जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 6 January 2020

केंद्र शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यत पोहोचवा - खा.अशोक नेते

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सभा

           केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.
        6 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन खा.नेते बोलत होते. खा.सुनिल मेंढे, आ. विनोद अग्रवाल, आ.मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        खा.नेते पुढे म्हणाले, केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागासाठी अनेक योजना आहेत. मात्र या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही असे दिसून येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असे सांगून श्री.नेते म्हणाले, यासाठी कृषि विभागाने गावपातळीवर या योजनेची माहिती शेतकऱ्यांना दयावी. शेतपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा. नैसर्गीक आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना वेळीच मदत करावी. गरीब व गरजू व्यक्तींना यादृष्टीने लाभ देण्यासाठी प्रशासनाने लक्ष दयावे, असे त्यांनी सांगितले.
        प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना ही बेरोजगार व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून श्री.नेते म्हणाले, बँकांनी या योजनेअंतर्गत तीन गटातून कर्ज देतांना बेरोजगारांची दिशाभूल करु नये. जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी प्रबंधक यांनी मुद्रा बँक योजनेत व्यक्तीश: लक्ष घालून बँकांना निर्देश दयावे असे सांगितले.  
        जिल्ह्यातील वन जमिनीवरील अतिक्रमण नियमीत झाले पाहिजे असे सांगून श्री.नेते म्हणाले, नवनवीन कृषि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषि विभागाने प्रोत्साहित करावे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होवून पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
        खा.मेंढे म्हणाले, बिरसी विमानतळाजवळ आबादी प्लॉटवर 15 लोकांनी घरे बांधलेली आहेत. विमानतळ विभागाकडून सदर घरे खाली करण्याकरीता संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. त्याठिकाणी बऱ्याच वर्षापासून 106 लोक थांबलेली आहेत. त्या लोकांना योग्य तो न्याय देवून प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.
       शेतकऱ्यांना गोठा बांधकामाची गरज आहे. त्यासाठी कोणतेही काम ठरलेल्या वेळेतच झाले पाहिजे. व्यक्तीगत लाभाचे प्रलंबीत कामे लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या घरांचे, गोठ्याचे नुकसान झाले असल्यास त्यांना योग्य लाभ देण्यात यावा. नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्युत कनेक्शन कापू नये. मुद्रा योजनेचा लाभ बेरोजगार व गरजू व्यक्तींनाच दिला पाहिजे यासाठी लक्ष घालण्यात येत असून बेरोजगारांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
       आ. अग्रवाल म्हणाले, मुद्रा लोनबाबत बँकांची फारच उदासिनता दिसून येत आहे. यावर जिल्हास्तरीय मुद्रा समितीने योग्य तो निर्णय घेवून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले. आ. चंद्रिकापुरे म्हणाले, गोंगले ते कोसमतोंडी रेल्वे रस्त्याचे काम प्रलंबीत असल्यामुळे ते काम पूर्ण करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
        सभेला उपस्थित काही गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींनी समस्या मांडल्या. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, जि.प.सदस्य रचना गहाणे, नगरसेविका भावना कदम यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक श्री. हाश्मी यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वैशाली खोब्रागडे यांनी केले.
00000


No comments:

Post a Comment