जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 14 November 2019

बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सवात रंगल्या मारुती चितमपल्लींशी गप्पा

पर्यटन विकास महामंडळाचा पुढाकार



‘केशराचा पाऊस’ कार्यक्रमातून मांडला निसर्गानुभव
 गोंदिया म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला जिल्हा. गोंदिया वनराईने तर समृद्ध आहेच, सोबत वन्यजीवसृष्टीने देखील समृद्ध असा आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र तर या जिल्ह्याचा मुकुटमणी आहे. सोबतच जिल्ह्यात हाजराफॉल, इटीयाडोह, चोरखमारा, बोदलकसा, चूलबंद यासह अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व तीर्थक्षेत्रांना पर्यटकांनी भेट द्यावी आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील आहे.
तिरोडा तालुक्यातील निसर्गरम्य अशा बोदलकसा या जलाशयाच्या काठावर, गर्द वनराईत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांच्या निवासाच्या दृष्टीने सुदंर असे रिसॉर्ट बांधले आहे. निसर्गाच्या सानिध्यात बांधलेल्या या रिसॉर्टकडे आता पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अभ्यासू, लोकाभिमुख व प्रयोगशील अधिकारी अभिमन्यू काळे हे २ डिसेंबर २०१६ ते मे २०१८ या कालावधीत गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी गोंदिया महोत्सव, सेंद्रिय शेतीला चालना, वृक्षांना पेन्शन, स्वदेशी वृक्षांची लागवड आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. श्री. अभिमन्यू काळे यांच्या रूपाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला एक प्रयोगशील, निसर्ग व वन्यजीवप्रेमी सनदी अधिकारी मिळाल्यामुळे पर्यटन विकासाला गती मिळाली आहे. अनेक उपक्रम ते पर्यटकांसाठी राबवीत आहेत.
श्री. काळे यांच्या संकल्पनेतून ११ नोव्हेंबर रोजी बोदलकसा येथील पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टच्या परिसरात बोदलकसा जलाशयाच्या काठावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने पौर्णिमा महोत्सवाचे नाविन्यपूर्ण आयोजन करण्यात आले. पौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ, थोर वन्यजीव साहित्यिक तथा निसर्गमित्र मारुती चितमपल्ली यांच्याशी त्यांनी लिहिलेल्या ‘केशराचा पाऊस’ या पुस्तकावर आधारित निसर्गानुभावाच्या गप्पांची मैफिल चांगलीच रंगली. प्रसिद्ध निवेदिका श्रीमती कांचन संगीत यांनी घेतलेली श्री. चितमपल्ली यांची मुलाखत उपस्थित पर्यटक, विद्यार्थी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी व पत्रकारांना थेट निसर्गाच्या आणि वन्यजीवांच्या सानिध्यात घेवून गेली.
बोदलकसा येथे आयोजित करण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, संचालक दिलीप गावडे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक श्री. रामानुजम, वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, सिद्ध समाधी योग पुणेचे मनोज गोखले, पर्यटन विकास महामंडळाचे लेखाधिकारी श्री. कांबळे, वन्यजीवप्रेमी डॉ. राजेंद्र जैन, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर, वर्धा येथील मानद वन्यजीव रक्षक कौशल मिश्र, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या निसर्गानुभवाबाबत बोलताना श्री. चितमपल्ली म्हणाले की, मी ध्यानाचा अभ्यास केला आणि नियमित ध्यान करीत असल्यामुळे वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी या ध्यानाचा उपयोग झाला. रानम्हशीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, या म्हशी रानटीच आहेत, पण त्या म्हशीच्या प्रजातीमधील आहेत. लगतच्या छत्तीसगड राज्याच्या बस्तर जिल्ह्यातील घनदाट जंगलातून या म्हशींचे कळप गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात चरण्यासाठी येवून निघून जातात. मेळघाटात आदिवासी बांधव रानकंदाचे डोळे जमिनीत लावतात. पुढे त्या कंदाचा आकार घागरी एव्हढा होतो. दुष्काळाच्या काळात आदिवासी रानकंद खावून जगतो. त्यामुळे त्यांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी या रानकंदाची मदत होते, असे त्यांनी सांगितले.
केशराच्या पावसाच्या अनुभवाबद्दल बोलताना श्री. चितमपल्ली म्हणाले, या पावसाचा अनुभव घेण्यासाठी मेळघाटातील खोल जंगलात असलेल्या कोकटू येथील ब्रिटीशकालीन विश्रामगृहाच्या परिसरात जावे लागेल. डिसेंबर महिन्यात रात्री १ ते ३ वाजेदरम्यान या पावसाचा अनुभव घेता येतो. आपल्या अंगावरील कपड्यांवर केशरी रंगाचा सुगंधी पाऊस पडल्याचे दिसून येते. मेळघाटात १५० पेक्षा जास्त गावे रिठी अर्थात उजाड आहेत. या रिठी गावांचे वैशिष्ट्य म्हणजे या गावांत आता बोरांच्या झाडांचे वन आहे. रिठी गावांबाबत अधिक माहिती देतांना श्री. चितमपल्ली म्हणाले, ही गावे लहान असायची. गावातील लोकांकडे पाळीव जनावरे असायची. वाघ, बिबटे पाळीव जनावरांना मारून खायचे. या दहशतीमुळे ग्रामस्थ स्थलांतरित व्हायचे. गावे रिठी झाली की तेथे मोठ्या प्रमाणात उंदीर, घुशी व्हायच्या. मग उंदीर व घुशींना खाण्यासाठी कोल्ह्यांचे कळप तेथे जमा व्हायचे. उंदीर व घुशी खावून ते रात्रभर तेथेच झोपायचे. सकाळी जाताना कोल्ह्यांचे कळप तेथेच विष्टा टाकायचे. कोल्ह्यांनी खाल्लेली बोरे पचत नसल्याने त्यांच्या विष्टेतून प्रक्रिया होवून तिथेच बोरांच्या बिया बाहेर पडायच्या. त्यामुळे विष्टेतून पडलेले बी जसेच्या तसे तेथेच पडायचे आणि पहिल्या पावसात ते झपाट्याने उगवायचे.  विष्टेतून बियांवर प्रक्रिया झाल्यामुळे तिची उगवण क्षमता ही १०० टक्के असायची आणि झाड लगेच मोठे व्हायचे. यातूनच ही बोरींची जंगले वाढली. बोरीच वन जिथे दिसेल, ते निश्चित समजायचे की ते रिठी गाव आहे.
१२ ते १५ हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला, असे सांगून श्री. चितमपल्ली म्हणाले, त्या आधी तो कंद गोळा करून खात होता. शेती करण्यापेक्षा जंगलात राहून तो आनंदित जीवन जगायचा. वाघ, बिबट व अन्य जंगली हिंस्त्र प्राण्यांच्या भीतीपोटी गावं उठायची. ग्रामस्थांकडे असलेली थोडीथोडकी भांडीकुंडी घेवून ते दुसरे गाव बसवायचे. त्यांच्या गरजा नव्हत्या. अत्यंत साधी जीवनपद्धती त्यांची होती. पण प्रत्येक गावात पाण्यासाठी विहीर असायची. अस्वलाचा अभ्यास करण्यासाठी वनसेवेत असताना खूप प्रयत्न केल्याचे सांगून श्री. चितमपल्ली म्हणाले, या काळात आपला वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचा अभ्यास झाला. मात्र अस्वलाचा अभ्यास कोणी केला नाही. त्याचा अभ्यास व निरीक्षण करणे अत्यंत अवघड काम आहे. झाडावर मचाण बांधली तर तेथे अस्वल वर चढून हल्ला करण्याची भीती. जमिनीखाली खड्डा करून तेथे लपून बसून निरीक्षण करतो म्हटले तर अस्वलाला वास येण्याच्या भीतीमुळे तो वासाच्या दिशेने हाताच्या नखाने जमीन उकरून काढून हल्ला करण्याची भीती ही ठरलेली. त्यामुळे अस्वलाचा फारसा अभ्यास झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
लठ्ठू गुंडाविषयी माहिती देताना श्री. चितमपल्ली म्हणाले, तो शिकारी होता. तो अस्वलाची शिकार करायचा. एके दिवशी तो शिकारीला गेला आणि मादी अस्वलाची शिकार केली पण ती जखमी झाली आणि पळाली. नर आणि मादी अस्वल सोबत होते. मादी अस्वलावर झालेला हल्ला बघून नर अस्वलाने जखमी झालेल्या अस्वलाच्या जखमेवर झाडपाला लावल्याचे स्वतः डोळ्यांनी बघितल्याचे त्यांनी सांगितले. गोरिला, चिंपांजी यांचा अभ्यास अनेकांनी केला आहे. मात्र यांच्या सवयी व गुणधर्म अस्वलामध्ये नाही. अस्वल हा आक्रमक प्राणी आहे. तो मनुष्य प्राण्याला बघितले की क्रूर होवून हल्ला करतो. तो माणसाचे डोळे फोडतो, त्याची कवटी फोडतो. याचे कारण म्हणजे जेव्हा अस्वल हल्ला करतो, तेव्हा तो दोन पायांवर उभा होतो आणि माणसाच्या उंचीच्या समकक्ष उभा होवून तो चेहऱ्यावर, डोक्यावर हल्ला करतो. कारण त्याला माणसाचे तोंड आणि डोके दिसते. म्हणून तो डोळे फोडतो. डोके फोडतो आणि तेथून पसार होतो.
माणूस वाघाला किंवा बिबट प्राण्याला पाहून घाबरतो किंवा कुठल्याही रानटी प्राण्याला बघितले की घाबरतो. घाबरला की त्याचा वास त्या प्राण्याला येतो. ज्याअर्थी प्राण्याला त्याचा वास येतो, यावरून तो आपल्यासाठी घातक आहे, हे निश्चित झाल्यावर तो प्राणी हल्ला करतो. पर्यटक वन्यप्राणी बघण्यासाठी जंगलात जातात, तेव्हा पर्यटक चेहऱ्याला पावडर व कपड्यांवर अत्तर लावतात. कधी लसून जास्त प्रमाणात खावून जातात, याचा वास वन्यप्राण्यांना एक ते दीड किलोमीटरपर्यंत येतो. त्या वासामुळेच हे प्राणी जवळ येत नाहीत. आलाच तर वेळप्रसंगी हल्ला केल्याशिवाय राहत नाही. सापांबाबत अधिक माहिती देताना श्री. चितमपल्ली म्हणाले, जवळपास १०० ते १५० प्रकारचे साप आहेत. त्यामध्ये फक्त चार प्रकारचे सापच विषारी आहेत, ते आपल्याला ओळखता आले तर आपण कोणालाच मारणार नाही. नागाला आपण ओळखतो, तो केवळ फना काढत असल्यामुळे. शाळांमधून विद्यार्थ्यांना विषारी सापांची माहिती दिली पाहिजे. साप बदला घेतो, असे म्हणणे म्हणजे त्याची बदनामी करणे होय. तो बदला कधीच घेत नाही. वारुळाची रचना ही पिरॅमिड सारखी आहे. तिथे असलेल्या वातानुकूलित वातावरण असल्यामुळे सापांना अंडी देण्याचे व राहण्याचे ते एक सुरक्षित ठिकाण वाटते. साप चावला तर मंत्र तंत्र करू नये. लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावून वैद्यकीय उपचार करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
रानफुल आणि फुलपाखरांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामधून फुलपाखरांना अन्न मिळते. पावसाळ्याच्या दिवसात सह्याद्रीच्या जंगलात चिंचेच्या झाडावर काजवे येतात. जे नर काजवे आहेत, ते चमकतात. वन्यजीवसृष्टीच्या अभ्यासासाठी आपला जवळपास ४१ वर्षांचा कालावधी गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांपैकी काहींनी वन्यजीवसृष्टीबाबत असलेल्या कुतूहलाविषयी काही प्रश्न श्री. चितमपल्ली यांना केले. विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे हे बोदलकसा येथे आयोजित करण्यात आलेल्या पौर्णिमा महोत्सवाबाबत बोलताना म्हणाले, पर्यटन म्हणजे एखाद्या रिसॉर्टला जाणे, तिथे खाणे आणि आजूबाजूला फिरणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासोबतच आत्मिक उन्नती साध्य करणे, या दृष्टीने मनुष्य पर्यटन करतो. हे पर्यटन करताना महाराष्ट्रामध्ये जे थोर साहित्यिक आहेत, त्यांच्याद्वारे पौर्णिमेच्या रात्री साहित्य संस्कृतीचा पर्यटकांना आस्वाद देणे, ही संकल्पना पौर्णिमा महोत्सवाच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. मारुती चितमपल्ली यांच्यासारख्या ज्येष्ठ, ऋषितुल्य साहित्यिकांनी बोदलकसा येथील पर्यटकांना, रसिकांना, विद्यार्थ्यांना, वन्यजीवप्रेमींना तसेच पर्यावरण प्रेमींना त्यांच्या मुलाखतीतून एक प्रकारे मेजवानीच दिली आहे. भविष्यात पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पौर्णिमा महोत्सवाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा श्री. काळे यांनी यावेळी व्यक्त केली.
पौर्णिमा महोत्सवाला बोदलकसा येथे आलेले पर्यटक, गोंदिया येथील पत्रकार, शेजारच्या गावातील काही नागरिक, विद्यार्थी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वन्यजीव व पर्यावरण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहुल डोंगरे यांनी केले, उपस्थितांचे आभार श्री. कांबळे यांनी मानले.

Friday 8 November 2019

प्रधान सचिवांकडून अल्पसंख्यांक विकास योजनांचा आढावा



अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. शाम तागडे यांनी ८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याला भेट देवून नवेगावबांध येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ई. ए. हाश्मी, अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी मयूर अंदेलवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. उईके प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. तागडे म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षण विभागामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांचे प्रस्ताव परिपूर्ण असल्याची खात्री करावी व ते ऑनलाईन सादर करावेत. जिल्ह्यातील ज्या धार्मिक अल्पसंख्याक शाळांमधून ७० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशा शाळांना प्रशासनाने मदत करावी व या शाळांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच या संस्थांना आवश्यक ते अनुदान देण्याचे प्रस्ताव मागवून घेवून पुढील कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यात असलेल्या १५ मदरशांच्या आधुनिकीकरणाचे प्रस्ताव डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून मागवून घ्यावेत व या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देता येईल, यासाठी काम करण्यात यावे.
जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी तातडीने प्रस्ताव मागवून या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविण्यात यावा, असे सांगून श्री. तागडे म्हणाले,  जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाची वस्ती आहे, त्या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची योजना आहे. त्या योजनांचा लाभ या वस्त्यांना मिळवून देण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे. गोंदिया व तिरोडा नगरपरिषदासह जिल्ह्यातील नगरपंचायतींनी अल्पसंख्याक समाजाच्या विकासाचे प्रस्ताव सन २०१५-१६ व त्यानंतर पाठविलेले नाहीत. ते तातडीने पाठवावेत व जी कामे अल्पसंख्याक विकास विभागामार्फत मंजूर झालेली आहेत, ती तातडीने सुरु करावीत. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार १५ टक्के कर्ज प्रकरणे अल्पसंख्याक समाजासाठी बँकांनी मंजूर करावीत. त्यामुळे त्यांना रोजगार निर्मितीस मदत होईल व ते स्वावलंबी होण्यास मदत होईल, असेही श्री. तागडे यावेळी म्हणाले.

Sunday 3 November 2019

पिकाचे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला भरपाई मिळणार -पालकमंत्री डॉ. फुके



     
        गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. 3 नोव्हेंबर रोजी  पालकमंत्री डॉ. फुके यांच्या उपस्थीतीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे  नुकसानीच्या आढावा घेण्यात आला.या वेळीस डॉ. फुके बोलत होते.
          कृषी विभाग व विमा कंपनीला युध्दस्तरावर संयुक्त सर्व्हे करून बाधित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यास पीक विम्याचा लाभ देण्याचे निर्देश देऊन श्री.फुके म्हणाले,  नुकसान झालेला एकही शेतकरी पिक विमापासून वंचित राहता कामा नये. राज्य सरकारने नुकतेच 10 हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी जाहिर केली असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पीक नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पिकनिहाय भरपाई शेतकऱ्यांना निश्चित मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार सर्वश्री विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी एस.ई.ए. हाश्मी, निवासी उपजिल्हाधिकारी महेन्द्र पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
           प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.नाईनवाड यांनी यावेळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती दिली. तसेच बाधित शेतकऱ्यांकडून अर्ज घेण्याचे व पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले. कोरडवाहु शेतीला प्रति हेक्टर 6800/- तर सिंचनाखालील शेतीला 13600/- प्रति हेक्टर प्रमाणे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
               या बैठकीत पालकमंत्री डॉ. फुके यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली. कृषी विभागाने व विमा कंपनीने गावोगावी जाऊन शेतीच्या पीक नुकसानीचा सर्व्हे करून पिकाच्या नुकसानीची पाहाणी करावी.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची सुचना पालकमंत्री डॉ.फुके यांनी यावेळी केली. परतीच्या पावसामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देऊन हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्यांची समस्या ऐकून घ्यावी. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोहचली नसेल अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर जी.पी.एस. टॅग करुन (लाईव्ह लोकेशन) फोटो काढुन विमा कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले असल्याचे पालकमंत्री डॉ.फुके यांनी यावेळी सांगितले.
            या बैठकीला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नाइनवाड, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपदे, रविंद्र राठोड, तहसिलदार विनोद मेश्राम, प्रविण घोरुडे, शेखर पुनसे, राजेश भांडारकर, अप्पर तहसीलदार.ग्रामीण खडतकर ,कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.