जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 2 October 2016

बाबासाहेबांचे विचार आचरणात आणा - राजकुमार बडोले

भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  लिहिलेल्या संविधानावरच देशाची अर्थव्यवस्था सुरळीत सुरु आहे. आपल्याला समाजाची प्रगती करायची असेल तर बाबासाहेबांचे विचार आत्मसात करुन ते आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज (ता.2) महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्ताने गोंदिया येथील केमिस्ट भवनात आयोजित गीत-गायन संगीत महोत्सव कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री.बडोले बोलत होते. यावेळी नागपूर येथील लॉर्ड बुध्दा टीव्ही चॅनलचे संचालक राजु मून, लॉर्ड बुध्दा टीव्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी रतन वासनिक, ॲड.प्रज्ञा डोंगरे व ॲड.विरेंद्र जायसवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.बडोले पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाच्या दृष्टीने सर्वधर्म समभाव विचार समोर ठेवून आयुष्यभर काम केले. बाबासाहेबांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना समाजातील नागरिकांनी अविरत पुढे नेण्याचे काम करावे असे आवाजन करुन श्री.बडोले पुढे म्हणाले, तथागत गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा संदेश दिला. प्रज्ञा-शिल-करुणा आणि समता-स्वातंत्र-बंधुत्व या विचारांचा अवलंब केला. त्याग सहन करणारा तथागत गौतम बुध्दासारखा व्यक्ती आजपर्यंत या धर्तीवर जन्माला आला नाही आणि येऊ शकणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया येथून आलेल्या कलाकारांनी तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बहारदार गीत-गायनाचा कार्यक्रम सादर केला.
यावेळी पालकमंत्री श्री.बडोले यांच्या हस्ते प्रभुदास गजभिये, हर्षिला वैद्य, पुरुषोत्तम वासनिक, कृष्णा मेश्राम, अंकला माने, भास्कर गायकवाड, शुभांगी राऊत, वंदना शामकुवर, मिलिंद डोंगरे, ग्यानचंद जांभूळकर, हर्षदा गोंडाणे व हिना भराडे यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमास सुनिल आवळे, उत्तम नंदेश्वर, रमन रामादे, सुरेंद्र खोब्रागडे, अनिल सुखदेवे, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लॉर्ड बुध्दा चॅनलचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment