जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 29 June 2020

वनहक्क जमिनीचे प्रलंबीत प्रकरणे त्वरित मार्गी लावावीत - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले


         गोंदिया जिल्हा हा झुडपी जंगल व्याप्त आहे. अनेक शेतकरी, आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांची उपजिविका चालविण्यासाठी वनहक्क जमिनीचे पट्टे त्यांना मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडे प्रलंबीत असलेल्या वनहक्क जमिनीचे पट्टे देण्यासाठीची प्रलंबीत प्रकरणे कायद्यानुसार तातडीने मार्गी लावण्यात यावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
         आज 29 जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री, विनोद अग्रवाल, सहेषराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसरंक्षक तथा क्षेत्र संचालक श्री.रामानुजम, गोंदिया न.प.अध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडा न.प.अध्यक्ष सोनाली देशपांडे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री. पटोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील जंगली झुडपी भागात अनेक वर्षापासून आपली उपजिविका चालविणाऱ्या आदिवासी, शेतकरी बांधवांनी वनहक्क जमिनीचे पट्टे मिळण्याकरीता अर्ज केले असून जमिनीचे पट्टे न मिळाल्यामुळे अजुनही ते वंचित आहेत. त्यामुळे सर्व उपविभागीय अधिकारी यांनी  या संदर्भात वनहक्क जमीन पट्टे प्रकरणे तपासून कायद्यानुसार आवश्यक बाबींची पूर्तता करुन प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावावीत, असे त्यांनी सांगितले.
        वनहक्क जमिनीचे पट्टे विषयी गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून पुरावा घेवून नामंजूर करण्यात आलेली प्रकरणे पुन्हा तपासून या संदर्भात सकारात्मक भूमिका ठेवून शेतकरी, आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वन निवासी बांधवांचे वनहक्क दाव्यांची प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात यावे असे श्री. पटोले यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.                  
      यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी राहूल खांडेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा मार्केटींग अधिकारी गणेश खर्चे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
धान खरेदी बाबत आढावा
      शेतकरी बांधवांनी धान खरेदी केंद्रावर जावून धान विक्री करावी असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. आज 29 जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात धान खरेदी बाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री, विनोद अग्रवाल, सहेषराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसरंक्षक तथा क्षेत्र संचालक श्री.रामानुजम, गोंदिया न.प.अध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडा न.प.अध्यक्ष सोनाली देशपांडे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        श्री. पटोले पुढे म्हणाले, खरीप व रब्बी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर जावून धानाची विक्री करुन शासनाने जाहीर केलेल्या बोनसचा लाभ घ्यावा. या कामी कोणतेही मध्यस्थ यांचा आधार घेवून धान विक्रीची प्रक्रिया करु नये. काही व्यवसायी याकामी मध्यस्थी करुन शेतकरी बांधवांचा हक्क हिरावून घेण्याचे काम करीत आहेत. प्रशासनाने या संदर्भात एक समिती गठीत करुन धान खरेदी केंद्रावर कोणत्याही प्रकारची अनियमीतता असल्यास संबंधितांविरुध्द दंडात्मक कारवाई करावी. शेतकऱ्यांचे उत्पादित धान ठेवण्यासाठी योग्य त्या ठिकाणी गोदाम तयार करण्याकरीता संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी. त्यानंतर गोदामाच्या बांधकामा संदर्भात प्रक्रिया पूर्ण करुन नवीन गोदाम तयार करण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.

राईस मिलर्स उद्योजकांच्या समस्या तातडीने निकाली काढा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले


      गोंदिया जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जातो. सन 1994 ते 2004 या कालावधीत स्थापन झालेल्या राईस मिल्सच्या प्रलंबीत अकृषक व एन.ओ.सी. बाबतच्या समस्या अजूनही जिल्हा स्तरावर प्रलंबीत असल्यामुळे ही प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
        आज 29 जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री, सहेषराम कोरोटे, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, गोंदिया न.प.अध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडा न.प.अध्यक्ष सोनाली देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसरंक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. रामानुजम, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        श्री. पटोले पुढे म्हणाले, राईस मिलर्सच्या समस्यांचे अर्ज अनेक वर्षापासून जिल्हा स्तरावर प्रलंबीत आहे. त्यामुळे राईस मिलर्स उद्योजकांना व्यवसायात अकृषक नसल्यामुळे नुकसान होत आहे. तसेच शासनाकडून दंड आकारण्यात येत आहे. या संदर्भात प्रशासनाने दखल घेवून प्रलंबीत प्रकरणांचे तातडीने निराकरण करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
       राईस मिलर्स यांचेकडून प्राप्त अर्जाची तालुका निहाय छाननी करुन उपविभागीय अधिकारी व संबंधीत तहसिलदार यांनी त्यांच्या अर्जात काही त्रुटी असल्यास संबंधितांना कळवावे व प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
       यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी राहूल खांडेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा मार्केटींग अधिकारी गणेश खर्चे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
                                                         00000


















Friday 26 June 2020

आज 2 रूग्ण कोरोनातून बरे झाले जिल्ह्यातील एका व्यक्तीचा नागपुरात कोरोना बाधित आढळून मृत्यू


                                        
  जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण उपचारातून बरे होऊन घरी जात आहे. आज 26 जून रोजी आणखी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आता केवळ दोनच  कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे.
      गोंदिया तालुक्यातील  मुंडीपार येथे राहून तिथल्या महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील एका उद्योग कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणारा व्यक्ती किडनीच्या आजारावरील उपचारासाठी 24 जून रोजी नागपूर येथे खाजगी रुग्णालयात भरती झाला होता. 25 जून रोजी त्याची प्रकृती ढासळली. याच दिवशी त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. आज 26 जून रोजी त्याचा मेयो रुग्णालय नागपूर येथे सकाळी 7:45 वाजता मृत्यू झाला. विशेष म्हणजे या रुग्णाला किडनीच्या आजारासोबतच मधुमेह व उच्च रक्तदाब हा देखील आजार होता.
       आज 26 जून रोजी जिल्ह्यात नवा बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आज आणखी 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तर केवळ 2 कोरोना क्रियाशील रुग्ण उपचार घेत आहे. आज जे 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले ते गोंदिया तालुक्यातील असून ते 20 ते 25 वर्ष वयोगटातील आहे.
       जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने कोरोनाचा संसर्ग आपणाला होऊ नये यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रत्येकाने शारीरिक अंतर राखावे. वारंवार हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावे. कोणत्याही वस्तूला हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावे. हाताला सॅनिटायझर लावावे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तोंडावर आणि नाकावर मास्क किंवा रुमालचा वापर करावा. सर्दी,ताप किंवा खोकला असल्यास नजीकच्या दवाखान्यात किंवा फिव्हर क्लीनिकमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी.
        जिल्ह्यात आतापर्यंत 105 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 102 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात क्रियाशील कोरोना रुग्णांची संख्या आता केवळ 2 इतकी आहे. तर नागपूर येथे कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णाचा नागपूर येथे आज मृत्यू झाला.
        जिल्ह्यात आढळलेले 105 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका- 31,सडक/अर्जुनी तालुका- 10, गोरेगाव तालुका- 4, आमगाव तालुका-1, सालेकसा तालुका- 2, गोंदिया तालुका- 23 आणि तिरोडा तालुक्यातील 34 रुग्ण आहे.
        गोंदिया येथील प्रयोगशाळेत कोरोना संशयित 2351 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये 105 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले. आज नागपूर येथे कोरोना बाधित आढळुन मृत्यू झालेल्या व्यक्तीचा देखील जिल्ह्यातील 105 बधितांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 128 नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त व्हायचा आहे.
       जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 699 आणि घरी 1896 अशा एकूण 2595 व्यक्ती विलगीकरणात आहे. 
       जिल्ह्यातील चोवीस कंटेंटमेंट झोनपैकी  सालेकसा तालुक्यातील बामणी हे झोन वगळता उर्वरित 23 कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध सेवामध्ये शिथीलता देण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी आज दिली.
00000





Wednesday 24 June 2020

देवरी तालुक्यात शेतकरी प्रशिक्षण


       रोहीणी नक्षत्राची चाहूल लागून मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावली आहे. लगेच मृग नक्षत्रामध्ये मान्सूनचे आगमन प्रगतीपथावर असल्याने खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. देवरी तालुक्यात धान हे मुख्य पीक आहे. यावर्षी कोरोना संसर्ग लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालेला आहे. त्यावर मात करण्यासाठी देवरी तालुक्यात कृषि विभागामार्फत खरीप हंगाम प्रशिक्षण घेवून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व शासकीय अनुदानीत योजनेबाबत मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच डोंगरगाव (सावली) येथे शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
         प्रशिक्षणामध्ये तालुका कृषि अधिकारी जी.जी.तोडसाम यांनी जमिनीची सुपीकता निर्देशांक, जमिनीचे आरोग्य, खत व्यवस्थापन, कामगंध सापळा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी विकास कुंभारे यांनी शासकीय योजनेबाबत माहिती दिली. कृषि पर्यवेक्षक येडाम यांनी 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया, बीज उगवन क्षमता व 5 टक्के निंबोळी अर्क तयार करण्याचे कृति विषद केली.
         यावेळी आत्मा यंत्रणेच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वप्ना लांडगे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सिध्दार्थ राऊत, कृषि सहायक संजय कापगते, सेवार्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री देशमुख व डोंगरगाव (सावली) येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Tuesday 23 June 2020

कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य सेतू ॲप अस्त्रासारखे - डॉ.कादंबरी बलकवडे


जिल्ह्यात 1 लक्ष 23 हजार नागरिकांनी केला ॲप डाऊनलोड
         राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. जरी आवश्यक असले तरी बाहेर पडतांना मास्क, दुपट्टे व सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी आरोग्य सेतु ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्हयातील नागरिकांना केले आहे. 
       आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर केल्यामुळे हे ॲप सर्व सामान्य नागरिकांसाठी अस्त्रासारखे काम करते. जोपर्यंत कोरोनावर लस निर्माण होत नाही, तोपर्यंत कोरोना आजारावर मात करण्यासाठी  सामाजिक सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छता पाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे इत्यादी बाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.  पण यालाच जोड देत शासनाने कोरोनाची माहिती देण्यासाठी, तसेच आपण कोणाला भेटतो, कुठे जातो, तिथे कोरोनाचे रुग्ण आहेत का अशा प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आरोग्य सेतू प तयार केले आहे. परंतु नागरिकांनी सदर पमध्ये खरी माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी नागरिकांना केले आहे. 
       सदर प डाऊनलोड केल्यावर सगळ्यात आधी युजरचे फोन नंबर विचारण्यात येते. त्यावर ओटीपी येतो आणि ओटीपी टाकल्यानंतर या पवर रजिस्टर केले जाऊ शकते. यानंतर काही प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे, जसे-  लिंग, वय नमूद करणे गरजेचे आहे. तसेच युजरने गेल्या काही काळात परदेश प्रवास केला आहे का याचा इतिहास विचारला जातो. 
       युजरला त्याची आरोग्याची माहिती या पवर द्यावी लागते. रक्तदाबाचा त्रास आहे का, मधुमेह आहे का याची माहितीही या ॲपवर सुरुवातीलाच द्यावी लागते. दिलेल्या माहितीच्या आधारे या पवर अनेक फिचर्स आहेत.  एक अत्यंत महत्त्वाचे फीचर म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना शोधण्याचे काम केले जाते व त्याच्यावर नजर ठेवली जाते.
       ब्लुटूथ आणि लोकेशन ट्रेसिंग तंत्रज्ञान वापरल्यामुळे या पचे काही फायदे निश्चितच आहेत. आरोग्य सेतू या ॲपच्या माध्यमातून एखादी व्यक्ति कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला असेल तर हे प अलर्ट करू शकते, पण हे प रजिस्ट्रेशन करताना लोकांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरं आणि स्वतःची खरी माहिती दिली असेल तरच हे शक्य होईल. ते कुठे जातात, कुणाला भेटतात, किती वेळ एका ठिकाणी थांबतात या सगळ्या गोष्टींवर प्रशासन नजर ठेवू शकतं. आरोग्यसेतू 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना त्यांच्या भाषेत ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्यास कामी येऊ शकते. तरी सर्व नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, आरोग्य सेतू ॲपचा वापर करतांना त्यांनी योग्य व खरी माहिती द्यावी.

धान रोपवाटिकेमध्येच करा खोडकिडीचे नियंत्रण

           गोंदिया जिल्हा "धानाचा जिल्हा" म्हणून ओळखला जातो. धानाच्या कमी उत्पादकतेच्या कारणांपैकी विविध किडी हे एक मुख्य कारण आहे. जिल्ह्यात धान पिकाशिवाय दुसऱ्या पिकांची फेरपालट जास्त प्रमाणात होत नाही. तसेच मागील वर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाचे क्षेत्र असल्याने व या वर्षी वेळेत पावसाला सुरुवात झाल्याने खोडकिडीस पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे धानाच्या रोपवाटिकेमध्येच खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
       खालील प्रमाणे एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे रोपवाटिकेत खोड किडीचे नियंत्रण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे धान खोड किडीचे सुरवातीच्या टप्प्यात नियंत्रण होऊन रोवणीनंतर होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे.
       किडीची ओळख :- या किडीचा प्रौढ पतंग १ ते २ सेंटिमीटर आकाराचा असून पिवळसर रंगाचा असतो. मादी पतंगाच्या दोन्ही पंखावर खालील बाजूस काळसर ठिपका असतो तर नर पतंगाच्या पंखावर ठिपका नसतो.
      नुकसानीचा प्रकार :- सध्याच्या काळात मादी पतंग पानाच्या शेंड्यावर ५० ते ८० अंडी घालून त्यावर केसांचे आच्छादन टाकून झाकून घेते. एक मादी ३ ते ४ ठिकाणी अंडी घालते. ५ ते ८ दिवसात अंड्यांमधून अळ्या बाहेर येऊन खोडात प्रवेश करतात व आतील भाग पोखरुन खातात. यामुळे गाभा मर होऊन कीडग्रस्त फुटवे निघतात. तर दाणे भरण्याच्या वेळी पांढऱ्या लोंबी निघतात.
      आर्थिक नुकसानीची पातळी :- 
१. एक अंडीपुंज किंवा एक पतंग प्रतिचौरस मीटर क्षेत्रात आढळल्यास.
२. पाच टक्के कीडग्रस्त किंवा सुकलेले फुटवे प्रति चौरस मीटर क्षेत्रात दिसल्यास.
      एकात्मिक कीड व्यवस्थापन :-
१. रोपवाटिकेत तसेच रोवणीपूर्वी रोपांच्या शेंड्यावरील अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत.
२. पाच टक्के निंबोळी अर्काची दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
३. शेतात प्रकाश सापळ्यांचा वापर करून पतंगांचा नायनाट करावा. 
४. रोपांची मुळे रोवणीपूर्वी क्लोरोपायरीफॉस (२० टक्‍के प्रवाही) १ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे तयार द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत.
५. या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कामगंध सापळे प्रति एकरी ४ ते ८ याप्रमाणे शेतात लावून नर पतंगांचा नायनाट करता येतो.
६. रोपवाटिकेमध्ये आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास दाणेदार १० टक्के फोरेट १० किलो किंवा ५ टक्के क्वीनॉलफॉस १५ किलो किंवा ३ टक्के कार्बोफुरॉन १६.५ किलो प्रतिहेक्‍टरी याप्रमाणे शेतात पुरेसा ओलावा असताना टाकावे.
७. उपलब्ध असल्यास ट्रायकोग्रामा जपोनीकम या परोपजीवी किटकाची प्रति हेक्टरी ५०,००० अंडी या प्रमाणात ८ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा सोडावेत.
      वरील उपायांचा वापर करून शेतकऱ्यांनी खोड किडीचे नियंत्रण करावे तथापि शेतात खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनात उपाययोजना कराव्यात. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव (9730176885),कृषी अधिकारी प्रवीण मुंढे (9921104709) तालुका कृषी अधिकारी कार्यालय आमगाव यांचेशी संपर्क साधावा.
00000


Friday 12 June 2020

मान्सून पुर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे

                                       गावपातळीवर गठित होणार आपत्ती व्यवस्थापन समिती


         जिल्हयातील धरण, जलाशये, तलाव, नद्या इत्यादी ठिकाणी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत अचानक पाऊस पडल्यास जिल्हयातील 87 गावांना पुराचा धोका नाकारता येत नाही. येणाऱ्या पुराच्या आपत्तीची तिव्रता कमी करण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपुर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात डॉ.बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुन पुर्व तयारीचा आढावा  11 जून 2020 रोजी आयोजित सभेत घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.  सभेला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहा.जिल्हाधिकारी रोहन घुगे, सावन कुमार,अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची् प्रामुख्याने उपस्थिती होती
डॉ. बलकवडे पुढे  म्हणाल्या की, आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्याचे सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. जलसंपदा व महसुल विभाग यांनी योग्य समन्वय साधुन काम करावे. जिल्हयातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतीची मान्सुनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा.असे सांगितले.
पुर परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी तात्काळ  प्रतिसाद देणे, संबंधीत माहिती विचारुन दक्षता घेऊन शोध व बचावकार्य करण्याचे निर्देश देऊन डॉ. बलकवडे म्हणाल्या, पुर परिस्थीतीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हॅलीपॅड बांधण्या संबंधाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तसेच संबंधित तहसिलदारानी समन्वय ठेवून काम करावे. जिल्हयातील पर्यंटनस्थळे, धरण, जलाशये, तलाव तसेच धोक्याच्या ठिकाणी कुणीही सेल्फी घेतांना किंवा गर्दी करतांना आढळल्यास त्यांच्या विरुध्द योग्य कार्यवाही करावी.
डॉ.बलकवडे म्हणाल्या, पुर परिस्थीतीचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी  जिल्हयातील तालुका, नगर परिषद, नगर पंचायत, प्रभाग, वार्ड  आणि ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करावी. जेणेकरुन पुर परिस्थीतीत ग्राम पातळीपर्यंत समन्वय साधला जाऊ शकेल तसेच पुर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.असे त्या म्हणाल्या. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करण्याचे निर्देश डॉ.बलकवडे यांनी दिले. उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार यांना पुर प्रवण 87 गावांचा सुक्ष्म आराखडा तयार करुन मान्सून कालावधीत सुरक्षित स्थळ (निवारा) चिन्हांकित करुन नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
 जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता यांना धरणाचे पाणी सोडण्यापुर्वी सर्व संबंधितांना सूचना देण्याबाबत, पोलिस विभागाला पाण्याखाली बुडालेले रस्ते, पुल या ठिकाणी बॅरीकेटींग लावून बंदोबस्त करण्याबाबत, पुरवठा विभागाला पुर प्रवण सर्व 87 गावात धान्याचा साठा उपलब्ध करण्याबाबत, विद्युत विभागाला मान्सून पुर्व विद्युत तारांवर झाडांच्या खांद्या कापणे, कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह यांना धोक्याचे ठिकाणात रेडीयमचे फलक लावण्याबाबत, आरोग्य विभागाला सर्व आरोग्य केन्द्रात औषधांचा पर्याप्त साठा व पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची माहिती सर्व ग्रामपंचायतीत लावण्याचे निर्देशही डॉ.बलकवडे यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व नगर परिषद , नगर पंचायत यांना नाले, नालींची स्वच्छता करुन जीर्ण इमारतीच्या मालकीच्या लोकांना नोटिस देण्याचे निर्देश डॉ.बलकवडे यांनी दिले. 
या सभेला उपविभागीय अधिकारी सर्वश्री रविंद्र राठोड (देवरी), गंगाधर तळपदे(तिरोडा),शिल्पा सोनाळे (अर्जुनी/मोरगाव), जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार सर्वश्री राजेश भांडारकर (गोंदिया) विनोद मेश्राम (अर्जुनी/मोरगाव) श्री.सी.जी. पित्तलवार(सालेकसा), प्रशांत घोरुडे(तिरोडा), डी.एस भोयर( आमगाव), विजय बोरुडे (देवरी),अपर तहसीलदार अनिल खडतकर,नायब तहसलिदार राजेश वाकचौरे, आर.एम खोकले,जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे तसेच सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

देवरी तालुक्यात बीज प्रक्रिया व व उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक

       भाताच्या उत्पादनवाढीसाठी बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमतेची तपासणी करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने देवरी तालुक्यातील गावागावांमध्ये तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात धान बियाणे प्रक्रिया आणि बीज अंकुरण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना  देण्यात येत आहे. 
      प्रात्यक्षिकाचा एक भाग म्हणून देवरी तालुक्यातील भागी या गावी सेवार्थ शेतकरी उत्पादक कंपनी देवरीच्या गटामार्फत तालुका कृषी विभागातील कृषी व्यवस्थापन आत्मा यंत्रणा, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून कमी खर्चाची बीज प्रक्रिया करून शेतकऱ्यांमध्ये जागृती करीत आहे. धान पिकावरील रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. तीन टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया व 100 दाण्यांची अंकुरण क्षमता तपासण्याचे प्रात्यक्षिके भागी येथे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष करून दाखविण्यात आली.
         यावेळी आत्मा यंत्रणेच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वप्ना लांडगे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सिद्धार्थ राऊत,कृषी सहाय्यक अजय कडव,सेवार्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री देशमुख,श्री हेमणे,श्री नागोसे,श्री देसाई, श्री पारधी, श्री रहांगडाले,श्री कोसमे व भागी येथील शेतकरी बांधव या वेळी उपस्थित होते.

आदिवासी नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठांचा पुरवठा


        कोरोना विषाणूच्या संकटकाळात संचारबंदीमुळे शेतकऱ्यांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला होता. खरीप हंगामाच्या तोंडावर दळणवळणाची साधने नसल्यामुळे हंगाम वाया जाणार की काय याची भीती असतांना कृषी विभागाने पुढाकार घेऊन देवरीसारख्या दुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे,खते, कीटकनाशके व बुरशीनाशके आदि. कृषी निविष्ठा पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवरी येथील अधिकारी - कर्मचारी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तसेच क्षेत्रीय अधिकारी- कर्मचारी, शेतकरी गट, कृषी सेवा केंद्रांनी यामध्ये सहभाग घेऊन शासनाची ही मोहीम यशस्वी केली.
     देवरी तालुक्यातील ककोडी येथील कृषकोन्नती शेतकरी कंपनीच्या सर्व शेतकरी सदस्य बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. कंपनीकडे नोंदणी केलेल्या व इतर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पोहोचविण्यात आल्या. यासाठी तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, मंडळ कृषी अधिकारी विकास कुंभारे, यांचेसह आत्माच्या व्यवस्थापक स्वप्ना लांडगे, सहव्यवस्थापक सिद्धार्थ राऊत, कृषी सहाय्यक सचिन गावळ,कृषकोन्नती शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मनेद्र मोहबन्सी,संचालक मनोज मेश्राम, चंदन हिरवाणी, कृषी निविष्ठा खरेदी करणारे शेतकरी, गट प्रमुख व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.