जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 26 November 2016

गोवारींचा अनुसूचित जमातीत समावेशासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री बडोले


निमगाव येथे समाज भवन भूमीपूजन
       गोवारी ही स्वतंत्र जात आहे. 1950 च्या सूचीत चुकीने गोंड गवारी असा उल्लेख आल्यामुळे घोळ झाला. गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
        25 नोव्हेंबर रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील निमगाव/बोंडगाव येथे 22 व्या स्थानिक शहीद गोवारी श्रध्दांजली कार्यक्रम व समाज भवनाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, जि.प.सदस्य कमल पाउलझगडे, सरपंच देवाजी डोंगरे, सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, उपसरपंच विलास गायकवाड, तहसिलदार श्री.बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, पोलीस निरिक्षक श्री.बंडगर, संजय कापगते, आदिवासी गोवारी संघटना महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष एम.आर.चचाणे, प्रमोद पाउलझगडे, बळीराम गोबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       पालकमंत्री श्री.बडोले म्हणाले, गोवारींचा समावेश आदिवासी जमातीमध्ये व्हावा यासाठी अभ्यास गटामध्ये समाजाचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. संशोधन प्रक्रियेत समाजाचे प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. बैठक घेवून मार्ग काढता येईल. राज्य शासन आपल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी श्रीमती गहाणे यांनीही मार्गदर्शन केले. श्री.चचाणे यांनी गोवारींच्या समस्या, गोवारी बांधव आदिवासी असल्याचे सांगून त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत करावा अशी मागणीही त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी 22 व्या स्थानिक शहीद गोवारी श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला. शहीद स्मारकाला मान्यवरांनी पुष्प वाहिली. गोवारी समाज भवनाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले.
      कार्यक्रमाला निमगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी, गोवारी समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक एम.आर.चचाणे यांनी केले. संचालन उमेश ठाकरे यांनी, तर उपस्थितांचे आभार आनंदराव येसनसुरे यांनी मानले.
            

No comments:

Post a Comment