जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 11 December 2016

जिल्ह्यातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री बडोले



रावणवाडी येथे रस्त्याचे भूमीपूजन
            जिल्हयात शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे, महिलांचे अनेक प्रश्न आहे. अपूर्णावस्थेत असलेले सिंचन प्रकल्प यासह जिल्हयातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            11 डिसेंबर रोजी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथील त्रिमुर्ती चौकात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रावणवाडी, गर्रा, शिवणी, उमरी माकडी या 7.86 कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामाचे भूमीपूजन करतांना आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बडोले बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,  जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प.सदस्य विजय लोणारे, पंचायत समिती सदस्य प्रकाश डहाट, माधुरी हरिणखेडे, श्रीमती पटले, रावणवाडी सरपंच सुजीत येवले यांची उपस्थिती होती.
            पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, रावणवाडी येथील जिर्ण झालेली शाळेची इमारत प्राधान्याने बांधण्यात येईल. रावणवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेत ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. त्यांना न्याय देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. नवीन भूसंपादन कायदयानूसार त्या शेतकऱ्यांना मोबदला देता येईल का हे सुध्दा बघणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार अग्रवाल बोलतांना म्हणाले, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांना त्रास करावा लागत आहे. हे काम पूर्ण होताच रस्त्याची चांगली सुविधा उपलब्ध होईल. 16 वर्षापासून अपूर्णावस्थेत्‍ असलेल्या रजेगांव-काटी उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करुन बाधित शेतकऱ्यांना शासनाने न्याय मिळवून दयावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            श्रीमती मेंढे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या तसेच वैयक्तिक लाभांच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न आहे. रावणवाडी येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न तातडीने सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्रीमती गहाणे म्हणाल्या, जिल्हयात अनेक पर्यटन स्थळे आहे. दुर्मिळ अशा सारस पक्षांचे अस्तीत्व केवळ रावणवाडीच्या भागातील परसवाडा, झिलमिली परिसरात आहे. जनसुविधा, दलीत वस्ती विकास, आदिवासी विकास, यासह अनेक योजना शासन राबवित असून यासाठी जिल्हयाकरीता जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचे काम पालकमंत्री करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्री विनोद अग्रवाल म्हणाले, जिल्हयातील ग्रामीण भागात जेथील रस्ते खराब आहेत तेथील सर्व रस्ते चांगल्या दर्जातून तयार करण्याचे काम या योजनेतून करण्यात येईल. कटंगीटोला प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे. त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी सरपंच येवले यांनी विविध समस्या यावेळी मांडल्या. जि.प.सदस्य विजय लोणारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व उपस्थितांचा आभार कार्यकारी अभियंता जी.जी.नंदनवार यांनी मानले. कार्यक्रमाला रावणवाडी ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
                               

No comments:

Post a Comment