जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 27 March 2017

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या चित्ररथाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ



सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती, गरजू व्यक्ती व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ 27 मार्च रोजी तिरोडा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आयोजित बचतगटाच्या महिला मुद्रा बँक योजना मेळाव्यात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
      आमदार विजय रहांगडाले, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी एच.एस.मानकर, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, उपनगराध्यक्ष सुनिल पालांदूरकर, पं.स.सदस्य श्री.अंबुले, पं.स.माजी सभापती बंडू सोनेवाने, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, मिडिया सोल्यूशन्सचे संचालक उमेश महतो यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      या चित्ररथावर शिशु गटामध्ये 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज, किशोर गटामध्ये 50 हजार ते 5 लक्ष रुपयापर्यंतचे कर्ज आणि तरुण गटामध्ये 5 लक्ष ते 10 लक्ष रुपयापर्यंतचे कर्ज या तीन गटातून देण्यात येणारी कर्ज सुविधा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, योजनेचे स्वरुप, या कर्जासाठी कोणतेही आनुषांगीक शुल्क नाही, सवलतीचे प्रक्रिया शुल्क, कमी व्याजदर, संयुक्तीक परतावा अवधी, मुद्रा कार्डाद्वारे खेळते भांडवली कर्ज ही या कर्जाची मुख्य वैशिष्ट्ये असून मुद्रा कटकटमुक्त आणि लवचिक, युनिटच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करते ही मुद्रा कार्डची वैशिष्टय असून मुद्रा कार्ड प्राप्त करा व आपला व्यवसाय वाढवा हा संदेशही या चित्ररथावर देण्यात आला असून केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व जास्तीत जास्त व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी 10 मिनिटांची चित्रफित, तसेच 3 ऑडिओ जिंगल्स या चित्ररथात असून अनेकांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यास हा आकर्षक चित्ररथ उपयुक्त ठरणार आहे.
        जिल्ह्यात 24 दिवस हा चित्ररथ विविध गावात भ्रमण करणार असून बसस्थानके, बँका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय, महत्वाचे चौक, महत्वाची शासकीय कार्यालय, आठवडी बाजार, तालुक्यातील महत्वाच्या गावामध्ये जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणी, गरजू व्यक्ती व महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यास चित्ररथाची महत्वाची भूमिका राहणार आहे.
                                                                 00000


बँकांनी बचतगटांच्या महिलांना मुद्रा योजनेतून स्वावलंबी करावे - राजकुमार बडोले

मुद्रा बँक योजना मेळावा व गृहपयोगी विक्री केंद्राचा शुभारंभ
मुद्रा योजना चित्ररथाचा शुभारंभ
    भित्तीपत्रक व पॉम्पलेटसचे विमोचन
ग्रामसंस्थांना निधी वाटप
 उत्कृष्ट बचतगटांचा सत्कार

       महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी बँकांनी आता बचतगटांच्या महिलांना वैयक्तिकरित्या मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      27 मार्च रोजी कायमस्वरुपी तालुका विक्री केंद्र तिरोडा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने बचतगटांच्या महिलांचा मुद्रा बँक योजना मेळावा व गृहपयोगी वस्तू विक्री केंद्राचे उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बडोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी एच.एस.मानकर, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, उपनगराध्यक्ष सुनिल पालांदूरकर, पं.स.सदस्य श्री.अंबुले, पं.स.माजी सभापती बंडू सोनेवाने, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, बचतगटांच्या महिलांना कर्ज देण्यासाठी बँकांची भूमिका आजही सकारात्मक दिसत नाही. राष्ट्रीयकृत बँकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे करण्याचे दिलेले उद्दिष्ट किती साध्य झाली आहेत याची माहिती बँकांनी उपलब्ध करुन दयावी. बँका मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असतील तर त्यांच्यावर निश्चित कार्यवाही झाली पाहिजे. बचतगटांच्या माध्यमातून मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसार शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       बँकेद्वारे वित्तीय व्यवस्था निर्माण होत असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, सर्वसामान्य माणसाला सक्षम करण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून करण्यात येत आहे, त्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने काम करावे. महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत बचतगटांचे तिरोडा तालुक्यात चांगले काम होत असल्याचे सांगून पालकमंत्री यावेळी म्हणाले, महिला बचतगटाने उत्पादीत केलेल्या वस्तू सर्वांनी खरेदी केल्या पाहिजे तरच बचतगटाने उत्पादित केलेल्या वस्तूला चांगली बाजारपेठ मिळेल. बचतगटाने उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकाना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        आमदार रहांगडाले म्हणाले, जिल्ह्यातील महिलांना स्वबळावर उभे करण्यासाठी जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळ काम करीत आहे. महिला सक्षमपणे आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. महिला बचतगटांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. महिला बचतगटांनी चांगले काम करुन तिरोडा तालुक्याचा विकासाला हातभार लावावा.
       मुद्रा बँक योजनेबाबत लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना कर्ज मिळवून देवून त्यांना स्वयंरोजगार करण्याची संधी उपलब्ध करुन दयावी असे सांगून आ.रहांगडाले म्हणाले, पुरुषाच्या यशस्वीतेत महिलांचीही साथ असते तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेच्या विकासासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ सहकार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.                                                                                                       श्रीवास्तव म्हणाले, मुद्रा बँक योजनेबाबत जिल्ह्यातील बँकांना जे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यापैकी 93 टक्के उद्दिष्ट 2017 पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्हा मुद्रा योजनेच्या कर्ज वाटप प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रत्येकाने आपले बचत खाते आधारकार्ड व मोबाईल नंबरशी जोडणे आवश्यक असल्याचे सांगून कॅशलेस व्यवहार करण्याबाबतचे महत्वही त्यांनी यावेळी विशद केले.
      यावेळी तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, माविमचे मोहन पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांनी परिसरात लावण्यात आलेल्या बचतगटाच्या विविध स्टॉलला भेट दिली. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या गृहपयोगी विक्री केंद्राचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.     
     पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील बँका, महत्वाच्या ग्रामपंचायती, तहसिल कार्यालय, पंचायत समिती व अन्य शासकीय कार्यालये अशा 300 ठिकाणी लावण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती असलेल्या फोमशीटचे, विविध आकारातील भित्तीपत्रकांचे व पॉम्पलेटसचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
     विविध स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या युक्ती ग्रामसंस्था खेडेपार, संजीवनी ग्रामसंस्था जमुनीया, नवचेतना ग्रामसंस्था अर्जुनी यांना प्रत्येकी 3 लक्ष रुपये तर प्रेरणा ग्रामसंस्था भिवापूर, स्वावलंबन ग्रामसंस्था सातोना यांना प्रत्येकी 75 हजार रुपये जोखीम प्रवणता निधी, गौतमबुध्द ग्रामसंस्था वडेगाव, संबोधी ग्रामसंस्था वडेगाव, शारदा ग्रामसंस्था खोडगाव यांना प्रत्येकी 15 हजार रुपये फिरता निधी पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
      समृध्दी ग्रामसंस्था खुर्शीपार, तेजस्वीनी ग्रामसंस्था घाटकुरोडा व प्रगती ग्रामसंस्था गोबाटोला यांनी गावे हागणदारी मुक्त केल्याबद्दल बेलाटी येथील रमाबाई आंबेडकर बचतगट, कवलेवाडा येथील शिवानी बचतगट, बरबसपुरा येथील शुभलक्ष्मी बचतगट यांनी सर्वाधिक कर्ज घेतल्याबद्दल, उत्तम समुदाय साधन व्यक्ती म्हणून ठाणेगाव प्रभागच्या उर्मिला पटले, कवलेवाडा प्रभागच्या अरुणा डोंगरे, वडेगाव प्रभागच्या शारदा बघेले, अर्जुनी प्रभागच्या माया मराठे, सुकळी प्रभागच्या सुलोचना येळे, सेजगाव प्रभागच्या सिंधू भगत, सरांडी प्रभागच्या भाग्यश्री पटले यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात सर्वप्रथम नोंदणीकृत सुकळी येथील तेजप्रवाह लोकसंचालीत साधन केंद्राच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
      यावेळी स्वयंसहायता महिला बचतगटाचे 26 स्टॉल्स, प्रबुध्द विनायती कल्याणकारी संस्था फुलचूर(गोंदिया) यांचे सिकलसेल व हिमोग्लोबीन आरोग्य चाचणीचे स्टॉल व जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य स्टॉल लावण्यात आले होते. मेळाव्याला तिरोडा तालुक्यातील अनेक गावातील बचतगटांच्या महिला, ग्रामसंस्थेच्या पदाधिकारी, महिला बचतगटाच्या सहयोगीनी, पशु सखी, कृषी सखी, मत्स्य सखी, समुदाय साधन व्यक्ती सखी व इंटरनेट साथी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सहायक नियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक शिल्पा येळे, उपजिविका सल्लागार प्रितम पारधी, रेखा रामटेके, सारिका बंसोड, चित्रा कावळे, अनिता आदमने, विनोद राऊत, सुनिल पटले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन सनियंत्रण व मुल्यमापन समन्वयक सविता तिडके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.

00000

Friday 10 March 2017

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य भेट

      

        मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे 10 मार्च रोजी गोंदिया येथे खाजगी दौऱ्यानिमित्त बिरसी विमानतळ येथे आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री चौहान यांना राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारे ‘महाराष्ट्र अहेड’ या इंग्रजी मासिकाचा फेब्रुवारी 2017 चा अंक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी भेट म्हणून दिला. यासोबतच त्यांना शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाचा जानेवारी व फेब्रुवारी 2017 या महिन्यातील हिंदी लोकराज्य अंक सुध्दा भेट म्हणून दिले. जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे यांनी मासिक भेट देतांना याबाबतची थोडक्यात माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसिलदार अरविंद हिंगे, अप्पर तहसिलदार के.डी.मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.