जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 27 November 2016

बंगाली बांधवांचे प्रश्न सोडविणार - पालकमंत्री बडोले पुष्पनगर येथे साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन



गोंदिया,दि.27 : बंगाली बांधवांच्या शेतीला काही प्रमाणात सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी लवकरच साठवण बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास येणार आहे. बंगाली शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. बार्टीच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन बंगाली बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल. यासह बंगाली बांधवांच्या अन्य प्रश्नांची देखील सोडवणूक करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
       अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पुष्पनगर येथे 25 नोव्हेंबर रोजी साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन व सभा मंडपाचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ.दयाराम कापगते होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कासीम जामा कुरेशी, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, जि.प.माजी सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, लघु सिंचनचे कार्यकारी अभियंता विलास निखारे, तहसिलदार श्री.बांर्बोडे, गट विकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच खोकन सरकार, उपसरपंच सचिन घरामी, नंदू गहाणे, दशरथ गहाणे, केवलराम पुस्तोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       श्री.बडोले यावेळी म्हणाले, इटियाडोह प्रकल्पावरील पाणी वाटप संस्था योग्यप्रकारे काम करीत नसल्याच्या तक्रारी येत आहे. पुष्पनगर येथील शाळा डिजीटल करण्यात येईल. इथल्या ग्रामस्थांना समाज कल्याण विभागाच्या विविध महामंडळामार्फत कर्ज देण्यात येईल. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी धान खरेदी केंद्र लवकर सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.कापगते म्हणाले, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे. साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीनंतर पुष्पनगर बंगाली शेतकरी बांधवांनी सिंचनासाठी इथल्या पाण्याचा चांगल्याप्रकारे वापर करुन आर्थिक समृध्दीकडे वाटचाल करावी असेही सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनीही मार्गदर्शन केले.
       लघुसिंचन (जलसंधारण) विभागामार्फत हे काम करण्यात येणार असून पुष्पनगर जवळून वाहणाऱ्या तोंड्या नाल्यावर हा साठवणूक बंधारा बांधण्यात येणार असून यावर 67 लाख 50 हजार लक्ष रुपये खर्च होणार आहे. या बंधाऱ्याचे काम 18 महिन्यात पूर्ण होणार असून पुष्पनगर येथील 29 हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. बंधाऱ्याची साठवणूक क्षमता 104.35 सहस्त्र घनमीटर असून पाण्याच्या साठवणूकीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास सुध्दा मदत होणार आहे.
      यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पनगर येथील सभा मंडपाचे लोकार्पण सुध्दा करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता विलास निखारे यांनी केले. उपस्थितांचे आभार सरपंच खोकन सरकार यांनी मानले. कार्यक्रमाला पुष्पनगर येथील बंगाली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                        00000


No comments:

Post a Comment