जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 20 December 2016

आदर्श गावे निर्माण करा - राजकुमार बडोले

                                                हागणदारीमुक्तीसाठी संकल्प मेळावा
           गावे हागणदारीमुक्त झाली पाहिजे ही संकल्पना आपल्याला 21 व्या शतकात राबवावी लागते हे आपले दुर्दैव आहे. हागणदारीमुक्तीसाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. गावे हागणदारीमुक्त, डासमुक्त व कॅशमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून ही संकल्पना प्रत्यक्षात लोकांच्या सहभागातून राबवून जिल्ह्यात आदर्श गावे निर्माण करा, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने हागणदारीमुक्त गोंदिया जिल्हा संकल्प मेळाव्याचे आयोजन 20 डिसेंबर रोजी मयूर लॉन कटंगीकला येथे करण्यात आले होते, या मेळाव्याचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती विमल नागपूरे, कटंगीकलाच्या सरपंच कांता नागरीकर यांची उपस्थिती होती.
       पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, निर्मल झालेली व पुरस्कार मिळालेल्या गावांची आज दुर्दशा झालेली आहे. हागणदारीमुक्त ही संकल्पना केवळ कागदावर न राहता यासाठी मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. 31 मार्च 2017 पर्यंत आपला जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प यंत्रणांनी केल्याबद्दल सर्वांचे त्यांनी कौतुक केले. या मुक्तीसाठी पैशाची अडचण येणार नाही. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी हे गाव विकासाचे कणा आहेत. या सर्वांनी पुढाकार घेतला तर गावाचे निश्चित चित्र बदलेल असे त्यांनी सांगितले.
       जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील किमान 10 पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास झाला तर यातून जिल्ह्याची आगळीवेगळी ओळख निर्माण करता येईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून येत्या तीन वर्षात गरजूंना घरकुले देण्यात येतील. शेतात येण्याजाण्याच्या व्यवस्थेसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून पांदण रस्त्यांची कामे करण्यात येतील. ग्रामपंचायतींनी 3 टक्के निधी हा दिव्यांग व्यक्तींवर खर्च करावा. पालकमंत्री आदर्श गावासाठी आपण व्यक्तीगत 50 हजार रुपये देणार आहोत. यातून एक आदर्श गाव उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
      येत्या 24 डिसेंबर रोजी मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक किर्तीच्या स्मारकाचे भूमीपूजन व जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शिवाजी महाराजांची जीवनमुल्ये याची माहिती देखील या स्मारकातून मिळणार आहे. हे स्मारक तीन वर्षात पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असून यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक आहे. रोजगार हमी योजनेतून देखील शौचालय बांधण्यात येतील. शौचालयाच्या बांधकामात कोणी अडचण निर्माण करत असतील तर त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येईल. मार्च 2017 पर्यंत आपला गोंदिया जिल्हा सर्वांच्या सहभागातून हागणदारीमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.                            खासदार पटोले म्हणाले, केंद्र सरकार ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबवित आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात काही अडचणी आल्यात, आता मात्र या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यात येतील. केवळ बक्षीसासाठी पुर्वी संडास बांधल्याचा देखावा व्हायचा, परंतू आज चित्र बदलले आहे. 12 हजार रुपयात मागेल त्याला संडास बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शौचालय बांधल्यास रोगराईला निश्चित आळा बसणार आहे. गावाच्या विकासाचे नियोजन गावपातळीवर लोकप्रतिनिधींनी करावे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
      आमदार रहांगडाले म्हणाले, गावाच्या विकासासाठी सरपंचाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जी गावे हागणदारीमुक्त झाली नाहीत तेथील सरपंचाने गावातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करावे. शौचालय बांधकामासाठी निधीची कमतरता नसून आवश्यकता पडल्यास जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गावांना हागणदारीमुक्त करुन जिल्ह्याचा नावलौकीक सरपंचांनी करावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा योग्य समन्वयातून काम करीत आहे. जिल्ह्यातील गावे डासमुक्त, कॅशमुक्त व हागणदारीमुक्त करण्यासाठी सभा घेण्यात आल्या आहेत. जी गावे हागणदारीमुक्त झालेली नाहीत ती गावे अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात आलेली आहेत. गावे कॅशलेस करण्यासाठी गावातील 100 कुटुंबासाठी एक कर्मचारी काम करणार असून तो कुटुंबाचे कॅशलेस व्यवहारासाठी बँक खाते हे मोबाईलला लिंक करणार आहे. विदर्भातील पहिला कॅशलेस जिल्हा करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
     प्रास्ताविकातून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पुलकुंडवार यांनी सांगीतले की, पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला सर्वोच्च स्थान दिले आहे. मानवी विकासाची सुरुवात ही स्वच्छतेपासून होते. मात्र याच बाबीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. स्वच्छतेचा शिवधनुष्य पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी उचलला असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांच्या समन्वयातून स्वच्छ भारत अभियानासाठी काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पी.जी.कटरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंचावर जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजेश देशमुख, राजकुमार पुराम यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भंडाराच्या कलावंतांनी स्वच्छ भारत अभियानावर नाटिका सादर करुन उपस्थितांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व तहसिलदार, अनेक गावातील सरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, रोजगार सेवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले व उपस्थितांचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी मानले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
00000
      
       




No comments:

Post a Comment