जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 11 December 2016

चांदणीटोला येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न


            मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या कटंगटोला-नवटोला-चांदणीटोला या 4.43 कि.मी. रस्त्यांच्या दर्जा उन्नतीच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बाडोले यांनी 11 डिसेंबर रोजी चांदणीटोला येथे केले.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,  जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर,  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प.सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, सरपंच पुष्पा अटाये यांची उपस्थिती होती.
            पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्हयातील 180 किमीच्या रस्त्यांचे कामे करण्यात येतील. या योजनेतील रस्ते दर्जेदार, चांगले व वेळेत पूर्ण होतील असे नियोजन करण्यात आले आहे. नागरा तीर्थक्षेत्राला ब दर्जा मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात या तीर्थक्षेत्राला 'ब' दर्जा निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरा येथील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून काही निधी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले, नागरा येथे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला 'ब' दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्यास अनेक सोयीसुविधा येथे उपलब्ध होणार आहे. या योजनेतून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थांना येण्या-जाण्याची चांगली सुविधा निर्माण होईल.
            श्रीमती मेंढे म्हणाल्या, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एक चांगला रस्ता तयार होणार आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी अपेक्षा असते की आपल्या कार्यक्षेत्रातील कामे झाली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जनेतसाठी विविध योजना आहेत. त्या योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
            यावेळी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प.सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, सरपंच पुष्पा अटाये यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला चांदणीटोला, नागरा, नवाटोला येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता जी.जी. नंदनवार यांनी  केले.
                                                              

No comments:

Post a Comment