जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 28 June 2019

पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

                            पूर नियंत्रण समन्वय आंतरराज्यीय बैठक संपन्न



         नैसर्गीक आपत्ती कधीही सांगून येत नाही. मान्सून कालावधीत अचानक उदभवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर नियंत्रण समन्वय आंतरराज्यीय बैठक 25 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक विनीता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, भंडारा अपर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी ए.के.घोरमारे, बालाघाट जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता एस.एस.गहरवार, संजय सरोवर प्रकल्प शिवनीचे कार्यकारी अभियंता पी.सी.महाजन, गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी क्रिष्णा रेड्डी, भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, मान्सून कालावधीत अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात व इतर भागात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जलसंपदा व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी योग्य समन्वय ठेवून पूर परिस्थिती आटोक्यात आणण्याचे कार्य करावे. धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन गावातील नागरिकांना पूर्वसूचना देवून पाणी सोडावे व त्यानंतर नदीच्या पातळीची सूचना संबंधित विभागांनी जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक आहे. अचानक उदभवणाऱ्या नैसर्गीक आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क रहावे अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.
      वैनगंगा, बाघ तसेच इतर उपनदयांमुळे जिल्ह्यातील 87 गावांमध्ये पूर परिस्थितीचे संभाव्य धोके आहेत. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमधील पूर परिस्थितीचे संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करुन सुक्ष्म नियोजन करावे. यासाठी धान्यसाठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा नैसर्गीक आपत्तीला तोंड देण्यास सज्ज ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाला संरचना तपासणी (Structure Audit), नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रात नाले, नाली सफाई, अतिक्रमण धारकांना तथा जीर्ण असलेल्या इमारतींना नोटीस देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
       भारतीय हवामान खात्याद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना/इशारा यासंदर्भात पुर्व माहिती मिळवून योग्य नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात सरासरी 1327.49 मि.मी. पाऊस पडतो. गोदिया जिल्ह्याच्या शेजारी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमा असून या बालाघाट व राजनांदगाव जिल्ह्यात पडणारा पाऊस संजय सरोवर तथा शिरपूर धरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रवेश करतो. संजय सरोवर (मध्यप्रदेश) येथून सुटणारा विसर्गाचा पाणी 25 तासात वैनगंगा नदीच्या माध्यमातून बिरसोला संगम घाट (काटी) महाराष्ट्र येथे पोहोचतो. तसेच शिरपूर देवरी येथून सुटणारा विसर्गाचा पाणी 27 तासात बाघनदीच्या माध्यमातून रजेगाव घाट पर्यंत येतो. या दरम्यान धरणातून सोडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली. वाट्अप ग्रुप तयार करुन पूर परिस्थितीची पुर्व सूचना नागरिकांना दयावी. तसेच पूर परिस्थितीत टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करुन आपत्तीवर मात करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी असे जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी सांगितले.
      पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी पोलीस यंत्रणेला पूर परिस्थितीच्या काळात संवादाची माध्यमे ही प्रभावीपणे कार्यरत ठेवावे. तसेच मोबाईल/इंटरनेट सेवा व संवादाचे इतर माध्यम विस्कळीत झाल्यास वायरलेस यंत्रणेने दक्षता बाळगून कार्य करावे असे निर्देश दिले.
      बैठकीला बालाघाट (म.प्र.), शिवनी (म.प्र.), भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्याचे जलसंपदा विभागाचे प्रमुख, तसेच महसूल व पोलीस खात्यातील विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता आर.एस.सोनटक्के यांनी केले. सादरीकरण वाय.एन.राठोड यांनी केले. संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले, उपस्थितांचे आभार उपविभागीय अभियंता बी.बी.बिसेन यांनी मानले.
00000

No comments:

Post a Comment