जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 8 October 2016

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनजागृती आवश्यक - जिल्हाधिकारी काळे



वनाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वन्यजीवांची भुमिका महत्वाची आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
         आज 8 ऑक्टोबर रोजी गुजराती बालक मंदिर, रेलटोली गोंदिया येथे नागझिरा फाउंडेशन गोंदिया द्वारा आयोजित वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनी कार्यक्रमात उदघाटक म्हणून श्री.काळे बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकीरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एस.एस.कातोरे, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील, वन्यजीवप्रेमी डॉ.राजेंद्र जैन व सुनिल धोटे यांची उपस्थिती होती.
         श्री.काळे पुढे म्हणाले, गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यजीवसृष्टी आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वन्यजीवांची महत्वाची भूमिका असते.  त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन व वन्यजीवांच्या संरक्षणाची जनजागृती करण्यासाठी वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनी  उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करुन हा एक स्तुत्य उपक्रम आहे असेही त्यांनी सांगितले. वन्यजीवप्रेमी डॉ.राजेंद्र जैन व सुनिल धोटे यांनी स्वत:च्या कल्पकतेतून रेखाटलेली वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनी 8 ते 10 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार असून ही चित्रप्रदर्शनी पाहण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी अवश्य भेट दयावी असेही त्यांनी सांगितले.
         डॉ.भूजबळ म्हणाले, वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाद्वारे वन्यजीवांचे संरक्षण व पर्यावरणाचे संवर्धन यामध्ये वन्यजीवप्रेमी डॉ.राजेंद्र जैन व सुनिल धोटे यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या विधायक दृष्टीकोनाबद्दल व सातत्याने या क्षेत्रात विविध माध्यमाद्वारे करीत असलेल्या प्रयत्नांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
         कार्यक्रमास गुजराती शाळा समितीचे सचिव दिपमभाई पटेल, जगेश निमोनकर, रुपेश निंबार्ते, राकेश रज्जक, बी.जे.हॉस्पीटल नर्सींग कॉलेच्या विद्यार्थीनी, सेंट झेव्हीयर्स शाळेचे विद्यार्थी व अन्य शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                       

Friday 7 October 2016

वनहक्क कायदयाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी - परिमल सिंह


          वनहक्क कायदयाअंतर्गत ग्रामस्थांना त्यांचे अधिकार व हक्क मिळाले पाहिजे. त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेवून वनहक्क कायदयाबाबत जास्तीत जास्त ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचे काम यंत्रणांनी ग्रामस्थांना सहभागी करुन करावे. असे प्रतिपादन राज्यपालांचे उपसचिव परिमल सिंह यांनी केले.
            आज 7 ऑक्टोबर रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी कायदयाच्या (वनहक्क कायदा) अंमलबजावणीचा आढावा घेतांना श्री.परिमल सिंह बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री.परिमल सिंह पुढे म्हणाले, सामुहिक वन हक्कासाठी उपलब्ध रेकॉर्डसह अन्य पुरावेही असावे. या कायदयात काही प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. या कायदयाचा लाभ जास्तीत जास्त ग्रामस्थांना देण्यासाठी वनविभाग व उपविभागीय अधिकारी यांनी योग्य समन्वयातून काम करावे. मागणी केलेल्या क्षेत्रापेक्षा किती क्षेत्र कमी दिले आहे याची माहितीही सात दिवसाच्या आत उपलब्ध करुन दयावे.
            श्री.परिमल सिंह पुढे म्हणाले, अनेक प्रकरणे उपविभागीय पातळीवर आहेत. या प्रकरणांचे पुरावे सादर केले असतील तर त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करावी. अर्जुनी/मोरगाव तालुक्यात अपील प्रकरणे जास्त असल्यामुळे याकडे लक्ष दयावे. या कायदयाअंतर्गत जे हक्क आहेत परंतू ते ग्रामस्थांनी व व्यक्तींनी मागितलेली नाही ते सुध्दा त्यांच्याकडून मागविण्यात यावे. इतर नियमाप्रमाणे लागू असलेले हक्क सुध्दा त्यांना दयावे.
            सामुहिक वनहक्काबाबत भविष्याचा विचार करुन वन संसाधनाचे संरक्षण करावे असे सांगून श्री.परिमल सिंह म्हणाले, गौण वन उपजाचे ग्रामस्थांना हक्क दयावे. चराई, स्मशान भूमी, ढोर फोडण्याची जागा, तसेच वन क्षेत्रात असलेल्या मंदिरांची क्षेत्रेही निश्चित करावी. बफर क्षेत्रात येणाऱ्या गावांना देखील वनहक्क दिले आहेत. ज्या गावांमध्ये बांबू आहेत त्यावरसुध्दा लोकांना अधिकार दयावेत. पूर्वीपासून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करण्याचे काम या कायदयाअंतर्गत करण्यात येत आहे. जिल्ह्यात सामुहिक वनहक्क दावे जास्तीत जास्त प्रस्तावित होवून या कायदयांतर्गत काम झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी श्री.काळे म्हणाले, वन हक्क कायदयाअंतर्गत दावे सादर करणाऱ्यांना अपील करता आले पाहिजे. निस्तार पत्रक कायदयाप्रमाणे जे देय आहे ते अधिकार ग्रामस्थांना देण्यात यावे. या कायदयाने आपण ग्रामस्थांना हक्क व जबाबदारी देतो आहे. वनहक्क कायदयाबाबतची कार्यवाही करतांना काही अडचणी असल्यास त्या सांगाव्यात, असेही ते म्हणाले.
            उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी कायदयाची माहिती देतांना सांगितले की, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून 21739 दावे प्राप्त झाले असून त्यापैकी 16044 दावे मान्य करण्यात आले. प्रलंबीत दाव्यांची संख्या 1590 असून अमान्य केलेले दावे 4105 इतके आहे. उपविभागीय स्तरावरील समितीकडे 16044 दावे प्राप्त झाले असून समितीने 9396 दावे मान्य केले. जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त दाव्यांची संख्या 9396 असून मान्य केलेल्या दाव्यांची संख्या 8429 इतकी आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्य केलेले एकूण वनक्षेत्र 4811.231 हेक्टर इतके आहे. वाटप केलेल्या टायटल्सची संख्या 8429 इतकी आहे.
            ते पुढे म्हणाले, सामुहिक वन हक्क दाव्यामध्ये ग्रामपंचायतीकडून 1357 दावे प्राप्त झाले असून मान्य केलेल्या दाव्यांची संख्या 1251 आहे. उपविभागीय स्तरीय समितीकडे 1251 दावे प्राप्त असून 1100 दावे मान्य करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त 1100 दाव्यांपैकी 843 दावे मान्य करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्य केलेले वनक्षेत्र 38673.56 हेक्टर इतके आहे. प्राप्त प्रकरणापैकी निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांची टक्केवारी 59 इतके असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            सभेला उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, मानव विकास मिशनच्या जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भूत, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज, उपविभागीय अधिकारी सर्वश्री मोहन टोणगावकर, सुनिल सूर्यवंशी, के.डी.मेश्राम, विठ्ठल परळीकर, सहायक वनसंरक्षक श्री.बिसेन, श्री.शेन्डे, तहसिलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, जिल्हा व्यवस्थापक वनहक्क अविनाश सेटीये, तसेच तालुका व्यवस्थापक वनहक्क यांची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी मानले.

वन्यजीव सप्ताहाचा समारोप वन्यजीव सृष्टीच्या संरक्षणाचे चांगले काम गोंदियात - जिल्हाधिकारी काळे


गोंदिया जिल्हा वनराई व वन्यजीवसृष्टीने समृध्द आहे. जिल्हयात मोठ्या प्रमाणात वन्यजीवसृष्टी आहे. या वन्यजीवसृष्टीच्या संरक्षण आणि संवर्धनाचे चांगले काम वन्यजीव, वनविभाग आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरुआहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
            1 ते 7 ऑक्टोबर दरम्यानच्या वन्यजीव सप्ताहाचा समारोप आज 7 ऑक्टोबर रोजी प्रताप लॉन येथे करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ हे होते. या मंचावर विशेष अतिथी म्हणून     नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकीरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, वन्यजीवप्रेमी डॉ.राजेंद्र जैन यांची उपस्थिती होती.
            अध्यक्ष म्हणून बोलतांना पोलीस अधिक्षक डॉ.भूजबळ म्हणाले, 1 जुलै रोजी जिल्हयात 2 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेला नागरिकांनी मोठे सहकार्य करुन वृक्ष लागवड केली. वन्यजीव सप्ताहात देखील विविध प्रकारचे चांगले कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वन्यजीव सप्ताह हा केवळ सात दिवसापुरता मर्यादीत न राहता वर्षभर साजरा करुन लोकसहभागातून वन्यजीवांचे व पर्यावरणाचे रक्षण करावे असेही ते म्हणाले.
            यावेळी आतेगाव येथील इको डेव्हलपमेन्ट समितीला वन्यजीव व पर्यावरण क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल एक लक्ष रुपयाचा पुरस्कार समितीचे अध्यक्ष मनीराम कळपते, उपाध्यक्ष सविता हरीणखेडे, कोषाध्यक्ष संजय हटवार, सचिव श्री.हटवार व सदस्य वसंत हटवार, मंगला कळपते, दयावंत मानकर, आनंदराव कोराम, रंजित कळपते जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आला. गोंदिया येथील मंगलम मुकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर पथनाट्य सादर केले. झाडीपट्टीची लोककला असलेली दंडार तिरोडा तालुक्यातील गांगला येथील ग्रुपने सादर केली. कलावंत जीवन लंजे यांनी तुमडी गीत सादर केले.
            यावेळी चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये रुची कापसे (प्रथम)- साकेत पब्लीक स्कुल गोंदिया, गुरुप्रीत ठकरानी (द्वितीय)- विवेक मंदीर गोंदिया, नवनीत प्राशर (तृतीय)- निर्मल इंग्लिश स्कुल गोंदिया. प्रश्न मंजूषा स्पर्धेमध्ये प्रथम- गुजराती नॅशनल हायस्कुल  गोंदिया, द्वितीय- मनोहर मुन्सीपल हायस्कूल गोंदिया, तृतीय- साकेत पब्लीक स्कुल गोंदिया. गोंदिया निसर्ग मंडळाने आयोजित केलेल्या कोलार्ज चित्रकला स्पर्धेत प्रथम- हितेश यादव, द्वितीय- भाविका करंजेकर, तृतीय- हुमीरा कच्छी व साक्षी नंदेश्वर. साकोली येथील एम.बी.पटेल कॉलेजने आयोजित केलेल्या फेस पेंटिंग स्पर्धेत प्रथम- रोहिणी बोरकर व प्रियंका अमृतवार, द्वितीय-हुमेरा सैय्यद व नेहा हटवार, तृतीय- तेजस्वीनी मारवाडे व तेजस्विनी बोरकर यांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देण्यात आले.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातपुडा फांऊडेशनचे मुकुंद धूर्वे, सलीमकुमार धुर्वे, जीवराज सलाम, हिरवळ संस्थेचे रुपेश निबांर्ते, प्रफुल जारोदे, डब्लूसीटीचे अंकुर काळी, न्यूज संस्थेचे श्री. खोडे, गोंदिया निसर्ग मंडळाचे संजय आकरे, अशोक पडोळे, नागझिरा फाऊंडेशनचे सुनिल धोटे, सेवा संस्थेचे सावन बहेकार, भरत जसानी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला साकेत पब्लीक स्कुल गोंदिया, सेंट झेवियर हायस्कुल गोंदिया, नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी व राजस्थान कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
            यावेळी विभागीय वनअधिकारी एस.एस.कातोरे, उपसंचालक उत्तम सावंत, सहायक वनसंरक्षक श्री.बिसेन, श्री. शेन्डे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वनपाल तसेच वनविभाग, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी केले. संचालन आनंद मेश्राम व मुकुंद धुर्वे यांनी केले. उपस्थितांचे आभार लागवड अधिकारी युवराज कुंभलकर यांनी मानले.
                       

Thursday 6 October 2016

सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा सारस महोत्सव 1 डिसेंबर 2016 ते 14 फेब्रुवारी 2017



गोंदिया निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला जिल्हा. तलावांचा आणि धान उत्पादकांचा जिल्हा म्हणूनही गोंदियाची ओळख. वन्यजीवांनी सुद्धा समृद्ध असलेल्या गोंदियाच्या आल्हाददायी वातावरणाची भुरळ अनेक प्रजातीच्या स्थलांतरीत व विदेशी पक्षांना घातली आहे. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या परिसरात मध्य पूर्व एशिया, मध्य युरोप, सायबेरिया, मंगोलीया, लेह, लद्दाख, इंडोनेशिया, पाकिस्तान, दक्षिणपूर्व आशिया, उत्तर युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण युरोप, पूर्व चीन, बांग्लादेश, मध्य आशिया व आखाती देशातून ग्रे लेग गुज, बार हेडेड गुज, कॉम्ब डक, कॉमन टेल, स्पॉट बिल्ट डक, नॉर्थन पिंटेल, नार्थन शॉवेलर, युरेशियन विंजेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड, फेरोजिनस पोचार्ड, इंडियन पिट्टा, कॉमन क्रेन, ग्रीन पोचार्ड, कस्टर्ड पोचार्ड यासारखे 350 च्यावर  विविध प्रजातीचे पक्षी जिल्ह्यातील विविध तलावांवर येतात. बार हेडेड गुज हा पक्षी तर उंच हिमालय ओलांडून जिल्ह्यात दाखल होतो. या पक्षांचा अधिवास हिवाळ्याच्या काळात हमखास असतो. माजी मालगुजारी तलावांच्या परिसरात असलेले देवधान, पाणवनस्पती व तलावातील किटक आवडीने खाण्यासाठी हे पक्षी जिल्ह्यात मोठ्या संख्येने दाखल होतात.
          पक्षांच्या या गर्दीत जिल्ह्याचे वैभव असलेला ऐश्वर्यसंपन्न सुंदर सारस पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. उडणारा मोठा व उंच पक्षी म्हणूनही सारस ओळखला जातो. त्याचे आकर्षक व रुबाबदार रुप बघणाऱ्यांची नजर खिळून ठेवते. सारस हे संस्कृत भाषेतील नाव, त्याचा अर्थ पाणपक्षी असा होतो. Grus antigone हे सारसाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाव देण्यात आलं आहे. आदिवासी गोंड समाजात पाच देवांची पुजा केली जाते. यामध्ये वाघ, घोडा, मोर, नाग व सारसाला देव म्हणून पूजण्यात येते.
          कवी कालिदासाच्या मेघदूत या काव्यात सारस कौंच असा सारस पक्षाचा उल्लेख केला आहे. 16 व्या शतकातील कलमकारी चित्रकारितेत सारस पक्षांच्या काढलेल्या चित्रांवरुन अनादी काळापासून सारस पक्षांचं आकर्षण होतं हे दिसून येते. गुजरात व राजस्थानमध्ये काही जमातीमध्ये नवदाम्पत्यांना सारस पक्षांच्या दर्शनासाठी पाठवून एकमेकांच्या सहवासातून प्रेम वृद्धीगत करण्याची जाणीव करुन दिली जाते.
          सारस पक्षाचं वैशिष्टय म्हणजे निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी एकत्र येऊन नर व मादी विशिष्ट आवाज करीत व पंख हलवून सुरेख नृत्य करीत आपल्या जोडीदारासाठी साद घालतात. जोडीदाराची एकदा निवड निश्चित केली की ते आयुष्यभर एकमेकांच्या सोबत एकनिष्ठ राहतात. जोडीदारापैकी एक जर का दगावला तर त्याच्या विरहानं दुसरा सुद्धा अन्नत्याग करुन प्राण त्यागतो, असे म्हणतात.
          झाडावर कधीच न बसणारा सारस पक्षी आपली घरटी जमीनीवरच बांधतो. मादी सारस ही जुलै ते ऑगस्ट या कालावधीत एक किंवा दोन अंडी देते. वैशिष्ट्यपूर्ण असलेला सारस राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावाजवळील परिसरात अरण्यपुत्र स्व.माधवराव पाटील डोंगरवार आणि वन्यजीव व पक्षी अभ्यासक मारोती चितमपल्ली यांनी 32 सारस पक्षांच्या जोड्या एकाचवेळी बघितल्याचे सांगितले जाते.
          नवेगावबांध तलाव परिसरासह जिल्ह्यातील अन्य भागात सुद्धा फार वर्षापासूनच सारस पक्षांचं अस्तित्व होतं. अलीकडे शेतकरी धान पिकासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करु लागल्यामुळे आणि शिकाऱ्यांचेही काही प्रमाणात लक्ष ठरल्यामुळे सारस आता नामशेष होऊ लागले आहे.
          उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, आसाम, पश्चिम बंगाल राज्यातील काही भागात सुद्धा सारस पक्षी अत्यल्प प्रमाणात आढळतो. अलिकडे जिल्ह्यातील बाघ, वैनगंगा नदीच्या खोऱ्यात, झिलमिली, परसवाडा आणि झालिया यासह अन्य तलाव परिसरात तसेच येथील काही धानाच्या शेतात सारस पक्षांचं अस्तित्व दिसून येते.                              जिल्ह्यात दुर्मिळ व हळूहळू नामशेष होत चाललेल्या जिल्ह्याचं वैभव असलेल्या ऐश्वर्यसंपन्न सुंदर सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा पक्षी व वन्यजीव प्रेमी माजी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी संकल्प केला. सारस संरक्षण आणि संवर्धनाची त्यांनी लोकचळवळ उभी केली. सारस बचावासाठी पुढाकार घेणारे शेतकरी, लोकप्रतिनिधी, पक्षी व वन्यजीव अभ्यासक, पक्षी व वन्यजीव प्रेमी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था यांच्या सहकार्यातून डॉ.सूर्यवंशी यांनी सारस महोत्सव-2015 चे आयोजन 15 डिसेंबर 2015 ते 31 जानेवारी 2016 या कालावधीत केले. 20 डिसेंबर रोजी हॉटेल गेट वे येथे या महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. यावेळी जिल्ह्याचे पालक सचिव डॉ.पी.एस.मीना, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम, मा.मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांचा, सरपंचाचा, वन्यजीव व पक्षीप्रेमींचा मान्यवरांच्या हस्ते सारसमित्र पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना सारसांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नित्यपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच सन्मानपत्र सुद्धा देण्यात आले.
          सारस महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम यांनी हौसी व वन्यजीव छायाचित्रकारांना छायाचित्र काढतांना कॅमेरा हाताळण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
          सारस संवर्धन व संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारस महोत्सवादरम्यान नवेगाव-नागझिरा फोटोशूट कॉम्पीटिशनचे आयोजन सुद्धा करण्यात आले. देशातील जवळपास 76 हौसी व वन्यजीव छायाचित्रकारांनी यामध्ये सहभाग नोंदविला. सारस महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सारस पक्षांबाबतची व जिल्ह्यातील जैवविविधतेची माहिती गोंदिया शहरातील व जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली.
          गोंदियातील सुभाष गार्डन येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स, चित्रकला स्पर्धा, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर भिंतीवर भित्तीचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
          जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी धकाते, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, वन्यजीवप्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने फिरुन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे समारोप करण्यात आला.
          सारस महोत्सवादरम्यान सारस पक्षांना बघण्यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.ए.बोबडे, प्रसिद्ध संगीतकार मिलींद-आनंद जोडीतील मिलींद श्रीवास्तव यांच्यासह अनेक पक्षीप्रेमी, वन्यजीवप्रेमी, विद्यार्थ्यांनी व पर्यटकांनी परसवाडा, झिलमीली तलावाच्या परिसराला भेट दिली.
          गोंदियाच्या वैभवात व पर्यटनात भर घालणाऱ्या सारसाच्या संरक्षण आणि संवर्धनाची लोकचळवळ डॉ.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनासाठी उभी झाली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव प्रकल्प तर पर्यटकांना भुरळ घालतोच पण सारस राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्यातच आढळत असल्याने गोंदिया ‘सारस डेस्टीनेशन’ स्थापीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
          ज्या शेतात सारसांचा अधिवास असतो त्या गावातील शेतकऱ्यांना धानपिकावरील रोगाच्या प्रतिबंधासाठी रासायनिक किटकनाशकाऐवजी आता जैविक किटकनाशकांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यामुळे सारसांची संख्या वाढण्यास मदत होत आहे. सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट मुंबईचे अंकुर काळी, सेवा संस्थेचे सावन बहेकार, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, सातपुडा फाऊंडेशनचे वन्यजीव अभ्यासक मुकूंद धुर्वे, गोंदिया निसर्ग मंडळाचे अध्यक्ष चेतन जसानी, संजय आकरे, मुनेश गौतम, त्र्यंबक जारोदे, हिरवळ बहुउद्देशीय संस्था रुपेश निंबार्ते, हौसी वन्यजीव छायाचित्रकार रवी गोलानी, डॉ.शिशीर कोल्हे, भरत जसानी, परसवाडाचे राहूल भावे, घाटटेमनीचे बबलु चुटे, यांचेसह संबंधित गावातील जैवविविधता समित्यांचे पदाधिकार व अन्य वन्यजीव व पक्षीप्रेमी परिश्रम घेत आहेत.                                                                                              सारस पक्षांच्या जिल्ह्यातील अस्तिवामुळे जिल्ह्यातील पर्यटनात भर पडली आहे. आज जिल्ह्यात जवळपास 60 ते 65 सारस पक्षांचा अधिवास असल्याचा अंदाज आहे. माजी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सारस संरक्षण आणि संवर्धनासाठी सारस महोत्सवाचे आयोजन करुन जिल्ह्यात सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे सुध्दा वन्यजीव व पक्षीप्रेमी असून यंदाचा सारस महोत्सव त्यांच्या नेतृत्वात 1 डिसेंबर 2016 ते 14 फेब्रुवारी 2017 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. सारस महोत्सवामुळे सारस पक्षांच्या संरक्षण व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहिल्यामुळे दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या सारस पक्षांची संख्या निश्चितच वाढण्यास मदत होणार आहे. पर्यटक व पक्षी अभ्यासक जिल्ह्यात या पक्षांना बघण्यासाठी येणार असल्यामुळे स्थानिकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. भविष्यात गोंदिया जिल्हा सारस पक्षांचा जिल्हा म्हणून नावरुपास येणार आहे, एवढं मात्र निश्चित.
                                                                                    - विवेक खडसे (मो.9423434308)
                                                 जिल्हा माहिती अधिकारी,
                                                 गोंदिया
                                                
                                                                               



Monday 3 October 2016

शोक सभा : अनेकांची उपस्थिती स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी मंत्री केवलचंद जैन यांचे देहदान




ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी राज्यमंत्री केवलचंद जैन यांचे काल    2 ऑक्टोबर रोजी वृध्दापकाळाने वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. आज 3 ऑक्टोबर रोजी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरुन नेहरु चौकात आणण्यात आले. यावेळी शोक सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ.नितीन राऊत हे होते. यावेळी माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकार, बंडूभाऊ सावरबांधे, आमदार राजेंद्र जैन, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार दिलीप बंसोड, माजी आमदार हरिहर पटेल, गोंदिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बाबा कटरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले, भंडारा जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, श्रीमती रजनी श्रीकांत जिचकार यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिक केवलचंद जैन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. खासदार नाना पटोले यांचा शोक संदेश अपुर्व अग्रवाल यांनी वाचून दाखविला.
          प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसिलदार अरविंद हिंगे यांनी केवलचंद जैन यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिली. यावेळी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, माजी आमदार रामरतन राऊत यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी बंदुकीने हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्या परिवारातील मुलगा, मुली, नातवंडे व मोठा आप्त परिवार उपस्थित होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांच्याकडे त्यांचे पार्थिव देहदानासाठी सोपविण्यात आले. शोक सभेनंतर त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचना शास्त्र विभागात नेण्यात आले.
          

Sunday 2 October 2016

बाबासाहेबांचे विचार आचरणात आणा - राजकुमार बडोले

भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  लिहिलेल्या संविधानावरच देशाची अर्थव्यवस्था सुरळीत सुरु आहे. आपल्याला समाजाची प्रगती करायची असेल तर बाबासाहेबांचे विचार आत्मसात करुन ते आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज (ता.2) महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्ताने गोंदिया येथील केमिस्ट भवनात आयोजित गीत-गायन संगीत महोत्सव कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री.बडोले बोलत होते. यावेळी नागपूर येथील लॉर्ड बुध्दा टीव्ही चॅनलचे संचालक राजु मून, लॉर्ड बुध्दा टीव्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी रतन वासनिक, ॲड.प्रज्ञा डोंगरे व ॲड.विरेंद्र जायसवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.बडोले पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाच्या दृष्टीने सर्वधर्म समभाव विचार समोर ठेवून आयुष्यभर काम केले. बाबासाहेबांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना समाजातील नागरिकांनी अविरत पुढे नेण्याचे काम करावे असे आवाजन करुन श्री.बडोले पुढे म्हणाले, तथागत गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा संदेश दिला. प्रज्ञा-शिल-करुणा आणि समता-स्वातंत्र-बंधुत्व या विचारांचा अवलंब केला. त्याग सहन करणारा तथागत गौतम बुध्दासारखा व्यक्ती आजपर्यंत या धर्तीवर जन्माला आला नाही आणि येऊ शकणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया येथून आलेल्या कलाकारांनी तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बहारदार गीत-गायनाचा कार्यक्रम सादर केला.
यावेळी पालकमंत्री श्री.बडोले यांच्या हस्ते प्रभुदास गजभिये, हर्षिला वैद्य, पुरुषोत्तम वासनिक, कृष्णा मेश्राम, अंकला माने, भास्कर गायकवाड, शुभांगी राऊत, वंदना शामकुवर, मिलिंद डोंगरे, ग्यानचंद जांभूळकर, हर्षदा गोंडाणे व हिना भराडे यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमास सुनिल आवळे, उत्तम नंदेश्वर, रमन रामादे, सुरेंद्र खोब्रागडे, अनिल सुखदेवे, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लॉर्ड बुध्दा चॅनलचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागझिरा अभयारण्यात वन्यजीव सप्ताह निमित्त प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा अभ्यास दौरा

पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वन्यजीवांची महत्वाची भूमिका आहे. त्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे आज काळाची गरज झाली आहे. वन्यजीवांच्या रक्षणाची जनजागृती करण्यासाठी राज्यात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
            वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून आज 2 ऑक्टोबर रोजी वन्यजीव विभागाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर यांच्या संकल्पनेतून गोंदिया येथील प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा अभ्यास दौरा नागझिरा अभयारण्यात आयोजित करण्यात आला.
            प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यात वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एस.एस.कातोरे, नागझिरा अभयारण्याचे उपसंचालक उत्तम सावंत, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहायक वनसंरक्षक नरेश खंडाते, वन्यजीव अभ्यासक मुकुंद धुर्वे, वनरिक्षेत्रीय अधिकारी श्री.वाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. नागझिरा अभयारण्यातील स्वागत कक्षात प्रसारमाध्यम प्रतिनिधींना आयोजित कार्यक्रमात वन्यजीव सप्ताहनिमित्त माहिती देण्यात आली.
            श्री.कातोरे यावेळी म्हणाले, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 व वन कायदयामुळे वन्य प्राण्यांचे व वनांचे संरक्षण होत आहे. डिसेंबर 2013 मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची निर्मिती करण्यात आली. यामध्ये वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, रानगवे, सांबर, चितळ, निलगाय, रानडुकरे, चौशिंगा, तडस, कोल्हा, माकडे यासारख्या 72 प्रजातींच्या वन्यप्राण्यांचा अधिवास असून साग, येन, बेहडा, हिरडा, जांभूळ यासह 364 प्रजातीच्या वनस्पती येथे आढळत असल्याचे सांगितले.
            ते पुढे म्हणाले, 6 सप्टेबर 2016 ला 12427 चौ.कि.मी. क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून गोंदिया व भंडारा जिल्ह्यतील 185 गावे या क्षेत्रात येतात. या गावांना प्रत्येकी 25 लाख रुपये अनुदान डॉ.शामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. आता अनेक गावांची मागणी त्यांना बफर क्षेत्रात घेण्यासाठी होत आहे. त्या गावातील मुलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, गावातील महिला बचतगटांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            उपसंचालक श्री.सावंत म्हणाले, व्याघ्र संरक्षण आणि निसर्ग संवर्धन हे मोठे विषय आहेत. यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. वाघाचे संवर्धन हा तांत्रिक विषय आहे. व्याघ्र राखीव क्षेत्राच्या काही समस्या आहेत. राज्यात 6 व्याघ्र राखीव प्रकल्प असून त्यापैकी 5 व्याघ्र राखीव प्रकल्प विदर्भात आहेत. वाघाचे अस्तित्व जंगलात राहावे यासाठी त्याच्या अधिवासाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वाघ हा संवर्धन चळवळीतील महत्वाचा भाग आहे. वन आणि वन्यजीव कायदे कडक असल्यामुळे वनांचे व वन्यजीवांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यात प्रा. एच.एच.पारधी, मनोज ताजने, अपुर्व मेठी, गोपाल अग्रवाल, खेमेंद्र कटरे, जयंत शुक्ला, संजय राऊत, हाजी अलताफ शेख, चक्रधर मेश्राम, सावन डोये, हरीश मोटघरे, माधव चंदनकर, ओमप्रकाश सपाटे, दिलीप लिल्हारे, निशांत कांबळे, मोहनचंद्र पवार व महेंद्र माने यांची उपस्थिती होती.