जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 20 December 2016

अरबी समुद्रात होणार शिवछत्रपतींचे भव्य स्मारक पालकमंत्री यांची पत्रपरिषदेत माहिती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई जवळच्या अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तीन वर्षात पूर्ण होणार असून येत्या 24 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे जलपूजन व भूमीपूजन होणार असल्याची माहिती पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
       कटंगीकला येथील मयूर लॉन येथे आज 20 डिसेंबर रोजी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या पत्रपरिषदेला जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती विमल नागपूरे, आमगाव पं.स.सभापती श्रीमती हेमलता डोये, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, गोंदिया पं.स.सभापती स्नेहा गौतम यांची उपस्थिती होती.
        पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, जगातील सर्वात उंच असे हे स्मारक राहणार असून राजभवनापासून जवळ असलेल्या समुद्रातील 15.96 हेक्टर बेटावर हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या जलपूजन व भूमीपूजनासाठी जिल्ह्यातील प्रतापगड, कचारगड येथील पवित्र माती व जिल्ह्यातील नदयांचे जल या कार्यक्रमासाठी  पाठविण्यात येणार आहे. राज्यातील 70 हून अधिक नदयांचे जल व गडकिल्‍ल्यांची माती या कार्यक्रमाला आणली जाणार असल्याचे सांगितले.
       आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभर फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याच्या वतीने हे अनोखे वंदन असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, राज्याच्या तेजस्वी व गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेवून प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे यासाठी 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करुन त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
      या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 192 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे प्रारंभी नियोजन होते. आता या पुतळयाची उंची 210 मीटर इतकी वाढविण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या स्मारकात महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अति महत्वाच्या व्यक्तींसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले.
       शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे सांगून बडोले यावेळी म्हणाले, हे स्मारक भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी देखील पर्यटनस्थळ असणार आहे. महाराजांची जीवनमुल्ये प्रदर्शीत करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
                                                

No comments:

Post a Comment