जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 26 June 2020

आज 2 रूग्ण कोरोनातून बरे झाले जिल्ह्यातील एका व्यक्तीचा नागपुरात कोरोना बाधित आढळून मृत्यू


                                        
  जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण उपचारातून बरे होऊन घरी जात आहे. आज 26 जून रोजी आणखी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात आता केवळ दोनच  कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे.
      गोंदिया तालुक्यातील  मुंडीपार येथे राहून तिथल्या महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील एका उद्योग कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणारा व्यक्ती किडनीच्या आजारावरील उपचारासाठी 24 जून रोजी नागपूर येथे खाजगी रुग्णालयात भरती झाला होता. 25 जून रोजी त्याची प्रकृती ढासळली. याच दिवशी त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. आज 26 जून रोजी त्याचा मेयो रुग्णालय नागपूर येथे सकाळी 7:45 वाजता मृत्यू झाला. विशेष म्हणजे या रुग्णाला किडनीच्या आजारासोबतच मधुमेह व उच्च रक्तदाब हा देखील आजार होता.
       आज 26 जून रोजी जिल्ह्यात नवा बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आज आणखी 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तर केवळ 2 कोरोना क्रियाशील रुग्ण उपचार घेत आहे. आज जे 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले ते गोंदिया तालुक्यातील असून ते 20 ते 25 वर्ष वयोगटातील आहे.
       जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने कोरोनाचा संसर्ग आपणाला होऊ नये यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रत्येकाने शारीरिक अंतर राखावे. वारंवार हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावे. कोणत्याही वस्तूला हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावे. हाताला सॅनिटायझर लावावे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तोंडावर आणि नाकावर मास्क किंवा रुमालचा वापर करावा. सर्दी,ताप किंवा खोकला असल्यास नजीकच्या दवाखान्यात किंवा फिव्हर क्लीनिकमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी.
        जिल्ह्यात आतापर्यंत 105 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 102 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात क्रियाशील कोरोना रुग्णांची संख्या आता केवळ 2 इतकी आहे. तर नागपूर येथे कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णाचा नागपूर येथे आज मृत्यू झाला.
        जिल्ह्यात आढळलेले 105 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका- 31,सडक/अर्जुनी तालुका- 10, गोरेगाव तालुका- 4, आमगाव तालुका-1, सालेकसा तालुका- 2, गोंदिया तालुका- 23 आणि तिरोडा तालुक्यातील 34 रुग्ण आहे.
        गोंदिया येथील प्रयोगशाळेत कोरोना संशयित 2351 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये 105 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले. आज नागपूर येथे कोरोना बाधित आढळुन मृत्यू झालेल्या व्यक्तीचा देखील जिल्ह्यातील 105 बधितांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 128 नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त व्हायचा आहे.
       जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 699 आणि घरी 1896 अशा एकूण 2595 व्यक्ती विलगीकरणात आहे. 
       जिल्ह्यातील चोवीस कंटेंटमेंट झोनपैकी  सालेकसा तालुक्यातील बामणी हे झोन वगळता उर्वरित 23 कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध सेवामध्ये शिथीलता देण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी आज दिली.
00000





No comments:

Post a Comment