जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 27 November 2016

‘गाव तेथे मुक्काम’ केशोरीतील मुक्कामातून पालकमंत्र्यांचा ग्रामस्थांशी संवाद • जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती • केशोरी व परिसरातील नागरिकांनी मांडल्या समस्या






गोंदिया,दि.27 : जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी हा परिसर म्हणजे मागास, दुर्गम, आदिवासी बहुल आणि नलक्षदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असला तरी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या हा परिसर मागास आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी गाव तेथे मुक्काम या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा मुख्यालयापासून टोकावर असलेल्या केशोरी या मतदारसंघातील गावात 25 नोव्हेंबर रोजी मुक्काम करुन गाव व परिसरातील ग्रामस्थांशी जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित सभेतून संवाद साधला.
       केशोरी सारख्या मागास भागातील 30 ते 35 गावाच्या विकासाला पालकमंत्र्यांच्या मुक्कामामुळे चालना मिळाली. कडाक्याच्या थंडीत देखील केशोरी व परिसरातील ग्रामस्थ आपल्या गावाच्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.
      ज्या कर्मचाऱ्यांची/अधिकाऱ्यांची ज्या गावासाठी नियुक्ती करण्यात येते. परंतू ते मुख्यालयी राहत नसल्यामुळे गावपातळीवर अनेक लोकांची, लाभार्थ्यांची कामे खोळंबून जातात. त्यामुळे यंत्रणांप्रती त्यांचा रोष निर्माण होत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. यंत्रणेच्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाच्या ज्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या त्या चोखपणे त्यांनी पार पाडाव्यात.
       केशोरी हा दुर्गम व मागास भाग असल्यामुळे विविध यंत्रणांनी नियोजन करुन विकास कामे करण्याचे निर्देश देवून पालकमंत्री पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचा मुख्यत: संबंध हा तलाठ्याशी आणि ग्रामसेवकांशी येतो. तेव्हा तलाठ्यांनी साजाला तर ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतला उपलब्ध असले पाहिजे. ग्रामीण भागातील व्यक्ती कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी आपली मजूरी बुडवून किंवा शेतीचे कामे सोडून येतो तेव्हा त्याला तो अधिकारी किंवा कर्मचारी जागेवर मिळत नाही. त्याचे काम न झाल्यामुळे तो निराश होतो. ग्रामीण भागातील जनतेची आणि विकासाची कामे करतांना यंत्रणांनी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करावे. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
      गाव तेथे मुक्काम या कार्यक्रमाअंतर्गत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासन सामान्य लोकांपर्यंत पोहचत आहे आणि गावाच्या समस्या या कार्यक्रमातून सोडविण्यास मदत होत आहे. असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे यांनी हा दिवस केशोरी ग्रामस्थांच्या दृष्टीने ऐतिहासिक असून पालकमंत्र्यांचा गाव तेथे मुक्काम हा आगळा वेगळा प्रशासकीय कार्यक्रम असल्याचे सांगितले. तालुका पातळीवरील प्रमुख अधिकाऱ्यांनी संबंधित गावचा कर्मचारी तसेच शिक्षक गावात मुक्कामी राहतो की नाही याची खात्री करावी. राहत असल्यास घरभाडे भत्ता दयावा, अन्यथा हा भत्ता देवू नये. गावात तो कर्मचारी राहत असल्याचे प्रमाणपत्र सुध्दा घ्यावे असेही त्यांनी सांगितले.
       केशोरी आणि परिसरातील गावातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची नोंद घेण्यात आली असून या भागाच्या तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी आलेला निधी वापस जाणार नाही याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
     केशोरी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने माजी जि.प.सभापती प्रकाश गहाणे यांनी परिसरातील समस्यांबाबत अवगत करुन अपूर्णावस्थेतील प्रकल्प व कामे त्वरित पूर्ण झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यामध्ये केशोरी-नवेगावबांध राज्य मार्ग वन विभागाच्या क्षेत्रातून जात असल्यामुळे येणाऱ्या अडचणी, अरडतोंडी येथील मार्गावर उंच पुलाची मागणी, केशोरी येथून अर्जुनी/मोरगावकडे जाण्यासाठी वळण रस्त्याची आवश्यकता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या भागातील करावयाची रस्त्यांची कामे, पांदण रस्त्यांची कामे, केशोरी येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी, तुकुमनारायणचा तलाव ग्रामपंचायतकडे हस्तांतरणाची मागणी, गाढवी नदीवर दर तीन कि.मी.अंतरावर साठवणूक बंधाऱ्याची आवश्यकता, परिसरातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची मागणी, जांभळी, सुरतोली, गार्डनपूर तलावाची कामे पूर्ण करणे, इटियाडोह प्रकल्पातून केशोरी, तुकुमनारायण व गटारी असा कालवा तयार करण्याची मागणी, धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा सर्व धान खरेदी करण्यात यावा. धान खरेदी करतांना शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येवू नये. त्यांच्या हुंड्या वापस येवू नये, आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, अशा विविध मागण्या ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या.
      कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी यांनी इळदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे. या भागात संबंधित गावचे कर्मचारी व शिक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून पाणलोटच्या कामात अनियमितता असल्याचे त्यांनी सांगितले.
       जळावू लाकडाची उपलब्धता झाली पाहिजे, नायब तहसिलदार कार्यालय केशोरी येथे सुरु करावे, रेशन कार्डवर योग्यप्रकारे धान्य मिळत नाही, मानव विकास मिशनच्या बसेसच्या फेऱ्यात वाढ करावी, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा केशोरी येथे सुरु करावी, करांडली येथील रोहयोच्या मजुरांना अद्यापर्यंत मजूरी मिळाली नाही, अरडतोंडी येथील शाळेची जीर्ण झालेली इमारत व रिक्त शिक्षकांची पदे, केशोरी येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात मागील दोन वर्षापासून रिक्त असलेले पशूवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याबाबतच्या तक्रारी, धान साठवणूकीसाठी गोदामाची आवश्यकता, यासह केशोरी परिसरातील समस्यांची या सभेत चर्चा झाली.
       पालकमंत्र्यांनी केशोरीत मुक्कामादरम्यान ऐकून घेतलेल्या समस्या व प्रश्नांची जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून हया समस्यांच्या सोडवणूकीसाठी नियोजन करावे असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
       सभेच्या प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त दीप प्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सभेला माजी आमदार दयाराम कापगते, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, जि.प.माजी सभापती प्रकाश गहाणे व उमाकांत ढेंगे, अर्जुनी/मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काशिम जामा कुरेशी, पं.स.सदस्य रामलाल मुंगनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, बाघ-इटियाडोह पाटबंधारे विभागाचे श्री.छप्परधरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंबादे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निगगडे, लघु सिंचनचे कार्यकारी अभियंता विलास निखारे, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, शिक्षणाधिकारी श्री.नरड, प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर यांचेसह अर्जुनी/मोरगाव तहसिलदार श्री.बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राऊत, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गोंडाणे यांचेसह विविध यंत्रणांचे जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
      गाव तेथे मुक्कामया पालकमंत्र्यांच्या सभेला केशोरी व परिसरातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, गाव पातळीवरील विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी आपल्या गावातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना अवगत केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार गट विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment