवारीचे नियोजन चुकीच्या पध्दतीने झाले तर सगळे काही चुकत असते. त्यासाठी सांख्यिकीचा आधार महत्वाचा असतो. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सांख्यिकीची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे जीवनात सांख्यिकीचे महत्व अनन्यसाधारण आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलवकडे यांनी केले.
      नियोजन विभाग, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 29 जून रोजी सांख्यिकी दिन कार्यक्रमाचे उदघाटन करतांना डॉ.बलकवडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती मृणालीनी भूत हया होत्या. यावेळी प्रभारी अपर जिल्हाधिकारी सुनिल कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा सांख्यिकी अधिकारी नवनाथ चव्हाण, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदिप भिमटे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीमती पुजा पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, मानवाचा सर्वांगीण विकास करतांना पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. यासाठी शाश्वत शेतीला चालना, सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानता, सर्वांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देणे व गरीबीचे निर्मूलन करणे आदी बाबींचा सांख्यिकीकरणामध्ये अंतर्भाव आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
         श्रीमती भूत म्हणाल्या, सांख्यिकीचा पाया सर्वप्रथम प्रा.प्रशांतचंद्र महालनोबीस यांनी रचला. सांख्यिकी हा नियोजनाचा पाया आहे. सांख्यिकीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात होत असतो. शासनाच्या विकासात्मक विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सांख्यिकीचे महत्व अनन्यसाधारण आहे. यावेळी त्यांनी नीती आयोगाच्या सांख्यिकीकरणाची सविस्तर माहिती विशद करुन सांख्यिकीकरणाला किती महत्व आहे असे सांगितले.
         प्रास्ताविकातून जिल्हा सांख्यिकी अधिकारी नवनाथ चव्हाण म्हणाले, जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सर्वकष माहितीकोष, पीक कापणी प्रयोग व नॅशनल सॅम्पल सर्व्हे पाहणी यांचा सांख्यिकी कार्यालयाद्वारे सविस्तर डाटा तयार करण्यात येतो. सांख्यिकी दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात शाश्वत विकासाची ध्येय याबाबत त्यांनी सविस्तर माहिती देवून आपल्या दैनंदिन जीवनात सांख्यिकीकरणाचे किती महत्व आहे असे सांगितले.
        यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक व सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदीप भिमटे यांनी मानवाच्या दैनंदिन जीवनात सांख्यिकीचे किती महत्वाचे स्थान आहे याबद्दल विस्तृत माहिती दिली. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीमती पुजा पाटील यांनी ‘शाश्वत विकासाची ध्येय’ याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
         कार्यक्रमाचे संचालन सांख्यिकी सहायक तुलसीदास झंझाड यांनी केले, उपस्थितांचे अभार संदीप भायदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील फुके, निकलेश दडमल, आरीफ शेख, मनीष रेगे, देवेंद्र करंजेकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Friday 28 June 2019

पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

                            पूर नियंत्रण समन्वय आंतरराज्यीय बैठक संपन्न



         नैसर्गीक आपत्ती कधीही सांगून येत नाही. मान्सून कालावधीत अचानक उदभवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर नियंत्रण समन्वय आंतरराज्यीय बैठक 25 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक विनीता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, भंडारा अपर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी ए.के.घोरमारे, बालाघाट जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता एस.एस.गहरवार, संजय सरोवर प्रकल्प शिवनीचे कार्यकारी अभियंता पी.सी.महाजन, गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी क्रिष्णा रेड्डी, भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, मान्सून कालावधीत अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात व इतर भागात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जलसंपदा व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी योग्य समन्वय ठेवून पूर परिस्थिती आटोक्यात आणण्याचे कार्य करावे. धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन गावातील नागरिकांना पूर्वसूचना देवून पाणी सोडावे व त्यानंतर नदीच्या पातळीची सूचना संबंधित विभागांनी जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक आहे. अचानक उदभवणाऱ्या नैसर्गीक आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क रहावे अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.
      वैनगंगा, बाघ तसेच इतर उपनदयांमुळे जिल्ह्यातील 87 गावांमध्ये पूर परिस्थितीचे संभाव्य धोके आहेत. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमधील पूर परिस्थितीचे संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करुन सुक्ष्म नियोजन करावे. यासाठी धान्यसाठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा नैसर्गीक आपत्तीला तोंड देण्यास सज्ज ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाला संरचना तपासणी (Structure Audit), नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रात नाले, नाली सफाई, अतिक्रमण धारकांना तथा जीर्ण असलेल्या इमारतींना नोटीस देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
       भारतीय हवामान खात्याद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना/इशारा यासंदर्भात पुर्व माहिती मिळवून योग्य नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात सरासरी 1327.49 मि.मी. पाऊस पडतो. गोदिया जिल्ह्याच्या शेजारी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमा असून या बालाघाट व राजनांदगाव जिल्ह्यात पडणारा पाऊस संजय सरोवर तथा शिरपूर धरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रवेश करतो. संजय सरोवर (मध्यप्रदेश) येथून सुटणारा विसर्गाचा पाणी 25 तासात वैनगंगा नदीच्या माध्यमातून बिरसोला संगम घाट (काटी) महाराष्ट्र येथे पोहोचतो. तसेच शिरपूर देवरी येथून सुटणारा विसर्गाचा पाणी 27 तासात बाघनदीच्या माध्यमातून रजेगाव घाट पर्यंत येतो. या दरम्यान धरणातून सोडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली. वाट्अप ग्रुप तयार करुन पूर परिस्थितीची पुर्व सूचना नागरिकांना दयावी. तसेच पूर परिस्थितीत टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करुन आपत्तीवर मात करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी असे जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी सांगितले.
      पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी पोलीस यंत्रणेला पूर परिस्थितीच्या काळात संवादाची माध्यमे ही प्रभावीपणे कार्यरत ठेवावे. तसेच मोबाईल/इंटरनेट सेवा व संवादाचे इतर माध्यम विस्कळीत झाल्यास वायरलेस यंत्रणेने दक्षता बाळगून कार्य करावे असे निर्देश दिले.
      बैठकीला बालाघाट (म.प्र.), शिवनी (म.प्र.), भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्याचे जलसंपदा विभागाचे प्रमुख, तसेच महसूल व पोलीस खात्यातील विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता आर.एस.सोनटक्के यांनी केले. सादरीकरण वाय.एन.राठोड यांनी केले. संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले, उपस्थितांचे आभार उपविभागीय अभियंता बी.बी.बिसेन यांनी मानले.
00000

Wednesday 26 June 2019

सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

सामुहिक विवाह सोहळ्यातील नवदाम्पंत्यांना
पाहुण्यांच्याच्या हस्ते भेट वस्तू वितरीत


           राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती समाज कल्याण विभाग कार्यालय व पहांदीपारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्था खर्रा ता.जि.गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आज 26 जून रोजी सामाजिक न्याय दिन म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे साजरी करण्यात आली.

        कार्यक्रमाचे उदघाट जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले. अध्यक्षस्थानी जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक विनीता साहू, जि.प.उपाध्यक्ष अलताब हमीद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.हाश्मी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, सेवानिवृत्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
         आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात 19 जोडपी विवाहबध्द झाली. यावेळी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दोन बचतगटातील लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर वाटप, दिव्यांग व्यक्तींना स्वयंचलीत तीनचाकी सायकल, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रती 50 हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्याचे धनादेश वितरीत करण्यात आले. सन 2018-19 या शैक्षणिक सत्रात निवासी शाळेतील इयत्ता दहावीतील प्रथम व द्वितीय आलेल्या व वसतिगृहातील बारावीच्या प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थी/विद्यार्थीनींचा तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
         सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून याप्रसंगी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द झालेल्या 19 जोडप्यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
         जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी नवदाम्पंत्यांना शुभाशिर्वाद देवून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नवदाम्पंत्यांना मान्यवरांच्या हस्ते मंगळसुत्र, साडीचोळी, शर्टपॅन्ट व संसारोपयोगी घरगुती भांडी भेट वस्तू प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रदिप ढवळे यांनी केले. उपस्थितांचे आभार वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण खेडकर, विशाल कळमकर, विनायक जटाळे, श्रीमती विद्या मोहोड, सतीश वाघ, शैलेश उजवणे, योगेश हजारे, मनोहर सोनटक्के, विलास रामटेके, राजेश मेश्राम, दिपक टेकाडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नवदाम्पंत्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी त्यांचे नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Saturday 22 June 2019

पक्षकारांना योग्य न्याय मिळवून देवून न्यायव्यवस्थेला प्रगतीपथावर न्यावे - न्या.मुरलीधर गिरटकर

सडक/अर्जुनी येथील न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन



          भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली आहे. लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायपालिका ही नि:पक्षपणे न्याय देण्याचे काम करते. मार्ग काढला तर निश्चितच मार्ग निघतो. पक्षकारांना केंद्रबिंदू मानून त्यांना योग्य न्याय मिळवून देवून न्यायव्यवस्थेला प्रगतीपथावर न्यावे. असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केले.
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने हे होते. यावेळी सडक/अर्जुनीचे नगराध्यक्ष देवचंद तरोणे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, जिल्हा न्यायाधीश-1 एस.बी.पराते, जिल्हा न्यायाधीश-2 अमित जोशी, भंडाऱ्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.खुणे व श्रीमती शर्मा, सह दिवाणी न्यायाधीश गोंदिया एन.आर.वानखडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे, मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया एन.जी.देशपांडे, सहायक संचालक सरकारी अभियोक्ता चंदन रणदिवे, गोंदिया जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. टी.बी.कटरे, वकील संघाचे सचिव ॲड.सचिन बोरकर, सडक/अर्जुनी वकील संघाचे सचिव डी.एस.बंसोड तसेच ॲड. एस.बी.गिऱ्हेपुंजे, ॲड.गहाणे, ॲड.रहांगडाले, ॲड.अनमोल राऊत, ॲड.पोर्णिमा रंगारी, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गाणार, उपअभियंता श्री.लांजेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         न्या.गिरटकर पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात न्यायालयाची स्वतंत्र इमारत तयार व्हावी यासाठी सतत पाठपुरावा करुन प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये सुसज्ज अशी न्यायालयाची इमारत तयार झालेली आहे. देवरी तालुका न्यायालयाच्या इमारतीसाठी काही प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या अडचणी सुध्दा आता दूर झाल्यामुळे देवरी येथील न्यायालयाच्या इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे असे त्यांनी सांगितले.
       गोंदिया व भंडारा येथील वकीलांमध्ये जागरुकता आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य समजून पक्षकारांना पारदर्शकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्याच्या न्यायव्यवस्थेतील काही अडचणी असल्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी समन्वयाचा मार्ग काढून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा असेही ते यावेळी म्हणाले.
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन न्यायाधीश सुहास माने म्हणाले, तालुका न्यायालयाची इमारत ही याअगोदर भाड्याच्या इमारतीत होती. सन 2016 मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली व 2019 मध्ये ही इमारत पूर्णत्वास आली. आता या सुसज्ज अशा न्यायालयाच्या नविन इमारतीत न्यायव्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी नेहमी सतकर्म करीत रहावे. प्रत्येक खटला हा लवकरात लवकर कसा संपवता येईल याकडे लक्ष केंद्रीत करुन न्यायालयाचे पावित्र्य कायम ठेवावे. यावेळी सडक/अर्जुनीचे दिवाणी न्यायाधीश एन.आर.ढोके यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
        यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांना स्मृतीचिन्ह म्हणून भारताचे संविधान हा ग्रंथ भेट देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक सडक/अर्जुनी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र लंजे यांनी केले. सूत्रसंचालन साकोली तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप कातोरे यांनी केले. उपस्थितांचे आभार देवरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.पी.एन.संगीडवार यांनी मानले. कार्यक्रमास गोंदिया व संलग्न तालुक्यातील सर्व न्यायाधीश, वकील मंडळी व सडक/अर्जुनी तालुका परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक डी.एस.एकनाथे, अधीक्षक एस.सी.कान्हे, एम.आर.कटरे, महेंद्र देशपांडे, कर्मचारी संघटनचे अध्यक्ष व्ही.पी.बेदरकर, सहायक अधीक्षक पी.डब्ल्यू रणदिवे, वासुदेव रहिले, एस.डी.पारधी, महेंद्र पटले, श्री.बडवाईक, सडक/अर्जुनीचे सहायक अधीक्षक श्री.कुकडे,  नरेंद्र टेंभरे व इतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Friday 21 June 2019

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगसाधना आवश्यक - डॉ.कादंबरी बलकवडे

                        आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा



       योगसाधना ही भारताने संपूर्ण जगाला आणि मानवतावादाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अनन्यसाधारण महत्व आहे. सुदृढ शरीर, मन आणि निरोगी आरोग्यासाठी योग हा उत्तम पर्याय असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने योगसाधना करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
         आज 21 जून रोजी इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, आजची आपली जीवनशैली पूर्णपणे बदलेली आहे. कामाच्या वेळा, खाण्याच्या सवयी, कामाचा ताण, झोपेची कमतरता या सर्वांमुळे आज प्रत्येकाला तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगसाधनेचा समावेश करणे आवश्यक आहे. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते. नियमीत योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मनशांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होवून एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
         आर्ट ऑफ लिव्हींगचे मुख्य प्रशिक्षक विकास देशपांडे यांनी नगर योग उत्सव समिती तर्फे उपस्थितांकडून वृक्षासन, अर्ध वृक्षासन, पूर्ण वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, दंडासन, वज्रासन, शसकासन, उत्तान मंडूकासन, उत्तान उर्ध्वमुस्कासन, उत्तान पादासन, मरिचासन, मक्रासन, भूजंगासन, शलभासन, सेतू बंधासन, जगदीस्पादासन, अर्धांगासन, पवन मुक्तासन, शवासन, नाडी शोधन प्राणायम, शितल प्राणायम, भ्रामरी प्राणायम, पदमासन, अर्ध पदमासन व सुकासन इत्यादी योगासनाचे उपस्थितांकडून प्रात्यक्षिके करवून घेतली.
       कार्यक्रमास माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हाश्मी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, लेखाधिकारी एल.एच.बावीस्कर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचेसह पतंजली योग समिती, योग मित्र मंडळ, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, अखिल विश्व गायत्री परिवार, ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, नेहरु युवा केंद्र, रामकृष्ण सत्संग मंडळ, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस इन्स्टीट्यूट आदी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे संचालन नागेश गौतम यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.प्रशांत कटरे यांनी मानले. यावेळी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Saturday 15 June 2019

पालक सचिव डॉ.मुखर्जी यांची वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट



     जिल्ह्याचे पालक सचिव तथा वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी आज 15 जून रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, वैद्यकीय  शिक्षण संचालक पी.टी.वाकोडे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे यांची उपस्थिती होती.
        डॉ.मुखर्जी यांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या सिटी स्कॅन मशीन विभागाला भेट देवून पाहणी केली व नविन येणारे सिटी स्कॅन मशीन नविन इमारतीत लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्यानेच बांधण्यात आलेल्या विद्यार्थी वर्ग व वाचन कक्षाची त्यांनी पाहणी करुन काही उपयुक्त सूचना केल्या. अतिदक्षता विभाग, टेलिमेडिसीन विभाग, दंतचिकित्सा विभाग, डायलेसीस विभाग, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभागाच्या वार्ड 1 व 2 ला भेट देवून रुग्णांशी संवाद साधला. तसेच येथील कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देवून रुग्णांना चांगल्याप्रकारची वैद्यकीय सेवा पुरविण्यात यावे असे सांगितले.
         बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला भेट देवून परिसराची पाहणी करुन पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा निचरा योग्यप्रकारे करण्यात यावा यासाठी 2 अतिरिक्त मोटरपंप लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे वार्डामध्ये पावसाळ्यात पाणी जाणार नाही व रुग्णांचे हाल होणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
        प्रत्येक बुधवारी प्रत्यक्ष मुलाखतीतून सहायक प्राध्यापक व निवासी डॉक्टरांची पदे भरण्यात येतात. परंतू या मुलाखतीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांनी सांगितली. बधिरीकरणशास्त्र विभागात 4 डॉक्टरांची पदे भरण्याची विनंती त्यांनी सचिवांना केली. याबाबत लवकरच निर्णय घेवून पदभरती करण्यात येईल व स्थानिक पातळीवर सुध्दा भरती प्रक्रिया राबवावी अशी सूचना डॉ.मुखर्जी यांनी अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांना केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

पाणीटंचाईच्या उपाययोजनांसोबत अन्य कामे वेळेत पूर्ण करा - डॉ.संजय मुखर्जी



जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येत असलेली कामे यंत्रणांनी समन्वयातून वेळीच पूर्ण करावीत. असे निर्देश पालक सविच डॉ.संजय मुखर्जी यांनी दिले.
        आज 15 जून रोजी जिल्ह्याच्या पाणीटंचाई स्थितीचा आणि अन्‍य योजनांचा आढावा पालक सचिव डॉ.मुखर्जी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपवनसंरक्षक एस. युवराज, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हाश्मी, अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        डॉ.मुखर्जी म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गाव पातळीवर कसे नियोजन करता येईल यादृष्टीने काम केले पाहिजे. जिल्हा परिषदेने टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक निधी ग्रामपंचायतींना उपलब्ध करुन दिला पाहिजे. नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. ज्या प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो तो पाणीपुरवठा योजनांच्या जलस्त्रोतांपर्यंत आवश्यक त्या वेळेत पोहोचला पाहिजे याचे देखील नियोजन झाले पाहिजे असे ते म्हणाले.
         जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजना अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे सांगून डॉ.मुखर्जी म्हणाले, या योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी विविध यंत्रणांनी निर्धारीत वेळेत खर्च करावा. तो समर्पित करण्याची वेळ येवू नये. शासन स्तरावर निधी मिळण्याबाबत काही अडचणी असल्यास त्याबाबत अवगत करुन दयावे. त्यामुळे तो निधी वेळेत मिळविता येईल. शेतकऱ्यांसाठी महत्वाची असलेली प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना वेळेत देवून त्यांना मदत करावी. जलयुक्त शिवार अभियानाची कामे यंत्रणांनी 30 जून पुर्वी पूर्ण करावी. जी कामे मजुरांअभावी प्रलंबीत आहेत तेथे तहसिलदारांनी लक्ष घालून मजूर उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी. तसेच या अभियानासाठी देण्यात येणाऱ्या विशेष निधीची कामे सुध्दा वेळेत पूर्ण करावी असे ते म्हणाले.
         राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपात उदासीन दिसत असल्याचे सांगून डॉ.मुखर्जी म्हणाले, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांनी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना वेळीच कर्ज उपलब्ध करुन दयावे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीत विविध यंत्रणांनी पुढाकार घेवून देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावी. रोजगार हमी योजनेच्या कामांची ज्या गावातील मजुरांकडून मागणी करण्यात येईल त्यांना गाव व परिसरात रोजगार उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही यंत्रणांनी करावी असे त्यांनी सांगितले.
        जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी जिल्ह्यातील ज्या गावांना व शहरांना पाणीटंचाई जाणवत आहे त्या टंचाईच्या निवारणार्थ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची व विविध योजनांच्या प्रगतीबाबतची माहिती यावेळी डॉ.मुखर्जी यांना दिली.                                               ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या निवारणार्थ टप्पा 1, 2, 3 अंतर्गत नविन विंधन विहिरींची 79 कामे, विंधन विहिर विशेष दुरुस्तीची 876 कामे आणि एक सार्वजनिक विहिर पाण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली. सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजनेअंतर्गत 20 कामे करण्यात आली असून संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांची/वाड्यांची संख्या 409 आहे. स्थानिक विकास निधी अंतर्गत 136 विंधन विहिरीच्या खोदकामांना मान्यता मिळाली असून 127 कामे पूर्ण झाल्याची  माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांनी दिली.
        गोंदिया शहराला दररोज एकवेळा दरडोई 100 लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. गोंदिया शहरासाठी पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगुर्ली येथे वैनगंगा नदीत येवून येथून हे पाणी योजनेच्या पाईप लाईनद्वारे गोंदिया शहराला पुरविण्यात येते. आमगाव येथे टंचाई असलेल्या भागात 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. तर गोरेगाव येथे नव्याने 14 विंधन विहिरी तयार करण्यात आल्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यात आल्याचे नगरपालिका प्रशासन अधिकारी श्री.जाधव यांनी सांगितले.
        जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 या वर्षात 146 कोटी 10 लक्ष रुपये नियतव्यय मंजूर होता, त्यापैकी 143 कोटी 13 लक्ष निधीचे वितरण करण्यात येवून शंभर टक्के खर्च करण्यात आला. सन 2019-20 या वर्षात 170 कोटी नियतव्यय मंजूर असून तेवढाच निधी अर्थसंकल्पीत झाला आहे. त्यापैकी 55 कोटी 64 लक्ष रुपये निधी प्राप्त झाल्याची माहिती सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.भिमटे यांनी दिली.
        प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील 1 लाख 69 हजार 465 शेतकरी पात्र ठरले. त्यापैकी 1 लाख 7 हजार 172 शेतकऱ्यांची  नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. 13 जूनच्या पत्रानुसार नविन लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील टंचाईच्या भागातील शेतकऱ्यांना 8 प्रकारच्या सुविधा देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री.धार्मिक यांनी दिली.
       जलयुक्त शिवार अभियानात सन 2016-17 ते 2018-19 या कालावधीत जिल्ह्यातील 305 गावांची निवड करण्यात आली. यापैकी 282 गावे वॉटर न्युट्रल झाली आहे. तर 1 लाख 18 हजार 537 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झाले. सन 2018-19 या वर्षात विविध विभागामार्फत सुरु असलेल्या 2892 कामांपैकी 2597 कामे पूर्ण करण्यात आल्याची  माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.नायनवाड यांनी दिली.
        सन 2019-20 या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात 31 मे पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका व ग्रामीण बँकांनी 21 हजार 780 शेतकऱ्यांना 86 कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 230 कोटी वाटपाचे यावर्षी उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री.सिल्हारे यांनी दिली.
       33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत सन 2019 च्या पावसाळ्यात जिल्ह्यातील विविध यंत्रणांना 78 लाख 88 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी दिली.
        आढावा सभेला विविध यंत्रणांचे जिल्हा प्रमुख, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर यांनी केले. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक यांनी मानले.

Tuesday 11 June 2019

गोंदिया जिल्ह्यातील वनहक्क जमिनीचे दावे पंधरा दिवसात निकाली काढा - राजकुमार बडोले


गोंदिया जिल्ह्यातील वन हक्क जमिनीचे दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढा असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज 11 जून रोजी संबंधित विभागाला दिले.
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियमांतर्गत वन हक्क जमिनीवर दावा केलेल्या प्रकरणांची आढावा बैठक आज 11 जून रोजी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले.
श्री. बडोले पुढे म्हणाले, गोंदिया जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे प्रलंबित असलेले 506 आणि उपविभागीय पातळीवर असलेले 28 दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढावेत. याशिवाय ज्या कास्तकारांनी अपिल दाखल केले नाही, त्यांनाही तातडीने अपिल दाखल करावयास सांगावे तसेच नामंजूर करण्यात आलेले दावे विशेष मोहिम घेऊन निकाली काढावेत. त्यासाठी जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंबंधिचा आढावा घेण्यात यावा असेही श्री. बडोले यांनी सांगितले.
ज्यांना वन जमिनीचे पट्टे मिळाले त्यांना कर्जमाफी, क कर्ज, विहीर, सोसायटीचे कर्ज अशा कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित रहावे लागते. इनाम जमिनी प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्या प्रकारे सर्व शासकिय योजनांचा लाभ मिळतो त्याप्रमाणेच गोंदिया जिल्ह्यातील वन हक्क जमिनीप्राप्त आदिवासी शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र परिपत्रक आदिवासी विभागाने निर्गमित करावे, असेही निर्देश्री. बडोले यांनी दिले.
यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, आदिवासी विभागाचे उपसचिव सुनिल पाटील, मुख्य वनसंरक्षक श्री. तिवारी, गोंदियाचे उपवनसंरक्षक  एस. युवराज, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गेडाम आदी अधिकारी उपस्थित होते.