जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 27 November 2016

‘गाव तेथे मुक्काम’ केशोरीतील मुक्कामातून पालकमंत्र्यांचा ग्रामस्थांशी संवाद • जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती • केशोरी व परिसरातील नागरिकांनी मांडल्या समस्या






गोंदिया,दि.27 : जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी हा परिसर म्हणजे मागास, दुर्गम, आदिवासी बहुल आणि नलक्षदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असला तरी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या हा परिसर मागास आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी गाव तेथे मुक्काम या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा मुख्यालयापासून टोकावर असलेल्या केशोरी या मतदारसंघातील गावात 25 नोव्हेंबर रोजी मुक्काम करुन गाव व परिसरातील ग्रामस्थांशी जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित सभेतून संवाद साधला.
       केशोरी सारख्या मागास भागातील 30 ते 35 गावाच्या विकासाला पालकमंत्र्यांच्या मुक्कामामुळे चालना मिळाली. कडाक्याच्या थंडीत देखील केशोरी व परिसरातील ग्रामस्थ आपल्या गावाच्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.
      ज्या कर्मचाऱ्यांची/अधिकाऱ्यांची ज्या गावासाठी नियुक्ती करण्यात येते. परंतू ते मुख्यालयी राहत नसल्यामुळे गावपातळीवर अनेक लोकांची, लाभार्थ्यांची कामे खोळंबून जातात. त्यामुळे यंत्रणांप्रती त्यांचा रोष निर्माण होत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. यंत्रणेच्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाच्या ज्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या त्या चोखपणे त्यांनी पार पाडाव्यात.
       केशोरी हा दुर्गम व मागास भाग असल्यामुळे विविध यंत्रणांनी नियोजन करुन विकास कामे करण्याचे निर्देश देवून पालकमंत्री पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचा मुख्यत: संबंध हा तलाठ्याशी आणि ग्रामसेवकांशी येतो. तेव्हा तलाठ्यांनी साजाला तर ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतला उपलब्ध असले पाहिजे. ग्रामीण भागातील व्यक्ती कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी आपली मजूरी बुडवून किंवा शेतीचे कामे सोडून येतो तेव्हा त्याला तो अधिकारी किंवा कर्मचारी जागेवर मिळत नाही. त्याचे काम न झाल्यामुळे तो निराश होतो. ग्रामीण भागातील जनतेची आणि विकासाची कामे करतांना यंत्रणांनी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करावे. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
      गाव तेथे मुक्काम या कार्यक्रमाअंतर्गत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासन सामान्य लोकांपर्यंत पोहचत आहे आणि गावाच्या समस्या या कार्यक्रमातून सोडविण्यास मदत होत आहे. असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे यांनी हा दिवस केशोरी ग्रामस्थांच्या दृष्टीने ऐतिहासिक असून पालकमंत्र्यांचा गाव तेथे मुक्काम हा आगळा वेगळा प्रशासकीय कार्यक्रम असल्याचे सांगितले. तालुका पातळीवरील प्रमुख अधिकाऱ्यांनी संबंधित गावचा कर्मचारी तसेच शिक्षक गावात मुक्कामी राहतो की नाही याची खात्री करावी. राहत असल्यास घरभाडे भत्ता दयावा, अन्यथा हा भत्ता देवू नये. गावात तो कर्मचारी राहत असल्याचे प्रमाणपत्र सुध्दा घ्यावे असेही त्यांनी सांगितले.
       केशोरी आणि परिसरातील गावातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची नोंद घेण्यात आली असून या भागाच्या तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी आलेला निधी वापस जाणार नाही याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
     केशोरी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने माजी जि.प.सभापती प्रकाश गहाणे यांनी परिसरातील समस्यांबाबत अवगत करुन अपूर्णावस्थेतील प्रकल्प व कामे त्वरित पूर्ण झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यामध्ये केशोरी-नवेगावबांध राज्य मार्ग वन विभागाच्या क्षेत्रातून जात असल्यामुळे येणाऱ्या अडचणी, अरडतोंडी येथील मार्गावर उंच पुलाची मागणी, केशोरी येथून अर्जुनी/मोरगावकडे जाण्यासाठी वळण रस्त्याची आवश्यकता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या भागातील करावयाची रस्त्यांची कामे, पांदण रस्त्यांची कामे, केशोरी येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी, तुकुमनारायणचा तलाव ग्रामपंचायतकडे हस्तांतरणाची मागणी, गाढवी नदीवर दर तीन कि.मी.अंतरावर साठवणूक बंधाऱ्याची आवश्यकता, परिसरातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची मागणी, जांभळी, सुरतोली, गार्डनपूर तलावाची कामे पूर्ण करणे, इटियाडोह प्रकल्पातून केशोरी, तुकुमनारायण व गटारी असा कालवा तयार करण्याची मागणी, धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा सर्व धान खरेदी करण्यात यावा. धान खरेदी करतांना शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येवू नये. त्यांच्या हुंड्या वापस येवू नये, आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, अशा विविध मागण्या ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या.
      कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी यांनी इळदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे. या भागात संबंधित गावचे कर्मचारी व शिक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून पाणलोटच्या कामात अनियमितता असल्याचे त्यांनी सांगितले.
       जळावू लाकडाची उपलब्धता झाली पाहिजे, नायब तहसिलदार कार्यालय केशोरी येथे सुरु करावे, रेशन कार्डवर योग्यप्रकारे धान्य मिळत नाही, मानव विकास मिशनच्या बसेसच्या फेऱ्यात वाढ करावी, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा केशोरी येथे सुरु करावी, करांडली येथील रोहयोच्या मजुरांना अद्यापर्यंत मजूरी मिळाली नाही, अरडतोंडी येथील शाळेची जीर्ण झालेली इमारत व रिक्त शिक्षकांची पदे, केशोरी येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात मागील दोन वर्षापासून रिक्त असलेले पशूवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याबाबतच्या तक्रारी, धान साठवणूकीसाठी गोदामाची आवश्यकता, यासह केशोरी परिसरातील समस्यांची या सभेत चर्चा झाली.
       पालकमंत्र्यांनी केशोरीत मुक्कामादरम्यान ऐकून घेतलेल्या समस्या व प्रश्नांची जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून हया समस्यांच्या सोडवणूकीसाठी नियोजन करावे असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
       सभेच्या प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त दीप प्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सभेला माजी आमदार दयाराम कापगते, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, जि.प.माजी सभापती प्रकाश गहाणे व उमाकांत ढेंगे, अर्जुनी/मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काशिम जामा कुरेशी, पं.स.सदस्य रामलाल मुंगनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, बाघ-इटियाडोह पाटबंधारे विभागाचे श्री.छप्परधरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंबादे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निगगडे, लघु सिंचनचे कार्यकारी अभियंता विलास निखारे, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, शिक्षणाधिकारी श्री.नरड, प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर यांचेसह अर्जुनी/मोरगाव तहसिलदार श्री.बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राऊत, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गोंडाणे यांचेसह विविध यंत्रणांचे जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
      गाव तेथे मुक्कामया पालकमंत्र्यांच्या सभेला केशोरी व परिसरातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, गाव पातळीवरील विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी आपल्या गावातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना अवगत केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार गट विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले.

00000

बंगाली बांधवांचे प्रश्न सोडविणार - पालकमंत्री बडोले पुष्पनगर येथे साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन



गोंदिया,दि.27 : बंगाली बांधवांच्या शेतीला काही प्रमाणात सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी लवकरच साठवण बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास येणार आहे. बंगाली शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. बार्टीच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन बंगाली बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल. यासह बंगाली बांधवांच्या अन्य प्रश्नांची देखील सोडवणूक करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
       अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पुष्पनगर येथे 25 नोव्हेंबर रोजी साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन व सभा मंडपाचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ.दयाराम कापगते होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कासीम जामा कुरेशी, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, जि.प.माजी सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, लघु सिंचनचे कार्यकारी अभियंता विलास निखारे, तहसिलदार श्री.बांर्बोडे, गट विकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच खोकन सरकार, उपसरपंच सचिन घरामी, नंदू गहाणे, दशरथ गहाणे, केवलराम पुस्तोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री.बडोले यावेळी म्हणाले, इटियाडोह प्रकल्पावरील पाणी वाटप संस्था योग्यप्रकारे काम करीत नसल्याच्या तक्रारी येत आहे. पुष्पनगर येथील शाळा डिजीटल करण्यात येईल. इथल्या ग्रामस्थांना समाज कल्याण विभागाच्या विविध महामंडळामार्फत कर्ज देण्यात येईल. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी धान खरेदी केंद्र लवकर सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.कापगते म्हणाले, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे. साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीनंतर पुष्पनगर बंगाली शेतकरी बांधवांनी सिंचनासाठी इथल्या पाण्याचा चांगल्याप्रकारे वापर करुन आर्थिक समृध्दीकडे वाटचाल करावी असेही सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनीही मार्गदर्शन केले.
       लघुसिंचन (जलसंधारण) विभागामार्फत हे काम करण्यात येणार असून पुष्पनगर जवळून वाहणाऱ्या तोंड्या नाल्यावर हा साठवणूक बंधारा बांधण्यात येणार असून यावर 67 लाख 50 हजार लक्ष रुपये खर्च होणार आहे. या बंधाऱ्याचे काम 18 महिन्यात पूर्ण होणार असून पुष्पनगर येथील 29 हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. बंधाऱ्याची साठवणूक क्षमता 104.35 सहस्त्र घनमीटर असून पाण्याच्या साठवणूकीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास सुध्दा मदत होणार आहे.
      यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पनगर येथील सभा मंडपाचे लोकार्पण सुध्दा करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता विलास निखारे यांनी केले. उपस्थितांचे आभार सरपंच खोकन सरकार यांनी मानले. कार्यक्रमाला पुष्पनगर येथील बंगाली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                        00000


Saturday 26 November 2016

गोवारींचा अनुसूचित जमातीत समावेशासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री बडोले


निमगाव येथे समाज भवन भूमीपूजन
       गोवारी ही स्वतंत्र जात आहे. 1950 च्या सूचीत चुकीने गोंड गवारी असा उल्लेख आल्यामुळे घोळ झाला. गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
        25 नोव्हेंबर रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील निमगाव/बोंडगाव येथे 22 व्या स्थानिक शहीद गोवारी श्रध्दांजली कार्यक्रम व समाज भवनाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, जि.प.सदस्य कमल पाउलझगडे, सरपंच देवाजी डोंगरे, सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, उपसरपंच विलास गायकवाड, तहसिलदार श्री.बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, पोलीस निरिक्षक श्री.बंडगर, संजय कापगते, आदिवासी गोवारी संघटना महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष एम.आर.चचाणे, प्रमोद पाउलझगडे, बळीराम गोबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       पालकमंत्री श्री.बडोले म्हणाले, गोवारींचा समावेश आदिवासी जमातीमध्ये व्हावा यासाठी अभ्यास गटामध्ये समाजाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. संशोधन प्रक्रियेत समाजाचे प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. बैठक घेवून मार्ग काढता येईल. राज्य शासन आपल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी श्रीमती गहाणे यांनीही मार्गदर्शन केले. श्री.चचाणे यांनी गोवारींच्या समस्या, गोवारी बांधव आदिवासी असल्याचे सांगून त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत करावा अशी मागणीही त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी 22 व्या स्थानिक शहीद गोवारी श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला. शहीद स्मारकाला मान्यवरांनी पुष्प वाहिली. गोवारी समाज भवनाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले.
      कार्यक्रमाला निमगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी, गोवारी समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक एम.आर.चचाणे यांनी केले. संचालन उमेश ठाकरे यांनी, तर उपस्थितांचे आभार आनंदराव येसनसुरे यांनी मानले.
            

सर्व रस्त्यांची कामे सन 2019 पर्यंत पूर्ण करणार - राजकुमार बडोले



खांबी येथे रस्त्याचे व सभा मंडपाचे भूमीपूजन
     जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यात  2 हजार सिंचन विहिरी बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेवून धान खरेदी केंद्र ऑनलाईन करण्यात आले आहे. विकासाच्या दृष्टीने रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे सन 2019 पर्यंत नियोजनातून पूर्ण करणार. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        25 नोव्हेंबर रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील खांबी येथे इटखेडा-निमगाव-खांबी-इंजोरी व बाक्टी रस्त्याची सुधारणा आणि जि.प.शाळेतील सभा मंडपाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य कमल पाउलझगडे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, सा.बां.कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, तहसिलदार श्री.बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, उपविभागीय अभियंता श्री.क्षत्रीय, प्रकाश लांजेवार, सरपंच शारदा खोटेले, माजी सरपंच वासुदेव खोटेले, नारायण भेंडारकर, नेमीचंद मेश्राम, चामेश्वर गहाणे यांची मंचावर उपस्थिती होती.
        श्री.बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर्वांना 2019 पर्यंत घरे देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतला असून इंदिरा आवास योजना, शबरी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी योजनेतून ही घरे बांधण्यात येणार आहे. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 100 रुपयांची वाढ करुन आता ती महिन्याला 700 रुपये अशी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
        जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल करण्यात येईल असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करुन सिंचन क्षमतेत वाढ होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         श्रीमती गहाणे म्हणाल्या, एखादया क्षेत्राची प्रगती ही टप्प्याटप्प्याने होत असते. प्रगतीच्या दृष्टीने योजना राबवितांना सरपंच, पं.स.सदस्य, जि.प.सदस्य आणि ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. पालकमंत्री बडोले यांना जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे निश्चितच विकासाला चालना मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
         सभापती शिवणकर म्हणाले, खांबीच्या विकासाच्या दृष्टीने टप्प्या टप्प्याने कामे करण्यात आली आहे. यापुढेही खांबीच्या विकासासाठी आपले पूर्ण सहकार्य राहणार असून या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा लवकरच सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य कमल पाउलझगडे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनीही मार्गदर्शन केले.

       पालकमंत्र्यांच्या हस्ते खांबी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात सभा मंडपाचे भूमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला खांबी ग्रामपंचायत, ग्राम शिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या तीन वर्षात नियोजनातून विकास कामे करणार - पालकमंत्री बडोले



2 कोटी 49 लक्षाच्या पुलाचे भूमीपूजन
         जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी पंपांचा पुरवठा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पांदण रस्त्यांची कामे, सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येतील. ही विकास कामे येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी नियोजन करणार असल्याचे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
        25 नोव्हेंबर रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील सावंगी-पळसगाव रस्त्यावरील शशिकिरण नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य माधुरी पातोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, सावंगी सरपंच दिगांबर चाटोरे, पळसगाव सरपंच उषा वलके, उपसरपंच शेरखा पठाण, सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, पोलीस पाटील धृवा बंसोड, परमानंद बडोले यांची उपस्थिती होती.  
       श्री.बडोले पुढे म्हणाले, या पुलाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. भूमीपूजनामुळे लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे कामही करण्यात येईल. तसेच डव्वा, घोटी, पळसगाव-डव्वा, चिरचाळ-सौंदड, कोदामेडी-शिवणी-गिरोली/हेटी या रस्त्यांची कामेही याच योजनेतून लवकरच पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
       सार्वजनिक बांधकाम (राज्य) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद या दोन्ही विभागाची उपविभागीय अधिकारी कार्यालये सडक/अर्जुनी येथे आपल्याच प्रयत्नामुळे सुरु झाली असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, या कार्यालयामुळे ग्रामीण विकासाला गती मिळणार आहे. समाधान शिबिराच्या माध्यमातून सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव आणि गोरेगाव तालुक्यातील नागरिकांची व लाभार्थ्यांचे विविध प्रकारचे 70 हजार दाखले, प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात 2 हजार धडक सिंचन विहिरी बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी माधुरी पातोडे व सोनाली चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
       शशिकिरण नदीवर सावंगी-पळसगाव रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या या पुलावर 2 कोटी 49 लक्ष 96 हजार रुपये खर्च येणार असून 140 मीटरच्या या पुलाचे बांधकाम 18 महिन्यात पूर्ण करणे अपेक्षीत आहे.
       कार्यक्रमाच्या यश्स्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी प्रकाश लांजेवार, श्री.देशमुख यांनी परिश्रम घेतले. यावेळी सावंगी, पळसगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत गहाणे यांनी केले. संचालन पराग कापगते यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरपंच चाटोरे यांनी मानले.
            

Saturday 19 November 2016

100 टक्के मतदान भंडारा-गोंदिया विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक • दोन जिल्हयात चार ठिकाणी मतदान • 387 मतदारांनीही केले मतदान • मतदान प्रक्रीया वेबकास्टद्वारे लाईव्ह





गोंदिया,दि.19 : भंडारा-गोदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी 19 नोव्हेंबर रोजी  मतदान झाले. भंडारा जिल्हयातील भंडारा तहसिल कार्यालयातील मतदान केंद्रात 150, साकोली तहसिल कार्यालय येथील मतदान केंद्रात 38, गोंदिया जिल्हयातील गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीतील मतदान केंद्रात 142 आणि सडक/अर्जुनी तहसिल कार्यालयातील मतदान केंद्रात 57 मतदार अशा एकूण 387 मतदारांनी  सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान केले.  
भंडारा जिल्हयातील भंडारा येथील मतदान केंद्रावर 79 पुरुष आणि 71 स्त्री मतदार, साकोली येथील  केंद्रावर 19 पुरुष आणि 19 स्त्री मतदार, गोंदिया मतदान केंद्रावर 70 पुरुष आणि 72 स्त्री मतदार आणि सडक/अर्जुनी केंद्रावर 30 पुरुष व 27 स्त्री मतदारांनी मतदान केले. यामध्ये 198 पुरुष व 189 स्त्री मतदारांचा यामध्ये समावेश आहे. अशा एकूण 387 मतदारांनी  सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळेत मतदान केले. मतदानाची टक्केवारी 100 इतकी आहे. 
निवडणूक निरिक्षक ए.एल. जऱ्हाड यांनी भंडारा व गोंदिया जिल्हयातील चारही मतदान केंद्राला भेट देवून मतदान प्रक्रियेची पाहणी केली. या निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भंडारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोंदिया निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी काम पाहिले. तर   भंडारा येथे  मतदान अधिकारी म्हणून  भंडारा तहसिलदार  संजय पवार, साकोली येथे तहसिलदार राजीव शक्करवार, गोंदिया येथे तहसिलदार अरविंद हिंगे व सडक/अर्जुनी येथे तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी  काम पाहिले.
भंडारा, गोदिया जिल्हयातील चारही  मतदान केंद्र  वेबकास्टद्वारे कनेक्ट करण्यात आले होते. त्यामुळे भंडारा आणि गोंदियाच्या संकेतस्थळावरुन मतदान प्रक्रिया संगणक, लॅपटॉप, टॅबलेट व ॲन्ड्राईड मोबाईलवर लाईव्हपणे पाहता आली. निवडणूकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भंडारा पोलीस अधिक्षक विनिता साहू व गोंदिया पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या नेतृत्वात मतदान केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त   लावण्यात आला होता.

00000