जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 25 March 2019

राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएमचे पहिल्या टप्प्यात सरमिसळीकरण



 
      येत्या 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्याअनुषंगाने आज 25 मार्च रोजी नविन प्रशासकीय इमारतीतील जिल्हा माहिती कार्यालयात असलेल्या प्रसारमाध्यम कक्षात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या समोर इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनचे पहिल्या टप्प्यात संगणकाच्या माध्यमातून सरमिसळीकरण करण्यात आले.
       जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यावेळी म्हणाल्या, विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापराबाबत मनात शंका ठेवू नये. निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे केली जाते. या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांना विश्वासात घेतले जाते. ईव्हीएम बाबत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यात येते. संगणक प्रक्रियेच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनचे सरमिसळीकरण करण्यात येत असल्यामुळे कोणत्या विधानसभा क्षेत्रातील कोणत्या मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जाणार आहे हे सांगता येणार नाही. जिल्ह्यात गोंदिया आणि अर्जुनी/मोरगाव येथील प्रत्येकी एक मतदान केंद्रावर 1400 पेक्षा जास्त मतदार असल्यामुळे दोन आणखी मतदार केंद्राची आवश्यकता असून या दोन मतदान केंद्राला मंजूरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
         भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, गोंदिया व तिरोडा हे विधानसभा मतदारसंघ येतात. तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आमगाव विधानसभा मतदारसंघ येतो. आमगाव विधानसभा मतदारसंघात 310 मतदान केंद्र येतात. त्यासाठी 310 बॅलेट युनिट मंजूर असून राखीव 25 टक्के म्हणजे 79 बॅलेट युनिट, असे एकूण 389 बॅलेट युनिट, आमगाव मतदारसंघासाठीच 310 कंट्रोल युनिट आणि 25 टक्के राखीवमध्ये 79 कंट्रोल युनिट आणि 310 मतदान केंद्रासाठी 310 व्हीव्हीपॅट मंजूर असून 32 टक्के म्हणजे 100 व्हीव्हीपॅट मशीन अशा एकूण 410 व्हीव्हीपॅट मशीन आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी देण्यात येणार आहे.
        अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील 316 मतदान केंद्रासाठी 316 बॅलेट युनिट मंजूर असून 17 टक्के राखीव म्हणजे 57 बॅलेट युनिट, असे एकूण 373 बॅलेट युनिट, 316 कंट्रोल युनिट मंजूर असून 17 टक्के राखीव म्हणजे 57 कंट्रोल युनिट, असे एकूण 373 कंट्रोल युनिट मतदान केंद्रासाठी तर 316 व्हीव्हीपॅट मशिन मंजूर असून, 28 टक्के राखीव व्हीव्हीपॅट असून ती संख्या 90 आहे असे एकूण 406 व्हीव्हीपॅट मशिन अर्जुनी/मोरगाव या विधानसभा क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे.
         गोंदिया विधानसभा क्षेत्रातील 360 मतदान केंद्रासाठी 360 बॅलेट युनिट मंजूर असून 17 टक्के राखीव म्हणजे 63 बॅलेट युनिट, असे एकूण 423 बॅलेट युनिट मंजूर आहे. 360 कंट्रोल युनिट मंजूर असून 17 टक्के राखीव ठेवण्यात आले असून ही संख्या 63 कंट्रोलची आहे. या विधानसभा क्षेत्रासाठी 423 कंट्रोल युनिट लागणार आहे. तर 360 व्हीव्हीपॅट मंजूर असून 27 टक्के म्हणजे 99 व्हीव्हीपॅट राखीव राहणार आहे. ही व्हीव्हीपॅटची संख्या एकूण 459 इतकी राहील.                                                                                                              तिरोडा विधानसभा क्षेत्रातील 295 मतदान केंद्रासाठी 295 बॅलेट युनिट मंजूर असून त्यामध्ये राखीव 17 टक्के म्हणजे 51 बॅलेट युनिट राखिव राहणार असून एकूण 346 बॅलेट युनिट या मतदारसंघासाठी पुरविण्यात येणार आहे. याच मतदारसंघासाठी 295 कंट्रोल युनिट मंजूर असून 17 टक्के म्हणजे 51 कंट्रोल युनिट राखीव राहणार आहे. असे एकूण 346 कंट्रोल युनिट या मतदारसंघासाठी पुरविण्यात येणार आहे. तर 295 व्हीव्हीपॅट मंजूर असून 27 टक्के राखीव म्हणजे 80 व्हीव्हीपॅट असतील. तर एकूण 375 व्हीव्हीपॅट यंत्राचा पुरवठा या मतदारसंघासाठी करण्यात येणार आहे.
        पहिल्या पातळीवर करण्यात आलेल्या सरमिसळीकरणानंतर ईव्हीएम मशीन, सीपीयु मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन मतदारसंघनिहाय तेथील स्ट्राँग रुमला पाठविण्यात येणार आहे. ज्या वाहनामधून ह्या मशिन्स जाणार आहेत त्या वाहनाला सुध्दा जीपीएस मशीन लावण्यात येणार आहे. नविन प्रशासकीय इमारतीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमचे कुलूप उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात आले.
       यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी राहूल खांडेभराड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
00000

No comments:

Post a Comment