जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 26 November 2016

येत्या तीन वर्षात नियोजनातून विकास कामे करणार - पालकमंत्री बडोले



2 कोटी 49 लक्षाच्या पुलाचे भूमीपूजन
         जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी पंपांचा पुरवठा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पांदण रस्त्यांची कामे, सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येतील. ही विकास कामे येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी नियोजन करणार असल्याचे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
        25 नोव्हेंबर रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील सावंगी-पळसगाव रस्त्यावरील शशिकिरण नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य माधुरी पातोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, सावंगी सरपंच दिगांबर चाटोरे, पळसगाव सरपंच उषा वलके, उपसरपंच शेरखा पठाण, सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, पोलीस पाटील धृवा बंसोड, परमानंद बडोले यांची उपस्थिती होती.  
       श्री.बडोले पुढे म्हणाले, या पुलाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. भूमीपूजनामुळे लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे कामही करण्यात येईल. तसेच डव्वा, घोटी, पळसगाव-डव्वा, चिरचाळ-सौंदड, कोदामेडी-शिवणी-गिरोली/हेटी या रस्त्यांची कामेही याच योजनेतून लवकरच पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
       सार्वजनिक बांधकाम (राज्य) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद या दोन्ही विभागाची उपविभागीय अधिकारी कार्यालये सडक/अर्जुनी येथे आपल्याच प्रयत्नामुळे सुरु झाली असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, या कार्यालयामुळे ग्रामीण विकासाला गती मिळणार आहे. समाधान शिबिराच्या माध्यमातून सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव आणि गोरेगाव तालुक्यातील नागरिकांची व लाभार्थ्यांचे विविध प्रकारचे 70 हजार दाखले, प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात 2 हजार धडक सिंचन विहिरी बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी माधुरी पातोडे व सोनाली चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
       शशिकिरण नदीवर सावंगी-पळसगाव रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या या पुलावर 2 कोटी 49 लक्ष 96 हजार रुपये खर्च येणार असून 140 मीटरच्या या पुलाचे बांधकाम 18 महिन्यात पूर्ण करणे अपेक्षीत आहे.
       कार्यक्रमाच्या यश्स्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी प्रकाश लांजेवार, श्री.देशमुख यांनी परिश्रम घेतले. यावेळी सावंगी, पळसगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत गहाणे यांनी केले. संचालन पराग कापगते यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरपंच चाटोरे यांनी मानले.
            

No comments:

Post a Comment