जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 26 November 2016

सर्व रस्त्यांची कामे सन 2019 पर्यंत पूर्ण करणार - राजकुमार बडोले



खांबी येथे रस्त्याचे व सभा मंडपाचे भूमीपूजन
     जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यात  2 हजार सिंचन विहिरी बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेवून धान खरेदी केंद्र ऑनलाईन करण्यात आले आहे. विकासाच्या दृष्टीने रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे सन 2019 पर्यंत नियोजनातून पूर्ण करणार. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        25 नोव्हेंबर रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील खांबी येथे इटखेडा-निमगाव-खांबी-इंजोरी व बाक्टी रस्त्याची सुधारणा आणि जि.प.शाळेतील सभा मंडपाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य कमल पाउलझगडे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, सा.बां.कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, तहसिलदार श्री.बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, उपविभागीय अभियंता श्री.क्षत्रीय, प्रकाश लांजेवार, सरपंच शारदा खोटेले, माजी सरपंच वासुदेव खोटेले, नारायण भेंडारकर, नेमीचंद मेश्राम, चामेश्वर गहाणे यांची मंचावर उपस्थिती होती.
        श्री.बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर्वांना 2019 पर्यंत घरे देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतला असून इंदिरा आवास योजना, शबरी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी योजनेतून ही घरे बांधण्यात येणार आहे. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 100 रुपयांची वाढ करुन आता ती महिन्याला 700 रुपये अशी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
        जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल करण्यात येईल असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करुन सिंचन क्षमतेत वाढ होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         श्रीमती गहाणे म्हणाल्या, एखादया क्षेत्राची प्रगती ही टप्प्याटप्प्याने होत असते. प्रगतीच्या दृष्टीने योजना राबवितांना सरपंच, पं.स.सदस्य, जि.प.सदस्य आणि ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. पालकमंत्री बडोले यांना जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे निश्चितच विकासाला चालना मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
         सभापती शिवणकर म्हणाले, खांबीच्या विकासाच्या दृष्टीने टप्प्या टप्प्याने कामे करण्यात आली आहे. यापुढेही खांबीच्या विकासासाठी आपले पूर्ण सहकार्य राहणार असून या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा लवकरच सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य कमल पाउलझगडे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनीही मार्गदर्शन केले.

       पालकमंत्र्यांच्या हस्ते खांबी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात सभा मंडपाचे भूमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला खांबी ग्रामपंचायत, ग्राम शिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment