जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 20 December 2016

आदर्श गावे निर्माण करा - राजकुमार बडोले

                                                हागणदारीमुक्तीसाठी संकल्प मेळावा
           गावे हागणदारीमुक्त झाली पाहिजे ही संकल्पना आपल्याला 21 व्या शतकात राबवावी लागते हे आपले दुर्दैव आहे. हागणदारीमुक्तीसाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. गावे हागणदारीमुक्त, डासमुक्त व कॅशमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून ही संकल्पना प्रत्यक्षात लोकांच्या सहभागातून राबवून जिल्ह्यात आदर्श गावे निर्माण करा, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने हागणदारीमुक्त गोंदिया जिल्हा संकल्प मेळाव्याचे आयोजन 20 डिसेंबर रोजी मयूर लॉन कटंगीकला येथे करण्यात आले होते, या मेळाव्याचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती विमल नागपूरे, कटंगीकलाच्या सरपंच कांता नागरीकर यांची उपस्थिती होती.
       पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, निर्मल झालेली व पुरस्कार मिळालेल्या गावांची आज दुर्दशा झालेली आहे. हागणदारीमुक्त ही संकल्पना केवळ कागदावर न राहता यासाठी मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. 31 मार्च 2017 पर्यंत आपला जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प यंत्रणांनी केल्याबद्दल सर्वांचे त्यांनी कौतुक केले. या मुक्तीसाठी पैशाची अडचण येणार नाही. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी हे गाव विकासाचे कणा आहेत. या सर्वांनी पुढाकार घेतला तर गावाचे निश्चित चित्र बदलेल असे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील किमान 10 पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास झाला तर यातून जिल्ह्याची आगळीवेगळी ओळख निर्माण करता येईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून येत्या तीन वर्षात गरजूंना घरकुले देण्यात येतील. शेतात येण्याजाण्याच्या व्यवस्थेसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून पांदण रस्त्यांची कामे करण्यात येतील. ग्रामपंचायतींनी 3 टक्के निधी हा दिव्यांग व्यक्तींवर खर्च करावा. पालकमंत्री आदर्श गावासाठी आपण व्यक्तीगत 50 हजार रुपये देणार आहोत. यातून एक आदर्श गाव उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
      येत्या 24 डिसेंबर रोजी मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक किर्तीच्या स्मारकाचे भूमीपूजन व जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शिवाजी महाराजांची जीवनमुल्ये याची माहिती देखील या स्मारकातून मिळणार आहे. हे स्मारक तीन वर्षात पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असून यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक आहे. रोजगार हमी योजनेतून देखील शौचालय बांधण्यात येतील. शौचालयाच्या बांधकामात कोणी अडचण निर्माण करत असतील तर त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येईल. मार्च 2017 पर्यंत आपला गोंदिया जिल्हा सर्वांच्या सहभागातून हागणदारीमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.                            खासदार पटोले म्हणाले, केंद्र सरकार ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबवित आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात काही अडचणी आल्यात, आता मात्र या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यात येतील. केवळ बक्षीसासाठी पुर्वी संडास बांधल्याचा देखावा व्हायचा, परंतू आज चित्र बदलले आहे. 12 हजार रुपयात मागेल त्याला संडास बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शौचालय बांधल्यास रोगराईला निश्चित आळा बसणार आहे. गावाच्या विकासाचे नियोजन गावपातळीवर लोकप्रतिनिधींनी करावे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
      आमदार रहांगडाले म्हणाले, गावाच्या विकासासाठी सरपंचाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जी गावे हागणदारीमुक्त झाली नाहीत तेथील सरपंचाने गावातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करावे. शौचालय बांधकामासाठी निधीची कमतरता नसून आवश्यकता पडल्यास जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गावांना हागणदारीमुक्त करुन जिल्ह्याचा नावलौकीक सरपंचांनी करावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा योग्य समन्वयातून काम करीत आहे. जिल्ह्यातील गावे डासमुक्त, कॅशमुक्त व हागणदारीमुक्त करण्यासाठी सभा घेण्यात आल्या आहेत. जी गावे हागणदारीमुक्त झालेली नाहीत ती गावे अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात आलेली आहेत. गावे कॅशलेस करण्यासाठी गावातील 100 कुटुंबासाठी एक कर्मचारी काम करणार असून तो कुटुंबाचे कॅशलेस व्यवहारासाठी बँक खाते हे मोबाईलला लिंक करणार आहे. विदर्भातील पहिला कॅशलेस जिल्हा करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
     प्रास्ताविकातून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पुलकुंडवार यांनी सांगीतले की, पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला सर्वोच्च स्थान दिले आहे. मानवी विकासाची सुरुवात ही स्वच्छतेपासून होते. मात्र याच बाबीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. स्वच्छतेचा शिवधनुष्य पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी उचलला असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांच्या समन्वयातून स्वच्छ भारत अभियानासाठी काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पी.जी.कटरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंचावर जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजेश देशमुख, राजकुमार पुराम यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भंडाराच्या कलावंतांनी स्वच्छ भारत अभियानावर नाटिका सादर करुन उपस्थितांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व तहसिलदार, अनेक गावातील सरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, रोजगार सेवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले व उपस्थितांचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी मानले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
00000
      
       




शिवछत्रपती महाराजांच्या स्मारक फ्लेक्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

            मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमीपूजन येत्या 24 डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
        या स्मारकाच्या जलपूजन व भूमीपूजनाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी शिवछत्रपतींचा आशीर्वाद आभाळाएवढ्या भव्यतेला समुद्राची साथ या वाक्यासह स्मारकाची सचित्र माहिती असलेल्या फ्लेक्सचे विमोचन 20 डिसेंबर रोजी मयूर लॉन कटंगीकला येथे एका कार्यक्रमात करण्यात आले.
        शिवछत्रपती शिवाजी महाराजांवरील स्मारक फ्लेक्स विमोचन प्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती विमल नागपूरे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, आमगाव पं.स.सभापती हेमलता डोये, गोंदिया पं.स.सभापती स्नेहा गौतम, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजेश देशमुख, राजकुमार पुराम, कटंगीच्या सरपंच कांता नागरीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        मान्यवरांच्या हस्ते गोंदिया तालुक्यातील कटंगीकला सरपंच कांता नागरीकर, ग्रामसेवक ए.सी.राणे, गोरेगाव तालुक्यातील मुददोली सरपंच सशेंद्र भगत, सचिव आर.एन.बहेकार, सडक/अर्जुनी तालुक्यातील घाडबोरी/तेलीचे सरपंच नाजुकराव झिंगरे, ग्रामसेवक श्रीमती एस.डी.मुंडे, सालेकसा तालुक्यातील बिजेपारच्या सरपंच श्रीमती नितु वालदे, ग्रामसेवक एस.बी.पटले, देवरी तालुक्यातील ढिवरीटोलाच्या सरपंच पुष्पा मडावी, ग्रामसेवक आर.बी.बोरसरे, तिरोडा तालुक्यातील बोदा येथील सरपंच महेंद्रसिंग चव्हाण, ग्रामसेवक ओ.के.रहांगडाले, आमगाव तालुक्यातील मुंडीपारच्या सरपंच माया उईके, ग्रामसेवक बी.एच.पटले आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील सिलेझरीचे सरपंच प्रकाश टेंभूर्णे, ग्रामसेवक जे.एस.नागलवाडे यांना या फ्लेक्सचे वितरण करण्यात आले.
       जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय तसेच पर्यटनस्थळे देखील हे फ्लेक्स लावून जास्तीत जास्त जणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमीपूजन व जलपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन या फ्लेक्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
                                                                 00000
       


वेलकम टू गोंदिया टेबल कॅलेंडर पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

         गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. तसेच जिल्ह्यात पुरातन धार्मिक स्थळे असून जिल्ह्यातील या पर्यटन व तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळांची सचित्र माहिती असलेले जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या वेलकम टू गोंदिया-2017 या रंगीत टेबल कॅलेंडरचे विमोचन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        हागणदारीमुक्त गोंदिया जिल्हा संकल्प मेळाव्याचे आयोजन 20 डिसेंबर रोजी कटंगीकला येथील मयूर लॉन येथे करण्यात आले, याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते या टेबल कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती विमल नागपूरे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, आमगाव पं.स.सभापती हेमलता डोये, गोंदिया पं.स.सभापती स्नेहा गौतम, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजेश देशमुख, राजकुमार पुराम, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, कटंगीच्या सरपंच कांता नागरीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       या टेबल कॅलेंडरमध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या नागझिरा, नवेगावबांध, इटियाडोह, हाजराफॉल, परसवाडा, चुलबंद, बोदलकसा, चोरखमारा तसेच तीर्थस्थळ असलेल्या नागरा, मांडोदेवी, कचारगड व तिबेटीयन कॅम्प याची सचित्र माहिती असून गोंदिया पासून या पर्यटन व तीर्थस्थळाचे अंतर दर्शविण्यात आले आहे. 2017 या वर्षात जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांना भेटी देण्यास येण्यासाठी या कॅलेंडरचा निश्चित उपयोग होणार आहे.
                                     पर्यटनस्थळ असलेल्या नागझिरा, नवेगावबांध, इटियाडोह, हाजराफॉल, परसवाडा, चुलबंद, बोदलकसा, चोरखमारा तसेच तीर्थस्थळ असलेल्या नागरा, मांडोदेवी, कचारगड व तिबेटीयन कॅम्प याची सचित्र माहिती असून गोंदिया पासून या पर्यटन व तीर्थस्थळाचे अंतर दर्शविण्यात आले आहे. 2017 या वर्षात जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांना भेटी देण्यास येण्यासाठी या कॅलेंडरचा निश्चित उपयोग होणार आहे.

                                                            

अरबी समुद्रात होणार शिवछत्रपतींचे भव्य स्मारक पालकमंत्री यांची पत्रपरिषदेत माहिती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई जवळच्या अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तीन वर्षात पूर्ण होणार असून येत्या 24 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे जलपूजन व भूमीपूजन होणार असल्याची माहिती पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
       कटंगीकला येथील मयूर लॉन येथे आज 20 डिसेंबर रोजी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या पत्रपरिषदेला जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती विमल नागपूरे, आमगाव पं.स.सभापती श्रीमती हेमलता डोये, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, गोंदिया पं.स.सभापती स्नेहा गौतम यांची उपस्थिती होती.
        पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, जगातील सर्वात उंच असे हे स्मारक राहणार असून राजभवनापासून जवळ असलेल्या समुद्रातील 15.96 हेक्टर बेटावर हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या जलपूजन व भूमीपूजनासाठी जिल्ह्यातील प्रतापगड, कचारगड येथील पवित्र माती व जिल्ह्यातील नदयांचे जल या कार्यक्रमासाठी  पाठविण्यात येणार आहे. राज्यातील 70 हून अधिक नदयांचे जल व गडकिल्‍ल्यांची माती या कार्यक्रमाला आणली जाणार असल्याचे सांगितले.
       आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभर फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याच्या वतीने हे अनोखे वंदन असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, राज्याच्या तेजस्वी व गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेवून प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे यासाठी 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करुन त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
      या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 192 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे प्रारंभी नियोजन होते. आता या पुतळयाची उंची 210 मीटर इतकी वाढविण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या स्मारकात महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अति महत्वाच्या व्यक्तींसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले.
       शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे सांगून बडोले यावेळी म्हणाले, हे स्मारक भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी देखील पर्यटनस्थळ असणार आहे. महाराजांची जीवनमुल्ये प्रदर्शीत करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
                                                

Tuesday 13 December 2016

धापेवाडा उपसा सिंचन योजनेची कामे तातडीने पूर्ण करा --- मुख्यमंत्री फडणवीस




                                                       
                                                             गोंदिया जिल्हा आढावा
          गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या धापेवाडा उपसा सिंचन योजनेची कामे तातडीने पूर्ण करुन जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली येईल याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
13 डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान भवनातील सभागृहात गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, आमदार सर्वश्री डॉ. परिणय फुके, गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, धापेवाडा उपसा सिंचन योजनेची कामे त्वरीत पूर्ण झाल्यास गोंदिया जिल्ह्यातील सर्वच आठ तालुके व भंडारा जिल्हयातील एक तालुका अशा एकूण नऊ तालुक्यातून जमीन सिंचनाखाली येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार किवा तिबार पिके घेण शक्य होणार आहे. जिल्हयातील अपूर्ण अवस्थेतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावे. चक्रीवादळाने ज्यांचे नुकसान झाले त्यांनाही मदत करणार असल्याचे ते म्हणाले. सिंचन प्रकल्प तयार करतांना यापुढे वन जमिनीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
रेतीघाटाच्या लिलावाबाबत व त्यामधून जास्त महसूल मिळण्याबाबत एखादे मॉडेल तयार करावे असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात गोंदियाने चांगले काम केले आहे. यात सातत्य कायम राखावे. शेतीत सिंचनासाठी कुठल्याही स्थितीत बोअरवेल देण्यात येणार नाही. संरक्षित सिंचनाची  सुविधा निर्माण व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही काही विहिरी तयार करण्यात याव्यात. ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार तयार व्हावीत यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीमधूनही निधी उपलब्ध करुन दयावा, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गोंदिया जिल्हयातील पोलिस वसाहतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा होण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. किमान आधारभूत किंमतीनुसार जिल्हयातील शेतकऱ्यांचे धान खरेदी केली नसल्यास याची चौकशी करुन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, यावर्षी धानाचे पिक चांगले झाले असून धानाचे गोदामे भरले आहे. काही धान उघड्यावर आहे. राईस मिलर्स धानाची भरडाई करण्यास तयार नसल्यामुळे यामधून मार्ग तातडीने काढावा. झांशीनगर उपसा सिंचन योजनेची कामे तातडीने  पूर्ण करावी. धापेवाडा सिंचन प्रकल्पाचा कामाला गती मिळावी, असेही ते म्हणाले.
श्री. पटोले म्हणाले, नवेगावबांध तलाव गाळाने भरल्यामुळे गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. रेतीघाटासाठी आंध्रप्रदेश पॅटर्न राबवावा. जिल्हयातील अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प युध्दपातळीवर पूर्ण झाले पाहिजे तसेच ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दयावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी  व्यक्त केली.
श्री.  अग्रवाल यांनी पिंडकेपार, डांगुर्ली सिंचन प्रकल्प  तातडीने पूर्ण झाला पाहिजे अशी मागणी केली. श्री. रहांगडाले यांनी निमगाव प्रकल्प त्वरीत पूर्ण झाला पाहिजे असे सांगितले. तर आ. पुराम यांनी बाघ नदिवर काही ठिकाणी बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आढावा बैठकीस सहकार विभागाचे अवर मुख्य सचिव एस.एस. संधू, मदत व पुनर्वसन विभागाच्या अवर मुख्य सचिव मालीनी शंकर, कृषी विभागाचे प्रधान  सचिव विजय कुमार, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, उर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामीण विकासाचे सचिव असिमकुमार गुप्ता, वन विभागाचे सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाच्या सचिव मनिषा-म्हैसकर, कृषी सचिव आप्पासाहेब जऱ्हाड, समाज कल्याणचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. काळे यांनी जिल्हयातील सिंचन प्रकल्पाच्या प्रगतीबाबत, कृषी पंप योजना, रमाई आवास, प्रधानमंत्री आवास व शबरी घरकुल योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, जलयुक्त शिवार अभियान, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण, पीक कर्ज वाटप, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, भूसंपादन व पुनर्वसन, सिंचन विहिरी कार्यक्रम, यासह जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती सादरीकरणातून केली. अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प व योजनांच्या पूर्णत्वासाठी नियोजन केले असल्याचेही यांनी सांगितले.
आढावा बैठकीला विविध विभागाचे प्रादेशिक विभाग प्रमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल-भूजबळ, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वश्री  गेडाम, ढोरे, छप्परघरे, निखारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांचेसह विविध यंत्रणाचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या सारस पक्षांवरील घडीपुस्तीकेचे विमोचन करण्यात आले. तसेच गोंडी चित्रकलेतून काढलेले गोंड चित्र मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. उपस्थिताचे आभार जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी मानले.

****





Sunday 11 December 2016

जिल्ह्यातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री बडोले



रावणवाडी येथे रस्त्याचे भूमीपूजन
            जिल्हयात शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे, महिलांचे अनेक प्रश्न आहे. अपूर्णावस्थेत असलेले सिंचन प्रकल्प यासह जिल्हयातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            11 डिसेंबर रोजी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथील त्रिमुर्ती चौकात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रावणवाडी, गर्रा, शिवणी, उमरी माकडी या 7.86 कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामाचे भूमीपूजन करतांना आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बडोले बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,  जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प.सदस्य विजय लोणारे, पंचायत समिती सदस्य प्रकाश डहाट, माधुरी हरिणखेडे, श्रीमती पटले, रावणवाडी सरपंच सुजीत येवले यांची उपस्थिती होती.
            पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, रावणवाडी येथील जिर्ण झालेली शाळेची इमारत प्राधान्याने बांधण्यात येईल. रावणवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेत ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. त्यांना न्याय देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. नवीन भूसंपादन कायदयानूसार त्या शेतकऱ्यांना मोबदला देता येईल का हे सुध्दा बघणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार अग्रवाल बोलतांना म्हणाले, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांना त्रास करावा लागत आहे. हे काम पूर्ण होताच रस्त्याची चांगली सुविधा उपलब्ध होईल. 16 वर्षापासून अपूर्णावस्थेत्‍ असलेल्या रजेगांव-काटी उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करुन बाधित शेतकऱ्यांना शासनाने न्याय मिळवून दयावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            श्रीमती मेंढे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या तसेच वैयक्तिक लाभांच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न आहे. रावणवाडी येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न तातडीने सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्रीमती गहाणे म्हणाल्या, जिल्हयात अनेक पर्यटन स्थळे आहे. दुर्मिळ अशा सारस पक्षांचे अस्तीत्व केवळ रावणवाडीच्या भागातील परसवाडा, झिलमिली परिसरात आहे. जनसुविधा, दलीत वस्ती विकास, आदिवासी विकास, यासह अनेक योजना शासन राबवित असून यासाठी जिल्हयाकरीता जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचे काम पालकमंत्री करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्री विनोद अग्रवाल म्हणाले, जिल्हयातील ग्रामीण भागात जेथील रस्ते खराब आहेत तेथील सर्व रस्ते चांगल्या दर्जातून तयार करण्याचे काम या योजनेतून करण्यात येईल. कटंगीटोला प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे. त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी सरपंच येवले यांनी विविध समस्या यावेळी मांडल्या. जि.प.सदस्य विजय लोणारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व उपस्थितांचा आभार कार्यकारी अभियंता जी.जी.नंदनवार यांनी मानले. कार्यक्रमाला रावणवाडी ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
                               

चांदणीटोला येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न


            मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या कटंगटोला-नवटोला-चांदणीटोला या 4.43 कि.मी. रस्त्यांच्या दर्जा उन्नतीच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बाडोले यांनी 11 डिसेंबर रोजी चांदणीटोला येथे केले.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,  जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर,  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प.सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, सरपंच पुष्पा अटाये यांची उपस्थिती होती.
            पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्हयातील 180 किमीच्या रस्त्यांचे कामे करण्यात येतील. या योजनेतील रस्ते दर्जेदार, चांगले व वेळेत पूर्ण होतील असे नियोजन करण्यात आले आहे. नागरा तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात या तीर्थक्षेत्राला 'ब' दर्जा निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरा येथील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून काही निधी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले, नागरा येथे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला 'ब' दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्यास अनेक सोयीसुविधा येथे उपलब्ध होणार आहे. या योजनेतून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थांना येण्या-जाण्याची चांगली सुविधा निर्माण होईल.
            श्रीमती मेंढे म्हणाल्या, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एक चांगला रस्ता तयार होणार आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी अपेक्षा असते की आपल्या कार्यक्षेत्रातील कामे झाली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जनेतसाठी विविध योजना आहेत. त्या योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
            यावेळी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प.सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, सरपंच पुष्पा अटाये यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला चांदणीटोला, नागरा, नवाटोला येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता जी.जी. नंदनवार यांनी  केले.
                                                              

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण करणार - पालकमंत्री बडोले


          
खमारी येथे रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन
       रस्ते हे विकासाच्या वाहिन्या आहेत. ग्रामीण दळणवळणात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रामीण भागातील रस्ते मुख्य रस्त्यांना जोडून बारमाही वाहतूकीच्या सुविधेसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्हयातील सर्वच ग्रामीण रस्त्यांची कामे टप्याटप्याने पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            11 डिसेंबर रोजी गोंदिया तालुक्यातील खमारी येथील बाजार चौकात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून खमारी ते चुलोद, आसोली, मुंडीपार रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,  जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे, शेखर पटले, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, पंचायत समिती सदस्य सारंग भेलावे, ममता वाढवे, इंद्रायणी धावडे, खमारी सरपंच विमल तावडे, चुलोद सरपंच रेखा ठाकुर, छत्रपाल तुरकर, भोलाराम मेश्राम, भाऊराव उके यांची उपस्थिती होती.
            मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून खमारी ते चुलोद, आसोली मुंडीपार हा रस्ता 10.69 कि.मी.चा असून यावर 4 कोटी 88 लक्ष रुपये खर्च येणार आहे. हे काम लवकर पूर्ण होणार असल्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना येण्या-जाण्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
            पालकमंत्री म्हणाले, या योजनेतून गोंदिया तालुक्यासाठी 39 कि.मी.चे रस्ते मंजूर केले आहे. मागील व यावर्षीचे या योजनेतील कामाचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात रस्त्यांच्या कामाचे नियोजन विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात येतील. जिल्हयात यावर्षी धानाचे चांगले पीक झाले असून शेतकऱ्यांना धान विक्रीची गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी 20 दिवस आधीच धान खरेदी केंद्र सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हयात 100 किमीचे आधुनिक पध्दतीचे रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे सांगून , श्री बडोले पुढे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही रस्त्यांची कामे घेण्यात येतील. यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेवून नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.
            आमदार अग्रवाल म्हणाले, या योजनेतून पालकमंत्र्यांनी तालुक्यातील 39 किमीच्या कामांना मंजुरी दिली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना ज्या प्रमाणे बोनस दिला आहे. त्याचप्रमाणे धानाला भाव देण्याचे कामही सरकारने करावे. पिंडकेपार प्रकल्पाला गती मिळाली पाहिजे असे सांगून ते म्हणाले की, खमारी हे तालुक्यातील मोठे गाव असल्यामुळे  या गावाच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष दयावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            श्रीमती मेंढे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविण्यात येतात. ग्रामीण जनतेला जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पालकमंत्री हे जिल्हयाचेच असल्यामुळे जिल्हयाच्या विकासाला गती मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
            हेमंत पटले म्हणाले, राज्य शासन गावाच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबध्द आहे. येत्या 5 वर्षात जिल्हयातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येतील. या योजनेच्या कामामुळे संबंधित गावातील नागरिकांना बाहेरगावी येण्या-जाण्याची चांगली सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, सरपंच श्रीमत तवाडे यांचीही समायोचित  भाषणे  झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता जी.जी.नंदनवार यांनी केले. उपस्थितांचे आभार परमानंद ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला खमारी, चुलोद, आसोली व मुंडीपार येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                

Saturday 10 December 2016

भविष्यात बचतगटांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देणार - पालकमंत्री बडोले


19 बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटप 
          समाज कल्याण विभागाच्या योजना हया केवळ स्कॉलरशिप व वसतीगृहापर्यंतच मर्यादित नसून त्या सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून राबविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचतगटांना सक्षम करण्यासाठी मिनी ट्रॅक्टरची योजना ही समाज कल्याण विभागाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेतून बचतगटात क्रांती झाली पाहिजे यासाठी भविष्यात बचतगटांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            10 डिसेंबर रोजी सडक/अर्जुनी तहसिल कार्यालय परिसरात समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हयातील 19 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार विठ्ठल परळीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री मोरे, महिन्द्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीचे पियुष मोकाशी यांची उपस्थिती होती.
            श्री बडोले म्हणाले, राज्यात मागील वर्षी 2 हजार मिनी ट्रॅक्टर बचतगटांना वाटप केले. त्या तुलनेत जिल्हयातून बचतगटांनी या योजनेला कमी प्रतिसाद दिला. जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. तो वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. बचतगटांनी ट्रॅक्टरचा वापर जास्तीत जास्त शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी कसे करतील यासाठी प्रयत्न करावे. अनुसूचित जातींच्या घटकातील शेतकऱ्यांसाठी भविष्यात विहिर व कृषी पंपाची योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
            सर्वांना घरे देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, रमाई आवास योजनेची व्याप्ती वाढूवन यामधून 1 लाख 60 हजार घरे सन 2019 पर्यंत बांधण्यात येतील. बचतगट हे सबसिडीपुरते मर्यादित न राहता त्यांनी मिळणाऱ्या विविध योजनांच्या लाभातून प्रभावीपणे काम करावे असेही त्यांनी सांगितले.
            तहसिलदार परळीकर म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा. मिनी ट्रॅक्टर योजनेतून बचतगटातील कुटूंबांना आधार मिळणार असून त्यांना आर्थिक फायदाही होणार असल्याचे सांगितले.
            श्री मोरे म्हणाले, गोंदिया जिल्हा धान उत्पादकांनाचा जिल्हा आहे. बचतगटांना मिळालेल्या मिनी ट्रॅक्टरसोबत रोटावेटर हे उपसाधन दिले आहे. त्याचा उपयोग धान  शेतीसाठी चांगल्या प्रकारे करता येईल. ट्रॉलीचा उपयोग सुध्दा शेती सोबत माल वाहतूकीसाठी करुन आपली आर्थिक स्थिती भक्कम करावी असेही त्यांनी सांगितले.                                                                                                                   
            यावेळी गोरेगाव तालुक्यातील करुणा महिला बचतगट  गणखैरा, रमाई महिला बचतगट गिधाडी , पंचशील  महिला बचतगट कवलेवाडा, करुणा महिला बचतगट तुमसर, प्रेरणा महिला बचतगट तेढा, श्री साई पुरुष बचतगट गणखैरा, आरोही महिला बचतगट निंबा, सहयोग महिला बचतगट बोटे, रमाई महिला बचतगट गोरेगाव, आमगाव तालुक्यातील समता महिला बचतगट कुंभारटोली, फुले शाहू स्वयंसहाय्यता बचतगट कुंभारटोली, सालेकसा तालुक्यातील सिध्दार्थ महिला बचतगट कडोतीटोला, सुजाता महिला बचतगट मक्काटोला, विधाता महिला बचतगट साखरीटोला, दिक्षा महिला बचतग्ट कडोतीटोला, कृषी तथागत महिला बचतगट कहाली, तिरोडा तालुक्यातील रमाबाई महिला बचत गट कोडेलोहारा, पंचशील महिला बचत गट सीतेपार, समता महिला बचतगट करटी अशा एकूण 19 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचतगटांना मीनी ट्रॅक्टर  व उपसाधनांचे वाटप करण्यात आले.

            कार्यक्रमाला जिल्हयातील बचतगटांच्या महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार  प्रदिप ढवळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण निरीक्षक अंकेश केदार, मुख्याध्यापिका संध्या दहिवले, श्री अंबुले यांचेसह अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.  

Sunday 4 December 2016

गोंडी चित्रकलेतून जिल्हयाची नवी ओळख निर्माण करा - अभिमन्यू काळे

गोंदिया महोत्सव 
* गोंडी चित्रकला कार्यशाळा
* 190 चित्रकारांचा सहभाग
            
             गोंदिया,दि.4 : गोंदिया  जिल्हा वन्यजीवसृष्टीने समृध्द असून जिल्हयात निसर्गाने भरभरुन दिले आहे. आदिवासी बहुल असलेल्या या जिल्हयात आदिवासी गोंड समाज बांधव मोठ्या संख्येने आहे. या समाजाची विशिष्ट संस्कृती असून या समाजाची विशिष्ट प्रकारची चित्रकला जोपासली आहे. या चित्रकलेचा व्यापक प्रचार-प्रसार करुन जिल्हयाची नवी ओळख निर्माण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
               जिल्हा पर्यटन समिती गोंदियाच्या वतीने गोंदिया महोत्सव 2016-17 च्या निमित्ताने 4 डिसेंबर रोजी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेट गोंदिया येथे आयोजित गोंडी चित्रकला कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उद्योग मंत्री यांचे खाजगी सचिव श्रीकांत पुलकुंडवार, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहाद्दुर तिडके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेटचे प्राचार्य तथा उमादेवी शिक्षण संस्थेचे सचिव निरज कटकवार, आदिवासी साहित्यीक तथा कवियत्री उषाकिरण आत्राम, उपशिक्षणाधिकारी राजन घरडे यांची उपस्थिती होती.
               गोंदिया महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हयाच्या वैभव संपन्नतेची ओळख व्हावी, त्याचा प्रचार-प्रसार करण्यासोबतच जिल्हयातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन 1 डिसेबर 2016 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान करण्यात आले आहे.
               जिल्हाधिकारी काळेद यावेळी म्हणाले, गोंदिया फेस्टीवलच्या माध्यमातून सारसांचे संरक्षण व संवर्धन व्हावे. या पक्षांना तसेच जिल्हयातील अनेक तलांवावर येणाऱ्या विदेशी व स्थलांतरीत पक्ष्यांना बघण्यासाठी  मोठ्या संख्येने पक्षी प्रेमी व पर्यटक आले पाहिजेत. आजची मुले उद्याची निसर्ग रक्षक झाली पाहिजे. पक्षी निरिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओळख पक्षांची - पक्षीनिरिक्षण कार्यशाळासुध्दा आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
               नवेगाव-नागझिरा फोटोशुट कॉम्पिटीशनचे आयोजन 1 डिसेंबर ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात आले असल्याचे सांगून श्री काळे म्हणाले, जिल्हयाची वन्यजीवसृष्टी कॅमेराबध्द करण्याची संधी हौसी छायाचित्रकारांना या माध्यमातून उपलबध करुन दिली आहे. यासाठी बक्षीससुध्दा ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
               डॉ. पुलकुंडवार म्हणाले, कार्यशाळेतून छंद जोपासला गेला पाहिजे. चित्रकलेची आवड जोपासत असतांना आपल्या पंरपंरेचे प्रतिबिंब त्यामधून उमटले पाहिजेत. शेकडो वर्षाची आदिवासी गोंड चित्रकलेची जोपासना भावी पिढ्यांनी करुन त्याचा प्रचार-प्रसार करावा. अनेक लोकांपर्यंत ही चित्रकला पोहाचली पाहिजे. जीवनात माणसाला अनेक छंद असतात. ते छंद जोपासत असताना त्यामधून व्यक्तीमत्वाचा विकास होत असल्याचे सांगितले.                                                                                                                
             यावेळी जिल्हाधिकारी काळे यांच्या हस्ते प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटचे प्राचार्य निरज कटकवार यांना जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सारस वैभव गोंदियाचे या माहितीपटाच्या डीव्हीडी देण्यात आल्या. त्यामुळे जिल्हयातील पर्यटनस्थळांचा व सारस पक्षांचा प्रचार व प्रसार करण्यास  विद्यार्थ्यांची मोठी मदत होणार आहे.            
                  कार्यशाळेत प्रोग्रेसिव्ह चित्रकला विद्यालय, श्री राजस्थानी इंग्लिश हायस्कुल, सेंट झेविअर हायस्कूल, नुतन विद्यालय, जैन हायस्कूल, विवेक मंदिर, शारदा कॉन्व्हेंट, चित्रांश ॲकडेमी, ॲसेंट पब्लीक स्कुल, सरस्वतीबाई महिला विद्यालय, गुजराती नॅशनल हायस्कूल, बी.एन.आदर्श सिंधी हायस्कूल, श्री गणेश कॉन्व्हेंट, एस.अग्रवाल मुन्सीपल गर्ल्स हायस्कूल, स्वामी थेनारोम आदर्श इग्लिंश हायस्कूल, श्री महावीर मारवाडी हायस्कूल, श्री महावीर मारवाडी अप्पर प्रायमरी स्कूल, श्रीमती चंद्रभागाबाई शांताबेन उच्च प्राथमिक शाळा, सरस्वती शिशू मंदिर हायस्कूल  रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, जीपीएस कॉन्व्हेंट, श्री गुरुनानक इंग्लिश हायस्कूल, श्री गुरुनानक हिंदी हायस्कूल मनोहर मुन्सिपल हायर सेकंडरी स्कुल, रमाबाई आंबेडकर हायस्कूल, साकेत पब्लीक स्कूल, सालेकसा हायस्कूल सालेकसा अशा एकूण 30 शाळेतील 167 विद्यार्थी,  20 चित्रकला शिक्षक व 3 चित्रकार अशा एकूण 190 जणांनी सहभाग घेतला.
           गोंडी चित्रकला कार्यशाळेत सुनंदा ऊईके, संगीता मौजे, उषा पटले, दिनेश मौजे, तेजपाल मडावी, भोजराज भोयर, राधेलाल धुर्वे, प्रतीक ऊईके, इंगेंद्र टेकाम, संध्या मेश्राम व मनोहर ऊईके यांनी उपस्थितांना चित्र रेखाटून मार्गदर्शन केले.
             कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे डॉ. विजय ताते, सातपुडा फाऊंडेशनचे संरक्षण अधिकारी मुकूंद धूर्वे, हिरवळ संस्थेचे रुपेश निबांर्ते, त्र्यंबक जारोदे, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटचे प्राचार्य सर्वश्री विलास नागदेवे, ओ.टी.रहांगडाले, विणा कावळे, निधी व्यास, अभय गुरव, प्रशासन अधिकारी प्रमोद वाडी तसेच कन्हैया अंबाडारे, तोमेश पारधी, सिमरन बास्के यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मुकूंद धूर्वे यांनी मानले.