जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 8 October 2016

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनजागृती आवश्यक - जिल्हाधिकारी काळे



वनाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वन्यजीवांची भुमिका महत्वाची आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
         आज 8 ऑक्टोबर रोजी गुजराती बालक मंदिर, रेलटोली गोंदिया येथे नागझिरा फाउंडेशन गोंदिया द्वारा आयोजित वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनी कार्यक्रमात उदघाटक म्हणून श्री.काळे बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकीरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एस.एस.कातोरे, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील, वन्यजीवप्रेमी डॉ.राजेंद्र जैन व सुनिल धोटे यांची उपस्थिती होती.
         श्री.काळे पुढे म्हणाले, गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यजीवसृष्टी आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वन्यजीवांची महत्वाची भूमिका असते.  त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन व वन्यजीवांच्या संरक्षणाची जनजागृती करण्यासाठी वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनी  उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करुन हा एक स्तुत्य उपक्रम आहे असेही त्यांनी सांगितले. वन्यजीवप्रेमी डॉ.राजेंद्र जैन व सुनिल धोटे यांनी स्वत:च्या कल्पकतेतून रेखाटलेली वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनी 8 ते 10 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार असून ही चित्रप्रदर्शनी पाहण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी अवश्य भेट दयावी असेही त्यांनी सांगितले.
         डॉ.भूजबळ म्हणाले, वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाद्वारे वन्यजीवांचे संरक्षण व पर्यावरणाचे संवर्धन यामध्ये वन्यजीवप्रेमी डॉ.राजेंद्र जैन व सुनिल धोटे यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या विधायक दृष्टीकोनाबद्दल व सातत्याने या क्षेत्रात विविध माध्यमाद्वारे करीत असलेल्या प्रयत्नांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
         कार्यक्रमास गुजराती शाळा समितीचे सचिव दिपमभाई पटेल, जगेश निमोनकर, रुपेश निंबार्ते, राकेश रज्जक, बी.जे.हॉस्पीटल नर्सींग कॉलेच्या विद्यार्थीनी, सेंट झेव्हीयर्स शाळेचे विद्यार्थी व अन्य शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                       

No comments:

Post a Comment