जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 2 October 2016

नागझिरा अभयारण्यात वन्यजीव सप्ताह निमित्त प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा अभ्यास दौरा

पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वन्यजीवांची महत्वाची भूमिका आहे. त्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे आज काळाची गरज झाली आहे. वन्यजीवांच्या रक्षणाची जनजागृती करण्यासाठी राज्यात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
            वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून आज 2 ऑक्टोबर रोजी वन्यजीव विभागाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर यांच्या संकल्पनेतून गोंदिया येथील प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा अभ्यास दौरा नागझिरा अभयारण्यात आयोजित करण्यात आला.
            प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यात वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एस.एस.कातोरे, नागझिरा अभयारण्याचे उपसंचालक उत्तम सावंत, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहायक वनसंरक्षक नरेश खंडाते, वन्यजीव अभ्यासक मुकुंद धुर्वे, वनरिक्षेत्रीय अधिकारी श्री.वाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. नागझिरा अभयारण्यातील स्वागत कक्षात प्रसारमाध्यम प्रतिनिधींना आयोजित कार्यक्रमात वन्यजीव सप्ताहनिमित्त माहिती देण्यात आली.
            श्री.कातोरे यावेळी म्हणाले, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 व वन कायदयामुळे वन्य प्राण्यांचे व वनांचे संरक्षण होत आहे. डिसेंबर 2013 मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राची निर्मिती करण्यात आली. यामध्ये वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, रानगवे, सांबर, चितळ, निलगाय, रानडुकरे, चौशिंगा, तडस, कोल्हा, माकडे यासारख्या 72 प्रजातींच्या वन्यप्राण्यांचा अधिवास असून साग, येन, बेहडा, हिरडा, जांभूळ यासह 364 प्रजातीच्या वनस्पती येथे आढळत असल्याचे सांगितले.
            ते पुढे म्हणाले, 6 सप्टेबर 2016 ला 12427 चौ.कि.मी. क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून गोंदिया व भंडारा जिल्ह्यतील 185 गावे या क्षेत्रात येतात. या गावांना प्रत्येकी 25 लाख रुपये अनुदान डॉ.शामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. आता अनेक गावांची मागणी त्यांना बफर क्षेत्रात घेण्यासाठी होत आहे. त्या गावातील मुलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण, गावातील महिला बचतगटांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            उपसंचालक श्री.सावंत म्हणाले, व्याघ्र संरक्षण आणि निसर्ग संवर्धन हे मोठे विषय आहेत. यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. वाघाचे संवर्धन हा तांत्रिक विषय आहे. व्याघ्र राखीव क्षेत्राच्या काही समस्या आहेत. राज्यात 6 व्याघ्र राखीव प्रकल्प असून त्यापैकी 5 व्याघ्र राखीव प्रकल्प विदर्भात आहेत. वाघाचे अस्तित्व जंगलात राहावे यासाठी त्याच्या अधिवासाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वाघ हा संवर्धन चळवळीतील महत्वाचा भाग आहे. वन आणि वन्यजीव कायदे कडक असल्यामुळे वनांचे व वन्यजीवांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यात प्रा. एच.एच.पारधी, मनोज ताजने, अपुर्व मेठी, गोपाल अग्रवाल, खेमेंद्र कटरे, जयंत शुक्ला, संजय राऊत, हाजी अलताफ शेख, चक्रधर मेश्राम, सावन डोये, हरीश मोटघरे, माधव चंदनकर, ओमप्रकाश सपाटे, दिलीप लिल्हारे, निशांत कांबळे, मोहनचंद्र पवार व महेंद्र माने यांची उपस्थिती होती.
                

No comments:

Post a Comment