जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 6 October 2016

सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा सारस महोत्सव 1 डिसेंबर 2016 ते 14 फेब्रुवारी 2017



गोंदिया निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला जिल्हा. तलावांचा आणि धान उत्पादकांचा जिल्हा म्हणूनही गोंदियाची ओळख. वन्यजीवांनी सुद्धा समृद्ध असलेल्या गोंदियाच्या आल्हाददायी वातावरणाची भुरळ अनेक प्रजातीच्या स्थलांतरीत व विदेशी पक्षांना घातली आहे. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या परिसरात मध्य पूर्व एशिया, मध्य युरोप, सायबेरिया, मंगोलीया, लेह, लद्दाख, इंडोनेशिया, पाकिस्तान, दक्षिणपूर्व आशिया, उत्तर युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण युरोप, पूर्व चीन, बांग्लादेश, मध्य आशिया व आखाती देशातून ग्रे लेग गुज, बार हेडेड गुज, कॉम्ब डक, कॉमन टेल, स्पॉट बिल्ट डक, नॉर्थन पिंटेल, नार्थन शॉवेलर, युरेशियन विंजेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड, फेरोजिनस पोचार्ड, इंडियन पिट्टा, कॉमन क्रेन, ग्रीन पोचार्ड, कस्टर्ड पोचार्ड यासारखे 350 च्यावर  विविध प्रजातीचे पक्षी जिल्ह्यातील विविध तलावांवर येतात. बार हेडेड गुज हा पक्षी तर उंच हिमालय ओलांडून जिल्ह्यात दाखल होतो. या पक्षांचा अधिवास हिवाळ्याच्या काळात हमखास असतो. माजी मालगुजारी तलावांच्या परिसरात असलेले देवधान, पाणवनस्पती व तलावातील किटक आवडीने खाण्यासाठी हे पक्षी जिल्ह्यात मोठ्या संख्येने दाखल होतात.
          पक्षांच्या या गर्दीत जिल्ह्याचे वैभव असलेला ऐश्वर्यसंपन्न सुंदर सारस पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. उडणारा मोठा व उंच पक्षी म्हणूनही सारस ओळखला जातो. त्याचे आकर्षक व रुबाबदार रुप बघणाऱ्यांची नजर खिळून ठेवते. सारस हे संस्कृत भाषेतील नाव, त्याचा अर्थ पाणपक्षी असा होतो. Grus antigone हे सारसाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाव देण्यात आलं आहे. आदिवासी गोंड समाजात पाच देवांची पुजा केली जाते. यामध्ये वाघ, घोडा, मोर, नाग व सारसाला देव म्हणून पूजण्यात येते.
          कवी कालिदासाच्या मेघदूत या काव्यात सारस कौंच असा सारस पक्षाचा उल्लेख केला आहे. 16 व्या शतकातील कलमकारी चित्रकारितेत सारस पक्षांच्या काढलेल्या चित्रांवरुन अनादी काळापासून सारस पक्षांचं आकर्षण होतं हे दिसून येते. गुजरात व राजस्थानमध्ये काही जमातीमध्ये नवदाम्पत्यांना सारस पक्षांच्या दर्शनासाठी पाठवून एकमेकांच्या सहवासातून प्रेम वृद्धीगत करण्याची जाणीव करुन दिली जाते.
          सारस पक्षाचं वैशिष्टय म्हणजे निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी एकत्र येऊन नर व मादी विशिष्ट आवाज करीत व पंख हलवून सुरेख नृत्य करीत आपल्या जोडीदारासाठी साद घालतात. जोडीदाराची एकदा निवड निश्चित केली की ते आयुष्यभर एकमेकांच्या सोबत एकनिष्ठ राहतात. जोडीदारापैकी एक जर का दगावला तर त्याच्या विरहानं दुसरा सुद्धा अन्नत्याग करुन प्राण त्यागतो, असे म्हणतात.
          झाडावर कधीच न बसणारा सारस पक्षी आपली घरटी जमीनीवरच बांधतो. मादी सारस ही जुलै ते ऑगस्ट या कालावधीत एक किंवा दोन अंडी देते. वैशिष्ट्यपूर्ण असलेला सारस राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावाजवळील परिसरात अरण्यपुत्र स्व.माधवराव पाटील डोंगरवार आणि वन्यजीव व पक्षी अभ्यासक मारोती चितमपल्ली यांनी 32 सारस पक्षांच्या जोड्या एकाचवेळी बघितल्याचे सांगितले जाते.
          नवेगावबांध तलाव परिसरासह जिल्ह्यातील अन्य भागात सुद्धा फार वर्षापासूनच सारस पक्षांचं अस्तित्व होतं. अलीकडे शेतकरी धान पिकासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करु लागल्यामुळे आणि शिकाऱ्यांचेही काही प्रमाणात लक्ष ठरल्यामुळे सारस आता नामशेष होऊ लागले आहे.
          उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, आसाम, पश्चिम बंगाल राज्यातील काही भागात सुद्धा सारस पक्षी अत्यल्प प्रमाणात आढळतो. अलिकडे जिल्ह्यातील बाघ, वैनगंगा नदीच्या खोऱ्यात, झिलमिली, परसवाडा आणि झालिया यासह अन्य तलाव परिसरात तसेच येथील काही धानाच्या शेतात सारस पक्षांचं अस्तित्व दिसून येते.                              जिल्ह्यात दुर्मिळ व हळूहळू नामशेष होत चाललेल्या जिल्ह्याचं वैभव असलेल्या ऐश्वर्यसंपन्न सुंदर सारस पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा पक्षी व वन्यजीव प्रेमी माजी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी संकल्प केला. सारस संरक्षण आणि संवर्धनाची त्यांनी लोकचळवळ उभी केली. सारस बचावासाठी पुढाकार घेणारे शेतकरी, लोकप्रतिनिधी, पक्षी व वन्यजीव अभ्यासक, पक्षी व वन्यजीव प्रेमी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था यांच्या सहकार्यातून डॉ.सूर्यवंशी यांनी सारस महोत्सव-2015 चे आयोजन 15 डिसेंबर 2015 ते 31 जानेवारी 2016 या कालावधीत केले. 20 डिसेंबर रोजी हॉटेल गेट वे येथे या महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. यावेळी जिल्ह्याचे पालक सचिव डॉ.पी.एस.मीना, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम, मा.मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांचा, सरपंचाचा, वन्यजीव व पक्षीप्रेमींचा मान्यवरांच्या हस्ते सारसमित्र पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना सारसांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नित्यपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच सन्मानपत्र सुद्धा देण्यात आले.
          सारस महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम यांनी हौसी व वन्यजीव छायाचित्रकारांना छायाचित्र काढतांना कॅमेरा हाताळण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
          सारस संवर्धन व संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारस महोत्सवादरम्यान नवेगाव-नागझिरा फोटोशूट कॉम्पीटिशनचे आयोजन सुद्धा करण्यात आले. देशातील जवळपास 76 हौसी व वन्यजीव छायाचित्रकारांनी यामध्ये सहभाग नोंदविला. सारस महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सारस पक्षांबाबतची व जिल्ह्यातील जैवविविधतेची माहिती गोंदिया शहरातील व जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली.
          गोंदियातील सुभाष गार्डन येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स, चित्रकला स्पर्धा, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर भिंतीवर भित्तीचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
          जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी धकाते, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, वन्यजीवप्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने फिरुन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे समारोप करण्यात आला.
          सारस महोत्सवादरम्यान सारस पक्षांना बघण्यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.ए.बोबडे, प्रसिद्ध संगीतकार मिलींद-आनंद जोडीतील मिलींद श्रीवास्तव यांच्यासह अनेक पक्षीप्रेमी, वन्यजीवप्रेमी, विद्यार्थ्यांनी व पर्यटकांनी परसवाडा, झिलमीली तलावाच्या परिसराला भेट दिली.
          गोंदियाच्या वैभवात व पर्यटनात भर घालणाऱ्या सारसाच्या संरक्षण आणि संवर्धनाची लोकचळवळ डॉ.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनासाठी उभी झाली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव प्रकल्प तर पर्यटकांना भुरळ घालतोच पण सारस राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्यातच आढळत असल्याने गोंदिया ‘सारस डेस्टीनेशन’ स्थापीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
          ज्या शेतात सारसांचा अधिवास असतो त्या गावातील शेतकऱ्यांना धानपिकावरील रोगाच्या प्रतिबंधासाठी रासायनिक किटकनाशकाऐवजी आता जैविक किटकनाशकांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यामुळे सारसांची संख्या वाढण्यास मदत होत आहे. सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट मुंबईचे अंकुर काळी, सेवा संस्थेचे सावन बहेकार, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, सातपुडा फाऊंडेशनचे वन्यजीव अभ्यासक मुकूंद धुर्वे, गोंदिया निसर्ग मंडळाचे अध्यक्ष चेतन जसानी, संजय आकरे, मुनेश गौतम, त्र्यंबक जारोदे, हिरवळ बहुउद्देशीय संस्था रुपेश निंबार्ते, हौसी वन्यजीव छायाचित्रकार रवी गोलानी, डॉ.शिशीर कोल्हे, भरत जसानी, परसवाडाचे राहूल भावे, घाटटेमनीचे बबलु चुटे, यांचेसह संबंधित गावातील जैवविविधता समित्यांचे पदाधिकार व अन्य वन्यजीव व पक्षीप्रेमी परिश्रम घेत आहेत.                                                                                              सारस पक्षांच्या जिल्ह्यातील अस्तिवामुळे जिल्ह्यातील पर्यटनात भर पडली आहे. आज जिल्ह्यात जवळपास 60 ते 65 सारस पक्षांचा अधिवास असल्याचा अंदाज आहे. माजी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सारस संरक्षण आणि संवर्धनासाठी सारस महोत्सवाचे आयोजन करुन जिल्ह्यात सारसांच्या संरक्षण आणि संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे सुध्दा वन्यजीव व पक्षीप्रेमी असून यंदाचा सारस महोत्सव त्यांच्या नेतृत्वात 1 डिसेंबर 2016 ते 14 फेब्रुवारी 2017 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. सारस महोत्सवामुळे सारस पक्षांच्या संरक्षण व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहिल्यामुळे दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या सारस पक्षांची संख्या निश्चितच वाढण्यास मदत होणार आहे. पर्यटक व पक्षी अभ्यासक जिल्ह्यात या पक्षांना बघण्यासाठी येणार असल्यामुळे स्थानिकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. भविष्यात गोंदिया जिल्हा सारस पक्षांचा जिल्हा म्हणून नावरुपास येणार आहे, एवढं मात्र निश्चित.
                                                                                    - विवेक खडसे (मो.9423434308)
                                                 जिल्हा माहिती अधिकारी,
                                                 गोंदिया
                                                
                                                                               



1 comment:

  1. aras is very unique migrated bird at Gondiya district. We should in cash it by way of promoting it. Recently MTDC opened new resort at Bodalkasa Dam which located near dam view and Sarounding is forest area. Those people want peace of mind they should vist to bodhalkas MTDC' Resort they can take safari of saras bird and also Nagzira wildlife Mangezari Entry Gate..

    ReplyDelete